राधा वणजू -

महाराष्ट्र अंनिसच्या राज्य महिला विभागाचे वटर्पौणिमेनिमित्त सिनेअभिनेत्री सायली संजीव यांचे व्याख्यान संपन्न
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य महिला विभागातर्फे आयोजित केलेल्या ‘चला व्रतवैकल्यांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहू’ या व्याख्यानाला ‘गोष्ट एका पैठणीची,’ ‘मन फकिरा,’ ‘दाह’ सारखे अनेक चित्रपट, कलर्स मराठीवर सुरू असलेल्या ‘शुभमंगल ऑनलाईन’सारख्या लोकप्रिय मालिका आणि कोलगेट, विको सारख्या प्रसिद्ध जाहिरातींमध्ये उत्कृष्ट अभिनय करणार्या लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव या प्रमुख वक्ता म्हणून लाभल्या.
यावेळी सायली संजीव यांनी लहानपणापासून घडणार्या घटनांविषयी बालसुलभ उत्सुकतेतून स्वतःला पडलेल्या प्रश्नांबाबत, मिळालेल्या उत्तरांबाबत आणि त्या अनुषंगाने स्वतःमध्ये व कुटुंबामध्ये घडणार्या व्रतवैकल्यामधील बदलाबाबत स्वत:चे अनुभव सांगत अतिशय सोप्या व साध्या शब्दांत मांडणी केली. चर्चात्मक प्रश्नोत्तराच्या भागातसुद्धा सायली संजीव यांनी अतिशय समर्पक उत्तरे दिली. अभिनय क्षेत्रातील माझ्या मित्रमैत्रिणींना मी अंनिसच्या कामात सहभागी व्हायला सांगेन. तसेच अंधश्रध्दाना खतपाणी घालणारे काम मी कधीही करणार नाही. मी माणूस ही जात व मानवता हाच धर्म मानते असेही त्या म्हणाल्या.
400 श्रोत्यांच्यावर उपस्थिती असलेल्या या ऑनलाईन व्याख्यानाचे प्रास्ताविक मुंबईच्या अंनिस कार्यकर्त्या सुनीता देवलवार यांनी केले. ठाण्याच्या जेष्ठ कार्यकर्त्या वंदनाताई शिंदे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाबाबत माहिती दिली. अभिनेत्री सायली संजीव यांच्यासोबत प्रश्नोत्तरे व चर्चेत कोल्हापूरच्या अनिस कार्यकर्त्या सीमा पाटील आणि रत्नागिरीच्या राधा वणजु सहभागी झाल्या. उपस्थितांचे आभार राधा वणजु यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चाळीसगावच्या कार्यकर्त्या निताताई सामंत यांनी केले.
– राधा वणजू, रत्नागिरी