‘अंनिस’ने जनप्रबोधन यात्रा नेली, गावातून भुताटकी पळूनच गेली

चित्तरंजन चौरे -

“तो रात्री-अपरात्री येतो… दारावर थाप मारतो..दार उघडताच गायब होतो.. तो सगळ्यांचे दार ठोठावतो; पण कोणालाच दिसत नाही…गावकरी लोक हिम्मत करतात, एकत्र येतात, अचानक झाड हालते… पण काहीच दिसत नाही… सारेच घाबरलेले, भयभीत चेहरे …झालं ..! गावाला भुतानं झपाटलं… हा भूत- भानामतीचाच प्रकार आहे, ही सार्‍या गावात चर्चा … सारा गाव दहशतीत… वार्‍यासारखी बातमी पसरते… पोलिस येतात..गावात गस्त घालतात… पेपरला बातमी येते … ‘महा. अंनिस’च्या कार्यकर्त्यांच्या कानावर थडकते व ते वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष त्या गावाला भेट देतात…

एखाद्या हॉरर चित्रपटाच्या कथेला साजेल अशी या घटनेची बातमी ‘महा. अंनिस’ टीमचे सेवानिवृत्त कामगार आयुक्त विजयकांत पानबुडे यांना कळली, तेव्हा योगायोगाने ‘महा.अंनिस’ची टीम गडचिरोली जिल्ह्याची जादूटोणाविरोधी जनप्रबोधन यात्रा आटोपून गोंदिया जिल्ह्यात प्रवेश करीत होती. या बातमीने टीमप्रमुख रामभाऊ डोंगरे थोडे अस्वस्थच झाले व गोंदियाचे कार्यक्रम तातडीने आटोपून लगेच ही जादूटोणाविरोधी कायद्याची यात्रा त्या भयभीत गावाकडे वळली.

पोहरा त्या गावाचं नाव. भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर लाखणीपासून दक्षिणेला पाच किलोमीटरवर वसलेलं गाव ..

गाव तसं चांगलं; पण दहशतीनं वैतागलं

दि. 18 एप्रिल 2022 सकाळी दहाची वेळ..आमची प्रबोधन यात्रेची बस जयघोष करत गावात पोचली, तसा गावकर्‍यांचा घोळका उत्सुकतेपोटी जमा झाला. आम्ही गावचे पोलीस पाटील, सरपंच व पीडित लोकांना शोधत होतो. बसवर लागलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याच्या पोस्टरवरून एव्हाना गावकर्‍यांच्या लक्षात आलं होतं की, हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोकं आहेत.

“या गावी रात्रीला घराच्या दारावर थाप मारणार्‍याची बातमी आहे. तो कोणाचे दार ठोठावतो,” असे विचारताच रामचंद शहारे पुढं आला व म्हणाला, “अजी माझ्याही घराचा दरवाजा ठोकलनं बाबा, पण उघडून पाहतो तं कोणीच नोहता.”

“चल, तुझं घर दाखव.” त्यांनी आम्हाला त्यांच्या गल्लीत नेलं. आमची सर्व टीम घरोघरी जाऊन विचारपूस करू लागली. एरव्ही समितीच्या नाटकात पात्र रंगवणारे आमचे कलाकार रॉकी घुटके, अजय रहाटे, माधुरी मेश्राम, श्वेता पाटील, प्रिया गजभिये, आशुतोष व निक्की बोंदाडे यांनी एक चमू बनवला व हाडांच्या पत्रकारासारखे घरोघरी जाऊन विचारपूस करू लागले, तर टीमचे ज्येेष्ठ कार्यकर्तेदेवानंद बडगे, आनंद मेश्राम, चंद्रशेखर मेश्राम, हे पण उत्सुकतेने गावकर्‍यांची गार्‍हाणी ऐकून घेत होते. चंदा, जान्हवी व सम्यक यांना सोबत घेऊन सर्वच कार्यकर्तेकामाला लागले.

कोणी म्हणे, “रात्री झोपल्यावर येते जी, घरायचे दरवाजे ठोकते, हिरवा टार्चही मारते; पण दिसेच नाही, हे भुताचेच काम आहे.”

म्हातारी मंगलाबाई म्हणाली, “माझा दरवाजा ठोकलंन तसीच मी उठलो जी पर कोण होय, तं दिसलाच नाही. मग तो झाड जोराजोरात हालला जी. आम्ही धावलो पण गायबच झाला.”

रवींद्र रामटेके, अजय रामटेके, शेख खाला यांचा स्वर होता, “सरजी, ये कोई सरफिरा इंसान होगा, दहशत फैलाना चाहता है, उसका अपना कोई मकशद होगा, मगर ये लोग समझते नहीं, शैतान भूत कहते फिर रहे है गावभर…”

कोणत्याही गावकर्‍यांनी त्याला डोळ्यांनी पाहिलं नव्हतं, म्हणून त्यांचा विश्वासाचा कल भुताटकीकडे होता.

सर्व पीडित लोकांची शहानिशा करून आम्ही मेन चावडी कडे वळलो. तिथे एव्हाना पोलिस पाटील भैय्याजी मते व गावातील शहाणे मानकरी जमले होते. यात्राप्रमुख रामभाऊ डोंगरे यांनी त्या सर्वांचे प्रबोधन केले, “हा जर भुताटकीचा प्रकार आहे, तर रात्री पोलिस गस्त शुरू असतांना तो कां दार ठोठावत नाही. रात्रीच कां झाड हालते; दिवसा कां हालत नाही. हा दहशत पसरवणारा तुमच्याच गावातील कोणी नटखट विघ्नसंतोषी मानुसच आहे. चमत्कार कधी कोणी घडवूच शकत नाही.”

वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी वेगवेगळे प्रसंग सांगून, प्रयोग करून गावकर्‍यांना जागृत करण्यात आले व मग गावकर्‍यांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. यावेळी जादूटोणाविरोधी कायद्याची पुस्तके गावकर्‍यांना दान करण्यात आली. गावकर्‍यांचे समुपदेशन करुन, आम्ही जनप्रबोधन यात्रेचा पुढील टप्पा भंडाराकडे वळलो. आता पोलीस पाटील भैय्याजी मते यांनी फोन करून सांगितलं की, गावात जे भुताटकीचे प्रकार व गावातली दहशत होती, ती दुसर्‍याच दिवसापासून बंद झाली आहे.

चित्तरंजन चौरे, जिल्हा कार्याध्यक्ष, नागपूर.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]