40.5 टक्के महिलांचा वटपौर्णिमा या व्रतावर विश्वास नाही! अंनिसच्या सर्वेक्षणात आढळून आली माहिती

राहुल विद्या माने -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘विविध उपक्रम’ विभागातर्फे वटपौर्णिमेनिमित्त खास महिलांसाठीचे असे ऑनलाईन सर्वेक्षण 23 जून ते 8 जुलैदरम्यान करण्यात आले. यासाठी तयार केलेल्या प्रश्नावलीला महाराष्ट्रातील 1120 महिलांनी प्रतिसाद दिला. या प्रश्नावलीमध्ये 15 प्रश्न होते. या प्रश्नावलीच्या मर्यादा असू शकतील. पण महिला वटपौर्णिमेचे व्रत का करतात आणि त्यामागे त्यांचे ज्ञान किंवा या परंपरेमागील समजुती काय असतील, हे जाणून घेण्याचा हे सर्वेक्षण हा एक छोटासा प्रयत्न होता. यातील प्रश्नांना महिलांनी कसा प्रतिसाद दिला, हे आम्हाला प्राप्त 1120 उत्तरांच्या विश्लेषणातून कळाले. परंतु या विश्लेषणातून वटपौर्णिमेच्या सणाबद्दल कोणताही निश्चित असा निष्कर्ष आमच्या हाती लागला आहे, असा आमचा दावा नाही. परंतु आधुनिक महाराष्ट्रातील महिला कशा विचार करतात, हे निश्चितच यावरून कळून येते. मिळालेल्या उत्तरांचे कोणत्याही प्रकारचे आकलन, मूल्यमापन किंवा विश्लेषण इथे न करता आम्ही इथे मिळालेले निष्कर्ष ‘अंनिस वार्तापत्रा’च्या वाचकांसाठी इथे देत आहोत. प्रत्येक प्रश्नाला चार किंवा त्यापेक्षा अधिक असे योग्य पर्याय दिले होते. आम्हाला प्राप्त झालेली उत्तरे ही सर्व लोकसंख्येला प्रातिनिधिक नाहीत, याची आम्हाला जाणीव आहे. परंतु उपलब्ध कमी वेळेत इतक्या महिलांनी याला प्रतिसाद दिला, याचे आम्हाला समाधान आहे.

1) ‘सत्यवान-सावित्री’ ही कथा आहे, असं मानणार्‍या महिलांचे प्रमाण 18 टक्के आहे. ‘सत्यवान-सावित्री’ ही दंतकथा आहे, असं मानणार्‍या महिलांचे प्रमाण 22 टक्के आहे. ‘सत्यवान-सावित्री’ ही पुराणकथा आहे, असं मानणार्‍या महिलांचे प्रमाण 52.5 टक्के आहे. उर्वरित प्रमाण असलेल्या महिलांमध्ये अशी भावना आहे की ‘सत्यवान-सावित्री’ हा इतिहास आहे.

2) वटपौर्णिमेच्या निमित्ताने काय करणे योग्य आहे, असे तुम्हाला वाटते. या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात 2.5 टक्के महिलांनी उपवास करावा, असे मत व्यक्त केले; तर 27.7 टक्के महिलांनी समानतेचा आग्रह धरावा, असे उत्तर दिले. वडाच्या फांद्या तोडून त्यांचे पूजन करण्याचे 0.5 टक्के महिलांनी मत व्यक्त केले, तर जवळपास 70 टक्के महिलांनी वडाचे वृक्षारोपण करावे, असे मत व्यक्त केले.

3) नवरा व्यसनी, दुराचारी असला तरीही स्त्री वटसावित्रीचा उपवास करते, याबद्दल काय कारण असू शकते, यावर महिलांनी मत व्यक्त केले. त्यामध्ये 12.4 टक्के प्रतिसदामध्ये खरेच महिलांचे त्यांच्या पतींवर प्रेम असते, असे मत व्यक्त केले. ती लोकलाजेस्तव असे करते, असे 21.6 टक्के महिलांनी सांगितले; तर जवळपास 66 टक्के महिलांनी ती केवळ परंपरा जपत असते, असे सांगितले.

4) वटसावित्रीच्या कथेमधील पुढीलपैकी कोणकोणत्या कल्पनांवर तुमचा विश्वास आहे, असा प्रश्न विचारल्यावर ‘आत्मा’ या संकल्पनेवर 14.7 टक्के महिलांनी सांगितले. ‘यम’ या कल्पनेवर 4.4 टक्के महिलांनी विश्वास असल्याचे सांगितले. याचप्रमाणे स्वर्ग (3.1 टक्के), पुनर्जन्म (8.1 टक्के), आत्मा-यम-स्वर्ग-पुनर्जन्म या चारही संकल्पना खर्‍या असल्याचे 9.6 टक्के महिलांनी मत व्यक्त केले. यापैकी एकही संकल्पनेवर विश्वास नसल्याचे 67 टक्के महिलांनी मत व्यक्त केले.

5) नव्या युगाच्या स्त्रीने कसे जगावे, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये काही महिलांनी ‘सत्यवान-सावित्री’सारखे नवर्‍याला समर्पित होऊन, असे उत्तर दिले; तर तब्बल 76 टक्के महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्यासारखे स्वत:ला घडवत नवर्‍याबरोबर सहजीवन करून, असे उत्तर दिले. याचबरोबर वरीलपैकी दोन्ही पर्याय एकत्रितरित्या योग्य आहेत, असे 16 टक्के महिलांनी मत व्यक्त केले.

6) वडाची पूजा कशी करता, याबद्दल 52 टक्के महिलांनी प्रत्यक्ष वडाची पूजा करतो, असा प्रतिसाद दिला; तर जवळपास 42टक्के महिलांनी आम्ही पूजा करत नाही, असे मत व्यक्त केले.

7) वटपूजेचे व्रत करत नसल्यास कारण कोणते, या प्रश्नाच्या उत्तरात 40.5 टक्के महिलांनी यावर आमचा विश्वास नसल्याचे सांगितले आणि जवळपास 56 टक्के महिलांनी हा प्रश्न आम्हाला लागू होत नाही, असे सांगितले.

8) वटपौर्णिमेदिवशी मासिक पाळी असेल तर आपण पूजा करता का नाही, या प्रश्नाच्या उत्तरादाखल 60 टक्के महिलांनी नाही, असे उत्तर दिले. 18 टक्के महिलांनी मासिक पाळीचा धार्मिक कार्यासाठी संबंध योग्य मानत नाही, असे सांगितले. 18 टक्के महिलांनी पूजा करते म्हणून सांगितले. इतर चार टक्क्यांत इतर पर्याय होते.

9) स्त्रियांना जसे वटसावित्रीचे व्रत असते, तसे व्रत पुरुषांसाठी सुद्धा असावे असं वाटतं का, या प्रश्नावर 36.8 टक्के महिलांनी ‘नाही’ असे उत्तर दिले; तर पुरुषांसाठी सुद्धा असा सण असायला हवा, असे 63.2 टक्के महिला म्हणाल्या.

10) समाजव्यवस्थेमध्ये पतीचे वय पत्नीपेक्षा जास्त असते. त्यामुळे या व्रतामुळे पती दीर्घायुषी होणं आणि पुढच्या जन्मी तोच पती परत मिळणं, यात विरोधाभास वाटत नाही का, या प्रश्नावर 22.5 टक्के महिलांनी ‘नाही’ असे उत्तर दिले; तर विरोधाभास वाटतो, असे 77.5 टक्के महिलांनी उतर दिले.

11) वटपूजेच्या व्रतामध्ये कालसुसंगत बदल व्हावा, असे आपणांस वाटते का, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये 18 टक्के महिलांनी ‘नाही’ असे उत्तर दिले; तर 82 टक्के महिलांनी ‘बदल व्हावा’ असे वाटते, असे उत्तर दिले.

12) वटसावित्री व्रत करताना फांदी तोडून पूजा केल्यामुळे पर्यावरणाची हानी होते, असं तुम्हाला वाटतं का या प्रश्नाला 95 टक्के महिलानी ‘हो’ असे उत्तर दिले. 5 टक्के महिलांनी हानी होत नाही, असे सांगितले.

13) ठिकाण : या सर्वेक्षणाला भरघोस प्रतिसाद मिळाला. पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, ठाणे, चंद्रपूर, नागपूर, धुळे, रायगड, सांगली, अहमदनगर, रत्नागिरी, अमरावती, परभणी, नाशिक, मुंबई, जळगाव, नवी मुंबई, चेन्नई, कराड, राजगुरूनगर, कल्याण, दापोली, श्रीरामपूर, उमरगा, कर्जत, चाळीसगाव, अंबरनाथ, वाई, यवतमाळ, औरंगाबाद, कणकवली, करमाळा, कुडाळ, माळशिरस, जालना, खेड, पालघर, उमरखेड, उस्मानाबाद, पुसद, सावंतवाडी, फलटण, अहमदपूर, पंढरपूर, चिपळूण, वसई, उदगीर, कोपरगाव, बेलापूर, देवणी, पिंपरी-चिंचवड, भोकर, अमळनेर, वापी, दहिवडी, नवी मुंबई, बडोदा, मिरज, सिंधुदुर्ग, अकोला, पाचोरा, चांदूरबाजार, संगमेश्वर, शिंगणापूर, दौंड, माण, बंगळुरू, अचलपूर, कुडाळ, रामटेक, डोंबिवली, औसा, किनगाव, लोहारा, वाळवा, निलंगा, नेवासा, बार्शी, मावळ आणि वाई या तालुका-जिल्ह्यांतून महिलांनी सर्वेक्षण अर्ज भरून दिले.

14) वय : 18-30 वर्षे वय असलेल्या महिलांचे प्रमाण 18 टक्के आहे. 31-45 टक्के वर्षे वय असलेल्या महिलांचे प्रमाण 49.7 टक्के आहे. 46-60 वर्षे वय असलेल्या महिलांचे प्रमाण 27.9 टक्के आहे. वय वर्षे 61 आणि त्यापुढील महिलांचे प्रमाण हे 4.5 टक्के आहे. 15) शिक्षण : दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या महिलांचे प्रमाण 10.4 टक्के आहे. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या महिलांचे प्रमाण 13.3 टक्के होते. पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या महिलांचे प्रमाण 36.3 टक्के होते. पदवीनंतरचे शिक्षण झालेल्या महिलांचे प्रमाण 40.1 टक्के होते. या सर्वेक्षणाची प्रश्नावली आणि संबंधित नियोजन करणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये किरण सगर, मिलिंद देशमुख, धनंजय कोठावळे, डॉ. श्याम जाधव, मधुरा सलवारू, फारूख गवंडी, अनिश पटवर्धन आणि राहुल माने या कार्यकर्त्यांचा समावेश होता.

अहवाल लेखन : राहुल विद्या माने, पुणे


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]