अंनिवा -
“शालेय विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन समजून सांगितला पाहिजे. त्यामुळे लहान वयातच विविध अंधश्रद्धा, भ्रामक समजुती दूर होतील. मोठे मठ, संप्रदाय स्थापून फसवणूक करणार्या ढोंगी लोकांपासून लांब राहिले पाहिजे,” असे मत ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांनी इस्लामपूर येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. बागाईतकर म्हणाले, “अंधश्रद्धांना प्रखर विरोध करायला हवा. काही ठिकाणी देवळात प्रसाद म्हणून दारू दिली जाते, याची चिकित्सा, आत्मपरीक्षण करायला हवे. उत्सवकाळात अंधश्रद्धा वाढीस लागतात, अनेक अंधश्रद्धांच्या वाहक राजकीय व्यक्ती असतात. आधुनिक काळात ज्योतिषाचा धंदा तेजीत येतो, अनेक बुवा, बाबा, अम्मा यांचे प्रस्थ वाढते, ही चिंतेची बाब आहे. अपराधी जगत हे अशा ढोंगी लोकांच्या पाठीशी असते. चळवळ चालवताना कार्यकर्त्यांनी सजगता, सावधानता बाळगली पाहिजे. परिवर्तनाच्या कामात लोकांनी साथ दिली पाहिजे. विवेकी मूल्यांचा आग्रह धरणारी पिढी निर्माण झाली पाहिजे.”
यावेळी ज्येष्ठ खगोल अभ्यासक व नेहरू तारांगण, मुंबईचे संचालक अरविंद परांजपे म्हणाले, “विज्ञानविषयक साक्षरता वाढली असती, तर गणपती दुग्धप्राशन झाले, यावर विश्वास ठेवला नसता. हसत-खेळत विज्ञानाने मुलांच्यात वैज्ञानिक मनोभाव वाढवता येतो. ग्रहांचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही, असे वैज्ञानिक सतत सांगतात, तरी लोक ज्योतिषावर विश्वास ठेवतात. हे थांबले पाहिजे. विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी ‘महा. अंनिस’चे काम पथदर्शी आहे.”
शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानजागृतीचे काम समिती सातत्याने करत आहे. समाजातून चमत्काराला शरण जाण्याची मानसिकता नष्ट करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या ऑनलाईन वेबिनार कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी केले. राज्य सरचिटणीस हरिदास तम्मेवार यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी केले. राज्य सरचिटणीस संजय शेंडे यांनी आभार मानले. समितीच्या वतीने ‘चमत्कारामागील विज्ञान’ या मोहिमेंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.