जगन्नाथ पुरी मंदिर:चमत्कार आणि वास्तव

राहुल थोरात -

जगन्नाथ पुरी भेट :

१५ ऑटोबरला आम्ही जगन्नाथ पुरीत पोचलो. पुरी मंदिराविषयी चमत्काराच्या अनेक दंतकथा आम्ही ऐकल्या होत्या. ऑनलाइन व्हिडिओ, स्थानिक बुक स्टॉलवरच्या माहिती पुस्तकात आजही त्या उपलब्ध आहेत. वारा ज्या दिशेने येतो, तिकडेच जगन्नाथ मंदिरावरील ध्वज फडकतो! शिखरावरील नीलचक्र सगळीकडून सारखेच दिसते, शिखरावरून पक्षी उडू शकत नाहीत, जवळच्या समुद्रलाटांचा आवाज मंदिरात ऐकायला येत नाही… एक ना अनेक.

सकाळी लवकर उठून जगन्नाथपुरी मंदिराला भेट द्यायला निघालो. भगवानांची वेषपूजा, भोजपूजा सुरू असल्याने भलीमोठी दर्शनरांग थांबवून ठेवलेली. दोन हजार भक्तांची रांग ‘जय जगन्नाथ’चा नारा देत होती. अबाल-वृद्ध उकाड्याने हैराण होत दीड तास थांबले होते. बाजूच्या, मंदिर प्रशासनाच्या डिजिटल पडद्यावर सतत मंदिरातील हुंडीत मिळाल्याच्या सोने, चांदी, पैसे दानाची माहिती फिरत होती. भक्तांना आत गेल्यावर ‘तुम्हीही हे करू शकता,’ अशीच जणू साद घालून सांगत होती. दीड तासांनी रांग सुरू झाली. प्रचंड चेंगराचेंगरी, गर्दी करत आत प्रवेश केला.

दोन्ही बाजूला पंडे (पुजारी) ‘अभिषेक कीजिये, पूजा कीजिये, दान कीजिये!’ असे म्हणत एकेका भक्ताला तीन-चार जण गळ घालत होते. त्यांना चुकवण्याची कसरत करत मंदिरात गेलो. या मंदिराभोवती साधारण वीस फूट उंचीची कडेकोट भिंत आहे. आत विविध देवतांची चाळीसएक लहान मंदिरे आहेत. मुख्य गाभार्‍यात जगन्नाथ (कृष्ण) बलभद्र आणि सुभद्रा यांच्या काष्ठमूर्ती आहेत. गाभार्‍यापासून वीस फुटांवरून दर्शन घ्यायला परवानगी असते. (याच गाभार्‍यात महात्मा गांधी, गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर, आचार्य विनोबा भावे, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना प्रवेश नाकारला होता, अशी माहिती आम्हाला अगोदरच तेथील कार्यकर्त्यांनी दिली होती). एका मिनिटात गर्दीच्या धक्क्याने तुम्हाला आपोआप बाहेरच्या रस्त्यावर आणले जाते. मुख्य मंदिराचा दरवाजा ओलांडला की, मुक्ती मंडपात साठ-सत्तर पंडे, ‘श्राद्ध करा, तांत्रिक क्रिया करा,’ असे सुचवतात. तंत्र-मंत्र साधना करण्यासाठी येथे वेगळं तांत्रिक मंदिर आहे. मुक्ती मंडपासमोरच्या नृसिंह मंदिराच्या प्रवेशव्दाराच्या दगडी भिंतीवर कोरलेले मोठमोठे शिलालेख आम्ही पाहिले. “यावर काय लिहिले आहे,” असे आम्ही तेथील पंड्यांना विचारले असता ते म्हणाले, “हे पाली भाषेतील प्राचीन शिलालेख आहेत, पाली भाषा आम्हाला येत नाही. त्यामुळे त्यावर काय लिहिले आहे, ते आम्हाला माहिती नाही.”

लांब लाकडी छडीने मारून पंडे लोकांना ‘आशीर्वाद’ देतात. त्यानंतर दक्षिणेसाठी हात पसरतात. मंदिरात वर्षभर नित्य भोगपूजा करण्याचा तुमचा विचार असेल तर कमीत कमी ११०० ते पाच लाख रुपयांपर्यंतचे दान स्वीकारून पावती दिली जाते. कोरोना काळात हे मंदिर बंद ठेवू नका, म्हणत मोठे आंदोलन झाले होते; मात्र सुप्रीम कोर्टाने फटकारले तेव्हा ते बंद करण्यात आले.

चमत्कार आणि वास्तव:

आम्ही ऐकलेले चमत्कार तपासायला सुरुवात केली. शिखरावर समुद्री पक्षी, घारी, कावळे आरामात उडत होते. ध्वज वार्‍याच्या दिशेने नाही, तर उलट निसर्गनियमाप्रमाणे फडकत होता. आजूबाजूच्या घरांवरील पताकाही त्याच दिशेने फडकत होत्या! नीलचक्रही वेगळे-वेगळे दिसते. मंदिरापासून दीड-दोन किलोमीटर दूर किनारा असल्याने समुद्राच्या लाटांचा आवाज मंदिराच्या आत येणे शयच नाही. एकंदर, लोकांना चमत्कारी कथा रंगवून सांगत धार्मिक महत्त्व वाढवण्याची चलाखी इथेही दिसली.

पुरीतील पुरोगामी

मंदिराला भेट दिल्यानंतर आम्ही पुरीतील प्रागतिक विचारांच्या कवी लेखिका ज्योत्स्नामई मिश्र यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. त्या ‘प्रगतशील पाठचक्र’ नावाने अभ्यासवर्ग चालवतात. त्यांचे सहकारी राखी नारायण मिश्र, सुरेंद्र तपस्सू यांचीही भेट झाली. “आम्ही महाराष्ट्रातून आलोय, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहोत,” हे सांगितल्यावर त्यांना अत्यानंद होऊन त्यांनी उभे राहून आमचे स्वागत केले. या तिघांशी आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली.

त्यांनी सांगितले, “आम्ही डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर पुरी शहरामधील ‘चिंतनचक्र’ हॉलमध्ये जाहीर निषेध सभा घेतली होती. ओरिसामधील प्रसिद्ध लेखक पवित्र दास यांना यासाठी बोलवले होते. पुरी जिल्ह्यातील प्रागतिक विचारांचे शेकडो कार्यकर्ते या निषेध सभेला उपस्थित राहिले होते.’ डॉ. दाभोलकरांचा विचार येथे जगन्नाथ पुरीमध्येही पोचला आहे, हे पाहून आम्ही भारावून गेलो.

ज्योत्स्नामई सांगायला लागल्या की, त्या ‘वैज्ञानिक मनोभाव’ या मासिकामध्ये कॉलम चालवतात. पुरीच्या मंदिरात आजही जातव्यवस्था पाळली जाते. तेथे प्रत्येक जातीला त्यांच्या जातीनुसार कामे वाटून दिली आहेत. पण स्त्रियांना या कामात कोठेही स्थान नाही; फक्त देवापुढे नृत्य करणारी ‘माहरी (देवदासी) प्रथा’ होती, त्यात तेवढा महिलांचा सहभाग होता. पूर्वी शेकडो देवदासी देवाच्या परंपरागत सेवेसाठी होत्या. आता मात्र ही ‘माहरी’ प्रथा बंद झाली आहे.

राखी नारायण मिश्र म्हणाले, ‘जगन्नाथ हा मूळ आदिवासी समाजातील नीलमाधव देव आहे, असे म्हणतात. तो पूर्वी जंगलात होता. वैष्णव संप्रदायाचे अनुयायी असलेल्या राजांनी त्यांचे रूपांतर वैदिक देवतेत करून त्याला पुरीच्या समुद्रकिनारी आणले.’

राखी नारायण मिश्र पुढे म्हणाले, “ओरिसातील प्रसिद्ध ‘महिमा’ धर्माचे संस्थापक, कोंढ आदिवासी जातीत जन्मलेले ‘भीम भोई’ नावाचे एक विद्रोही संत होऊन गेले. त्यांनी समाजातील जातिभेद नष्ट करण्याची मोठी मोहीम राबवली. आजही ‘महिमा’ धर्माचे लाखो अनुयायी ओरिसात आहेत. वैदिक धर्मातल्या अंधश्रद्धांवर आघात करणारा आणि ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान देणारा पंथ म्हणून त्याला तीव्र विरोधही होत होता.” (महाराष्ट्रातील आपल्या वारकरी संप्रदायाप्रमाणेच हा एक पंथ ओरिसात आहे).

मिश्र अधिक माहिती सांगताना म्हणाले की, ‘या महिमा धर्माचे एक अनुयायी पुरीच्या राजाचे राजवैद्य होते. पुरीच्या राजाने या राजवैद्याची हत्या केली, तेव्हा महिमा धर्माचे लाखो अनुयायी राजाला जाब विचारायला पुरीला आले. भीम भोईंच्या अनुयायांनी जगन्नाथ मंदिराला घेराव घातला. जगन्नाथाची मूर्ती ते मागत होते, तेव्हा पंड्यांनी त्यांना अडवले. तेथे झालेल्या धूमश्चक्रीत अनेक लोक मारले गेले. (याचा उल्लेख दै. ‘लोकसत्ता’च्या एका लेखात अरुणा ढेरेंनीही केला आहे.) तेव्हापासून दलित, आदिवासींना मंदिरप्रवेश बंद आहे; ते हिंदू असले तरीही. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच ‘फक्त हिंदूंनाच प्रवेश’ अशी पाटी आजही लावलेली दिसते. गाभार्‍यात हिंदूंना प्रवेश आहे; पण उच्चवर्णीय हिंदूंना. इतरांच्यासाठी मंदिराबाहेर एक पतितपावन मंदिर उभारून चलाखीने त्यांची बोळवण केली आहे. बलराम दास नावाच्या लेखकाने अनेक लेखांमधून इथले वास्तव सांगितले आहे. सीताकांत महापात्रा यांनीही यावर ओडिया भाषेत बरेच लिखाण केले आहे.

जगन्नाथ रथयात्रेसंबंधी माहिती देताना राखी नारायण मिश्र सांगत होते, “जगन्नाथाचा लाकडी रथ दरवर्षी बनवला जातो. त्याला ओढण्यासाठी लाखो लोक येतात. हा रथ ओढल्यानंतर स्वर्गप्राप्ती होते, अशी लोकांची श्रद्धा आहे. ज्या दोरखंडाने रथ ओढतात, त्यांचे धागे लोक घरी नेऊन त्याची पूजा करतात. हात-पाय, सांधे दुखू लागले की ते पवित्र दोरखंडाचे धागे अंगाला बांधतात.”

बौद्ध साहित्याचे अभ्यासक असलेले सुरेंद्र तपस्सू यांनी आम्हाला माहिती दिली की, “ओरिसाचे माजी मुख्यमंत्री जानकीवल्लभ पटनाईक यांनी लिहिलेल्या एका प्रबंधात, येथे बुद्धांचा दात असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे या प्रदेशाला ‘दंतपुरी’ म्हटले जायचे. येथील रथयात्रा ही बुध्दाच्या संघप्रचाराचेच एक स्वरूप आहे. पटनाईक यांनी ‘बुध्दा’ या नावाचे पुस्तकही लिहिले आहे. आजही हा परिसर कलिंग देशामधील बुध्द अवशेषांच्या खाणाखुणांनी भरलेला आहे.” त्यांनी ते पुस्तक आम्हाला काढून दाखवले.

ज्योत्स्नामई एका पवित्र धार्मिक गावामध्ये एक पुरोगामी विचार रुजविण्याचे काम करतात म्हणून शेजारी-पाजारी त्यांच्याशी व्देषाने वागतात, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. एकंदर, महाराष्ट्र काय आणि ओरिसा काय; धार्मिक कथा, लोकांचे भ्रम सर्वत्र सारखेच आढळले.

हम होंगे कामयाब एक दिन!

आमच्या आठ दिवसांच्या दौर्‍यात आम्ही ओरिसातील अनेक विवेकवादी कार्यकर्त्यांना, लेखक – कवी – पत्रकार, शिक्षक – विद्यार्थी, वरिष्ठ पोलीस अधिकारी – पोलीस शिपाई, सनदी अधिकारी, दलित – मुस्लिम – आदिवासी – डाव्या कार्यकर्त्यांना भेटलो. हे सर्व जण आपापल्या परीने ओरिसा राज्याला विवेकवादी, विज्ञानवादी करण्यासाठी झटत आहेत.

“जगाच्या कल्याणासाठी काम करणे

हे स्वतःच्या हितापेक्षा खूप मोठे आहे.”

– संत भीम भोई

(ओरिसातील सुप्रसिद्ध आदिवासी संतकवी भीम भोई यांच्या याच वचनाने ओरिसाच्या सुकन्या आणि आपल्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी त्यांचा शपथविधी सुरू केला होता.)

संत भीम भोई यांच्या या संतवचनाप्रमाणेच ओरिसातील हे विवेकवादी कार्यकर्ते समाजासाठी अहोरात्र झटत आहेत. आपल्या महाराष्ट्रासारखा त्यांना फुले-शाहू-आंबेडकर आणि वारकरी परंपरेचा वारसा नसल्यामुळे त्यांची समाजबदलाची लढाई थोडी अवघड आहे. पण ते चिकाटीने लढताय. त्यांना बळ देणे हे आपली जबाबदारी आहे.

एक दिवस नव्या विचारांची पहाट नक्की उगवेल, हम सब होंगे कामयाब एक दिन! असा आशावाद व्यक्त करून आम्ही ओरिसाचा निरोप घेतला.

लेखक संपर्क:

राहुल थोरात मो. ९४२२४ ११८६२

अण्णा कडलास्कर मो.९२७०० २०६२१


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]