-

नवी दिल्लीतील रोहिणी या उपनगरामध्ये आध्यात्मिक विश्व विद्यालय या नावाचे आश्रम असून त्याची सुरक्षा व्यवस्था एखाद्या बंदिस्त कडेकोटाला साजेशी ठरेल. या चार मजली इमारतीत सुमारे २०० महिला व डझनभर तरी पुरुष राहत असावेत. नेमका आकडा किती हे कुणी खात्रीशीर सांगू शकत नाही. येथील प्रत्येक खिडकी जाड लोखंडी सळ्यानी बंदिस्त केलेली आहे. त्यावर काळ्या कपड्यांचे कर्टन्स आहेत. गच्चीवर महिला कपडे वाळवण्यासाठी जात असल्यामुळे कुणालाही दिसू नये म्हणून गच्चीचे चारी बाजू हिरव्या रंगाच्या ताडपत्रीने झाकलेले आहेत. बाहेरच्यांना इमारतीच्या लॉबीपाशीच अडवले जाते. आध्यात्मिक विश्व विद्यालयातील सदस्यसुद्धा कुणीतरी एस्कॉर्ट असल्याशिवाय बाहेर पडू शकत नाहीत. तळमजल्यावर पार्किंग व्यवस्था असली तरी कोण आले कोण गेले हे शेजार्यांना थांगपत्ता लागत नाही. गेल्या नऊ वर्षात तीन वेळा सीबीआयची धाड पडली तरी शेजार्यांना त्याबद्दल काहीही माहीत नव्हते.
दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या २०१८ च्या अहवालात, दिल्ली महिला आयोगाचे माजी प्रमुख, स्वाती मालीवाल, यांनी हे आश्रम एक तुरुंग असल्याचे सांगितले. न्यायालयाच्या अलीकडील अहवालात तेथील मुलींच्यावरील नियम इतके बंधनकारक व कडक आहेत की निरीक्षकांनी कितीही प्रयत्न केले तरीही दहशती खाली असलेल्या त्या मुली नियम उल्लंघन करून बोलण्यास तयार होत नाहीत. असे नमूद केले आहे.
या जगाचा शेवट (लवकरच) होणार आहे, या भाकितावर विश्वास ठेवलेल्या प्रजापिता ब्रह्म कुमारी या कल्टची उपशाखा म्हणून हे विश्व विद्यालय पहिल्या पहिल्यांदा काम करत होती. या विद्यालयात भरती झालेल्या महिला प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या कल्याणकारी ‘सत्यम्-शिवम्-सुन्दरम् सुप्रीम सोल’ या तत्वांच्या प्रचार- प्रसार यासाठी काम करत आहेत. त्याचे नेतृत्व स्वतःकडे दैवी शक्ती आहे असा दावा करणार्या ८२ वर्षाचा गॉडमॅन वीरेंद्र देव दीक्षित याच्याकडे आहे. प्रजापिता ब्रह्म कुमारीच्या शिष्यांना त्यांचा गुरु लेखराज ब्रह्माच वीरेंद्र देव दीक्षित यांच्या माध्यमातून उपदेश करतात असे तीव्रतेने वाटते. ब्रह्मकुमार व ब्रह्मकुमारींना लेखराज ब्रह्माच्या मृत्युनंतर त्याची गादी चालविण्यासाठी योग्य व्यक्ती हवी होती. ती त्याना या दिक्षितच्या स्वरूपात सापडली. नंतरच्या काळात मूळ ब्रह्मकुमारी विद्यालय व नंतर स्थापन झालेल्या आध्यात्मिक विश्व विद्यालय यांच्यामध्ये वितुष्ट आले. परंतु दिक्षित यांनी बाजी मारली व त्यानी या देशातच नव्हे तर परदेशातही शाखा उघडून सर्व संबंधितांना आश्चर्यचकित केले. त्याच्या वेबसाइटने त्याचे वर्णन “गरीब ब्राह्मण” असे केले असून “सुवर्ण युगाची स्थापना करण्याचे कार्य ते करत आहेत.” असा दावा केला आहे.

१९८४ मध्ये त्यांच्या घरापासून आध्यात्मिक सेवेला सुरुवात करून, नंतर त्याची बालवधू कमला देवीसह, दिक्षित यांनी भारतातील मोठमोठ्या शहरात आध्यात्मिक विश्व विद्यालय केंद्रांची स्थापना केली. ५० हजारहून अधिक अनुयायांना जमविले. परंतु १९९८ पासून कंपिला आश्रमातील दोन मुलींनी त्याच्यावर बलात्काराचा आरोप केल्याने हा धर्मगुरू वादात सापडला. त्याच्यावर रीतसर खटले भरले गेले. आरोप केलेल्यानीच नंतर आरोप मागे घेतल्यामुळे न्यायालयाला खटले मागे घ्यावे लागले. त्यानंतर, २०१७ मध्ये, शेजार्यांनी पुन्हा तक्रार केल्यामुळे दिल्ली महिला आयोगाने विजय विहार, नांगलोई, करावल नगर आणि मोहन गार्डनमधील दिल्लीस्थित आध्यात्मिक विश्व विद्यालय आश्रमांची तपासणी करू लागली. या तपासणीत अनेक धक्कादायक लैंगिक अत्याचाराच्या गोष्टी आढळल्या. संपूर्ण देश हादरले.
डिसेंबर २०१७ च्या सुमारची घटना. वीस वर्षाची श्रीवनिता या विश्वविद्यालयात दोन वर्षे शिकत होती. हे विश्वविद्यालय विद्यार्थ्यांच्या आध्यात्मिक उन्नतीचे शिक्षण देत असल्याचा दावा करत होती. एके दिवशी या विद्यालयाचे मुख्यस्थ, दीक्षित यानी तिला सेवा करण्यासाठी त्याच्यासाठी असलेल्या खास सूटमध्ये बोलावले. तिला सेवा म्हणजे जेवण वाढणे वा पायाला मसाज करणे एवढेच अभिप्रेत होते.
आश्रमातील काही वयस्कर महिला तिला विद्यालयाच्या इमारतीला जोडून असलेल्या वेगळ्या शयनगृहात घेवून बाहेरून कडी लावले. तेव्हाही तिला तिच्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना आली नाही. अजूनही तिला आपल्या वडिलासारखे असणार्या व दिसणार्या गुरूचे पाय चेपणे हीच सेवा अशी माझी समजूत होती, असे तिने नंतर सांगितले.
जेव्हा दिक्षित तिचा मानभंग करण्याच्या पावित्र्यात होता तेव्हा ती त्याच्यावर तुटून पडली व जोरजोराने किंचाळू लागली. ‘मी माझे ओरडणे काही थांबवले नाही. तितक्यात एक बाई जिना चढून वर आली व बाहेरची कडी काढली व एक शब्दही न बोलता पळून गेली.’ ती सांगत होती.
श्रीवनिताने आपल्या भावाला व बहिणीला पण याच आश्रमात दाखल केली होती. अशी करणारी ती एकटीच वा पहिली किंवा शेवटची नव्हती. तिने जरी आश्रम सोडले असले तरी तिचा भाऊ प्रजापिता ब्रह्मकुमारीचा अनुयायीच होता.
या घटनेच्या सुमारास दिल्ली महिला आयोग दिक्षित व त्याच्या संस्थेवरील मानवी तस्करीच्या आरोपांची चौकशी करत होती. रोहिणी, मोहन गार्डनमधील आश्रमातील ४१ महिलांना सीबीआयने बंधमुक्त केले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने चौकशीच्या काळात दिक्षित याला विनाअनुमती बाहेरगावी जाऊ नये अशी अट घातली होती. श्रीवनिताच्या मते न्यायालयाने सक्त ताकीद दिलेले असले तरी हा बाबा उत्तर प्रदेश येथील फरुकाबाद आश्रमात रहात होता
९ वर्षे फरार असलेल्या दिक्षितच्या मागावर सीबीआयने लूकआउट नोटीस पाठवली. अनेक वेळा त्याच्या आश्रमावर धाडी टाकल्या व अवैध व्यवहाराच्या नोटीसा पाठवल्या. परंतु प्रत्येक वेळी त्याचे अनुयायी गोंधळ घालून आरडा-ओरडा करून अधिकार्यांना नामोहरम करत असल्यामुळे त्यांना रिकाम्या हाती परतावे लागत होते.
“आश्रमाच्या आत असलेल्या महिलांच्या समोर तुम्ही कितीही प्रत्यक्ष पुरावे सादर करा, ते तुमच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाहीत वा पुराव्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. त्यांच्या श्रद्धेला तुम्ही धक्का पोचू शकणार नाही.” ४० वर्षे वयाची प्रेरणा सांगत होती. २०२१साली ती अनंतपूर आश्रमातून पळून आलेली होती. तिचे अनुभवाचे बोल होते. “पुराव्यांच्या बद्दल एक चकार शब्द न काढता या बायका काही तरी बाष्कळ बोलून माझा मूड खराब करत होत्या.”
२००५ साली फरुकाबाद आश्रमातून बाहेर पडून ती स्वतःची सुटका करून घेतली. तिची आई दिक्षितची परम भक्त होती. परंतु तिला तिची १९ वर्षाची आंध्रमधून बीटेक झालेली मुलगी आश्रमात जाऊ नये असे वाटत होते. परंतु सत्संगाचा माहोल व बाबाच्या मिठास वाणीत सांगितलेली प्रवचनं ऐकून ती भारावून गेली. प्रेरणालाही आपले आयुष्य आध्यात्मिक उन्नतीसाठी खर्ची घालावे असे वाटले. आश्रमातील पहिल्याच दिवशी एका ज्येष्ठ महिलेने तिची दिक्षितबरोबर भेट घडवून आणली. व त्याने तिच्यावर बलात्कार केला. ती सांगत होती. दुसर्या दिवशी ती तिथून बाहेर पडण्यासाठी धडपडत होती. परंतु आश्रमातील दीदी आणि माता (त्यांच्या वैवाहिक स्थितीची ओळख करून देणार्या उपाधी) तिच्याभोवती जमल्या. ही तुझ्या श्रद्धेच्या सत्वपरीक्षेची वेळ आहे असे म्हणत ते तरुणीचे मन वळवीत होते.
दिल्ली-स्थित मनोविश्लेषणतज्ज्ञ व कल्ट सदस्याबरोबर काम केलेली, जयती कालराच्या मते कल्टच्या एकाच सदस्याच्या मनात काय चालले आहे यावरून कल्टचे पूर्ण चित्र उभे राहू शकत नाही. या महिलांच्या मनात काय आहे याचे त्या महिला समूहाच्या चौकटीतून पहावे लागेल.
आपली एखाद्या समूहाशी बांधिलकी असावी वा आपण एखाद्या समूहाचे हिस्सेदार असावे ही एक प्रत्येक माणसाची आदिम इच्छा असते. मानव हा अनादी काळापासून सामाजिक प्राणी आहे. परंतु कल्टमध्ये करीष्मा असलेला, वलय असलेला एखादा नेता असतो व तो तुम्हाला दैवी ज्ञान देऊ शकतो, अशी एक भावना त्यात असते. दिक्षित हा आपला उद्धारकर्ता आहे व या कलियुगातून व जगत्प्रलयापासून तोच फक्त वाचवू शकतो याची मनोमन खात्री झालेल्या या महिला त्याच्याकडे आकर्षित होतात व १६ हजार जन्म-मृत्युच्या फेर्यातून वाचवून आपल्याला मोक्षप्राप्ती करून देणारा हा एकमेव देवपुरुष आहे असे त्यांना वाटत असल्यामुळे ते कुठल्याही थराला जाण्याच्या तयारीत असतात. कल्टचे तत्वज्ञान त्यांच्या मनावर दबाव आणते व त्यांचे ब्रेन वाशिंग करून त्यांना आपल्यात ओढते.

२०२१ मध्ये जेव्हा प्रेरणा आश्रमातून पळून आल्यावर तिला एक प्रश्न विचारण्यात आलाः “वयाच्या १६व्या वर्षी बलात्कार झाल्यानंतरसुद्धा तू तेथेच का राहिली?” त्यावर उत्तर देताना तिने सविस्तरपणे सांगितले. बलात्कार झाल्यानंतर तिला ताबडतोब कंपिला आश्रमात पाठविण्यात आले. काही जबाबदारीची कामं देण्यात आली. एका वर्षात तिला मुख्यस्थ म्हणून अनंतपूरच्या आश्रमात पाठवले गेले. “जेव्हा मला मुख्यस्थ म्हणून जबाबदारीची कामं देण्यात आली. तेव्हा मला इतर महिलांपेक्षा मी वेगळी असून माझ्या शहाणपणाचा उपयोग करण्यात येईल असे वाटले व मी सुरक्षित आहे असेही वाटले.”
कल्टमध्ये बक्षीस व शिक्षा यांची नेहमीच सरमिसळ असते. चांगले काही केल्यास नेत्याशी भेट घडवली जाते, त्याच्या हातातून बक्षीस दिले जाते वा केंद्रातील इतरांच्यावर सत्ता गाजविण्यासाठी एखाद्या केंद्राचे प्रमुख म्हणून नेमले जाते. असे केल्यामुळे त्या कल्टच्या विरोधात व तेथील (गैर) व्यवहाराबद्दल एक अपशब्दही उच्चारला जात नाही. सगळे चिडीचूप.
कल्टचा आपल्या सदस्यावर शारीरिक व मानसिक दबाव असतो, कालरा सांगतं होती. आश्रमातील वातावरण वेडसरपणाकडे झुकलेले, प्रचंड दबाव असलेले व गैरव्यवहारास पुष्टी देणारे असते. दिक्षित यानी असे काही दहशतीचे वातावरण तयार केले होते की शेजारच्या सदस्याशीसुद्धा दोन शब्द बोलण्याचे व त्यांना काय होत आहे हे ऐकण्याइतके धैर्य कुणाकडेही नव्हते. दिल्ली उच्चन्यायालयात सादर केलेल्या प्रेरणाच्या प्रतिज्ञापत्रात तेथील गुप्त व चोरून केलेले व्यवहार, कायम दबावाखाली असलेली वागणूक व आपल्याच सावलीला घाबरण्याची मानसिकता याबद्दलचे सविस्तर वर्णन होते.
आध्यात्मिक विश्वविद्यालयात प्रवेश घेतलेल्या वा कुणाच्या तरी दबावाखाली येथे आलेल्या तरुणींना आपण कुमारिका आहोत वा पश्चात्तापदग्ध कुमारिका आहोत याची चाचणी द्यावी लागते. आश्रमात रहायला आल्यानंतर लग्न करण्यास अनुमती नाही, परपुरुषाबरोबर बोलण्याची मुभा नाही वा धुणी-भांडी यासारख्या घरगुती गप्पा करायचे नाही अशी बंधने लादल्या जातात. आश्रमातील महिलांसाठीच सर्व जाचक नियम आहेत. पुरुष मात्र केव्हाही येऊ-जाऊ शकतात. श्रीवनिता सांगत होती.
महिलांचा दिवस रात्रीच्या दोन-अडीचपासून सुरु होतो. दिक्षितच्या सकाळच्या न्याहरीची व्यवस्था ज्येष्ठ महिलांच्याकडे असते. आश्रमातील झाड-लोट व स्वच्छता नेमून दिलेल्या काही बायकांच्याकडे असते. महिलांच्या एकेक गटाला काही कामे वाटून दिलेली असतात, काही जण स्वैपाक करतात, काही जण संडास साफ करतात.
कालराच्या मते प्रत्येक कल्ट स्वतःचेच काही रूढी परंपरा व कर्मकांड विकसित करत असते. या रूढी परंपरा व कर्मकांड पाळल्यामुळे आपण एकाच समूहाचे आहोत याची जाणीव होते. बायकांची काही प्राथमिक कामं संपल्यावर सकाळी ५ वाजता अध्यात्मावरील पाठ-प्रवचन तासभर चालते. असल्या पाठ-प्रवचनांची उजळणी दिवसातून पाच वेळा केली जाते.
या पाठ-प्रवचनांना संगीताची जोड दिली जाते, प्रभावी भाषणबाजी होते. (दिक्षितनी तर आपल्या भाषणाला मुरली हा शब्द वापरला आहे.) या वातावरणामुळे भक्त मंडळींना आपल्याला नवीन काही तरी मिळत आहे, अध्यात्माच्या उंचीवर आपण पोचत आहोत असे वाटू लागते. त्यांना अगदी दगडातसुद्धा देवाला पाहिल्यासारखा दैवी साक्षात्कार झाल्याचा अनुभव येतो. तो शब्दात व्यक्त करता येत नाही यावर सर्वांचे एकमत असते. या पाठ-प्रवचनामुळे भारावलेली कंपिला येथील ५० वर्षे वयाची अण्णा बेहन दिक्षितलाच परमेश्वराच्या स्वरूपात बघत होती.
कल्टमध्ये सामील झालेल्यांच्यातील उरल्या सुरल्या विरोधाची गळचेपी करण्याचे हे एक पद्धतशीर तंत्र असते. जेव्हा एखादी व्यक्ती कल्टमध्ये शिरते तेव्हा ती व्यक्ती बाहेरच्या वर्तुळातली असते. मात्र सत्संगच्या वेळी अनेक जण भेटतात व येथील व्यवस्थेमध्येही उतरंड आहे याची कल्पना येऊ लागते. जसे दिवस जातात तेव्हा ते नेतृत्वाशी जवळीक साधू लागतात. काही विशेष माहिती असल्यास ती त्या व्यक्तिबरोबर शेर केली जाते. हळूहळू भरपूर माहितीचा मारा त्याच्यावर केला जातो. त्याला वाटते की आपल्यावर विश्वास ठेवला जात आहे. परंतु ही प्रक्रिया पूर्ण होण्यास भरपूर वेळ लागतो. व नंतरच्या काळात ती व्यक्ती त्या सिस्टिमचे अविभाज्य घटक बनते.
आध्यात्मिक विश्व विद्यालयाच्या दिक्षित यांनी अजून एका नामी युक्तीचा वापर करून त्याचे देवत्व सिद्ध केले आहे. दीक्षित यानी प्रत्येक आश्रमवासींना दररोज वा दर आठवड्याला आपल्या मनात आलेल्या लैंगिक विचाराबद्दल, विश्वविद्यालयाबद्दलच्या शंका-कुशंकाबद्दल कबुलीजवाब लिहून काढण्याची सक्ती केली आहे. त्यात प्रत्येक लहान-सहान घटना, त्याची वेळ, जागा, मनात आलेल्या भावना यासुद्धा नमूद करायला हवेत प्रेरणा सांगत होती. या कबुलीजवाबचा दीक्षित नाव न घेता आपल्या भाषणात (मुरलीत) उपयोग करून भक्तांना आश्चर्यचकित करतो. आपल्या मनातल्या गोष्टी तंतोतंत सांगणारा हा एक प्रेषितच आहे याची खात्री पटू लागते.
दिक्षितच्या कुठल्याही नियमांच्या विरोधात कुणी एक ब्र शब्द उच्चारला तरी त्याला विद्रोही असा शिक्का मारला जातो. विद्रोहींच्याकडे तात्साराने बघितले जाते, त्याला त्याच्या पदावरून हटविले जाते व शक्य तो त्याला एका वेगळ्या खोलीत ठेवले जाते. विश्वविद्यालयातील कुठलाही सदस्य त्याच्याबरोबर वा त्याच्या कुटुंबियाबरोबर बोलणार नाही. श्रीवनिताचा भाऊ तिच्या हातचे जेवणसुद्धा खाणार नाही कारण श्रीवनिता विद्रोही होती. व तिचा आत्मा सदोष होता.
या सर्व गोष्ठी पचवून हा बाबा अजूनही आपले काहीही चुकले नाही असे त्याच्या वेबसाइटवर नमूद करतो. अटक झाली तरी “मी सहिसलामत सुटलो,” असे बिनदिक्कत सांगतो. आणि त्याच्या असल्या (निर्लज्ज) विधांनाकडे काना डोळा करत त्याचे भक्त अजूनही त्याच्या मागे जातात. ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये,’ हे मात्र यावरून प्रकर्षाने जाणवते.
– प्रभाकर नानावटी
(संदर्भ : आउटलूक)
वीरेंद्र दिक्षितचा ‘वारसदार’
दिल्लीच्या सीमेवरील पालम येथील एका चार मजली इमारतीत या विश्वविद्यालयाचे नवीन आश्रम आहे. खालच्या दोन मजल्यावर आश्रम व दीक्षित याचे माजी वकील अमोल कोकणे याचे अनुयायी असलेले तरूणी तेथे राहतात. तिसर्या मजल्यावरील सर्व दरवाजे रोहिणी आश्रमाप्रमाणे लोखंडी सळ्याने बंदिस्त केलेले आहेत.
कोकणेबद्दल जास्त माहिती नसली तरी कायद्याची पदवी मिळाल्यानतंर तो २००५मध्ये आध्यात्मिक विश्वविद्यालयात प्रवेश घेतला. ४४ वर्षे वयाचा हा वकील दिल्ली उच्च न्यायालयात दिक्षितावरील खटल्यात बाजू मांडत होता. बाजू मांडत असताना त्याच्या अद्वातद्वा बोलण्यावर न्यायाधीश गीता मित्तल चिडून त्याच्या वकीली ज्ञानाबद्दलच प्रश्नचिन्ह करत होती.
पोलीस अटक करतील या भीतीने दीक्षित फरार झाल्यानंतर कोकणे यानी विश्वविद्यालयाचा ताबा घेतला. तो स्वतःला अष्टदेव म्हणून घेऊ लागला. या अष्टदेवता पृथ्वीच्या प्रलय काळात मानववंशाला मुक्त करणार आहेत या ब्रह्मकुमारी पंथाच्या दाव्याला पुष्टी देणारे वक्तव्य तो करू लागला. या कल्टच्या मते २०३६ मध्ये प्रलय येणार असून नंतर पुन्हा एकदा मानवाची निर्मिती होणार आहे.
कोकणेच्या या आश्रमात वयाच्या १६ व्या वर्षापासून रहात असलेल्या आपल्या मुलीला भेटण्यासाठी कोईमत्तूर येथील तिच्या आईने दिल्ली उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तिच्या मते कोकणे यांनी वाट्सअपमधून चॅटिंग करत काहीतरी लिहून तिला मोहित केले व ती आता आश्रमात रहात आहे. कोकणे यानीच तिला फूस लावून येथे आणले असा आईचा दावा होता. चॅटिंगचे पुरावे सादर केले तरी प्रत्यक्ष शरीर संबंध न आल्यामुळे पोक्सो कायद्यात फक्त फूस लावणे हे बेकायदा ठरत नाही. असे कायदेतज्ज्ञांचे मत होते. त्यामुळे आईला फक्त ४५ मिनिटे भेटण्याची मुभा देण्यात आली. आता ती मुलगी १८ वर्षाची झाल्यामुळे पोक्सो हा कायदा लागू होत नाही. ती मुलगीसुद्धा आईबरोबर एक शब्दही न बोलता आश्रमात परत गेली. यावरून या सर्व आध्यात्माचा व बुवा-बाबांचा एखाद्या तरुण मनावर किती प्रभाव असू शकतो याची कल्पना येईल.
तर अशा प्रकारे हा बाबा-बुवांचा धंदा जोरात चालू आहे व चालूच राहील.