डॉक्टरांनी आमचं साधं आदरातिथ्य आनंदाने स्वीकारलं

विलास निंबोरकर - 8605940169

जादूटोणाविरोधी कायदा विधिमंडळात संमत व्हावा, म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर आपल्या सहकार्‍यांसोबत अनेक वेळा विधानभवनात चकरा मारत राहिले. आमदार व मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. परंतु होकारापलिकडे कायदा मंजूर करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले जात नव्हते, म्हणून महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने स्वत:च्या थोबाडीत थप्पड मारून घेण्यापासून ते स्वरक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यापर्यंतचे उपक्रम राबविले गेले.

जादूटोणाविरोधी कायदा अमलात यावा म्हणून राज्य कार्यकारिणीच्या आवाहनानंतर मार्च 2013 मध्ये आम्ही गडचिरोली येथे स्वरक्ताने पत्र लिहिण्याचा उपक्रम हाती घेतला होता. डॉक्टरांनी मला वैयक्तिक दूरध्वनीवरून संपर्क साधून, ‘गडचिरोली येथे रक्ताने पत्र लिहिण्याचा उपक्रम राबविणार आहात काय,’ म्हणून विचारणा केली व मी लगेच होकार दिला. मी डॉक्टरांना दिनांक, वेळ, स्थळ व अंदाजे सहभागी कार्यकर्तेकिती उपस्थित राहू शकतील, याची कल्पना दिली. सहभागी कार्यकर्त्यांची संख्या ऐकून डॉक्टर खूष झाले व ‘मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहीन,’ असं सांगितलं. ‘मी गडचिरोलीला मुक्कामी येईन व माझ्या सोबत गाडीच्या ड्रायव्हरसह आणखी दोन जण राहतील,’ असं सांगून काही टिप्स दिल्या. जसे – ‘आम्ही शक्यतो कार्यकर्त्यांच्या घरीच जेवण घेऊ, त्यांच्याकडेच झोपण्याची व्यवस्था होईल, असे करावे. रेस्ट हाऊस किंवा महागडे हॉटेल बुक करू नये, झोपण्यासाठी चटई किंवा सतरंजी मिळाली तरी चालेल. खर्चाच्या भानगडीत पडू नका. आम्ही आदल्या दिवशी सायंकाळी सात वाजेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो. पोचण्याचे ठिकाण नेमके कळव म्हणजे आम्हाला पोेचायला सोयीचे होईल.’ मी डॉक्टरांना, ‘सगळ्यांची व्यवस्था माझ्या घरीच करेन,’ असे सांगून ‘घरी कसे पोचाल,’ याविषयी सविस्तर माहिती देऊन ठेवली. तेव्हा डॉक्टर म्हणाले, ‘मी पुन्हा आदल्या दिवशी संपर्क करतोच. चला, लागा कामाला आणि उपक्रमात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करा.’ एवढं बोलून ‘बरं, ठीक आहे,’ असं म्हणून डॉक्टरांनी फोन ठेवला. डॉक्टर आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहणार याचा मनस्वी आनंद होत होता, तर दुसर्‍या बाजूला डॉक्टर येतील, तेव्हा खरंच आपण निदान वीस तरी कार्यकर्ते उपस्थित ठेवू शकू का, हा प्रश्न भेडसावत होता. तरीपण डॉक्टर येणार म्हणून आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना डॉ. दाभोलकर साहेब आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत, असे सांगताच कित्येकांचा विश्वासच बसेना. ‘कार्यकर्त्यांना जमविण्यासाठी उगीच थापा कशाला मारायच्या,’ म्हणून म्हणत होते, तर ‘डॉ. दाभोलकर येणार आहेत आणि आपल्याला हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांना उपस्थित ठेवून यशस्वी करून दाखवायचा आहे,’ म्हणून मी सगळ्यांना सभेचं आयोजन करून सांगितलं. डॉक्टर उपस्थित राहणार म्हणून वृत्तपत्रांतून बरीच प्रसिद्धी दिली. शहरातील सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांशी संपर्क साधून उपस्थित राहण्याविषयी विनंतीवजा निमंत्रण पत्रिकांचेही वाटप केले आणि कार्यक्रमास पंचवीस-तीस कार्यकर्ते कसेही करून उपस्थित राहतील, याची खात्री बाळगून होतो.

ठरल्याप्रमाणे डॉक्टरांचा दोन दिवसा अगोदर फोन आला. ‘कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आतापर्यंत काय-काय केलात, लोकांशी संवाद व संपर्क नीट झालाय का,’ इथपासून आम्ही गडचिरोलीला अंदाजे किती वाजेपर्यंत पोचू शकतो, याची पुरेपूर कल्पना दिली. मी नेहमीप्रमाणे शाळा आटोपून एरव्ही बॅग घरी ठेवायला येणारा त्या दिवशी घराकडे न येता कार्यकर्त्यांच्याकडे गेलो. त्यांना उद्याच्या कार्यक्रमाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सांगितले. या सर्व व्यापात आज डॉक्टर आपल्याकडे येणार आहेत, हे मी पूर्ण विसरून गेलो होतो.

ठरल्याप्रमाणे डॉक्टर व त्यांच्यासोबत अविनाश पाटील, गजेंद्र सुरकार चंद्रपूरहून गडचिरोलीला निघाले, तेव्हा ते सतत माझ्याशी संपर्क करत होते. पण माझा फोन डिस्चार्ज झालेला असल्याने माझ्याशी त्यांचा संपर्क होऊ शकत नव्हता. आज डॉक्टर आणि इतर गडचिरोलीला येणार आहेत, हे मी सुद्धा पुरता विसरून गेलो. एवढेच नाही, तर घरी देखील सांगायचे राहून गेले. त्यामुळे घरी अकस्मात एक नव्हे, दोन नव्हे, चक्क चार व्यक्तींचा स्वयंपाक; तोही रात्रीच्या वेळी करावा लागेल, हे माझ्या पत्नीच्या कल्पनेतही नव्हतं. ज्यावेळी हे सर्व मान्यवर घरी गाडी घेऊन पोेचले, तेव्हा आपल्याकडे कोणी तरी पाहुणे आले, अशी माझ्या पत्नीची समजूत झाली. त्यांच्यात गजेंद्र सुरकार ही एकमेव परिचित व्यक्ती होती. त्यांनी आधी माझ्याविषयी चौकशी केली; पण तिलाही नेहमीप्रमाणे काहीही माहीत नसल्याने ते आता एवढ्यात येतील, यापलिकडे काहीही सांगू शकत नव्हती. त्यानंतर सुरकारांनी माझ्या पत्नीला सर्वांचा परिचय करून दिला. त्यानंतर तिने सर्व पाहुण्यांना पाय धुवायला पाणी देऊन व चहा-पाणी करून आपला गृहिणीधर्म पार पाडला. स्वयंपाक घरी करायचा की यांना जेवायला बाहेर नेणार, याबाबत ती अजून तरी साशंकच होती. शक्यतो आजवरचा तिचा अनुभव हेच सांगत होता की, हे लोक घरीच जेवण घेणार; पण जर बाहेर गेले तर शिजविलेल्या अन्नाचं काय, या विवंचनेत असताना मी घरी येऊन थबकलो. आता तिच्याही जीवात जीव आला; पण माझी पुरती तारांबळ उडाली होती. घरी सगळ्यांना पाहून आनंद झाला; पण मी घरी पाहुण्यांचं स्वागत करायला घरी नाही, म्हटल्यावर त्यांना काय वाटले असावे, अशी नाहक चिंता डोकावत होती. सायकल बाजूला ठेवली. घरात गेलो. म्हटलं, ‘भाजीचं काय करणार आहे?’ ती म्हणाली, ‘हिरव्या भाज्यांचे म्हणाल तर घरात काहीही नाही. टमाटे, मिरची, डाळ आणि बेसन याशिवाय काहीही नाही.’ मी तिला ‘तोपर्यंत तू भात आणि पोळ्याचं बघ, मी पटकन भाजीसाठी काहीतरी घेऊन येतो,’ म्हणून हातात पिशवी घेऊन बाहेर पडत होतो. आमचं बोलणं डॉक्टरांनी ऐकलं असावं, म्हणून ते मला म्हणाले, ‘विलास, तू आता काहीही आणायला बाहेर पडू नकोस. महानंदाला, जे आता घरात आहे तेच बनवायला सांग.’ तरीही मी डॉक्टरांना म्हणालो की, ‘आमच्याकडे मार्केट आठ-नऊ वाजेपर्यंत सुरूच असते. मी आता पाच मिनिटांत जाऊन येतो, तोपर्यंत स्वयंपाक सुरूच राहतो.’ तेव्हा डॉक्टर म्हणाले, ‘आम्ही काही खास वेगळे नाहीत. जे घरात आहे तेच बनवायला सांग. आम्हाला वरणभातही चालेल, नाही तर बेसन-भात (पिठलं-भाकरी) ही चालेल; पण तू बाहेर पडायचं नाही. आता आपण उद्याविषयीच्या कार्यक्रमाबद्दल बोलूया.’ त्यानंतर मी काहीएक न बोलता पत्नीला बेसन-भात बनविण्यासाठी सांगून डॉक्टरांशी गप्पा मारायला व दुसर्‍या दिवशी आपण कुठे काय करणार आहोत, याची सविस्तर माहिती देऊ लागलो. डॉक्टर जसा प्रश्न करायचे, तसे मी उत्तरे देत होतो. पण मी मनातून फार अस्वस्थ होतो. मी पाहुण्यांना जेवणासाठी बाहेर घेऊन गेलो असतो तर किती चांगले झाले असते, नाही का? असं एक म्हणत होते; तर दुसरे मन म्हणत होते की, बाहेर नेल्यानंतर डॉक्टरांना काय वाटलं असतं की, याच्या बायकोनंच याला बाहेर घेऊन जायला सांगितले असणार, म्हणून त्यांनी घरी स्वयंपाक न करता बाहेर घेऊन जाण्याचा बेत आखला असावा. त्याच्या कार्यात नक्कीच पत्नीचा खोळंबा असणार, असे तर डॉक्टरांना नाही ना वाटणार, अशी ही शंका मनात येत होती. एकीकडे मी त्यांच्या जेवणाची नीट सोय करू शकलो नाही, अशी अपराधाची भावना, तर बाहेर गेलो असतो तर बायकोची बदनामी या द्वंद्व स्थितीत मन सापडले होते. आमच्या चर्चा चालू होत्या. अधूनमधून मला माझ्या फोनचाही राग यायचा. आजच अचानक फोन पूर्णपणे डिस्चार्ज का व्हावा? तशी ही फोन डिस्चार्ज होण्याची पहिलीच वेळ नव्हती, तरीपण वाटायचं की, ही माझी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता म्हणून एक प्रकारे अग्निपरीक्षा होती की काय? डॉक्टरांना उद्याच्या कार्यक्रमाची चिंता, तर माझ्याकडून इतकी कशी बेपर्वाई होऊ शकते, याची चिंता सतावत होती आणि माझ्या पत्नीने कशा पद्धतीने स्वयंपाक करून ठेवला असेल. निदान जो स्वयंपाक केला, तो तरी यांना पसंत पडेल की नाही, याची दुसरी चिंता अधिक भर घालत होती. ही चिंता मात्र माझ्या मनातून बाहेर पडायला तयार नव्हती. एकतर माझ्याकडे एवढ्या दिवसांनंतर डॉक्टर पहिल्यांदाच आले. आम्ही येणार आहोत, याची कल्पनाही दिलेली आणि मी इतका बेपर्वाईने कसा वागलो, हेच मला मुळी खटकत होते. स्वयंपाक तयार झाला. ताट वाढून तिने जेवणासाठी मला इशारा केला तसा मी सगळ्यांना हात धुवायला सांगून जेवणाची तयारी झाली, असे म्हणून आम्ही सगळे एकाच वेळी जेवायला बसलो. ताटात एवढे सारे पदार्थ बघून डॉक्टर म्हणाले, ‘महानंदा, तू खूप मेहनत घेतली; पण मी फक्त आज बेसन, भात आणि पोळीच खाणार आहे. माझ्या ताटातलं हे थोडं-थोडं कमी कर.’ तिनं काय केलं, तर शिरा, कांदाभजी, पापड, घरी आंब्याचे लोणचे होतेच. ठरल्याप्रमाणे बेसन, भात (पिठले) पोळी आणि म्हशीच्या दुधापासून दही बनविलेल्या लोण्यापासून बनविलेलं खमंग असं तूप. डॉक्टरांनी एक घास घेतला नि, ‘बेसन किती मस्त झाले,’ म्हणून सगळ्यांना सांगितलं खरं; पण आमचं काही समाधान होईना. महानंदानं तर चक्क सांगूनच टाकलंं की, ‘काय माहीत तुम्हाला आवडलं की नाही ते. जसं बनविता आलं तसे बनविलं. तरीपण गोड वाटून घ्या, एवढंच.’ डॉक्टर म्हणाले, ‘अगं मी खरंच सांगतोय, बेसन मस्त झालं. मला तर खूप आवडलं. व्वा! मस्त. मला परत बेसन वाढ.’ डॉक्टरांनी बेसन मस्त म्हणावं, तसं आमच्या मनात अपराधीपणाची भावना पुन्हा-पुन्हा राहून यायची. एकदाचं जेवण आटोपलं आणि आता झोपण्याची वेळ आली. घर भलेही लहान असेल; पण मन मोठं असलं की मार्ग आपोआप सापडत असतो, असं म्हणतात, याचा प्रत्यय आम्हाला येत होता. सगळ्यांना खाली अंथरायला आणि अंगावर पांघरायला भरपूर आणि पुरेसे साहित्य होते. कॉट एक होती आणि खाली जागा भरपूर. तीन-चार सहज झोपू शकतील, एवढी जागा होती. सगळ्यांना वाटायचं की, डॉक्टरांनी कॉटवर झोपावं, तर डॉक्टर म्हणायचे, ‘मी खाली झोपतो.’ तेव्हा डॉक्टरांनी कॉटवर झोपावं असं ठरलं नि इतरांनी खाली गाद्या टाकून झोपावं असं ठरलं.

विलास निंबोरकर

दुसर्‍या दिवशी सकाळी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानंतर लागलीच प्रत्येकजण आपापले रक्त काढून अंंधश्रद्धा निर्मूलन विधेयक, कायदा पारित झालाच पाहिजे म्हणून मोठ्या आवडीने पत्र लिहून सहकार्य करू लागले. इतक्या जणांनी सहभाग घेतला म्हणून डॉक्टरांना देखील आनंद झाला. यातून मला बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या. एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाला सहज रेस्टहाऊस किंवा चांगल्यापैकी लॉजमध्ये फुकटात सोयी-सुविधा उपलब्ध होत असतानाही इतक्या साधेपणानं कोणत्याही सामान्य कार्यकर्त्याच्या घरी राहायला का पसंत करीत असावेत? जेवण मनासारखं झालेलं नसतानाही इतकी प्रसंशा का करावी? एक-एक माणूस जोडण्यासाठी इतक्या अग्निदिव्यातून जावे लागत असावे का? तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा वारसा, प्रचार आणि प्रसार खर्‍या अर्थाने डॉक्टर करीत असावेत का? असे कितीतरी प्रश्न मनात येत होते. डॉक्टरांची दिनचर्या खरंच वाख्याणण्याजोगी होती. वेळेचा सदुपयोग व वेळेचं महत्त्व मला आमच्या संस्थेचे दिवंगत अध्यक्ष दलितमित्र आदरणीय लहुजी मडावी यांच्यानंतर डॉक्टरांमध्ये पाहायला मिळालं. बोलण्यातून जाणवत होतं, ते म्हणजे ‘क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची’ जाणीव त्यांच्या सान्निध्यात राहिल्याने आली. डॉक्टरांच्या हयातीत आम्ही डॉक्टरांना वर्धेच्या बैठकीत शब्द दिला होता की, या वर्षी गडचिरोलीत नवीन पाच शाखा उघडणार आणि आतापर्यंत ‘अंनिवा’चा मी एकटाच वाचक होतो. त्याचे पंचवीस सदस्य करू आणि आजपर्यंत आम्ही एकही रुपयाची जाहिरात किंवा देणगी मिळवून दिली नाही; पण या वेळी निदान पंचवीस हजार रुपयांपर्यंत तरी प्रयत्न करू, असं आश्वासन दिलं होतं. ते सर्व आश्वासन आम्ही पूर्ण केलं. पण, डॉक्टरांना ते पाहता आले नाही. कारण सनातन्यांनी नोव्हेंबर महिना उजाडण्याआधीच त्यांचा डाव अर्ध्यावरच मोडून टाकला. अशा या महान तपस्वी महामानवाला आमच्या परिवारातर्फे व ‘महा. अंनिस’ गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाखांच्या कार्यकर्त्यांतर्फे विनम्र अभिवादन!


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ]