कॉ. नारायण सुर्वे : कष्टकऱ्यांचा युगप्रवर्तक कवी

कॉ. सुबोध मोरे -

भाकरीचा चंद्र पाहणाऱ्या कष्टकरी समाजाचे दर्शन घडवणारे व बहुजन समाजाला संघर्षाची प्रेरणा व आत्मबळाचे भान देणारे कविवर्य कॉम्रेड नारायण सुर्वे यांची यावर्षी जन्मशताब्दी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या आयुष्याची व व्यक्तिमत्त्वाची  जडणघडण  तसेच त्यांच्या कवितांबद्दल लिहित आहेत कॉ. सुबोध मोरे …

रोजी रोटीचा सवाल रोजचाच आहे 
कधी फाटका बाहेर,
कधी फाटका आत आहे....
रोटी प्यारी खरी, आणखी काही हवे आहे..
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे...
सारस्वतांनो ! थोडासा गुन्हा घडणार..
एकटाच आलो नाही, युगाचीही साथ आहे...

युगाची साथ असलेले युगप्रवर्तक कविवर्य कॉ. नारायण सुर्वे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. नारायण सुर्वे हे खर्‍या अर्थाने आधुनिक काळातील पहिले ‘कामगार कवी’ होते. त्यांच्या आधीच्या काळातही, कामगार, कष्टकर्‍यांवर कविता लिहिली गेली. परंतु ते उच्च जात वर्गीयांतील होते. ते स्वतः कामगारवर्गीय नव्हते. त्यांनी कष्टकर्‍यांवर सहानुभूतीतून काव्यलेखन केले, त्याला अनुभूतीची जोड नव्हती. नारायण सुर्वे हे गिरणीत कामगार, कष्टकरी म्हणून राबले होते. त्यांनी शोषण, दु:ख, वेदना, अनुभवली होती. ती अनुभूती त्यांना त्यांच्या आधी लिहिणार्‍या वरील उच्च जात- वर्गीयांच्या कवितेत, साहित्यात आढळत नव्हती. त्या संदर्भात ते ‘जाहीरनामा’ काव्यसंग्रहातील, परिशिष्टातील ‘कविता आणि मी’ या लेखात म्हणतात, ज्या जगात मी उभा होतो, त्या जगाविषयी ते बोलत, पण ते अंत:करणाला भिडत नव्हते… माझ्या इच्छांना, तडफडाटाला व्यक्त करण्यात ही मंडळी अपुरी वाटायची… माझ्या मेहनतीचा घामाचा वास जसा माझाच असतो तसाच तो माझ्या कवितेत हवा असतो, पण तो सापडत नाही’ अशी खंत सुर्वेंनी व्यक्त केली होती. नारायण सुर्वे यांचे वरील विधान हे ११ जून १८८५ रोजी महात्मा फुले यांनी तत्कालीन मराठी ग्रंथकार सभेच्या (साहित्य संमेलन) आयोजकांना जे पत्र पाठविले होते, त्याच्याशी साधर्म्य व्यक्त करणारे आहे. त्यात फुले म्हणतात,

‘त्यांनी केलेल्या भावार्थाशी आपल्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळत नाही.’ हीच खदखद म. फुले यांनी तत्कालीन उच्च जातवर्गीयांच्या साहित्याविषयी व्यत केली होती व आपले वेगळे साहित्य निर्माण केले.

लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे यांनीही पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या १९५८ सालच्या उद्घाटकीय भाषणात, आमचा दलित साहित्याचा वेगळा सवतासुभा का? या विषयावर, “पिळला जाणारा नि कष्ट करणारा, दलित म्हणून तो निराळा आहे. या दलिताला आपल्या जीवनाचे स्पष्ट प्रतिबिंब आजच्या मराठी साहित्यात दिसत नाही”, असं मत नोंदवले होते.

हे दोघेही मराठीतील महत्त्वाचे लेखक, साहित्यिक जवळपास एकाच कालखंडात जगत होते व लिहीत होते. अर्थात, नारायण सुर्वे हे थोडे उशिरा लेखनाकडे वळले. परंतु दोघांचे वैशिष्ट्य असे की, ते दोघेही समाजातील तळागाळातील दलित – शोषित, उपेक्षित समाज घटकातून आले होते. परंतु, कॉ. अण्णा भाऊ साठेंना जातिव्यवस्थेचे चटके अधिक बसले होते. नारायण सुर्वेंना ‘अनाथ’ म्हणून गंगाराम सुर्वे नावाच्या गिरणी कामगाराने वाढविले होते. आणि सुर्वेही बाल कामगार म्हणून गिरणीत काम करू लागले व कष्टकरी म्हणून बालपणातच शोषणाला सामोरे गेले. नंतर त्यांचा प्रवास शिपाई ते शाळेतील शिक्षक असा झाला. परंतु पुढे याच ‘अनाथ’ मुलाने आपली ‘नाममुद्रा’ मराठी साहित्यावर उमटवली!

जसा कॉ. अण्णा भाऊ साठेंना मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्पमध्ये कम्युनिस्टांचा सहवास लाभला व ते कम्युनिस्ट पक्षाचे शाहीर, वार्ताहर, कार्यकर्ते म्हणून काम करु लागले. थोड्याबहुत प्रमाणात तसाच जीवनाचा प्रवास नारायण सुर्वेंचाही झाला. सुर्वेही मुंबईतील गिरणीत बाल कामगार म्हणून काम करीत असतानाच त्या काळी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील, ‘लाल बावटा गिरणी कामगार युनियन’चे जे लढे, संघर्ष सुरू होते, त्या आंदोलनतूनच त्यांची कम्युनिस्ट पक्षाची व मार्क्सवादी विचारांची ओळख झाली. आणि त्याबद्दलच नारायण सुर्वे आपल्या ‘कार्ल मार्क्स’ या गाजलेल्या कवितेत म्हणतात,

"माझ्या पहिल्या संपातच,
मार्क्स मला असा भेटला,
मिरवणुकीच्या मध्यभागी, माझ्या 
खांद्यावर त्याचा बॅनर होता...”

१९४० च्या दशकात आपल्या खांद्यावर जो ‘लाल झेंडा’ घेतला, तो ते अखेरपर्यंत गौरवाने फडकावीत राहिले. त्यांची मार्क्सवादी विचारांची ओळख ही खंडीभर मार्क्सवादी विचारांची पुस्तके वाचून नाही, तर प्रत्यक्ष रोजच्या जीवन संघर्षातून झाली होती. ते त्या काळी ज्या गिरणगावात रहात होते व काम करीत होते, तो परिसर, सभोवताल लाल बावट्याच्या, कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखालील लढे, संघर्ष, आंदोलनांनी व विचारांनीही घुसळून निघाला होता. नारायण सुर्वेही त्या आंदोलने व विचारांनी भारावलेले होते. ते त्याच काळात कम्युनिस्ट पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते बनले. नारायण सुर्वे काही काळ मुंबईतील कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यालय असलेल्या ‘राजभवन’ या इमारतीचे ‘रेड गार्ड’ स्वयंसेवक म्हणूनही काही काळ काम करीत असत.

नारायण सुर्वे यांची मार्क्सवादी तत्त्वज्ञानावर अढळ निष्ठा होती. त्याविषयी ते ‘कविता आणि मी’ या लेखात म्हणतात, ‘मार्क्स व एंगल्स हे आजच्या युगाचे थोर विचारवंत आहेत. ते वैज्ञानिक दृष्टिकोन देतात, जीवनाने पुढे आणलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. मार्क्सवादी तत्त्वज्ञानातील शब्दही असेच जीवनाचे मूल्यमापन, दिग्दर्शन करतात. ते माणूस, भौतिक परिस्थिती आणि निसर्ग या सर्वांच्या अतूट संबंधांचे विवेचन करतात. ते माणूस आणि कलेचाही संबंध सांगतात!” नारायण सुर्वे यांनी मार्क्सवादातील कलेचा दृष्टिकोन आपल्या साहित्यात सर्जनशीलपणे रुजविण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रचारी रूप येऊ दिले नाही. नारायण सुर्वेंच्या कवितेवरील मार्क्सवादी विचारांच्या प्रभावाविषयी मत नोंदविताना, पुरोगामी समीक्षक दिगंबर पाध्ये ‘नारायण सुर्वे यांची कविता’ या समीक्षा ग्रंथात म्हणतात, “सुर्वे यांनी जी कविता लिहिली त्या कवितेतून व्यत होणार्‍या आशयामागे मार्क्सवादी मूल्ये व भावनात्मक कल आहे. सुर्वे यांच्या कवितेतील आशयाचे वेगळेपण, भोवतालच्या वास्तवाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी आणि त्यामुळे मराठी कार्यक्षेत्रात या कवितेला प्राप्त होणारी वैशिष्ट्यपूर्णता पाहताना मार्क्सवाद केवळ प्रस्तुत नव्हे, तर अपरिहार्य आहे.”

नारायण सुर्वे यांच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे, आजवर मराठी साहित्यात न आलेलं (दलित साहित्याचा अपवाद) कष्टकर्‍यांचं जगणं, वेदना, दु:ख व सभोवताल त्यांनी समर्थपणे कवितेत आणले. तो त्यांचा जीवनानुभव होता. त्यांची कविता फक्त त्यांच्या एका व्यतीपुरती मर्यादित नव्हती. ती समग्र कष्टकरी, शोषित समूहाची, समष्टीची आहे.

नारायण सुर्वे ज्या मुंबई शहरात लहानाचे मोठे झाले, त्या शहरात खेड्यातून, देशभरातून लोकं पोटासाठी, रोजगारासाठी श्रम विकायला येतात. त्याचं वर्णन ‘मुंबई’ कवितेत करताना सुर्वे म्हणतात…

पटकूर खांद्यावर टाकून, सह्याद्री घाट उतरून..

माझा बाप तुझ्या दारावर उभा राहिला श्रम घेऊन...
कळू आले तेव्हापासून, डब्बा घेऊन साच्यावर गेलो...
घडवतो लोहार हातोड्या, तसाच घडवत गेलो...
शिकलो तार कशी लावावी,
बाबिण कशी भरावी धोट्यात...’

पुढे कवी म्हणतो..

‘तेच आम्ही.. तुझ्या वास्तुशिल्पाचे शिल्पकार..
तुझ्या सौंदर्यात हे  नगरी...
दिसोंदीस घालीत असतो भर...’

      परंतु या शहराचे सौंदर्य वाढविणारे कामगार – कष्टकरी कसे नरकमय जीवन जगतात याचं वर्णन सुर्वे पुढील ओळीत करतात…

‘नरकासम चाळीत राहून,
स्वच्छ करतो तुझे रस्ते
उठवले जातो कधी,
दंडुकेवाले जसे उठवितात फिरस्ते...
पुन्हा उचलतो संसार थाटतो,
दुजा बाजूच्या खाचरात...
असे आम्ही लक्षावधी..
राबता खपता आयुष्य,
मेणबत्तीसम विझून घेतो...’

    मुंबई शहर कसं आहे, हे सांगताना ते म्हणतात,

‘हे कारखाने, गिरण्या 
आमुच्या दुनियेचे अलंकार...
ह्या झोतभट्ट्या, गोद्या, लोहरूळ,
हे गजबजलेले रस्ते...
हे आपले प्रचंड नगर 
धडाडणार्‍या बॉयलरसारखे...
झोत भट्टीत शेकावे पोलाद,
तसे आयुष्य छान शेकले...’

नारायण सुर्वेंची कविता ही सामान्य गरीब, कष्टकर्‍यांच्या जगण्याचा दस्तावेज आहे. त्यांच्या  ‘मुंबई, माझे विद्यापीठ’, ‘पोस्टर’ या कविता व ‘गिरणीची लावणी,’ ‘डोंगरी शेत माझं गं…’ ही गाणी नारायण सुर्वेंच्याच आवाजात ऐकणे, हे आमच्यासाठी खूपच संस्मरणीय आहे. काही कवी, गीतकार त्यांच्या अशा खास गाण्यानेच ओळखले जातात. दया पवार हे त्यांच्या ‘बाई मी धरण बांधते…’ या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. तसेच दया पवारांच्याही आधी नारायण सुर्वे हे, ‘डोंगरी शेत, माझं ग…’ या एकाच गाण्याने महाराष्ट्रातील शाळा- महाविद्यालयांत पोचले होते. आम्ही शाळेत असल्यापासून ते आतापर्यंत या गाण्यावर विद्यार्थी लोकनृत्य करताहेत. आणि चळवळीत, आंदोलनातही या जनतेच्या कवीचे गाणे चळवळीचे कार्यकर्ते – कलावंत जोशात गात असतात.

हे गाणं लोकप्रिय करण्यात, लोकशाहीर कॉ. अमर शेख यांचा सिंहाचा वाटा आहे! या गाण्याला शाहीर कॉ. द. ना. गव्हाणकरांनी सुंदर चाल लावली होती. प्रथम हे गाणं लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे, शाहीर कॉ. अमर शेख व शाहीर कॉ. द. ना. गव्हाणकरांनी स्थापन केलेल्या ‘लाल बावटा कला पथका’ने जानेवारी १९४४ साली मुंबई जवळील टिटवाळा येथे, किसान सभेचे जे पहिले महाराष्ट्र स्थापना अधिवेशन भरले होते, त्या अधिवेशनात कॉ. अमर शेख यांनी आपल्या पहाडी आवाजात गायले होते. स्वत: नारायण सुर्वे हे देखील त्या काळी ‘लाल बावटा’ कला पथकात सहभागी असत. त्याच दरम्यान, नारायण सुर्वेंनी ‘गिरणीची लावणी’ लिहिली, जी अमर शेख गात असत. सुर्वेंच्या लाल बावटा कला पथकातील सहभागाची नोंद कुठे झालेली नाही. ही माहिती माझे वडील कॉ. सत्येंद्र मोरे यांनी मला दिली. नारायण सुर्वे ज्या शाळेत शिपाई होते, तेथेच माझे वडील विद्यार्थी होते. नारायण सुर्वे व माझे वडील मिळून शाळेचे ‘भित्तीपत्र’ चालवायचे, ज्यात सुर्वे कविता, गाणी लिहायचे. तसेच लाल बावटा कला पथकात सुर्वेंसोबत माझे वडील, आत्या कमल, कॉ. डांगेची मुलगी रोझा, कॉ. अण्णा भाऊ साठेंची मुलगी शांता आदी बालसंघाचे बालकलाकारही कार्यक्रमांत सहभागी होत असत.

नारायण सुर्वे हे अण्णा भाऊ साठेंप्रमाणेच कम्युनिस्ट चळवळीतून घडलेले कवी, लेखक होते. सुर्वेही अण्णा भाऊंप्रमाणे जास्त शिकलेले नव्हते. ते म्हणतात, ‘माझं शिक्षण हे जीवनाच्या विद्यापीठात झाले आहे. १९४० ते १९७० पर्यंतच्या कालखंडात मुंबईतील कामगार चळवळीवर, साहित्य व सांस्कृतिक, नाट्य – सिनेसृष्टीवर  कम्युनिस्टांचा, मार्क्सवादी विचारांचा प्रभाव होता. रशियातील सुप्रसिद्ध लेखक मॅक्झिम गॉर्की, चेखोव, टॉलस्टॉय, तुर्गनेव मायकोवस्की आदींच्या कथा, कादंबरी, कविता मराठीत अनुवादित झाल्या होत्या. दुसरीकडे प्रगतीशील लेखक संघाचे प्रेमचंद, फैझ अहमद फैज, ख्वाजा अहमद अब्बास, कृष्ण चंद्र, मंटो, इस्मत चुगताई, राहुल सांकृत्यायन, यशपाल, सज्जाद जहिर, मजाज, साहिर, कैफी आझमी, जांनिसार अख्तर, सरदार अली जाफरी, मुल्कराज आनंद, शैलेंद्र, प्रेम धवन, मजरुह आदी अनेक पुरोगामी साहित्यिकांचा प्रभाव अण्णा भाऊ साठे, नारायण सुर्वे यांच्यावर पडला होता. नारायण सुर्वे यांना हिंदी, उर्दू भाषांची उत्तम जाण होती. सुर्वे यांनी त्या भाषेतील कवींच्या कविता, त्यांच्या ‘गवसलेल्या कविता’ या संग्रहात अनुवादित केल्या आहेत. कृष्ण चंद्रच्या कथाही अनुवादित केल्या आहेत. त्यांनी शहनाज शेख व गीता महाजनने लिहिलेले, ‘मैं मोर्चे में जाऊ की नक्को…’ हे प्रसिद्ध गाणंही अनुवादित केले आहे.

ज्या काळात अण्णा भाऊ साठे, नारायण सुर्वे लिहीत होते, त्या काळात हिंदी-उर्दूतील साहित्यिक, डाव्या पुरोगामी चळवळीतील प्रगतिशील लेखक संघ व इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) तर्फे सक्रिय होते. बलराज सहानी, ए. के. हंगल, दीना पाठक, रवीशंकर, सलील चौधरी, उत्पल दत्त, मामा वरेरकर आदी अनेक कलावंत उघड राजकीय भूमिका घेऊन काम करीत होते. नारायण सुर्वेही या प्रगतीशील, सांस्कृतिक प्रवाहासोबत सक्रिय होते.

१९६०-७० च्या दशकात ‘लिटल मॅगझिन’चा ही गवगवा होता. त्याच वेळी डाव्या, पुरोगामी विचारांच्या मित्रांनी ‘जागृती मंडळ’ नावाचा मंच स्थापन केला होता. ज्यात शशी शेखर प्रधान, कॉ. तारा रेड्डी, अरुण खोपकर, शिवराम देवलकर, सतीश काळसेकर आदी होते. त्यांनी ‘भारुड’ नावाचे अनियतकालिक सुरू केले होते. त्या भारुडशीही सुर्वेंचा संबंध होता.

त्याच ७० च्या दशकात नारायण सुर्वे, बाबुराव बागुल, सतीश काळसेकर, सुधीर बेडेकर, प्र. श्री. नेरुरकर, वा. वि. भट, डॉ. सदा कर्‍हाडे आदींनी मिळून ‘प्रगत साहित्य सभा’ नावाने पुरोगामी सांस्कृतिक मंच स्थापन केला होता. नारायण सुर्वेंचा ‘अभिनव प्रकाशन’ व ‘लोकवाङ्मय गृह’ या पुरोगामी प्रकाशन संस्थांशीही संबंध राहिला. ते अनेक वर्षे लोकवाङ्मय गृहाचे संचालकही होते. तसेच ‘लोकवाङ्मय’ या मासिकाचे  संपादन करीत होते. ‘तात्पर्य’ या डाव्या विचारांच्या मासिकाच्याही सुर्वे सल्लागार मंडळावर होते.

नारायण सुर्वे यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पहिला दोन लाखांचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ देण्यात आला होता. त्या पुरस्काराच्या रकमेतून त्यांनी ‘प्रगत’ ही संस्था सुरू केली आणि त्यातर्फे ‘प्रगत’ वार्षिक अंकही प्रकाशित केला होता.

नारायण सुर्वेंना देश व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांच्या कवितांचे इंग्रजी व अन्य भारतीय भाषांतही अनुवाद झालेत. (सोबतची चौकट पाहणे) नारायण सुर्वेंवर सुप्रसिद्ध दिग्दर्शक अरुण खोपकर यांनी लघुपट केला आहे. तसेच सुप्रसिद्ध चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन व नारायण सुर्वेंच्या कवितांवर डॉ. अंजली मॉन्टेरो व जयशंकर यांनी ‘साचा’ नावाचा लघुपट केला आहे. नारायण सुर्वे यांच्या कवितांवर त्यांचा दिवंगत मुलगा श्रीरंग सुर्वे याने ‘पोस्टर आणि कविता’ या नावाचं नाटकही केले होते.

नारायण सुर्वे यांनी पुरोगामी, डाव्या चळवळीतील सांस्कृतिक विश्वातील अनेक चढउतार पाहिलेत, परंतु त्यांची श्रमिक – कष्टकरी चळवळीशी बांधिलकी कायम होती. त्यांच्या कवितांमध्ये जी – हणम्या, सुंद्री, याकूब, जानकी अका, शिगवाला अशी जी माणसं आली, त्यांच्याशी त्यांचं जैव नातं राहिलं. देशातील या सर्वसामान्य लोकांच्या दु:ख, वेदना, दारिद्य्राविषयी ते देशाला पुढील शब्दांत सवाल करतात…

‘हा माझाही देश; आणि त्यातील पोकेपोकेसे लोक… आपल्या घरालाच असे पोकेपण यावे; तर काय करावे? ज्यांना जन्मभर दु:ख, दारिद्य्रच मिळाले असेल त्यांनी तपशीलासह सर्वच नाकारू नये तर; काय करावे?

थांबू तर शकत नाही; आणि तुमचे हे असे औदासिन्य एका नव्या संघर्षासाठी धुमाळीत घुसू नये तर काय करावे..?’

आज देशात शोषित, कष्टकर्‍यांची जी दारुण स्थिती आहे त्याचे भेदक चित्रण सुर्वेंनी वरील ओळीत टिपलं आहे. आता जी पोकळ देशभती, राष्ट्रवादाची भाषा आजचे धर्मांध राज्यकर्ते वापरीत आहेत, त्याला सुर्वे तपशीलासह सर्वच नाकारू नये तर काय करावे? असा मर्मभेदी सवाल करून, लोकांना नव्या संघर्षासाठी औदासिन्य सोडून घुसण्याचे आवाहन करीत आहेत.

नारायण सुर्वे यांची जन्मशताब्दी साजरी करताना त्यांच्या या संघर्षाचे आवाहन लक्षात घेतले तरच या सामाजिक बांधिलकी मानणार्‍या पुरोगामी कविवर्यांचे खरे स्मरण होईल!

- कॉ. सुबोध मोरे, मुंबई

(लेखक डाव्या चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.)
७७०९८ ७६०२९            subodhvidrohi@gmail.com

नारायण सुर्वे यांची प्रकाशित पुस्तके

काव्यसंग्रह

ऐसा गा मी ब्रह्म, माझे विद्यापीठ, सनद (संपादक : कुसुमाग्रज), जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन
गवसलेल्या कविता (संपादक : विजय तापस)

लेखसंग्रह 

माणूस, कलावंत आणि समाज

नारायण सुर्वे यांनी केलेले अनुवाद –

तीन गुंड आणि सात कथा (मूळ लेखक : कृष्णचंद्र)
दादर पुलाखालची मुले (मूळ लेखक : कृष्णचंद्र)

अनुवादित

ऑन द पेव्हमेंट ऑफ लाइफ (इंग्रजी)          (अनु.: प्र. श्री. नेरूरकर, कृष्णा चौधरी)
नारायण सुर्वेनी कविता (गुजराती) (अनु.: वसंत जोशी)
मेरा विद्यापीठ (हिंदी) (अनु. मनोज सोनकर)
नारायण सुर्वे की कविता (हिंदी) (अनु.: पांडुरंग कापडणीस)
मेरी दरस गाह (उर्दू) (अनु.: रफिया शबनम आबीबी)
नारायण सुर्वे निवडक कविता (कन्नड)    (अनु. ल. रा. पंडित)

संपादित – दलित काव्यदर्शन, गाणी चळवळीची, कविता श्रमाचीकॉ. डांगे :  भारतीय राजकारणातील वादळ


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ]