राजीव देशपांडे -
१४ जुलै २०२३ रोजी अवकाशात झेपावलेले ‘विक्रम’ हे अवकाशयान २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रावर यशस्वीरीत्या उतरले. या ऐतिहासिक घटनेबद्दल भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तेवढे थोडेच!
वैज्ञानिक प्रगतीच्या बाबत आपण जगातील चार देशांपैकी एक आहोत, याबद्दलही आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
पण विज्ञानाच्या दृष्टीचे काय?
या नजिकच्या काळातील वृत्तपत्रांच्या बातम्यांवर नजर टाकली, तरी वैज्ञानिक दृष्टिकोनापासून आपण खूपच लांब आहोत, हे दिसते. अजूनही बुवा- बाबा-महाराज-तांत्रिक-मांत्रिक यांच्या नादी लागणार्यांची संख्या प्रचंड आहे.
विज्ञानाचा उपयोग तरी सर्व जनतेसाठी होतोय का? तर याचेही उत्तर नकारार्थीच आहे. चंद्रावर यान उतरले; पण नागरिकांना साधे शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही, ऐंशी कोटी लोक पोट भरण्यासाठी आजही मोफत रेशनवर अवलंबून आहेत.
एकाच वेळी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा व सर्वांच्या मूलभूत गरजाही पूर्ण व्हाव्यात, विज्ञानाने निर्माण केलेल्या संधीचे समान वाटप व्हावे व विवेकवादी समाज निर्माण व्हावा, तर आयुष्यभर झटणार्या व यासाठी शहीद झालेल्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला २० ऑगस्ट २०२३ रोजी दहा वर्षे पूर्ण झाली. खून करूनही सनातनी त्यांचे विचार संपवू शकलेले नाहीत. उलट अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर जोमदारपणे पसरत आहे. त्याचे प्रतिबिंब यावर्षीच्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभरच नव्हे, तर देशभरात झालेल्या कार्यक्रमांवरून दिसून येते. डॉक्टर दाभोलकरांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रकाशित केलेल्या बारा पुस्तिकांच्या संचाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. या पुस्तिकांच्या ५०,००० प्रती प्रकाशनपूर्व नोंदणीतच संपल्या.
त्याचबरोबर २० ऑगस्ट रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यभरातील २३ जिल्ह्यांतील शाखांनी खुनाच्या सूत्रधारांना पकडण्याची मागणी घेऊन राज्यभर निर्भय मॉर्निंग वॉक, अभिवादन सभा, व्याख्याने, भाषणे, निदर्शने, जिल्हाधिकार्यांना निवेदने, रक्तदान शिबिरे, चित्रप्रदर्शने वगैरेचे आयोजन केले. त्यात शाखांमधील हजारच्यावर कार्यकर्ते, मान्यवर व समविचारी संघटना यांनी सहभाग नोंदवला. त्या कार्यक्रमांचे संपूर्ण वृत्तांत आम्ही या अंकात देत आहोत.
तसेच पुणे येथे जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा यावर पूर्ण दिवसाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कायद्यांच्या जनजागरणासाठी राज्यभरात निघणार्या ९० दिवसांच्या यात्रेचे उद्घाटनही २० ऑगस्टरोजी करण्यात आले.
‘अंनिसचा हास्यजागर’ आणि ‘वैज्ञानिक दृष्टिकोनासमोरील आव्हाने’ हा तीन तरुण पत्रकारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या तीन अनुवादित पुस्तकांचे प्रकाशन याचे सविस्तर वृत्तांतही आम्ही या अंकात देत आहोत.
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद अधिक जोमाने पुढे जात आहे, असेच या निमित्ताने म्हणता येईल.
आभार
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह सहाय्य केंद्रासाठी अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. प्रविण देशमुख (डोंबिवली) यांनी रुपये १ लाख ची देगणी संघटनेस दिली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
तसेच सुषमा सामंत मुंबई, अशोक नंदकर पुणे, सुरेश चिटणीस मुंबई, डॉ. भागवत औरंगाबाद यांनीही संघटनेस देणगी देऊन सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार.