रमेश वडणगेकर - 9764836994
स्वत:ला अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेणार्या, अवैज्ञानिक दावे करणार्या श्वेता जुमानी यांचा कार्यक्रम (सार्वजनिक नव्हे) हॉटेलमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले. यासंदर्भात कोल्हापुरातील अग्रगण्य वृत्तपत्रांत; तसेच ‘पत्र नव्हे, मित्र’ असा गवगवा असलेल्या वृत्तपत्रात मोठ्या आकाराची जाहिरात प्रसिद्ध झाली. जाहिरात वाटणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली होती. कोल्हापूरचे पालकमंत्री; तसेच गृह राज्यमंत्री असलेले सतेज ऊर्फ बंटी पाटील, उद्योगपती संजय घोडावत यांचा उल्लेख या जाहिरातीत होता. तसेच सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार अजय देवगण, सलमान खान, शाहरूख खान, इरफान खान अशा व्यक्तींनी श्वेता जुमानी यांचे मार्गदर्शन घेतल्याचे जाहिरातीत म्हटले होते.
यासंदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर शाखेची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीमध्ये श्वेता जुमानी यांच्याबद्दल चर्चा झाली.
अवैज्ञानिक दावे करणार्या श्वेता जुमानी यांच्या कार्यक्रमास प्रतिबंध करावा, अशा मागणीचे निवेदन मा. जिल्हाधिकारी आणि मा. जिल्हा पोलीसप्रमुख यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमांनाही अंनिसचे आव्हान देण्यात आले. पण काही मोजक्याच वृत्तपत्रांनी त्या आव्हानाला प्रसिद्धी दिली. प्रशासनाने नेहमीप्रमाणे कानाडोळा केला.
श्वेता जुमानी ज्या दिवशी कोल्हापुरात आल्या, त्या दिवशी सायंकाळी अंनिस व डाव्या विचारांचे कार्यकर्ते एकत्र येऊन कदमवाडीतील चैत्राली हॉटेल परिसरात जमले. हॉटेलच्या गेटजवळ त्यांनी घोषणा दिल्या. ‘श्वेता जुमानी चले जाव’, ‘अवैज्ञानिक दावे करणार्या श्वेता जुमानी चले जाव’, ‘श्वेता जुमानी तेरी भोंदूगिरी नहीं चलेगी’, ‘बंद करा आकड्याचा खेळ’… अशा घोषणांनी हॉटेलचा परिसर दणाणून गेला.
यावेळी अंनिसचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे म्हणाले, “अवैज्ञानिक दावे करणार्या श्वेता जुमानींचा निषेध असो. त्यांनी या दाव्यांसंदर्भात पुरावे सादर करावेत, अंकशास्त्राचा आधार घेऊन कांद्याची भाववाढ रोखून दाखवावी; तसेच शाळेतील अप्रगत मुले प्रगत करून दाखवावीत.” यावेळी ‘अंनिस’ वार्तापत्राचे सहसंपादक व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. अनिल चव्हाण म्हणाले, “श्वेता जुमानी यांनी जाहिरातीमध्ये ज्या राजकीय व्यक्तींची नावे घेतली आहेत, त्यांनी आपली भूमिका सांगावी. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा, हे फक्त ‘अंनिस’चे काम नाही. या ठिकाणी जे पोलीस बंदोबस्तासाठी आले आहेत, त्यांचेही हे काम आहे. तसेच निवडणुकीत विजयी झालेल्या प्रत्येक उमेदवारांचे ते काम आहे. ते ही मंडळी करीत नाहीत. भोंदू बाबांना संरक्षण देण्याचे काम ही मंडळी करीत आहेत.” हॉटेल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी बोलताना खगोल अभ्यासक डॉ. नितीन शिंदे म्हणाले, “अंकशास्त्रज्ञ ही पदवीच नाही. श्वेता जुमानी स्वत:ला अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेतात. त्यांनी अवैज्ञानिक दावे केले आहेत. श्वेता जुमानी यांनी मोठमोठ्या व्यक्तीचे आयुष्य बदलून टाकले. श्वेता जुमानी यांनी सुचविल्याप्रमाणे नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला. त्यामुळे आयुष्यात भरभराट झाली आहे, असे दावे त्यांनी केले आहेत. या मोठ्या व्यक्तींना लाभ झाला, आपणालाही होईल, असे सर्वसामान्यांना वाटणे साहजिकच आहे. परंतु आपले भविष्य आपणच घडवायचे असते. आजूबाजूची परिस्थिती त्यास पोषक हवी.”
त्याचवेळेस राष्ट्रसेवा दलाचे भरत लाटकर, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे आनंद माने, अंनिसचे प्रमोद दुर्गा, कृष्णात कोरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या दरम्यान ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या घरी पत्रकार परिषद घेण्यात आली. यात श्वेता जुमानी यांना त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या उपस्थितीत चमत्काराचे दावे सिद्ध करावेत व ‘अंनिस’चे 25 लाखांचे बक्षीस घेऊन जावे, असे आव्हान देण्यात आले.
या आंदोलनात महाराष्ट्र अंनिस कोल्हापूर जिल्हा प्रधान सचिव सीमा पाटील, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष विनायक चव्हाण, राज्य कार्यवाह सुजाता म्हेत्रे यांच्यासह कोल्हापूर व इस्लामपूर ‘अंनिस’चे बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी होते.