मला मेलीला काय कळतंय?

अनिल चव्हाण - 9764147483

कोरोनाची दुसरी लाट ओसरली, तसा शाळांमधून चिवचिवाट सुरू झाला, फुलपाखरांनी कॉलेज गजबजली, दुकानदारांनी काऊंटरवरची धूळ झटकली, उद्योगधंदे मोठ्या जोमाने सुरू झाले.

आध्यात्मिक ‘उद्योग’ तरी मग मागे कसा राहील? भजनी मंडळे, सत्संग बैठकांना ऊत आला. अध्यात्माचे संस्कार लहानपणापासूनच केले पाहिजेत, हा तसा जुनाच विचार आहे; पण त्याला पुन्हा धुमारे फुटले. असा काही विचार गावात आला की, त्याचे पहिले गिर्‍हाईक म्हणजे आमचा गुंड्याभाऊ! आणि गुंड्याभाऊचे पहिले गिर्‍हाईक असतो मी. त्या दिवशी संस्कारवाल्या ‘विचारवंता’सह गुंड्याभाऊंनी सकाळीच आमचे घर गाठले.

“नमस्कार आईसाहेब! येऊ का आत?” गुंड्याभाऊंच्या मागोमाग संस्कारवाले आत आले.

आईने, “या, या,” म्हणत निवडायच्या भाजीचे ताट बाजूला सारून वाट करून दिली.

“हे बापूसाहेब! मुलांच्यावर संस्कार करण्यासाठी धडपडत असतात. बँकेतून रिटायर झालेत; पण संस्कार कसे बघा! घरी आल्याबरोबर आईच्या पायाला हात लावून नमस्कार केला.” ओळख करून दिल्यावर गुंड्याभाऊ वीरा आणि आदिकडे वळला.

“अरे, घरी आलेल्या पाहुण्यांना नमस्कार करावा, उठा बरं!” आदि आणि वीराने पुस्तके वरच्या बाजूला सारली आणि पाहुण्यांना वाकून नमस्कार केला.

“झालं का, एवढंच? पाहुण्यांबरोबर घरच्यांनाही नमस्कार केला, तर कंबरडं मोडत नाही.” गुंड्याभाऊ चिडून म्हणाला.

मोठ्यांना नमस्कार करण्याचा पहिला संस्कार मुलांच्यावर केल्यावर बापूसाहेबांनी तोंड उघडले आणि माझ्याकडे पाहून म्हणाले, “बरं का भाऊसाहेब, आज समाजात किती अराजक माजलंय! कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. रोजचं वर्तमानपत्र उघडलं तर पहिल्या पानापासून चोरी, लूटमार, दरोडे, अत्याचार, भ्रष्टाचार, खून, मारामार्‍या आणि त्याशिवाय पर्यावरणर्‍हास, गटारे तुंबली, ओझोनला छिद्र पडले, कॅन्सरचे रोगी वाढले, आम्लवर्षा, एक ना अनेक बातम्या. कुठे चाललोय आपण?”

“हो तर… काय चाललंय कळत नाही. या वर्षात आमच्या गल्लीतल्या दोन पोरी पोरांचा हात धरून पळून गेल्या. त्यांनी म्हणे जात मोडून लग्ने केली! हरऽ हरऽ हरऽ कलियुग, दुसरं काय?” आईने उसासा सोडला.

“म्हणून तर आपल्या मुलांच्यावर संस्कार केले पाहिजेत आणि हेच सांगायला आम्ही आलोत.” गुंड्याभाऊने हेतुकथन केले.

“होय, मुलांच्यावर वेळीच संस्कार केले, तर बरे! म्हणून आपण संस्कार वर्ग सुरू करतो आहोत. या दोघांनाही रोज पाठवत चला,” बापूसाहेबानी हेतुपूर्ती केली.

मैना स्वयंपाक करत असली, तरी तिचे कान बाहेर काय चाललंय हे ऐकत असतात. ती पिठाने भरलेला हात घेऊन बाहेर आली. “मला मेलीला काय कळतंय? पण ही पोरं दिवसभर टी.व्ही.समोरून हलत नाहीत हो! भाऊजी, तुम्ही काहीतरी सांगा त्यांना!” तिने तक्रार केली आणि म्हणाली, “पण संस्कार म्हणजे आपण काय करणार आहात?”

“सांगतो ना! आम्ही त्यांना मनाचे श्लोक शिकवणार. वर्षभर लागणार्‍या आरत्या, संस्कृत श्लोक पाठ करून घेणार. धार्मिक सणांचे महत्त्व सांगणार. धार्मिक कथा, पुराण कथा आणि संस्कार कथा सांगणार!” बापूसाहेबांनी संस्कारवर्गाचा तपशील सांगितला.

“म्हणजे तुम्ही धार्मिक संस्कार करणार म्हणा ना!” मी म्हटले.

“मग त्यात वाईट काय? त्यांच्या पोरांना कुराण पाठ असते, आमच्या पोरांना पुराण का नको?” गुंड्याभाऊंचा सवाल.

“मला मेलीला काय कळतंय? पण भाऊजी, त्यांची पोरं काय-काय शिकली, त्यावरून आपल्या पोरांचं शिक्षण करायचं का? त्यांनी उद्या बेडूकउडी मारली, तर आपल्या पोरांनी कुठली उडी मारायची? आणि त्यांचे चूक असेल, तर त्यांना तसे सांगायला पाहिजे. आमच्या पोरांनी पण तशीच चूक का करावी? त्यांनी चार बायका केल्या, तर तुम्ही आम्हाला पण सवत आणणार काय?” तिने डोळ्याला पदर लावला.

“काऊ, काय बोलतीस हे? मी असं काही करीन असं तुला वाटतंय का? मला हे उदाहरण बरे वाटले नाही.”

“काका… म्हणजे… त्यांच्या चुका त्यांना दाखवायला हव्यात. तशाच चुका आपण करणे हा उपाय नव्हे!” वीराने गुंड्याभाऊला समजावले.

“हो, बरं, गुंड्याभाऊ! तुम्ही चांगले संस्कार करणार असाल, तर आम्ही पोरं पाठवतो,” आई म्हणाली.

“आई, तुम्हाला असे का वाटते? आपण धर्माचे शिक्षण द्यायला हवे की नको? विज्ञानाने सगळा विनाश केलाय! म्हणून विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते, म्हणतात. आपण मुलांना अध्यात्म शिकवायचे की नाही? नीती सांगायची की नाही?” बापूसाहेबांनी संस्कारांचे महत्त्व स्पष्ट केले. पुढे म्हणाले, “काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यावर नियंत्रण आणले पाहिजे. भौतिक पदार्थ सगळे नश्वर आहेत. नश्वर पदार्थांनी शांती कशी मिळेल? एक पदार्थ खाल्ला की, दुसर्‍याची इच्छा होते.”

“अगं काऊ, पाहुण्यांना काही खायला कर ना!”आई म्हणाली.

“नको आईसाहेब, आमचा नाष्टा झालाय. तर मी काय म्हणत होतो, एक पदार्थ खाल्ला की दुसर्‍याची इच्छा होते. भूक वाढतेच! त्यातून हे प्रदूषणाचे प्रश्न निर्माण झालेत. निसर्ग ओरबडायचे काम चाललेय!”

“बरोबर आहे. या विज्ञानाच्या शोधांनी सगळा हैदोस घातलाय. प्रत्येकजण आधुनिक बनायला निघालाय. त्याला कुठंतरी अटकाव करायला पाहिजे.”- आई.

“आजी, पण याचा विज्ञानाशी काय संबंध? विज्ञान शोध लावते, त्याचा वापर माणसांनी व्यवस्थित करायला पाहिजे ना? प्लॅस्टिकच्या पिशव्या विज्ञानाने तयार केल्या; पण त्या गटारात टाकायला विज्ञान सांगत नाही. त्याचे उत्पादन करायला सरकार परवानगी देतं, वैज्ञानिक नाही. त्यावर नियंत्रण सरकारने आणले पाहिजे; आणि विशेष म्हणजे सरकारी अधिकारी आणि राजकारणी सरसकट धार्मिक आहेत. धार्मिक लोक निर्णय घेणार आणि खापर विज्ञानावर का फोडता?” आदिने विज्ञानाची वकिली केली.

“हो आजी! विज्ञानाने अनेक रोगांवर मात केली आहे. लोकांचे आयुर्मान वाढले आहे. घरबसल्या सगळ्या जगाची माहिती घेता येते. एका क्षणात संदेश जगाच्या दुसर्‍या टोकाला पोचतो. वाहतुकीच्या साधनांमुळे लोक पृथ्वीभ्रमण करू शकतात. यातील कोणतीच गोष्ट अध्यात्माला जमलेली नाही. तेव्हा विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते, असे म्हणता येणार नाही हं! उलट म्हणता येईल, अध्यात्माला पाच हजार वर्षांत जमले नाही, ते विज्ञानाने पाचशे वर्षांत करून दाखवलेय,” वीराने बाजू मांडली.

“असू दे, असू दे! विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म, हा आपला विषय नाहीय! संस्कार कसे करावेत हा प्रश्न आहे,” बापूसाहेब बोलले.

“त्यात योगासने, ध्यानधारणा, व्यायाम यांचाही समावेश असावा.”- गुंड्याभाऊ.

“काही महाराज आणि धार्मिक संघटनाही संस्कार वर्ग चालवतात ना? त्यांची मदत घ्यावी,” आईने सूचना केली.

“लक्षात घ्या, एका महाराजांनी संस्कार करण्यासाठी शाळा चालवली. सध्या ते महाराज मुलांच्या खुनाच्या आणि बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. दाभोलकरांच्या खुनातले पोलिसांनी पकडलेले संशयित आरोपी एका आध्यात्मिक संघटनेचे सदस्य आहेत.” मी माहिती दिली.

“हो, त्यांची बातमी गेल्या वर्षी; म्हणजे 2020 साली आली होती ना! तेव्हा त्याचे वय पंचवीस वर्षेहोते.” वीराने भर घातली.

“डॉ. दाभोलकरांचा खून 2013 साली झाला होता ना? म्हणजे सात वर्षांपूर्वी खून झाला. मग तेव्हा हा संशयित आरोपी अठरा वर्षांचा असणार. त्यापूर्वी दोन वर्षे, म्हणजे सोळाव्या वर्षी तो त्या आध्यात्मिक संघटनेत गेला.” आदिने हिशोब मांडला.

“सोळा वर्षेम्हणजे दहावीमधील मुलगा असावा, त्याला ‘ईश्वरी राज्य आणूया,’ असे सांगून संघटनेत घेतले होते.” – वीरा.

“मला मेलीला काय कळतंय? पण, म्हणजे शाळेतल्या मुलावर असे संस्कार करून, त्याला खून करायला लावलाय का? हे कसले ईश्वरी राज्याचे संस्कार?”काऊ म्हणाली.

“असले संस्कार नकोत आमच्या पोरांना. गुंड्याभाऊ, जळ्ळले तुझे संस्कार! आणि जळ्ळली तुझी ती संघटना. ती तुझी तुलाच लखलाभ होवो. आमची पोरं नाही येणार तिकडे.” आई सात्विक संतापाने म्हणाली.

“आई, आई, एखाद्या महाराजाने गैरवर्तन केले किंवा एखाद्या संघटनेने साधकांना गुन्हेगारीचा रस्ता दाखवला म्हणजे सगळ्या संघटना तशाच आहेत, असे म्हणण्याचे कारण नाही हो!” – गुंड्याभाऊने सारवासारव सुरू केली.

“काय सांगतोस गुंड्याभाऊ, भाविकांना ठकवून कोट्यधीश आणि अब्जाधीश बनलेले बुवा आहेत. खून, मारामार्‍या, पळवापळवी, अत्याचार आणि धमक्या देणारेही बुवा आहेत.” मी म्हटले.

“चिमण, गुंड्याभाऊ म्हणतोय त्यात तथ्य आहे बरं! आम्ही लाखो वारकरी वारीला जातोय; पण कधी अरेरावी केल्याची, चोरी आणि लुटालुटीची तक्रार ऐकली का? महिलांची छेड काढल्याचे कधी ऐकलेय का? की आपसांत मारामारी केली, भांडण केले, अशी एक तरी तक्रार आहे का? गर्दी आणि चेंगराचेंगरीही कधी नाही. सगळ्या धार्मिकांना एकाच तराजूने नको मोजू!” आईने पुन्हा बाजू बदलली. वारकरी म्हणजे तिच्या जिव्हाळ्याचा विषय.

“मला मेलीला काय कळतंय! पण संत तुकाराम, एकनाथ, नामदेव, चोखामेळा, संत कबीर, संत रोहिदास असे किती मोठे संत होऊन गेलेत. सरसकट संतांना नावे ठेवू नका हो.” काऊने भर घातली.

“आई, महिला संतही झाल्यात बरं! संत बहिणाबाई, मुक्ताबाई, जनाबाई! महिलाही काही मागे नाहीत.” वीराला स्त्रीसमानतेचे वारे लागले होते.

“हो मग, त्यांचे संस्कार करायला आमची काही हरकत नाही, बरे. गुंड्याभाऊ!” मी होकार देताच बापूसाहेब पुढे सरसावले.

“आपण वारकरी संतांचे अभंग मुलांना शिकवू! संत कबीर आणि रोहिदासांचे दोहे पाठ करून घेऊ! व्यायाम शिकवू, योगासने शिकवू! सूर्यनमस्कार शिकवू!”

“सूर्यनमस्कार, योगासने शिकवा; पण त्यांना धर्म नका चिकटवू!” मी सूचना केली.

“का? का बाबा? सूर्यनमस्कार घालताना सूर्याची नावे घ्यावी लागतात. योगासने करताना तर ओम नमो: शिवाय म्हणावे लागतेच ना!”- वीराची शंका.

“सूर्यनमस्कार किंवा योगासने हे व्यायामाचे प्रकार आहेत. ते करताना कोणत्याही देवाचे किंवा धर्माचे नामस्मरण करावे लागत नाही.” माझं स्पष्टीकरण.

“पण संस्कारकथा, नीतिकथांसाठी पुराणांचीच मदत घ्यावी लागणार बरे’ गुंड्याभाऊने पुन्हा धर्म आणलाच.

“गुंड्याभाऊ, पुराणकथा या धर्मप्रसारासाठी तयार झालेल्या आहेत. त्यातून धर्माची भलावण केलेली असते. धर्माने वागण्याचा सल्ला असतो. धर्माने म्हणजे रुढी-परंपरा पाळून, जातिभेद, वर्णभेद पाळून; हे आपल्याला नाही चालणार!” मी म्हटले. “पुराणकथांतल्या, धार्मिक कथांतल्या चांगल्या गोष्टी तेवढ्या घ्या; उरलेल्या द्या सोडून या भाजीसारख्या. भाजी खुडली, आणि नको असलेले देठ टाकून दिले.” आईने सल्ला दिला.

“होय! चांगली कथा आणि वाईट कथा अशी निवड कशी करणार?” इतका वेळ शांत असलेल्या बापूसाहेबांनी आता चर्चेत भाग घेत प्रश्न केला.

“त्यात काय एवढं? आजच्या युगधर्माला आवश्यक ते घ्यायचे! आजचा युगधर्म म्हणजे विज्ञान! आपलं देशाचं संविधान! समता, बंधुता, न्याय या तत्त्वाला बांधील असलेल्या कथा घ्यायच्या,” मी खुलासा केला,

“ठरलं तर मग! तुकारामांचे अभंग, व्यायाम आणि समता-बंधुतेच्या कथा यांचे संस्कार आपण करू,” गुंड्याभाऊ आणि बापूसाहेबांनी एका सुरात विचार मांडला.

“मला मेलीला काय कळतंय? पण असे संस्कार करणार असाल, तर आमच्या पोरांना घ्या बरं वर्गाला.” काऊने संमती दिली आणि चहाचे कप पाहुण्यांच्या पुढे केले.

संपर्क : 9764147483


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ]