धनंजय कोठावळे -

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला एक वेगळे महत्त्व आहे. त्यापैकी होळी हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरात गोड-धोड केलं जातं. आपल्याकडे होळीला पुरणाच्या पोळ्या करण्याची परंपरा आहे. ‘होळीत दृष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा,’ या भावनेनं पुरणपोळी अर्पण केली जाते. पण संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार केला, तर अक्षरश: लाखो पुरणपोळ्या अग्नीच्या अधीन जातात. आजही 20 टक्के महाराष्ट्र अर्धपोटी झोपतो. किमान पोळ्या जाळून टाकण्याऐवजी कुणाच्या तरी मुखात गेल्या तर…?
या वर्षीच्या होळी सणाच्या वेळी ‘महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती’च्या महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या-त्यांच्या कार्यक्षेत्रात ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा उपक्रम राबवला.
1. पुणे ः पुण्यातील ‘अंनिस’ कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी रस्त्यात बसून गाणी म्हणणार्या अंध लोकांना घरी बोलावून, त्यांना पोळी खायला देऊन अनोख्या पध्दतीने होळी साजरी केली.
2. चाकण शाखा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चाकण शाखेच्यावतीने ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा उपक्रम राबवताना पुरणपोळी होळीत न टाकता त्या पोळ्या समितीच्या कार्यकर्त्यांमार्फत गोळा करून अनाथाश्रम व कातकरी वस्तीतील लोकांना वाटल्या. या कार्यक्रमाच्या अंतर्गत चाकण परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने पोळ्या ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांकडे जमा केल्या. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे चाकण शाखेचे हे 13 वे वर्ष आहे. यावेळी समितीचे मनोहर बापू शेवकरी, श्याम राक्षे, चंद्रकांत बुटे, विजयकुमार तांबे, नारायण करपे, विशाल बारवकर, अनिल टोपे, चाकण शाखेच्या कार्याध्यक्षा प्रमिला गोरे, अर्चना काळे, कुसुम करपे, रमा हुलावळे, अपर्णा कानडे, प्रिया वाव्हळ, डॉ. स्नेहल वैभव घुमटकर, प्रज्ञा घुमटकर, अनुष्का करपे; तसेच कातकरी वस्तीमधील शिवाजीराव मुकणे, कलाविष्कार मंच, स्व. गुलाबराव गोरे प्रतिष्ठान, वसुंधरा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
‘महाराष्ट्र अंनिस’ची पुणे शहर शाखा व स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा उपक्रम साजरा केला. याअंतर्गत सुमारे 1000 पोळ्यांचे वाटप पुणे स्टेशन परिसर व सिंहगड रोड येथे करण्यात आले. या उपक्रमात वसंत कदम, हसन बारटक्के, अनुराधा काळे, अनिल वेल्हाळ, सविता म्हेत्रे, चेतन झेंडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले.
4. पिंपरी–चिंचवड व निगडी शाखा ः महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, पिंपरी-चिंचवड व निगडी शाखेकडून पर्यावरणपूरक होळी, ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा प्रतीकात्मक उपक्रम दोन ठिकाणी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या घेण्यात आला.
5. माळवाडी ः चिंचोली, झेंडे मळा देहूरोड या परिसरातील होळीमध्ये टाकल्या जाणार्या पोळ्या व इतर अन्न संकलन करण्यात आले. देहू रोडमधील एका पालावरील वस्तीमध्ये संकलित अन्नाचे वाटप करण्यात आले. मिलिंद देशमुख, रामभाऊ नलावडे, सुभाष सोळंकी सर व मॅडम, रवीकर पाठक, हुरहिंद पठाण, प्रदीप तासगावकर, अशोक जाधव सर, राजू जाधव, विजय सुर्वे आदी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
6. चिंचवड ः विश्वेश्वर मंदिर, अश्विनी हॉस्पिटलशेजारी बिजलीनगर येथे देखील परिसरातील नागरिकांचा या उपक्रमातील सहभाग हा एक आश्वासक दिलासा देणारा होता. अंजली इंगळे, शुभांगी घनवट, विश्वास पेंडसे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
5. राजगुरूनगर शाखा ः राजगुरूनगर शाखेने राबवलेल्या ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ या उपक्रमात 490 पोळ्या, 3 किलो जिलेबी, 10 किलो गूळ, लापशी आदी गोड पदार्थ जमा करून चांडोली (ता. खेड) येथील कातकरी बांधवांना पोटभर जेवण म्हणून दिले. या उपक्रमात लक्ष्मीनगर, सुगंधा विहार सोसायटी फेज 2, शिवनेरी राजगड सोसायटी, वाडा रोड भागातील रहिवासी शुभम तांबडे, सिद्धार्थ नागदेवे, वामन बाजारे, अॅड. साधना बाजारे, अलका जोगदंड, संदेश खैरे, महेश धनवटे, सोन्या ढोले, ऋतिक बोराडे, ओंकार, महाकाळ आदींनी सहभाग घेतला.
6. पाली–सुधागड (जि. रायगड) ः ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ला उदंड प्रतिसाद मिळाला. सालाबादप्रमाणे यंदा वन व महसूल विभाग, गाव व शहरातील काही ग्रुप व पर्यावरणमित्र, विविध सामाजिक संस्था, संघटना, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या माध्यमातून विधायक म्हणजेच पर्यावरणपूरक व पर्यावरणस्नेही होळी आणि धूळवड साजरी करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती व प्रबोधन करण्यात आले. याबरोबरच तब्बल दोन वर्षांनंतर अनेक शाळा व महाविद्यालयांत देखील पर्यावरणस्नेही होळी व धूळवड साजरी केली गेली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दरवर्षी ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ असे आवाहन करते. रायगड जिल्ह्यात ‘महा. अंनिस’च्या या अभियानास मोठा पाठिंबा मिळाला. अनेक हितचिंतक व सामाजिक संघटनांनी देखील या उपक्रमात सहभाग घेतला होता. पालीतील ‘एक संघर्ष समाजसेवेसाठी’ ग्रुप व ‘महा. अंनिस’ पाली-सुधागड शाखेच्या वतीने जवळपास एक हजारांहून अधिक पोळ्या जमा करून त्यांचे आदिवासी वाडीवर वाटप केले. यावेळी अमित निंबाळकर, श्रीकांत ठोंबरे, रोशन रुईकर, केतन निंबाळकर व महाडिक उपस्थित होते. पेण ‘अंनिस’ शाखा; तसेच जिल्ह्यातील इतरही मंडळांनी व कोणी वैयक्तिकरित्या हजारो पोळ्या जमा करून आदिवासी वाड्यांवर वाटप केले.
7. हिंगणा (जि. नागपूर) ः ‘महा. अंनिस’च्या हिंगणा (जि. नागपूर) शाखेने होळीचे निमित्त साधून ‘होळी करा लहान आणि पोळी करा दान’ या उपक्रमांतर्गत होळीचे पूजन करताना होळीत अर्पण करणार्या पुरणपोळ्या, नारळ, साखरेच्या गाठ्या व इतर खाद्यपदार्थ संकलन करून पालावरल्या व हिंगणा झोपडपट्टी एरियातील अनाथ व भटक्या कुटुंबांमध्ये वितरीत केले.
या अनोख्या उपक्रमात ‘महा. अंनिस’च्या कल्पना लोखंडे व नीलिमा गोबाडे व शाखा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. यावेळी ‘महा. अंनिस’चे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे व राज्य सदस्य विजयाताई श्रीखंडे, नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे, देवानंद बडगे, चंद्रशेखर मेश्राम, नीता इटनकर, दीपक लोखंडे व सुरेश गोबाडे उपस्थित होते. याकामी संध्या राऊळकर व शिल्पा वीर यांनी सुद्धा मदत केली.
8. ठाणे शहर शाखा ः ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शाखेतर्फे काल रात्री ठाणे शहरातील हरिओम नगर येथील डम्पिंग ग्राउंड येथे जवळजवळ 325 पोळ्यांचे वाटप करण्यात आले. ठाणे शाखेच्या कार्यकर्त्या, वसंतविहार येथील पुष्पा तापोळे यांनी सोसायटीमधील लोकांना सांगून मोठ्या प्रमाणात पोळ्या जमा केल्या. तसेच कळवा येथील साई एकविरा गोविंदा मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ यांनीही या उपक्रमासाठी मदत केली. ‘अंनिस’ ठाणे शाखेतर्फे वंदना शिंदे, अजय भोसले, अथर्व लिप्रे, ओंकार जंगम, अभिषेक रणशिंगे, मिनू पगारे उपस्थित होते.
9. सातारा ः ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा उपक्रम महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, सातारा यांनी संगम माहुली, सातारा येथे राबविण्यात आला. यावेळी दारू, गांजा, अफू, तंबाखू आदी व्यसनदर्शक लेबल लावलेल्या प्रतीकात्मक प्रतिमेची होळी गावातील कचरा गोळा करून त्यासोबत केली. उपक्रमाची माहिती डॉ. दीपक माने यांनी दिली व ‘मानवास तारी, निसर्गाचा ठेवा…’ हे पर्यावरणगीत गायले. भगवान रणदिवे यांनी ‘या भारत देशात कुणी कितीही शिकला…’ हे गीत गायले. नंतर माजी सरपंच, माहुली यांनी उपक्रम राबवल्याबद्दल ‘अंनिस’चे आभार मानले. ‘आम्ही प्रकाशबीजे…’ हे गीत सौ. मगर मॅडम (परिवर्तन संस्था) यांनी गायले. कार्यक्रमास अॅड. हौसेराव धुमाळ सर, जयप्रकाश जाधव सर, रसाळ सर, नलवडे सर, खटावकर सर, महादार सर, पत्रकार दशरथ रणदिवे सर, ग्रामस्थ व ग्रामसेवक उपस्थित होते.
संकलन ः धनंजय कोठावळे, भोर