डॉ.दाभोलकरांचे पुस्तक व्हिडीओ स्वरूपात

प्रियंका ननावरे -

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी तरुणांना उद्देशून छोटीछोटी पत्रं युवा सकाळ मधील सदरात लिहिली होती. पुढे त्यांचं ‘ठरलंडोळस व्ह्यायचं’ हे पुस्तक निघालं आणि खूप गाजलं. तरुणांनी विचारलेला प्रश्न आणि त्याचं डॉक्टरांनी दिलेलं उत्तर असं त्याचं स्वरूप आहे. प्रत्येक पत्र छोटे व मुद्देसूद असून फक्त 5 ते 7 मिनिटे इतक्याच अवधीचे आहे. या पुस्तकाचं क्रमशः वाचन करून, त्याचा व्हिडिओ बनवून आणि तो सोशल मीडियावर (यू ट्यूब, व्हॉट्सअप, Telegram, Facebook, tweeter) प्रसारित करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अंनिसचे चाळीसगाव येथील कार्यकर्ते आणि व्हॉईस आर्टिस्ट विकास बलवंत शुक्ल यांनी हा उपक्रम केला असून त्यांच्या यू ट्यूब चॅनलवर ही सारी पत्रे एकत्रित उपलब्ध आहेत. त्याची लिंक खाली दिली आहे.

https://www.youtube.com/user/vikasbalwantshukla सुमारे चार हजार मोबाईल्सवर रोज ही पत्रे ऑडियो आणि व्हिडिओ रुपात पाठवण्यात आली. यापैकी निम्मे दृष्टीबाधित विद्यार्थी आणि युवकयुवती आहेत.

यापैकी एका अंध युवतीची डोळस प्रतिक्रिया प्रातिनिधिक म्हणून देत आहोत.

माझं तर ठरलंयडोळस व्हायचंच

नरेंद्र दाभोलकर यांच्या ठरलं तर डोळस व्हायचंच या पुस्तकात, दाभोलकरांनी विज्ञान आणि विवेकाची कास धरून तरुण-तरुणींना उद्देशून लिहिलेली काही पत्रं समाविष्ट आहेत.

या सर्व पत्रांचे वाचन विकास शुक्ल यांनी केले आणि स्वागत थोरात सर यांनी ही ’ऑडियो फॉरमॅट’मधली पत्रे रोज एक याप्रमाणे सलग 44 दिवस व्हॉट्सअपवर शेअर केली. याआधी मी कधीच इतक्या जवळून दाभोलकर अनुभवले नव्हते. हे ऑडियोज ऐकताना, ते, त्यांची डोळस विचारधारा, त्यांचं परखड व्यक्तित्व, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येक परिस्थितीत त्यांनी कायम ठेवलेला कृतिशीलपणा मी या पत्रप्रवासातून अनुभवला. विकास सर आणि स्वागत सर, तुम्हा दोघांचे हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल खूप-खूप आभार!

दाभोलकरांना सारा समाज डोळस व्हावा, म्हणजेच प्रत्येकाने आपापल्या विचारांवरची अंधश्रद्धेची, अंधविश्वासाची काजळी झटकावी आणि आपले विचार विवेकी व डोळसपणे करावेत, असंच वाटत होतं. आपला विवेकसाथी होऊन त्यांनी विज्ञानाची कास धरा, डोळस व्हा हेच त्यांच्या प्रत्येक पत्रात नियमितपणे सांगितलं आहे.

तसा माझा आधीपासूनच देव-देवता, त्यांचे उपासतापास आणि त्यातूनच निपजणारी कर्मकांडं, अंधश्रद्धा आणि देवाच्या नावावर होत असलेल्या काळ्या बाजाराला कडाडून विरोध होताच. पण आता-आतापर्यंत तो विरोध फक्त माझ्या मनातच किंवा विचारांतच गटांगळ्या खात होता. घरात खासकरून घरच्यांचं मन उगाचच कशाला दुखवा, त्यांचा रोष कशाला ओढवून घ्या, म्हणून मी याबद्दल कधी चकार शब्दही काढला नाही. जाऊ दे ना काय होतं? मम्मी म्हणते म्हणून अंगारकीचा उपवास केला तर… ? मम्मी म्हणतेय ना, मग नको खाऊया सोमवारी नॉनव्हेज. घरातले सांगताहेत तर देऊ या पाचशे एक रुपये देवाला दान. एक ना अनेक गोष्टी मी डोळे झाकून केल्या, पण मी आता पक्कं ठरवलंय, डोळस व्हायचंच.

नुसते विचार; त्या विचारांना कृतीची जोड नसेल, तर मातीमोल ठरतात. म्हणूनच, माझी मित्रमंडळी, माझं कुटुंब यांना मी कितपत डोळसपणाच्या मार्गावर आणू शकेन, याची मला खात्री देता येणार नाही; पण मी तर पक्कं ठरवलंय –

पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या, परंपरेच्या नावाखाली ज्या भाकड गोष्टी आजवर मी इतक्या नेटाने पाळत आले, त्यांना तिलांजली द्यायची आणि यापुढे डोळे सतत उघडे ठेवून आपल्याकडून कधीही, चुकूनही, अगदी भावनेच्या भरातही अंधश्रद्धा, अंधविश्वासाला दुजोरा देणारं कृत्य होणार नाही, याची काळजी घ्यायची. उदाहरणादाखल सांगायचंच झालं, तर

तसे बरेच संदर्भ देता येतील; पण काही उदाहरणं येथे ठेवते.

1. दर वर्षी खाजगी गाडी करून जेजुरीला आमचे कुलदैवत खंडोबाच्या दर्शनाला जाणे. कुलदैवताला जायला हरकत नाही. पण आमच्या गावात या कुलदैवताचं मंदिर आहे… आधीच एक खंडोबाचं मंदिर गावात असताना, इथला देव सोडून बाहेरगावच्या त्याच देवाचं दर्शन घ्यायला आपण का जातो? गावच्या मंदिरातल्या खंडोबाला जेजुरीवाल्याची सर येत नाही म्हणून? की जेजुरीचा खंडोबा गावातल्यापेक्षा अधिक शक्तिशाली, अधिक दैवी असतो म्हणून? हेच मुळी मला कळत नाही. गावातल्या खंडोबातला आणि जेजुरीच्या खंडोबातला तसुभरही फरक कुणी सांगावा. मला विचाराल…. तर असा कुठला खंडोबाच अस्तित्वात नसतो.

2. दर लक्ष्मीपूजनाला मी माझा लॅपटॉप, माझं पैशांचं वॉलेट पटत नसतानाही, मम्मीचं मन कसं मोडायचं म्हणून पुजायला देत असे. ते आता मुळीच देणार नाही. आधी तिला समजावून पाहीन, नाही उपयोग झाला समजावण्याचा, तर सौम्यपणे विरोधही करेन आणि तिलाही डोळसपणे विचार करायला लावेन. हो… तसा नुसता प्रयत्न जरी केला मी, तरी माझ्या आजवरच्या शिक्षणाचा, मी कमावत असलेल्या पैशांचा निश्चितच उद्धार होईल; पण शेवटी डोळसपणाची कास धरून चालायचं, तर हे सगळं होणारच नाही का?


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]