डॉ. हमीद दाभोलकर -
निर्भयता म्हणजे भीतीचा अभाव असणे नव्हे, तर निर्भयता म्हणजे तुम्ही स्वतःहून भीतीला सामोरे जाण्याचा घेतलेला निर्णय! जर आपण हे समजून घेत असू, तर हा निर्भयतेतील पहिला सोपान आहे. आपण निर्भयता म्हणजे केवळ भीतीचा अभाव अशा धारणेने बघतो, म्हणजे आपल्या समाजामध्ये अनेक वेळेला निधडेपणा आणि निर्भयता हे एकत्रित केलं जातं. प्रत्यक्षात समजून घ्यायला पाहिजे की, आपल्यातील प्रत्येकाला भीतीला सामोरे जायला लागणार आहे. भीतीला सामोरे जाण्याचा निर्णयदेखील आपल्यातला प्रत्येक जण घेऊ शकतो. त्यामुळे निर्भय माणसं ही एक वेगळी जमात नसते, निर्भयपणे जगणारे लोक आकाशातून पडलेले नसतात. म्हणजे ज्यांना कुठल्यातरी गोष्टीची भीती वाटते आणि ज्यांना निर्णय घेता येतो, तो प्रत्येक माणूस निर्भय बनू शकतो!
माझ्या पातळीवर मी बरखा दत्तला ते उत्तर दिलं, त्या वेळेला माझ्या मनात काय विचार होता?
२८ जानेवारी २०२४ रोजी प्रगतशील लेखक संघाने आयोजित केलेल्या बेळगाव येथील तिसर्या मराठी साहित्य संमेलनामध्ये डॉ. हमीद दाभोलकरांनी केलेले भाषण ‘अंनिवा’ वाचकांसाठी देत आहोत…
नमस्कार!
कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर नानावटी, संयोजक कॉ. आनंद मेणसे, श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेले कॉ. भालचंद्र कांगो, मधुकर भावे, मेधा सामंत-पुरव आणि बेळगावमधील सर्व मित्रमैत्रिणींनो. बेळगाव हे माझे आजोळ आहे. माझे आजोबा गुंडोपंत तेंडोलकर हे बेळगाव ‘तरुण भारत’चे कार्यकारी संपादक होते. माझ्या आईचं, मामाचं सगळं शिक्षण बेळगावमध्ये झालं. त्यामुळे बेळगावमध्ये येऊन बेळगावकरांशी बोलणं, ही माझ्यासाठी खूप समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. माझे आजी-आजोबा अगदी साधी माणसं होती. स्वतःचं काम अतिशय प्रेमाने आणि निर्धाराने करावं, पण ते करत असताना समाजाप्रति देणं विसरू नये अशा धारणेने ते आयुष्य जगले. आपला नातू बेळगावमध्ये येऊन भाषण देतोय, याचा त्यांना कोण आनंद झाला असता! त्यांची आठवण काढण्याची संधी आपण दिलीत, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो.
आनंद मेणसे सरांनी मला भाषणासाठी बोलावले, तेव्हा मी खरं सांगायचं तर बेसावध क्षणी होकार दिला. मला असं वाटलं होतं की, हे आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी किंवा मानसिक आरोग्याविषयी बोलायला लावतील. नंतर काही दिवसांनी त्यांनी गुगली टाकला आणि तसं म्हटलं तर खूप सोपा आणि प्रत्यक्षात बोलायचं झालं, तर खूप अवघड असा विषय दिला. या विषयावर मी पहिल्यांदाच बोलणार आहे. त्यामुळे काही कमी-जास्त झाल्यास नकी समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.
साधारणपणे एका मानसोपचार तज्ज्ञाकडून आनंदी जीवन कसं जगावं? यशस्वी जीवन कसं जगावं? अशा विषयावर भाषण देण्याची अपेक्षा असते. निर्भय जीवन कसं जगावं? हा विषय त्यापेक्षा वेगळा आहे. ‘निर्भय बनो’ ही घोषणा देणं ही वेगळी गोष्ट आहे, पण ज्या लोकांना आपण ‘निर्भय जीवन जगावे’, असे सांगत आहोत त्यांनी ‘हे निर्भय जीवन प्रत्यक्षात कसे जगायचे’ असे विचारले, तर आपण काय सांगणार, असा प्रश्न मला पडला. मग मी त्याविषयी विचार आणि अभ्यास करायला सुरुवात केली. तेव्हा मला पहिली आठवण माझे वडील डॉ. नरेंद्र दाभोलकरांची झाली. लहानपणी ते आम्हाला स्कूटरवरून फिरायला घेऊन जायचे. पूर्वीच्या काळात बजाजच्या स्कूटर होत्या. त्यांच्या मागे टायर असायचा आणि टायरच्या मध्ये छोटीशी जागा असायची, त्या जागेवर त्यांनी ‘निर्भय बनो’ असं लिहिलेलं होतं. ही साधारण ३५-४० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सातार्यात त्यांना भेटलेली माणसं आजही सांगतात की, डॉ. दाभोलकरांच्या स्कूटरमागे ‘निर्भय बनो’ असं लिहिलेलं आम्ही पाहिलेलं आहे.
मला त्या वयात ‘निर्भय बनो’चा अर्थ काय आहे? हे समजणं शक्य नव्हतं. खरं सांगायचं तर नरेंद्र दाभोलकर हयात होते तोपर्यंत निर्भयतेशी किंवा भीतीला सामोरे जाण्याशी माझा संबंध फारसा आला नव्हता. मला तेव्हा ज्या गोष्टींची भीती असे, त्या माझ्या तेव्हाच्या वयाला धरून होत्या. उदा. परीक्षेत आपण अपयशी होऊ का? ज्या मुलीशी लग्न करायचं आहे ती आपल्याला नकार देईल का? करिअरमध्ये यश मिळेल की नाही? पुरेसे अर्थार्जन आपण करू शकू की नाही?
२० ऑगस्ट २०१३ ला मात्र ते चित्र पूर्णपणे बदललं. त्या दिवशी पुण्यामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतरच्या कालखंडामध्ये मी, माझे कुटुंबीय, अंनिसचे कार्यकर्ते यांच्यासमोर एक गंभीर प्रश्न आयुष्याने टाकला. या प्रसंगाला आपण निर्भयतेने सामोरे जाणार की पळून जाणार? हा निर्णय आम्हाला त्या क्षणी घेणं आवश्यक होतं. एका अर्थी आयुष्याने ही आमची घेतलेली परीक्षा होती. त्या परीक्षेला सामोरे जाण्याचा प्रयत्न करताना निर्भयतेविषयीची माझी जी संकल्पना तयार झाली, ती तुम्हा सर्वांसमोर मांडणार आहे. या मांडणीला दुसरादेखील संदर्भ आहे. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातला विद्यार्थी म्हणून माणसाला उन्नत करणार्या आणि अवनत करणार्या अशा दोन्ही प्रकारच्या भावनांचा अभ्यास करण्यात मला रस राहिलेला आहे. दुःख, क्रौर्य, वेदना, करुणा अशा भावनांसोबत निर्भयता हीदेखील आहे. निर्भयता माणसाच्या मनामध्ये कुठून निर्माण होते? तिचे उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर पूर्वसुरी कोण आहेत? आपल्याला ही निर्भयता जन्मजात मिळते? का ती शिकता येते? ही निर्भयता वाढवायची असेल, तर काय पद्धतीने वाढवता येते? हे सर्व मानसोपचारतज्ज्ञ म्हणून माझ्या आवडीचे विषय आहेत. त्यामुळे जीवनाचा अनुभव आणि मानसशास्त्रीय अभ्यास यांची सांगड घालून निर्भयतेविषयी मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. या सगळ्याला एक मोठी व्यापक सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीदेखील आहे.
महाराष्ट्रातील काही समाजशास्त्रज्ञ असंदेखील म्हणतात की, २०१३ मध्ये झालेला डॉ. दाभोलकरांचा खून ही त्या भयसूचक कालखंडाची सुरुवात आहे. त्यानंतरच्या १०-११ वर्षांमध्ये जे काही बदल आपण सगळे अनुभवतोय ती पार्श्वभूमी ’निर्भय बनून का जगावे?’ या विषयाच्या चर्चेला आहे.
गेल्या १०-११ वर्षांमध्ये धर्म ही संस्था आपल्या जीवनाचं एक मध्यवर्ती अंग कधी नव्हे इतके व्यापून राहिलेली आहे. आज आपण तुकारामांचे नाव असलेल्या सभागृहात बोलत आहोत, त्यांनी सांगितलेला हा धर्म नाही. ‘जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले’ म्हणणारा हा धर्म नकीच नाही. या देशाच्या चर्चाविश्वाच्या मध्यभागी आलेली धर्मकल्पना वेगळीच आहे. एका बाजूला स्वतःच्या श्रेष्ठत्वाविषयी टोकाचा अभिमान बाळगणारा, दुसर्या बाजूला अन्य धर्माच्या लोकांचा द्वेष करायला शिकवणारा आणि तिसर्या बाजूला या सगळ्याचं संघटित राजकारण करून त्यामधून सत्ताकारण आणि भांडवली शोषण करणार्या अर्थव्यवस्थेला बळ देणारा आजचा हा धर्म आहे. तो लोकशाहीच्या स्वरूपामध्ये जरी आपल्यासमोर येत असला, तरीदेखील त्याचं खरं रूप हे दमनशाहीचं आहे. लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या सगळ्या घटकांवर त्याची पकड आहे. न्यायालय, पोलीस यंत्रणा, माध्यमे, अर्थकारण एवढेच काय, तर विरोधी पक्षाच्या अवकाशावर या मध्यवर्ती केंद्रीभूत सत्तेच्या कार्यपद्धतीची पकड आहे.
न्यायालयामध्ये यांच्या विरोधात निकाल देण्याचं धाडस केलं, तर काय होऊ शकतं हेदेखील काही न्यायमूर्तीच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती रिटायर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाचा खासदार होतो. मुंबईसारख्या शहराचे पोलीस प्रमुख वा प्रशासनातील अधिकारी हे सत्ताधारी पक्षाचे खासदार होतात. गेल्या अकरा वर्षांत पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणा, न्याय यंत्रणा यांच्याशी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपासाच्या निमित्ताने माझा जो काही संबंध आला; त्यामधून मी स्वतः तरी या निष्कर्षाप्रत आलेलो आहे की, नैसर्गिक न्याय ही संकल्पना भारतातील कुठल्याही सामान्य माणसाला मिळण्यासाठी दुरापास्त झालेली गोष्ट आहे. तुम्हाला हायकोर्टात नुसता वकील जरी नेमायचा झाला, तरी काही लाख रुपये मोजावे लागतात. अशा परिस्थितीत विरोधाचा आवाज कोण उठवणार? जे राजकारणात विरोधाचा आवाज उठवतात त्यांच्यामागे ईडी, सीबीआय लावली जाते.
धर्माच्या बाबतीत तुम्ही चिकित्सक थोडेदेखील बोलायला लागलात तर ट्रोलर्सच्या झुंडी पाठीमागे यायला लागतात. २२ जानेवारीला झालेल्या सोहळ्याच्या निमित्ताने समाजमाध्यमांवर हे अनुभवलेले आहे. भारताच्या इतिहासात असंख्य असलेली रामाची वेगळी रूपं जरी तुम्ही समाजमाध्यमांवर मांडण्याचा प्रयत्न केलात, तर असभ्य भाषेत तुम्हांला ट्रोल केले जाते. रामाच्या विविध संकल्पना आणि त्यांना पुजणारा भारतीय समाज याचे एकजिनसीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामध्ये जे कोणी वेगळा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यामागे ट्रोलर्सच्या झुंडी येतात. प्रत्यक्षात हल्ले केले जातात. केसेस घातल्या जातात. वेगवेगळ्या आरोपांमध्ये अडकवलं जातं. तरीही तुम्ही थांबला नाहीत, तर तुमचा खून करण्यात येतो. गेल्या १५० वर्षांत या प्रवृत्तींनी केलेली ‘प्रगती’ बघा.
१५० वर्षांपूर्वी महात्मा फुले यांच्यावर मारेकरी चालून आले आणि जेव्हा त्यांना कळले की हा माणूस आपल्या शिक्षणासाठी काम करतोय, तेव्हा त्या मारेकर्यांनी फुलेंना मारण्याचा विचार सोडला आणि ते त्यांचे शिष्य झाले. ७५ वर्षांपूर्वी म. गांधींना या प्रवृत्तीचे लोक मारायला आले, तेव्हा त्यांच्यामध्ये एवढं तरी धाडस होतं की, त्यांनी समोरून येऊन गोळ्या झाडल्या आणि स्वतःची ओळख लपवली नाही. मात्र नरेंद्र दाभोलकरांना जे गोळ्या घालायला आले, त्यांच्यामध्ये तेवढदेखील धाडस नव्हतं. अहिंसक मार्गानं काम करणार्या सत्तरीच्या माणसावर पाठीमागून येऊन गोळ्या झाडल्या. कोल्हापूरमध्ये पानसरेंवर गोळ्या झाडायला ते आले, तेव्हा त्यांनी उमाताईंनादेखील सोडले नाही. कलबुर्गीवर गोळ्या झाडायला ते त्यांच्या घरामध्ये विद्यार्थी आहोत असा बहाणा करून गेले. भीतीचे वातावरण लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा कसा प्रयत्न आपल्या समाजामध्ये केला जातो, हे यातून समजून यावे. त्या चौघांच्या शरीरावर जरी गोळ्या मारल्या असल्या, तरी इशारा तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकाला आहे; जो वेगळे विचार समाजामध्ये मांडू इच्छितो. लोकशाही मार्गाने संघटित होऊ इच्छितो त्यांनी दिलेला हा इशारा आहे की व्यवस्थेला प्रश्न विचारायला लागलात, तुम्ही जर निर्भयता दाखवायला लागलात तर तुमचं आम्ही काय करू हे समजून घ्या.
आपण ह्याची दुसरी बाजूदेखील समजून घेतली पाहिजे, ती अशी की या स्वरूपाच्या भयाचा वापर आणि त्यामधून निर्माण होणारी दमनशाही ही मानवी इतिहासाला नवीन गोष्ट नाही. इतिहासामध्ये अशा स्वरूपाचे टप्पे येऊन गेलेले आहेत आणि त्या दमनशाहीचं पुढे काय झालेले आहे ते आपण मुसोलिनी, हिटलर, स्टॅलिन यांच्याबाबतीत; काही अर्थाने महाराष्ट्रातील पेशवाईच्या आणि आणीबाणीच्या बाबतीतदेखील बघितलेलं आहे. एका मर्यादेपलीकडे दमनशाही जाते, तेव्हा लोक हळूहळू तिच्या विरोधात संघटित व्हायला लागतात. दमनशहांच्या मधील कोणीच अमरत्वाचा पट्टा घेऊन जन्माला आलेलं नाहीये. ते मानत असलेल्या गीतेतलाच संदर्भ द्यायचा झाला, तर त्यांनी केलेल्या कर्माची फळं त्यांना आज ना उद्या भोगावी लागणार आहेत.पण या कालखंडात आपण सगळ्यांनी काय करावं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यासाठी आवश्यक असलेली निर्भयता – तिच्याकडे आपण काय नजरेने बघू शकतो हे समजून घेऊ या.
जर निर्भयता एक उद्दिष्ट असेल, तर त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचणारे मला दिसलेले ‘सात सोपान’ मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तुमच्यातील कोणी त्या सातचे दहा करावेत, सतरा करावेत किंवा सत्तरदेखील करावेत. कारण ही निर्भयता केवळ काही ठरावीक लोकांपुरती मर्यादित असलेली गोष्ट नाही.
पहिल्या टप्याविषयी बोलताना, माझ्या आयुष्यातील सन २०१५चा एक प्रसंग सांगतो. बरखा दत्त त्या वेळी NDTV वर we the people नावाचा एक कार्यक्रम करायची. आता पूर्वीचे काय झालंय ते आपल्याला माहीत आहे आणि बरखा दत्तचं काय झालंय तेपण आपल्याला माहीत आहे. त्या कार्यक्रमात बरखा दत्तने समाजात वाढणार्या धर्मांधतेविषयी चर्चा करण्यासाठी चार-पाच लोकांना बोलावलं होतं. त्यामध्ये अंनिसचा प्रतिनिधी म्हणून मी होतो. त्या कार्यक्रमामध्ये ‘सनल एरामाडू’ नावाचे केरळमधील एक विवेकवादी कार्यकर्ते इंग्लंडमधून ऑनलाइन सहभागी झाले होते.
सनल एरामाडू यांनी ख्रिश्चन धर्मामधल्या अंधश्रद्धांच्या विरोधात लढाई चालू केली होती (ही साधारण २०१२ ची गोष्ट आहे.) या कामामुळे त्यांना धमक्या यायला लागल्या आणि त्यांनी केरळ सोडलं. ते इंग्लंडमध्ये जाऊन स्थायिक झाले. त्यांना बरखा दत्तने असं विचारलं की, “तुम्ही का भारत सोडून गेलात?” त्यावर सनल म्हणाले, “मला धमकी आली होती”, तेव्हा डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा फोन आलेला आणि ते म्हणाले, “तुम्ही हा देश सोडून जाऊ नका. तुम्ही इथे या. आपण ही लढाई एकत्र लढू या. पण बघा. पुढच्या आठ महिन्यांत त्यांचं काय झालं? मग मी माझ्या जिवाचा धोका कशासाठी घेऊ? त्यामुळे मी इंग्लंडमध्ये निघून आलेलो आहे.” बरखा दत्तने पुढचा प्रश्न मला विचारला की, “तुम्हांला देश सोडून जावे वाटत नाही का? तुम्हांला जिवाची भीती वाटत नाही का?” माझ्यासाठी हा पूर्णपणे अनपेक्षित प्रश्न होता. त्या क्षणी मला जे काही सुचलं ते उत्तर मी दिलं. ते उत्तर असं होतं, “भीती वाटत नाही असं अजिबात नाही. भीती मला देखील वाटते. भीती ही माणसाची नैसर्गिक भावना आहे. जर कोणी म्हणत असेल की, या परिस्थितीत मला भीती वाटत नाही, तर तो खोटं बोलत आहे असं समजावं. पण त्या भीतीला सामोरं जायचं असं आम्ही ठरवलेलं आहे.”
काही दिवसांपूर्वी Psychology of courage किंवा Psychology of fearlessness असं वाचत होतो, तेव्हा एक व्याख्या माझ्यासमोर आली ती इंग्लिशमध्ये पहिल्यांदा सांगतो: courage or fear-lessness is not just absence of fear, but your concious decision to confront it. अर्थात, निर्भयता म्हणजे भीतीचा अभाव असणे नव्हे, तर निर्भयता म्हणजे तुम्ही स्वतःहून भीतीला सामोरे जाण्याचा घेतलेला निर्णय! जर आपण हे समजून घेत असू, तर हा निर्भयतेतील पहिला सोपान आहे.
आपण निर्भयता म्हणजे केवळ भीतीचा अभाव अशा धारणेने बघतो, म्हणजे आपल्या समाजामध्ये अनेक वेळेला निधडेपणा आणि निर्भयता हे एकत्रित केलं जातं. प्रत्यक्षात समजून घ्यायला पाहिजे की, आपल्यातील प्रत्येकाला भीतीला सामोरे जायला लागणार आहे. भीतीला सामोरे जाण्याचा निर्णयदेखील आपल्यातला प्रत्येक जण घेऊ शकतो. त्यामुळे निर्भय माणसं ही एक वेगळी जमात नसते, निर्भयपणे जगणारे लोक आकाशातून पडलेले नसतात. म्हणजे ज्यांना कुठल्यातरी गोष्टीची भीती वाटते आणि ज्यांना निर्णय घेता येतो, तो प्रत्येक माणूस निर्भय बनू शकतो!
माझ्या पातळीवर मी बरखा दत्तला ते उत्तर दिलं, त्या वेळेला माझ्या मनात काय विचार होता? मी तेव्हा पस्तीस वर्षांचा होतो. माझी मुलगी दोन वर्षांची होती, आम्ही नुकतंच घर बांधलेलं होतं, त्याचं कर्ज आमच्या डोक्यावर होतं. मला स्वतःच्या आयुष्यात करिअर म्हणून काही करण्याच्या aspirations होत्या. अशा परिस्थितीत आपल्या जिवाचं काही बरं-वाईट झालं, तर यांचं काय होईल या विचाराने येणारी भीती माझ्या मनामध्ये असणार. मानसोपचाराचा विद्यार्थी म्हणून मी अभ्यास करत होतो, तेव्हा भावना कशा ओळखायच्या, स्वतःच्या भावनांना सामोरे कसे जायचे, हे शिकत होतो. मानसोपचारतज्ज्ञ म्हणून जेव्हा तुम्ही दुसर्या लोकांना भावना ओळखायला शिकवता; तेव्हा तुम्हांला स्वतःला पण येणं आवश्यक आहे. त्याचा मला या कामी फायदा झाला असे मी मानतो. मी माझ्या मनात असलेली भीती स्वीकारू शकलो नसतो, तर त्या भीतीला सामोरे जाण्याचा निर्णय मी घेऊ शकलो नसतो. जी गोष्ट आपण मान्यच केली नाही तिला सामोरे कसे जाणार? त्यामुळे स्वतःच्या पातळीवर त्या गोष्टीचा स्वीकार करणे आणि त्यानंतर त्याला सामोरे जाणं किंवा आहे ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणं हे माझ्या मते निर्भयतेच्या दृष्टीने टाकण्यात आलेलं पहिलं पाऊल असायला हवं.
निर्भयतेच्या प्रवासातला दुसरा सोपान म्हणजे मनात भीती येते त्या वेळेला वेळेला नकी काय होतं? याचे विज्ञान आपल्याला माहीत असणे.
भीती ही उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये माणसाच्या मनात निर्माण झालेली भावना आहे. कुठल्याही प्राण्याला स्वतःचा जीव वाचवायचा असेल, तर त्याच्या मनात भीती असणे आवश्यक आहे. जर हरणाला वाघाची भीती वाटली नाही, तर तो जगू शकणार नाही! त्यामुळे भीती ही एका पातळीवर माणसाला स्वतःचं जीवन टिकवण्यासाठी आवश्यक असलेली भावना आहे. मानवी मेंदूमध्ये प्राण्यांच्या मेंदूच्या जवळ जाणारा जो भाग असतो, त्याला भावनेचा मेंदू (limbic brain) असे म्हणतात. मेंदूच्या रचनेमध्ये तो असा खालती असतो आणि त्याच्यावर तयार झालेला विचारांचा मेंदू (Cerebral cortex) आहे. भावनेच्या मेंदूमध्ये निर्माण होणार्या भीतीवर विचारांच्या मेंदूच्या माध्यमातून आपण ताबा मिळवायला शिकतो. माणसाच्या मनात निर्माण होणारी निर्भयता ही अशी उन्नत स्वरूपाची निर्भयता असू शकते. ती निर्भयता मेंदूच्या वरच्या भागामधून येत असते. प्राण्यांमध्येदेखील काही प्रमाणात निर्भयता असते; पण ती प्रतिक्षिप्त पातळीवरची असते. म्हणजे एखाद्या अवघड परिस्थितीमध्ये एखादा दुबळा प्राणी आपल्यापेक्षा जास्त ताकदवान प्राण्यावरती तुटून पडतो, तर ती केवळ धाडसाच्या पातळीवर असलेली, स्वतःचा जीव वाचवण्यापुरती निर्माण झालेली निर्भयता असते. परंतु ज्याच्यामध्ये स्वतःचा कोणताही फायदा नाही अशा परिस्थितीमध्येदेखील स्वतःचा जीव पणाला लावणे किंवा स्वतःच्या भीतीवर विजय मिळवणं ही माणसाच्या मनामध्ये निर्माण होणारी निर्भयता आहे; तिच्यासाठी उन्नत मेंदू अतिशय महत्त्वाचा असतो.
प्रत्यक्षात होतं काय, तर विचारांच्या आणि भावनांच्या मेंदूमध्ये जो दुवा असतो, तिथे अमेग्डेला नावाचा एक भाग असतो. तुमच्यातील काही जणांनी ‘अमेग्डेला हायजॅक’ नावाचा शब्द ऐकला असेल. आपल्याला भीती वाटते त्या वेळेला आपला अमेग्डेला हायजॅक होतो आणि विचारांच्या मेंदूकडून आपला ताबा हा भावनांच्या मेंदूकडे पळवला जातो! जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर हे पळवणे आपण रोज आजूबाजूला बघतोय. आपल्याला भविष्याविषयीची भीती दाखवली जाते. तेव्हा आपला अमेग्डेला हायजॅक होतो, आपण विचार करणे थांबवतो. तर आपल्या वरच्या मेंदूकडे असणारा जो ताबा आहे, तो मानवतेचा सगळ्यात महत्त्वाचा निर्देशांक आहे! तो जाऊन भावनेच्या मेंदूकडे ताबा येतो, तेव्हा माणूस निर्भयतेच्या ऐवजी भयाच्या प्रभावाखाली काम करायला लागतो.
या सगळ्याविषयी उत्क्रांती विज्ञान, मेंदूविज्ञान यामध्ये मोठ्या प्रमाणात अभ्यास झालेला आहे. तसेच भीतीच्या मानसशास्त्राविषयी खूप अभ्यास झालेला आहे. भीती कशाने निर्माण होते? भीतीचे आजार कोणते आणि त्याचे कसे उपचार करावेत याचा थेट संबंध आपण बोलत असलेल्या निर्भयतेशी नाहीये; परंतु त्याचं जे शास्त्र आहे ते चांगल्या प्रकारे समजून घेतलं, तर निर्भयतेकडे बघण्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ होण्यास मदत होते. यामुळेच भीतीचं आणि निर्भयतेचं मानसशास्त्र आणि मेंदूविज्ञानदेखील आपण समजून घ्यायला पाहिजे.
आता तिसरा सोपान मांडतो. आपल्या समाजामधील निर्भयतेची संकल्पना काही जणांच्या असीम त्यागावर उभी राहिलेली आहे. प्रत्येकाने थोडी थोडी निर्भयता दाखवण्याऐवजी समाजातील काही जणांनी टोकाची निर्भयता दाखवावी आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही सगळे थोडी थोडी (आम्हांला जमली तर) निर्भयता दाखवू असं आपल्या समाजातील निर्भयतेचं मॉडेल आहे. तुम्हांला ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ कविता माहीत असेल. या कवितेतील एक कडवं मला या संदर्भात आवडतं.
अंत झाला अस्ता आधी जन्म एक व्याधी। वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी ॥ देई कोण हाळी त्याचा पडे बळी आधी। हारापरी हौताम्य हे त्याच्या गळी साजे ॥
जो कोणी पहिली हाळी देतो, त्याचाच पहिला बळी आपल्या समाजामध्ये पडतो. त्याचं हौतात्म्य हार घालून सजवण्यासाठी समाज एका पायावर तयार असतो. मला असं वाटतं की, एक समाज म्हणून हे आपलं निर्भयतेचं मॉडेल आहे. कोणीतरी स्वतःच्या जिवाची बाजी लावावी, त्यानंतर आम्ही बघू, असा तो विचार आहे.
प्राणिजगतात याला एक समांतर उदाहरण आहे. विल्डरबीस्ट नावाचा आफ्रिकेत आढळणारा आणि हरिणासारखा दिसणारा एक प्राणी आहे. आफ्रिकेतील केनिया आणि टांझानिया या देशांमध्ये सेरेंगेटी नावाचं नॅशनल पार्क आहे. अन्न कमी होतं, त्या वेळेला हे विल्डरबीस्ट हजारोंच्या कळपाने टांझानियामधून केनियामध्ये येतात. केनियातून परत टांझानियात जाताना त्यांना ‘मारा’ नदी ओलांडावी लागते. त्या नदीत मगरी असतात, हिप्पो असतात. त्या नदीच्या कडेला हजारो विल्डरबीस्ट फुरफुरत थांबलेले असतात. तासामागून तास गेले तरी कोणीच पुढे जात नाही. मग त्यांच्यातील एक विल्डरबीस्ट धाडस करून त्या नदीमध्ये उडी मारतो. एकाने धाडस केले की, मागे थांबलेले सगळे विल्डरबीस्ट त्या नदीमध्ये उडी मारून ती पार करतात. हे प्राण्यांपासून उत्क्रांतीमध्ये निर्माण झालेलं भीतीविषयीचं प्रारूप आहे, ते आपल्या मनातदेखील आहे हे आपण समजून घेऊ.
काही लोकांच्या असीम त्यागावर अवलंबून असलेलं हे निर्भयतेचं मॉडेल आहे. ते एका मर्यादेपलीकडे किती दिवस चालवणार? निर्भयतेचा विचार आपल्याला काही क्रांतिकारी लोकांपुरता मर्यादित असेल हे अपेक्षित नाहीये. तुम्हांला बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेचा संदर्भ देता.
"अशीच जावी वर्षे काही आणि महात्मा यावा पुढचा, आम्हांस आम्ही पुन्हा पहावे काढून चष्मा डोळ्यांवरचा.”
तर अशी काही आपल्या सर्वांची स्थिती आहे? आपण सगळे पुढचा महात्मा येण्यासाठी, त्याने निर्भयता दाखवावी यासाठी वाट बघत बसलेली पिढी तर नाही ना?
आता आपण चौथ्या सोपानाकडे येऊ. दैनंदिन जीवनामध्ये निर्भयता आणायची असेल, तर काय करायला पाहिजे. त्याच्यासाठी राजकीय परिप्रेक्ष्यातच बघायला पाहिजे असं नाही. आपल्या दैनंदिन आयुष्यात जो माणूस निर्भयतेने जगू शकत नाही, जी व्यक्ती आपल्या कुटुंबामध्ये निर्भयतेने जगू शकत नाही; ती व्यक्ती अचानकपणे सरकारच्या विरोधात किंवा संघटित धर्मसत्तेच्या विरुद्ध काम करायला लागेल, हे दिवास्वप्न होईल!
त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये आपण निर्भयतेने काम करतो की नाही याचा अगदी छोटा निर्देशांक म्हणजे स्वतःमधले दोष स्वीकारणं! ही कितीतरी साधी गोष्ट आहे. खरं तर आपल्यातले अनेक जण असे असतात की, ज्यांना दुसर्यांमधलेच दोष दुरुस्त करायचे असतात. सोशल मीडियावर आज जे विचारप्रवर्तक कार्यकर्ते आणि नेते आहेत ते प्रामुख्याने दुसर्यांच्या दोषांविषयीच बोलताना दिसतील. ते करताना त्यांची स्वतःची भाषा आणि भावनादेखील इतक्या खालच्या पातळीवर गेलेली असते की, त्यांना परिवर्तनाच्या चळवळीतले आपले साथीदार म्हणावं की नाही असा प्रश्न मनामध्ये यायला लागतो.
आपल्याला ज्या प्रवृत्तीचा पराभव करायचा आहे, ज्यांच्या विरोधात झगडायचं आहे; त्यांच्यासारखेच जर आपण व्हायला लागलो तर मोठा दुसरा पराभव काय आहे? म्हणजे आपल्याला जर या प्रवृत्तीचा पराभव करायचा असेल, तर आपली भाषा, अभिव्यक्ती, विचार त्यांच्यापेक्षा वेगळे असायला हवेत हे विसरता कामा नये.
निर्भयतेच्या ऐवजी केवळ आपण धाडसी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करताना आपण हे समजून घेतले पाहिजे की, निर्भयतेचाही एक अहंगंड असतो. मी कसा बाकीच्यांपेक्षा धाडसी आहे हे दाखवण्याच्या सापळ्यात आपण अडकतो. खास सोशल मीडियाच्या जमान्यात रोज उठून कुणाशीतरी कचाकचा भांडलं की मी कसा निर्भय आहे, हे आपण सहज स्वतःच्या मनाला सिद्ध करू शकतो. प्रत्यक्षात निर्भयतेची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. त्यानंतर कुटुंबात निर्भयपणे वागणे येते. या दोन ठिकाणी आपण निर्भय पद्धतीने जगणार नसू, तर समाजामध्ये निर्भयतेने जगता येणार नाही. ही अगदी साधी गोष्ट आहे. त्याकडे आपण अनेक वेळेला लक्ष देत नाही.
निर्भयतेने जगताना निर्भय माणसाची संवादाची पद्धतदेखील खूप महत्त्वाची आहे. दैनंदिन जीवनात दुसर्याला घालून पाडून बोलणं, दुसर्याची मापं काढणं, दुसर्याला कमीपणा देणं ही निर्भयतेची कार्यपद्धती असू शकते का, याचादेखील आपण विचार करायला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हे जर निर्भयतेचे काम असेल, तर त्याची संवादपद्धती काय असायला पाहिजे याच्याविषयी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी सांगितलेलं आहे. ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे.’
स्वाभाविक माणसाला निर्भयता कुठलातरी बदल करण्यासाठीच लागते; कारण त्यामधून सत्तासंबंध निर्माण झालेले आहेत-मग ते कुटुंबातील असोत, वैयक्तिक आयुष्यातील असोत, समाजातील असोत. त्या सत्तासंबंधांना आपण आव्हान द्यायला लागतो, तेव्हा माणसाला निर्भयता लागते. ‘स्टेट्स को’ ठेवण्यासाठी निर्भयतेची गरज पडत नाही. या सगळ्याच्या बरोबरीनं हादेखील भाग आपण समजून घेऊ या की, निर्भयता एक इव्हेंट नसून एक प्रोसेस आहे.
मागच्या वर्षी पुण्यात घडलेला एक प्रसंग तुम्हांला आठवत असेल. एमपीएससीचा अभ्यास करणारा अतिशय धाडसी मुलगा होता. एका मुलीवर एकतर्फी प्रेम करणार्या मुलाने तिच्यावर कोयत्याचा वार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा मुलगा तिथेच जवळ होता. त्याने धाडसाने हल्लेखोराचा हात पकडला, हे मोठेच धाडस आहे! परंतु यामध्ये बहुतांश भाग ही त्या क्षणामध्ये करायची प्रतिक्षिप्त क्रिया आहे. यामध्ये हल्लेखोराला थांबवणार्या व्यक्तीने बहुतांश वेळा पुढे काय होऊ शकेल याचा विचार केलेला नसतो. त्या क्षणी केलेले ते धाडस असते. ज्या स्वरूपाच्या व्यवस्थांविषयी आपण लढायचं म्हणतो आहोत, त्या व्यवस्था इतक्या सोप्या- सरळ आणि मनात आलं की कोयत्यानं वार केला, अशा स्वरूपाच्या नाहीत. त्या व्यवस्था अतिशय दमनकारी आहेत. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनी निर्माण झालेल्या या यंत्रणा आहेत. ते साम, दाम, दंड, भेद या सगळ्या पद्धती तुमच्या विरोधात वापरतात.
भ्रष्टाचाराच्या विरोधात, धर्माच्या विरोधात किंवा नागरी प्रश्नांवर निर्भयता दाखवायची; तर एका कोणाचा तरी हात पकडण्यापेक्षा कितीतरी जास्त विचार करणे आवश्यक आहे. एकदा ही भूमिका आपण घेतली की त्यामधून परतीचा मार्ग फारसा नाही. हे अभिमन्यूच्या चक्रव्यूहासारखं आहे. आत जायचा रस्ता आहे. पण परत यायचा रस्ता असेलच असे नाही. त्याचमुळे स्वतःच्या आयुष्यात अशी निर्भयता दाखवताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की सातत्याने हे काम करण्याची आपली तयारी आहे की नाही. कुठलीही प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने करायला हवी.
निर्भयतेचा मानसशास्त्रात अभ्यास झालेला आहे. अवकाश यात्रींना यानामधून पाठवले गेले किंवा पाणबुड्यांमध्ये जाणारे लोक त्यांच्यावर हे अभ्यास झालेले आहेत. त्यामधून परत परत असं लक्षात आलं आहे की, आपल्याला निर्भयतेचीदेखील प्रॅक्टिस करावी लागते! आपण अचानकपणे एका दिवशी निर्भय होऊ शकत नाही. तो फक्त ‘हिरोइझम’ झाला. निर्भयता ही दैनंदिन जीवनात प्रॅक्टिस करायची गोष्ट आहे. नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला, त्याने तिथे पहिली पावलं टाकली; त्या वेळी तो असं म्हणाला की, It is as good as I’m performing routine drill. ते ड्रील त्याने इतके वेळेला केलं होतं की, चंद्रावरती पहिल्यांदा उतरताना वाटणारे भय, हे माझ्यासाठी ड्रीलच आहे अशी भावना त्याच्या मनात झाली. हा निर्भयतेचा चौथा सोपान आहे.
पाचवा सोपान सगळ्या महत्त्वाचा आहे. निर्भयता आपल्याला कशासाठी हवी आहे? सुसाइड बॉम्बरमध्ये ही निर्भयता असते, आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह कुणी केला म्हणून आपल्याच मुलीचा जीव घेणार्या लोकांनादेखील स्वतःच्या जिवाचं भय वाटत नसतं किंवा दहशतवादीदेखील एक प्रकारे निर्भय असतात; तर अशा स्वरूपाच्या निर्भयतेचा शोध आपल्याला आहे का?
मला मुद्दामहून नमूद करावंसं वाटतं की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ‘विज्ञान, निर्भयता आणि नीती’ ही त्रिसूत्री अतिशय विचारपूर्वक डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी निर्माण केलेली आहे. विज्ञानाचा वापर करून नीतीकडे जायचं असेल, तर निर्भयतेला शॉर्टकट नाही. निर्भयता हे नीतिवान समाज निर्माण करण्यासाठीचं आयुध आहे. जोपर्यंत आपण हा विचार करत नाही, तोपर्यंत आपली निर्भयता दिशाहीन असेल. नीतीचा विचार केवळ मानवी मन करू शकतं. प्राणीजगतात कोणी नीतीचा, चांगल्या-वाईटाचा विचार करू शकत नाही. त्या क्षमतेचा आपण वापर केला नाही तर नुसती निर्भयता आणि मूर्खपणा यांत अंतर उरणार नाही. निर्भयता आणि मूर्खपणा यांच्यात खूप अंधूक रेष आहे असं म्हटलं जातं. आपल्याला कुठल्या दिशेला जायचं आहे याचं भान नसेल, तर ती निर्भयता बर्याचदा स्वतःसाठी आणि समाजासाठी हानिकारक बनते, हे आपण समजून घेणे आवश्यक आहे.
निर्भयतेसोबत येणारे परिणाम भोगण्याची तयारी हा सहावा सोपान आहे. आपण कुठल्याही सत्तासंबंधांना आव्हान देत असतो, तेव्हा त्याचे काहीएक परिणाम भोगण्याची वेळ स्वभाविकपणे येते. ‘ग्रेट भेट’ मध्ये निखिल वागळे यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची एक मुलाखत घेतली होती. निखिल वागळेंनी विचारलं की, “तुम्ही जे काम करत आहात ते अतिशय संवेदनशील क्षेत्रातील आहे, कुणीतरी आपल्यावर हल्ला करेल, जिवाचं काही बरंवाईट होईल अशी तुम्हांला भीती नाही का वाटत?” त्या वेळेला डॉ. दाभोलकरांनी दिलेलं उत्तर असं होतं, “मला भीती वाटत नाही. मी जे काम करतो ते चुकीचे काम नाहीये. संविधानाच्या चौकटीत राहून लोकांना जागं करण्याचं काम मी करत आहे. परंतु, समजा माझ्यावरती हल्ला झालाच, तर मला याची खात्री आहे की यामुळे माझं काम थांबणार नाही. माझं काम माझ्या बलिदानातून प्रेरणा घेऊन आणखी जोमानं पुढे जाईल.”
आपल्या आयुष्यात आपण जो रस्ता निवडलेला आहे, त्या रस्त्यावर पलीकडच्या बाजूला काय आहे याचा अंदाज न घेता आपण जायला लागतो, तेव्हा ते वेडे धाडस होते. पण या धाडसाला आपण विचारांची जोड देतो, तेव्हा निर्भयता निर्माण होते. निर्भयतेमध्ये आपण चालत असलेल्या रस्त्यावरचे परिणाम, ते भोगण्याची तयारी आणि त्या निमित्ताने स्वतःच्या आयुष्याचं केलेलं नियोजन हे सगळे आवश्यक आहे. असे न करता येईल त्याला मी शिंगावर घ्यायला लागलो, तर ती संभाव्य परिणामांचा विचार न करता दाखवलेली निर्भयता असेल. ह्या स्वरूपाचे धाडस हे त्या कामाला उपयोगी पडण्याऐवजी हानिकारक होण्याची शक्यता जास्त असते.
सातवा आणि शेवटचा सोपान आहे नियोजनाचा. ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ असं आपल्याकडे म्हटलं जातं, तसं ‘नियोजनाशिवाय निर्भयता व्यर्थ आहे…’ काही जणांना सनसनाटीची खूप आवड असते. त्यामुळे त्यांना सनसनाटीच्या परिस्थितीमध्ये जाणे म्हणजे निर्भयता असं वाटायला लागतं. पण निर्भयतेने आयुष्य जगायचं असेल, दैनंदिन जीवनात निर्भयता आणायची असेल; तर ती नियोजनाशिवाय आणणे अतिशय अवघड आहे.
तर, हे माझ्या दैनंदिन जीवनाच्या अनुभवातून आणि मानसशास्त्राच्या अभ्यासातून आलेले निर्भयतेचे सात सोपान आहेत. ते कोणीही सामान्य माणूस आपल्या दैनंदिन जीवनात वापरून पाहू शकतो.
आज या भाषणाच्या निमित्ताने संत तुकारामांचे नाव असलेल्या सभागृहात आणि आचार्य अत्रेचे नाव असलेल्या साहित्य संमेलनात बोलण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी संयोजकांचे मनापासून आभार मानतो. आणि शेवटी गोरख पांडे यांची ‘वे डरते हैं’ ही कविता उद्धृत करून थांबतो –
वे डरते हैं किस चीज से डरते हैं वे तमाम धन-दौलत गोला-बारूद पुलिस-फौज के बावजूद? वे डरते हैं कि एक दिन निहत्थे और गरीब लोग उनसे डरना बंद कर देंगे
तर मित्रहो, निर्भयतेने आपल्या आयुष्यात आज आपण जिथे आहोत; तिथून एकतरी निर्भयतेचा सोपान चढण्याचा निर्धार करू या.
(शब्दांकन – सौरभ बागडे)