अंनिवा -
नायट्रिक ऑक्साईड कोरोनाला मारून टाकेल, अशी शक्यता निर्माण झालीय. ‘सॅनोटाईज’ ही जैवतंत्रज्ञानात संशोधन करणारी कंपनी, अॅरशफोर्ड आणि एनएचएस फौंडेशन यांनी गेली वर्षभर मिळून केलेल्या संशोधनातून हे हाती लागले आहे. नायट्रिक ऑक्साईडचा लघुफवारा नाकात सोडला तर 99 टक्के कोरोना मरतात, असे वैद्यकीय चाचण्यात दिसून आलेय. नायट्रिक ऑक्साईड हे रक्तवाहिन्या प्रसारण किंवा तात्पुरत्या मोठ्या करण्याचे काम करते. पुरुषांच्या शिश्नात ताठरता येत नसेल तर नायट्रिक ऑक्साईड ताठरता निर्माण करण्याचे काम करते. ‘व्हायग्रा’सारखी ‘सिलडिनाफिल’ नावाचे रसायन असलेलं गोळी शरीरात नैसर्गिकरित्या नायट्रिक ऑक्साईड निर्माण करण्याचे काम करते आणि पुरुष लिंगात ताठरता निर्माण करते. हृदयविकारात ते महत्त्वाचे औषध आहे. औषधी रुपातले नायट्रिक ऑक्साईड मूळ रुपात मात्र विषारी असते. ‘यह विग्यान है भैय्या!’ याचे औषधी गुण भन्नाट आहेत. ते जीवाणू, विषाणू आणि बुरशी म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगस या सार्यांचा नायनाट करते; शिवाय जखमा बर्या करते आणि रोगप्रतिकारशक्ती नियंत्रित करते. हे सारे शोधून काढले होते, नोबेल पारितोषिक मिळालेल्या डॉ. मुरिद फराद यांनी; पण ते कोरोनाला मारते हे शोधलेय डॉ. स्टीफन विंचेस्टर आणि राबर्ट विल्सन यांनी. कोरोना नाकात वसतो. त्याच वेळी नायट्रिक ऑक्साईडचा मारा केला तर 72 तासांत कोरोनाचा नाश होतो. मंत्राने नाश करणारे आपल्याकडचे संशोधक आणि संशोधन करणारे सरकार अजूनही जडी-बुटी आणि काढ्यात कालवत बसलेत. इंग्लंड आणि कॅनडात याच्या चाचण्या झाल्यावर हे निष्कर्ष जाहीर केले आहेत. चाचण्या संख्येने तशा अपुर्या असल्या तरी संशोधन होत आहे, ही आश्वासक आणि दिलासादायक गोष्ट आहे. नाही तर गोबर आणि गोमुत्रातच वळवळणारे संशोधक आणि त्यांचे पित्ते आपल्याकडे ‘प्राचीन शास्त्र’ नावाच्या उकिरड्यात शोधत राहिलेच आहेत.
नायट्रिक ऑक्साईड हे जनरल अँटीव्हायरल समजले जाते. याच्या आणखी ट्रायल यशस्वी झाल्या तर कोरोनाचे भुईसपाट आणि हवासपाट होणे किती उपकाराचे होईल!
उपकाराचे होण्यासाठी आज केवळ जे काही उरलेय, ते आहे विज्ञान म्हणूनच. कोव्हिड संपवायचा असेल, तर मनातल्या भीतीवर स्वार व्हा. योग्य वैज्ञानिक उपाय निवडा आणि जगणे निरंतर ठेवण्यात यशस्वी व्हा.
यासारखा चांगला मंत्र कोणता असेल?