राजीव देशपांडे -
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला 20 ऑगस्ट, 2021 ला आठ वर्षे पूर्ण झाली. गेली आठ वर्षे त्यांच्या खुनाचा तपास यंत्रणा तपास करत आहेत; पण कोणतीही ठोस कृती त्यांच्याकडून होत नव्हती. मात्र आता तब्बल आठ वर्षांनंतर, 15 सप्टेंबर 2021 ला पुण्याच्या विशेष सीबीआय न्यायालयात पाच संशयित आरोपींवर आरोपनिश्चिती करण्यात आली. त्यापैकी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, विक्रम भावे यांच्यावर ‘यूएपीए’ कायद्यानुसार खुनाचा; तर संजीव पुनाळेकर याच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मध्यंतरी पूर्णपणे ठप्प झालेला खटला आता वेग घेईल, अशी आशा करायला हरकत नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर डाव्या, पुरोगामी पक्ष-संघटना चारही विचारवंतांच्या खुन्यांना पकडण्याची मागणी करत रस्त्यावर आणि न्यायालयात गेली आठ वर्षे अतिशय शांतपणे; पण निर्धाराने संघर्ष करीत आहेत.
“आठ वर्षे हा काही छोटा कालखंड नाही… कितीही उशीर झाला असला तरी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे… उशीर झाला, न्याय मिळत नाही, असे वाटत असले, तरीही आपली लढाई संवैधानिक मार्गानेच लढायची ज्यांची इच्छा आहे, त्यांना आपल्या देशात हा रस्ता अटळ आहे… आरोपनिश्चिती ही केवळ अर्धी लढाई झाली; अजून खटला चालणे, हे दहशतवादी कृत्य करणार्या व्यक्तींना शिक्षा होणे आणि त्यामागचे सूत्रधार पकडले जाणे… ही मोठी लढाई अजून बाकी आहे. मा. मुंबई हायकोर्टाची देखरेख, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे बलिदान न विसरलेले समाजमन आणि ते समाजाला विसरू न देणारे कार्यकर्तेआणि माध्यमे यांच्यामधूनच ही लढाई लढली जात आहे आणि इथून पुढे देखील लढली जाणार आहे… या प्रवासात लढत राहणे, हेच जिंकणे आहे…” ही संशयितांच्या आरोपनिश्चितीनंतरची डॉ. हमीद दाभोलकर यांची प्रतिक्रिया ‘महाराष्ट्र अंनिस’च्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना व्यक्त करणारीच आहे.
नुकत्याच मुंबईतील साकीनाका, पुणे, उल्हासनगर, वसई, डोंबिवली अशा विविध ठिकाणी लहान मुली, तरुण स्त्रियांवर भीषण, क्रूर प्रकारच्या ज्या लैंगिक अत्याचाराच्या घटना सामोर्या आल्या आहेत, त्यामुळे कोणत्याही संवेदनशील मनाचा थरकाप उडाल्याशिवाय राहाणार नाही. तसेच अशा घटनांचा केवळ निषेध करून अथवा ‘फाशी द्या,’ ‘लिंगविच्छेद करा’ किंवा ‘एन्काउन्टर करा,’ अशा हिंसक मागण्या करून अशा घटनांना पायबंद बसणार नाही. खरे तर स्त्रियांवरील अत्याचाराबाबत फाशीची तरतूद असलेला बलात्कारविरोधी कायदा, बाललैंगिक अत्याचारविरोधी (पोक्सो) कायदा, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा, 498 अ कलम, अॅट्रॉसिटी, सायबर कायदा, अल्पवयीन लग्न रोखणारा कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, गर्भलिंगनिदान विरोधी कायदा असे अनेक कायदे आहेत; पण या कायद्यांची संवेदनशीलपणे अंमलबजावणी करणे आणि अशा आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आर्थिक तरतूद करणे, या गोष्टी जोपर्यंत होत नाहीत; तसेच वेळखाऊ न्यायालयीन प्रक्रिया आणि पीडितेबद्दलचा नोकरशाहीचा; आणि एकूणच समाजाचा असंवेदनशील दृष्टिकोन बदलत नाही, तोपर्यंत कायदे असूनही गुन्हेगारांवर जरब बसवणे शक्य होणार नाही; पण याचबरोबर सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे वाढणारी बेरोजगारी, त्यामुळे एकूणच समाजातील वाढत चाललेली आर्थिक असुरक्षितता, त्यातून येणारे वैफल्य, भणंगपणा व त्याचे स्त्रियांवर होणारे परिणाम, त्यांच्या श्रमाचे सातत्याने होत जाणारे अवमूल्यन, सर्व प्रकारच्या बाजारीकरणामुळे स्त्रियांचे होणारे वस्तूकरण, त्यात ‘कोविड’सारख्या महामारीची परिस्थिती; तसेच भारतीय समाजाच्या विषमतेवर आधारलेल्या वर्ग-जात आणि पितृसत्ताक रचनेत स्त्रियांची दुय्यमता कायम राखण्यासाठी हुंडा, गर्भलिंग परीक्षा, जाती-धर्म-कुटुंबाच्या भ्रामक अस्मितेपायी जाती-धर्माबाहेर लग्न करण्यास हिंसक विरोध, धर्माच्या आधाराने पसरविल्या जात असलेल्या अंधश्रद्धा, व्रतवैकल्ये, बुवाबाजीचे वाढत असलेले प्रस्थ अशा विविध मार्गाने स्त्रीच्या स्वतंत्र निर्णयक्षमतेवर बंधने लादली जात आहेत. त्यामुळे स्त्रियांच्या असुरक्षिततेत व त्यातूनच त्यांच्यावर होणार्या अत्याचाराच्या घटनांत वाढच झालेली आहे. त्यामुळे अशा अत्याचारांच्या प्रकरणात पोलिसांचा चोख तपास, प्रशासनाकडून सुविधांची उपलब्धता, न्यायव्यवस्थेकडून विनाविलंब न्याय या न्यायालयीन, प्रशासकीय उपायांबरोबरच विषमता वाढवणार्या आर्थिक धोरणांना विरोध, घटनेतील ‘समान हक्क’ प्रत्यक्षात आणण्यासाठीचा संघर्ष यातून जे वातावरण निर्माण होईल, त्यातून पीडितेला न्याय मिळण्याची व स्त्रियांवरील अत्याचारांना आळा बसण्याची शक्यता वाढेल; पण इथेही संघर्षाचा रस्ता अटळच.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह छताला टांगलेल्या अवस्थेत अलाहाबाद येथील वाघांबरी मठात सापडल्यावर बरीच खळबळ उडाली. त्यांच्या मृतदेहाबरोबर एक सात पानांची चिठ्ठीही सापडली. त्यात त्यांनी आपला शिष्य आनंदगिरी याच्या कारवायामुळे आपण मानसिकदृष्ट्या अस्थिर बनल्याने जीवन संपवत असल्याचे लिहिले असल्याने त्यांच्या मृत्यूचे गूढ आणखीच वाढले आहे. हा आनंदगिरी स्वत:ला योगगुरू संबोधतो. त्याच्या विरोधात 2018 मध्ये ऑस्ट्रेलियात महिलांच्या छेडछाडीबद्दल खटला भरण्यात आला होता. त्यामुळे हा खून आहे की आत्महत्या, असा प्रश्न त्यांच्याच भक्तांच्या मनात निर्माण झाला. पण या गूढ मृत्यूच्या निमित्ताने भक्तांना संन्यास-सर्वसंगपरित्यागाचे डोस पाजणारे, या आखाड्यातील हे तथाकथित साधू, संत-महंतांच्या आखाड्यांच्या प्रचंड मालमत्ता, त्यासाठी चालू असलेल्या हिंसक कारवाया, मार्यामार्या, राजकारण्यांशी असलेले त्यांचे लागेबांधे, त्यांच्या सत्तास्पर्धा, ऐषआरामी, विलासी जीवन या बाबी जनतेपुढे आल्या आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने जनतेचा पैसा खर्च करत यांची बडदास्त, मनमानी कशी राखली जाते, हे आपण अनुभवतच असतो. अर्थात, राजसत्तेशी यांची पूर्वापार सलगी आहे. त्याच्या बळावरच यांची मौजमस्ती चालू असते. या काही गोष्टी नव्याने पुढे आलेल्या नाहीत. कोणताही बाबा, बुवा, महाराजाच्या बाबतीत याच गोष्टी राजरोसपणे श्रद्धेच्या, अध्यात्माच्या बुरख्याआड घडत असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने वारंवार दाखवून दिलेले आहे.