आरक्षण : गुणवत्ता व कार्यक्षमतेस बाधक?

सुबोध मोरे -

कोणत्याही वेळेस उच्चस्तरीय प्राण्यांच्या पेशीतील जवळजवळ ८० टक्के गुणसुत्रीय पदार्थ हे अक्रियाशील स्थितीत असतात. ही निष्क्रियता विशिष्ट पर्यावरणीय प्रभावाने पुर्नक्रियान्वीत होते. आणि पूर्वीचे निष्क्रिय गुणसूत्रे पुन्हा क्रियाशील होत असतात.

अलेक्झांडर जी. बर्न

बुद्ध्यांक चाचणी म्हणजे नव्या वर्गीय समाजाची उभारणी आहे.

नॉम चॉम्स्की

उत्तम प्रशासनातील कार्यक्षमता म्हणजे परीक्षेतं मिळणारे फक्त गुण नव्हेत. तर जबाबदारीने व प्रतिसादात्मक सेवा करणे हेसुद्धा आहे.

व्हि.कृष्णा अय्यर, निवृत्त न्यायाधीश

जगात भारत एक प्रगत राष्ट्र म्हणून उभारायचे असल्यास सर्व क्षेत्रात अतिउच्च कार्यक्षमतेचा दर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि कार्यक्षमतेला अडथळा निर्माण करणार्‍या गोष्टी संपुष्टात आणल्या पाहिजेत. सरकारी उद्योगात आणि सार्वजनिक क्षेत्रातील मागासवर्गीयांना मिळणारे आरक्षण हा सर्वात मोठा अडथळा आहे. असा प्रचार सध्या नवउदारमतवादी करीत असतात. त्यांचा निम्नस्तरीय सार्वजनिक उद्योगातील किंवा निम्नस्तरीय सरकारी कचेर्‍यातील आरक्षणास विरोध नसतो. परंतु उच्चस्तरीय व अतिनैपुण्याच्या क्षेत्रातील आरक्षणाला त्यांचा विरोध असतो. म्हणजे अतिनैपुण्यता व कार्यक्षमता ही त्यांची त्यांना जन्मसिद्ध मक्तेदारी वाटते. अवकाश तंत्रविज्ञान, अणुशक्ती, वैमानिक अभियांत्रिकी, हवामान विज्ञान, इलेक्ट्रॉनिक विज्ञान व औद्योगिक संशोधन, इस्पितळे इ. क्षेत्रातील आरक्षणाला विरोध करताना गुणवत्ता व कार्यक्षमतेचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. परंतु निम्न/उच्चस्तरीय शिक्षण, नोकर्‍यात विशिष्ट गुणवत्ता व किमान पात्रतेशिवाय प्रवेश मिळतच नाही. योग्य प्रमाण व विशिष्ट प्रकारची निपुणता व कार्यक्षमता ही आरक्षणातून मिळणार्‍या नोकर्‍यासाठी, शिक्षणाच्या प्रवेशासाठी आणि पदोन्नतीसाठी पूर्वअट आहे. घटनेच्या ३३५ कलमानुसार खरं तर गुणवत्ता व कार्यक्षमतेचा प्रश्न पुढे करणार्‍या आरक्षण विरोधी आक्षेपाला मुळीच जागा ठेवलेला नाही. घटनेच्या अंतर्गत गुणवत्ता व कार्यक्षमतेबाबत स्पष्ट निर्देश नमूद केले आहेत. ३३५ कलमांतर्गत संघराज्य किंवा राज्य यांच्या कारभाराच्या सेवांमध्ये व पदावर नियुक्ती करताना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांमधील व्यक्तींचे हक्क प्रशासनाची कार्यक्षमता राखण्याशी सुसंगत असेल अशा रीतीने विचारात घेतले जातील. परंतु आरक्षणातून गुणवत्ताहीनाची भरती केली जाते व परिणामतः प्रशासनात अकार्यक्षमता वाढीस लागते, असा दुष्ट प्रचार केला जातो. आरक्षणाबाबत अनेक सुरस व चमत्कारिक कथा पसरविल्या जातात.

आरक्षणाची कल्पना ही मूलतः गुणवत्तेला छेद देणारी आहे व त्यामुळे आरक्षणप्राप्त लोकसमूह (जाती) हे गुणवत्तापूर्ण नसतात, असाही भ्रम प्रचलित आहे. आज जगातील कोणत्याही शाखेतील वैज्ञानिक/प्रज्ञावंत सप्रमाण सिद्ध करू शकणार नाहीत की एका विशिष्ट जातीत जन्मल्यामुळे त्या व्यक्तीस जन्मसिद्ध बौद्धिक अंपगत्व किंवा बौद्धिक संपदा प्राप्त होते. तरीही दलित जातीकडे कुत्सितेने पहाण्यामागे पूर्वापार असलेला पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनच असतो.

व्यक्तीकडे पाहण्याचा असा सदोष दृष्टिकोनाचा आधारस्तंभ असलेल्या ‘अनुवांशिक पाठशाळा’ना कोणताही वैज्ञानिक, तार्किक आधार नाही. कोणत्याही व्यक्तीचा विकास हा भौतिक परिस्थितीवर अवलंबून असतो. अनुकूल परिस्थितीचा (सर्व सुबत्ता व विपुल सोयी असलेल्या) आणि शिक्षणाचा वारसा लाभलेल्या व्यक्तींत निपुणतेची/गुणवत्तेची सखोलता अधिक विस्तारीत जाणे ही नैसर्गिकच असते. परंतु प्रतिकूल परिस्थितीत (मूलभूत सोयींच्या अभावग्रस्त पर्यावरणात) निपुणता/गुणवत्ता प्राप्त करणे हा तल्लख बुद्धिचा अविष्कार आहे. पूर्वापार शिक्षणाचा (प्रचलित) व मूलभूत सोयींची सुबत्ता नसलेल्या दलित जातींना जी मोजक्या वर्षात उल्लेखनीय प्रगती केली ती विलक्षण गोष्ट आहे.

स्पर्धात्मक परीक्षेत खुला वर्ग व आरक्षित वर्गाच्या गुणांतील दरी सतत कमी होत चालली आहे. वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाच्या प्रवेशासाठी आधारभूत परीक्षांच्या गुणातील तफावत कमी होत आहे. अन्य मागासवर्गीय व खुल्या वर्गातील गुणांच्या टक्केवारीतील तफावत जवळजवळ धूसर होत आहे. तर अनुसूचित जाती-जमातींच्या गुणांच्या टक्केवारीतही भरीव वाढ होत आहे. तामीळनाडूतील एम.बी.बी.एस. च्या प्रवेशासाठी खुल्या वर्गाच्या शेवटच्या विद्यार्थ्याचे गुण ९५.२२ टक्के अन्य मागासवर्गीयांसाठी ९३.१८ टक्के अनुसूचित जातीसाठी ८९.६२ टक्के आणि अनुसूचित जमातींसाठी ८३.९८ टक्के होते. संगणक अभ्यासक्रमासाठी हेच गुण अनुक्रमे ९७.९८ टक्के, ९६.५९ टक्के, ९३.२५ टक्के आणि ८४.३८ टक्के होते. उपरोक्त आकडेवारी ही सर्वत्र आढळणारी थोड्याफार फरकांनी आढळणारी प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वाढती गुणांची टक्केवारी अधिक ठळकपणे मांडली जाते, परंतु आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या टक्केवारीचा उल्लेख केलाच जात नाही. उलट अत्यंत भ्रमावर आधारित ऐकीव दंतकथाच अधिक प्रसिद्ध आहेत.

खुल्या वर्गातून वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्रवेश कमी गुणांमुळे न मिळू शकलेल्यासाठी कॅपिटेशन फीवर आधारित खासगी शिक्षण उद्योग समूहाचे आरक्षित कुरण श्रीमंतासाठी ठेवलेले आहे. कॅपिटेशन फीसंदर्भात श्रीमंताच्या या आरक्षणाबाबत उच्चवर्गीय पालक किंवा न्यायालये गुणवत्ता व कार्यक्षमतेचा मुद्दा उपस्थित करत नाहीत. श्रीमंत विद्यार्थ्यांना मिळणारे गुण हे बर्‍याचदा खासगी शिकवण्याद्वारे मिळत असतात. ‘हमसखास यश मिळवून देणार्‍या’ विशिष्ट विद्यामंदिरातून तल्लख विद्यार्थी तयार केले जातात. त्यासाठी मात्र हजारो रुपयांची दक्षिणा द्यावी लागते. शालांत व उच्च माध्यमिक परीक्षांच्या निकालानंतर दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रातील झळकणार्‍या ‘भव्य’ जाहिरातीतील यशस्वी उमेदवारांच्या यादीतून स्पष्ट होईल. या धनवंतांच्या विदेश भरार्‍या खालील चौकटीत पहा. हेच का देशहित?

गुणवंतांच्या विदेशी भरार्‍या

स्विस व्यापारी कंपनी ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट’ (आय.एम.टी.) च्या ३४ राष्ट्रांच्या सर्वेक्षणात ‘ब्रेन ड्रेन’च्या संदर्भात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. आज भारतातून उच्चशिक्षित १० लोकांपैकी ६ लोक उच्च नोकर्‍यांसाठी परदेशात जात आहेत. अमेरिकेत सुमारे १५ लाख भारतीय आहेत. (अमेरिकन लोकसंख्येच्या जवळजवळ १ टक्का) तेथील डॉक्टरांच्या एकूण संख्येच्या भारतीय डॉक्टरांची संख्या १० टक्के आहे. अमेरिकेतील सिलीकॉन व्हॅली आज भारतीयांनी गजबजलेली आहे. भारतीयांची उच्चशिक्षित व्यावसायिकांच्या संस्था (सिलीकॉन व्हॅली इंडियन प्रोफेशनल असोसिएशन-एस.आय.पी.ए., दी इन्डयूएस इंट्रप्रिनर्स – टी.आय.ई.इ.) अमेरिकेत अधिक प्रबळ आहेत. माहिती व तंत्रविज्ञान क्षेत्रात भारतीयांचे प्रमाण ५० टक्के आहे. जगातील सर्वाधिक पदवीधर आपल्या देशात आहेत, यापैकी ‘अतिनैपुण्यता प्राप्त गुणवंतांच्या झुंडी’ विदेशात स्थलांतरीत होत आहेत. एरोस्पेस इंजिनिअरींग विभागाचे प्राध्यापक एस. सूर्यनारायण यांच्या मते सर्वसाधारण आय.आय.टी.तील प्रशिक्षितांच्या ब्रेन ड्रेनचे प्रमाण २० ते ५० टक्के आहे. अमेरिकेच्या नॅशनल एरॉनॉटिक अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नासा) संस्थेत विविध देशातील स्थलांतरित बहुतांशी वैज्ञानिक व कुशल कर्मचारी करारावर काम करीत आहेत. भारतीय जनतेच्या कष्टावर उच्च शिक्षण मिळविणार्‍या या ‘गुणवंतांच्या निर्याती’ कोणत्या राष्ट्राचे हित जपत आहेत?


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]