डॉ. नरेंद्र दाभोलकर खरे धर्ममित्र

-

20 ऑगस्ट 2022 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त पुणे येथे प्रा. डॉ. सदानंद मोरे यांचे ‘महाराष्ट्रातील संत समाज सुधारकांची परंपरा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ’ या विषयावर स्मृती व्याख्यान आयोजित केले होते. हे या व्याख्यानाचे शब्दांकन…!

“डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना परंपरेबद्दल आस्था होती. परंपरेतील अनिष्ट गोष्टी दूर करण्यासाठी ते राबत होते. साहजिकच परंपरेत हितसंबंध दडलेल्या लोकांना ते शत्रू वाटले; पण डॉ. दाभोलकर धर्माचे शत्रू नसून मित्र होते. त्यांनी खर्‍या अर्थाने संत आणि सुधारकांची परंपरा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातून पुढे नेली,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी शनिवारी (ता. 20 ऑगस्ट) पुणे येथे केले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्यानात डॉ. मोरे बोलत होते. ‘महाराष्ट्रातील संत-समाजसुधारकांची परंपरा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. पुणे येथील शिवाजीनगरमधील घोले रोड वरील पंडित जवाहरलाल नेहरू भवन येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित होत्या.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुधारकांच्या कार्यावर सविस्तर प्रकाश टाकताना डॉ. मोरे म्हणाले, “आजच्याच दिवशी; म्हणजे 20 ऑगस्ट, 1828 मध्ये बंगालमध्ये डॉ. राजा राममोहन रॉय आणि सहकार्‍यांनी ‘ब्राह्मो समाजा’ची स्थापना केली. हा एक धर्मपंथ होता. तत्कालीन भ्रष्ट धर्माची चिकित्सा करून त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी ‘ब्राह्मो समाजा’ची स्थापना करण्यात आली. त्याचा बंगालवर मोठा प्रभाव पडला. त्या वेळी त्याच पद्धतीचा विचार महाराष्ट्रातील विचारवंत करत होते. बंगालमधील हा विचार महाराष्ट्रात येऊन त्यातून ‘प्रार्थना समाज’ उभा राहिला. न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती चंदावरकर, विठ्ठल रामजी शिंदे, रामकृष्ण भांडारकर, वाईचे रा. ना. चव्हाण आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला. धर्माच्या शुद्धीकरणाचे काम त्यांनी हाती घेतले होते. धर्माचे शुद्धीकरण ही एक अविरत चालणारी प्रक्रिया आहे. ‘अधर्मच धर्म म्हणून मिरवायला लागतो, तेव्हा आपण अवतार घेतो,’ असे श्रीकृष्णाने सांगितले. धर्म ही समाजजीवनातील अत्यंत महत्त्वाची संस्था असते. तिचा प्रभाव अनेक क्षेत्रांवर असतो, तो नाकारू नये. या धर्माचे स्वरूप शुद्ध ठेवण्याचे काम धर्म मानणार्‍यांचे आणि न मानणार्‍यांचेही आहे. त्याबाबत तुच्छतावाद नसावा.

पुण्यातील ‘सार्वजनिक सभा’ समाजोपयोगी कामे करत असे. त्यासाठी देणग्या गोळा करत. ठिकठिकाणी सभा घेत. एकदा या सभांना देहविक्रय करणार्‍या स्त्रियांना बोलवावे का, त्यांच्या देणग्या घ्याव्यात का, असा वाद उभा राहिला. त्यावर लोकमान्य टिळकांनी त्या स्त्रियांना असा हक्क आहे, अशी भूमिका घेतली.

डॉ. दाभोलकरांना समाजाबद्दल आस्था होती आणि त्यासाठी त्यांनी स्वत:ला पणाला लावले. तशीच आस्था संतांना होती. आईवडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानदेवादी भावंडांना ‘संन्याशाची मुले’ म्हणून बहिष्कृत करण्यात आले. त्यांचा छळ करण्यात आला. त्यातून एकदा ज्ञानदेवांना उद्वेग आला आणि लोकांवर रागावून झोपडीचे दार बंद करून आतमध्ये बसले. अशा वेळी त्यांच्या धाकट्या भगिनी मुक्ताई पुढे आल्या. ‘समाजाकडे आस्थेने पाहणे, हे संतांचे कर्तव्य आहे. तुम्ही संत आहात, म्हणून बाहेर येऊन लोकांसाठी कार्य करा,’ असे त्यांनी ज्ञानदेवांना सांगितले.

तुकोबारायांनी ‘जे का रंजले गांजले…’ तसेच ‘तुका म्हणे तोचि संत। सोशी जगाचे आघात।’ अशा अभंगांतून संतांची व्याख्या केली आहे. आपण या समाजाचे देणे लागतो, ही संतांची भूमिका होती. हीच भूमिका डॉ. नरेंद्र दाभोलकरांची होती. जादूटोणाविरोधी विधेयक निर्णायक टप्प्यावर असताना एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या चर्चेत आम्ही दोघे सहभागी झालो होतो. चर्चेत मी विधेयकाची; अर्थात डॉक्टरांची बाजू घेतली. त्या वेळी डॉक्टर म्हणाले होते, “मोरे, तुम्ही आमचं काम करताय.” त्यावर मी त्यांना म्हणालो होतो, “तुम्हीच आमचं काम करत आहात; म्हणजे संतांनी सांगितलेले धर्मशुद्धीकरणाचे काम तुम्ही करत आहात.” काही लोकांनी या विधेयकाला वारकर्‍यांचा विरोध असल्याचे वारकरी संप्रदायाच्या नावाने सरकारला सांगितले. त्या वेळी आम्ही पंढरपुरातून लक्झरी बस करून फडकरी, वारकर्‍यांसह सरकारकडे गेलो आणि वारकर्‍यांचा या विधेयकाला विरोध नाही, हे आवर्जून सांगितले.”

“पुरोगामी लोकांतही अडाणीपणा असतो. त्यांना परंपरा माहीत नसतात. परंपरेच्या उडदात काळेगोरे निवडता आले पाहिजेत. गोर्‍या उडदांना आत्मसात करता आले पाहिजे. ‘पुरोगामी मंडळींची धर्माबद्दलची भूमिका’ या विषयावर मी ‘साधने’त लिहिले, तेव्हा पुरोगामी लोकांमधील मूलतत्त्ववादी लोकांनी दाभोलकरांना ‘तुम्ही मोरेंचे लेखन का छापले,’ असा जाब विचारला. ‘सारासार विचार करण्याची फॅकल्टी म्हणजे विवेक.’ संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘चंद्र तेथे चंद्रिका। शंभु तेथे अंबिका। संत तेथे विवेका। असणेकीजी॥’ म्हणजेच संतांकडे आस्था असते, पण आस्था आंधळी असता कामा नये. विनोबा म्हणाले होते – ‘बुडणार्‍या माणसाला वाचवणे म्हणजे आस्था. त्यासाठी विवेक लागतो. तो संतांमध्ये होता. तो सुधारकांमध्ये असायला हवा.’ डॉक्टर गेल्यानंतर इतरांप्रमाणे मीही अस्वस्थ झालो. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशी गोष्ट घडतेच कशी, असा सवाल त्या वेळचे ‘साप्ताहिक सकाळ’चे संपादक विश्वासराव देवकर यांनी उपस्थित केला. आपल्याकडे सुधारणा चळवळ कशी झाली, सामाजिक, धार्मिक संघर्ष कसे झाले, त्याबाबतचा सामाजिक, धार्मिक इतिहास काय आहे, यावर लिहिण्याची त्यांनी मला गळ घातली. त्याला मान देऊन मी या विषयावर डॉ. दाभोलकरांना श्रद्धांजली वाहणारी मालिका ‘साप्ताहिक सकाळ’मध्ये लिहिली. त्यातून ‘महाराष्ट्राची लोकयात्रा – सामाजिक संघर्ष आणि चळवळी यांचा इतिहास’ हे पुस्तक तयार झाले.

संत वगैरे मध्ययुगातील लोक. ते देव मानणारे होते; विज्ञाननिष्ठ नव्हते, प्रतिगामी होते, अशी बाळबोध समजूत आहे. मात्र नेमके असे नाही.

‘सुधारक’ शब्द संतांच्या काळात नव्हता. तो ब्रिटिशांच्या राजवटीत आला. ब्रिटिशांसोबत पश्चिमेतील ज्ञान, विज्ञान, सामाजिक, राजकीय संस्था आल्या. ‘सुधारक’ नावाची ‘कॅटेगरी’ ब्रिटीश काळात आली. ‘परंपरा वगैरे प्रांत संतसाहित्याचा अभ्यास करणारे लोक आणि प्रवचन-कीर्तन करणारे लोक यांचा आहे. ती संग्रहालयात ठेवण्याची गोष्ट आहे,’ असा समज नवीन शिक्षण घेतलेल्यांच्या नंतरच्या पिढ्यांनी करून घेतला. त्यामुळे या दोन प्रकारच्या लोकांमध्ये संवाद राहिला नाही. सुधारकांच्या पहिल्या पिढ्यांनी हा संवाद ठेवला होता. संतांचीच परंपरा या पिढ्यांनी सुरू ठेवली होती.

महाराष्ट्रात असे घडले, की ब्रिटिशांची राजवट आली, तेव्हा त्यांच्याकडील सामाजिक चलनवलन आपल्याकडील लोकांना समजू लागले. ब्रिटीश येण्यापूर्वी महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचे स्वराज्य होते. त्याचे रूपांतर नंतर साम्राज्यात झाले होते. ब्रिटीश भारतात आले नसते, तर मराठ्यांचेच राज्य भारतावर असते. देशात ब्रिटीश येणे, हा आपल्याला थेट फटका होता. त्यामुळे लगेच आत्मपरीक्षण सुरू झाले. 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. त्यातून त्यांनी विधवा विवाह पुरस्कार वगैरे सुरू केला. महाराष्ट्रात मुद्रणकला आल्यानंतर या जांभेकरांनी पहिल्यांदा ‘ज्ञानेश्वरी’ छापली. सोबत टीपा वगैरे दिलेली ती ‘ज्ञानेश्वरी’ची पहिली चिकित्सक आवृत्ती. त्यानंतर लोकहितवादी, न्या. रानडे, भांडारकरांचा ‘प्रार्थना समाज’, जोतिरावांचा ‘सत्यशोधक समाज’ या सर्व धार्मिक, धर्मशुद्धीच्या चळवळी उभ्या राहिल्या. धर्म हा सर्व व्यवहारांच्या मुळाशी होता.

आपल्याकडील राज्य गेले, याचे कारण केवळ राजकीय नव्हते. वि. का. राजवाडे म्हणत – ‘ज्याच्या बंदुकीची नळी लांब तो जिंकतो.’ ते काही प्रमाणात खरेही होते. पण मग विज्ञान, तंत्रज्ञान त्यांच्याकडेच का आले? त्यानंतर लक्षात आले, की त्यांच्याकडे समाजरचना चांगली आहे. स्त्रियांना सामाजिक स्थान आहे; जातिभेद नाहीत. आपणही ते स्वीकारले पाहिजे, असा विचार सुरू झाला. ज्याला आपण ‘सामाजिक सुधारणा’ म्हणतो, त्या सर्व धर्मांत गुंतलेल्या आहेत. त्यामुळे आगरकर वगळता सर्व सुधारकांनी धार्मिक सुधारणा हाती घेतल्या. धर्मचिकित्सा करण्यास सुरुवात केली. ‘धर्म नीट केला, तर समाज नीट राहील. समाज नीट झाला तर स्वातंत्र्य मिळेल,’ अशी त्यांची धारणा होती. त्याव्यतिरिक्त मार्गांनी स्वातंत्र्य मिळेल; पण ते टिकणार नाही. 19व्या शतकातील सुधारकांच्या हे लक्षात आले. आपल्या सुधारणांची नाळ त्यांनी संतांच्या सुधारणांशी जोडली. त्यांना तुकोबा ‘फ्रेंड’, ‘फिलॉसॉफर’ आणि ‘गाईड’ वाटले.

तुकाराम तात्या पडवळ हे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या ‘परमहंस सभे’चे सभासद होते. त्यांनी ‘जातिभेद विवेकसार’ नावाचे पुस्तक लिहिले. जातिभेदामुळे समाजाचे नुकसान होते, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी पूर्वसूरींनी काय सांगितले आहे, हे सांगितले. आपल्या काही साहित्यकृतींना उपनिषदांचा दर्जा मिळाला आहे. मुख्य उपनिषदे 10-11 आहेत. त्यानंतरही अनेक उपनिषदे आली. त्यातील एक मुख्य म्हणजे ‘वज्रसूची.’ बौद्ध तत्त्ववेत्ता अश्वघोष याची ती मूळ कृती असल्याचे मानले जाते. तिला वैदिक परंपरेतील लोकांनी उपनिषदाचा दर्जा देऊन आत्मसात केले. तुकाराम तात्यांनी ‘जातिभेद विवेकसार’ या पुस्तकात ‘वज्रसूची’ घेतली. ब्राह्मण कोणाला म्हणायचे, ब्राह्मण्य हे जातीने ठरते, की आणखी कशाने, याची त्यात चर्चा आहे. संत बहिणाबाईंनी या संस्कृत ‘वज्रसूची’चे मराठीत अभंगात्म पद्धतीने अनुवाद केला. तो अनुवाद तुकाराम तात्यांनी आपल्या पुस्तकात छापला. त्यावरही टीका झाली. त्यात चिपळूणकरही होते. तुकाराम तात्या परदेशात गेले, तेव्हा या पुस्तकाची आवृत्ती संपली होती. मग महात्मा फुलेंनी पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढली आणि ते पुस्तक स्वत: विकलेही.

समाजावर धर्माचा, संतांचा प्रभाव असतो, हे ओळखून सुधारकांनी त्यांना जोडून घेतले. बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंगांची ‘परमहंस सभा’, ‘सत्यशोधक समाज’ यांचा संबंध संतांच्या विचारांशी आहे. भांडारकर हे त्रिखंडात गाजलेले पंडित होते. त्यांनी पुण्यात ‘तुकाराम चर्चा मंडळ’ स्थापन केले. पुण्यातील सर्व विद्वान लोक त्यात होते. सर्वजण आठवड्यातून एकदा एकत्र येत. तुकोबांचा एकेक अभंग घेऊन त्याचा अर्थ लावत. ‘प्रार्थना सभे’च्या ‘सुबोध पत्रिके’त छापत असत. अशा एकूण 1800 अभंगांची चर्चा केल्याची नोंद आहे. त्याचे पुस्तकही झाले.

संतांची परंपरा वारकरी संप्रदायाने भजन, कीर्तन, दिंड्या आदींमधून सुरू ठेवली होती. त्यांचे महाराष्ट्रात ‘नेटवर्क’ होते. पण संतांचे विचार बदलत्या आधुनिक काळात लोकांना सांगण्यासारखे आहेत, हे त्या वेळच्या वारकरी नेतृत्वाच्या लक्षात आले नव्हते. त्याचे कारण त्यांच्यापर्यंत ब्रिटिशांचे आधुनिक शिक्षण पोचले नव्हते. विसाव्या शतकाच्या उत्तर काळात वारकर्‍यांमध्ये पहिला पदवीधर झाला असेल. वारकरी शेतकरी होते, खेडोपाड्यातील होते. सुधारकांनी आधुनिक शिक्षण घेतलेले होते. त्यामुळे त्यांना संतांच्या विचारांचे महत्त्व कळले. ‘सत्यशोधक’, ‘प्रार्थना समाज’, सुधारकांमध्ये अगदी आंबेडकरी चळवळीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर अनेक मंडळी गोपाळबुवा वलंगकरांसारखे वारकरी पद्धतीने कीर्तन करत. न्यायमूर्ती रानडे कीर्तन नाही; पण निरुपण करायचे. भांडारकर कीर्तन करत. गाणे शिकण्यासाठी भांडारकरांनी अब्दुल करीम खाँ यांची शिकवणी लावली होती. भांडारकर अगदी शरीर साथ देईपर्यंत कीर्तन करत होते. शेवटी त्यांनी आपल्या मुलाच्या गळ्यात वीणा दिला होता.

समाजाला धर्माची गरज असते, म्हणून धर्म शुद्ध असला पाहिजे. त्यासाठी धर्मचिकित्सा आणि धर्मशुद्धीकरण होणे गरजेचे ठरते. त्यातून समाज नीतिमान राहतो. संतांमधील सामाजिकता, सुधारणेची प्रवृत्ती संप्रदायाच्या बाहेरील लोकांनी उचलली आणि त्यांनी नवीन धर्मपंथ, नवीन सुधारणा समाजामध्ये दाखल केल्या. वारकर्‍यांना हे नवीन बदल माहिती नव्हते. संत आणि सुधारकांचा हा संघर्ष धर्माच्या चौकटीतील आहे. धर्मसुधारणा, धर्मशुद्धी, धर्मचिकित्सा यांच्यासाठीचा हा संघर्ष आहे.

धर्माधर्मांत, धर्माच्या अंतर्गत संघर्ष असतो. मुस्लिम धर्मातही संघर्ष आहे. उदा. पाकिस्तानातील मशिदीत स्फोट होतो. एका पंथाचा दुसर्‍या पंथाशी संघर्ष असतो. शिवराय स्वराज्य उभारत होते, तेव्हा युरोपात ‘प्रोटेस्टंट’ आणि ‘कॅथॉलिक’ यांच्यात 30 वर्षेलढाया सुरू होत्या; म्हणजे जेव्हा युरोपियन जगभर फिरत होते, त्यांना विज्ञानाची दृष्टी आली होती, तेव्हा त्यांच्यात हा संघर्ष सुरू होता. हिंदू समाजातील जातीभेद कसा चुकीचा आहे, हे एकनाथ महाराज भारुडातून सांगत होते. त्यांचे ब्राह्मण आणि महार यांचा संवाद असलेले एक भारूड आहे. या दोघांची टक्कर होते. त्यावर ‘का रे महारा मदमस्ता’, ‘का हो ब्राह्मणबुवा भलतेसलते बोलता, तुमचा-आमचा बाप एकच हाय,’ असा या भारुडात संवाद आहे. मुस्लिम आणि हिंदू या दोघांच्याही धर्मांची चिकित्सा करणारी भारूडे नाथांनी लिहिली. त्यातील पात्रे एकमेकांच्या धर्मांतील उणिवा सांगतात. त्या वेळी तेथे अहमदनगरच्या निजामशहाची राजवट होती. भारुडातील पात्रे एकमेकांवर टीका, समीक्षा करतात आणि शेवटी ‘आपण दोघे एकाच ईश्वराची लेकरे आहोत,’ असे म्हणत एकमेकांना आलिंगन देतात. नाथांनी भट आणि भटीण असा संवाद लिहून स्त्री-पुरुष समानता सांगितली.

ज्यांना परिवर्तन नको असते, ते लोक प्रभावी ग्रंथांचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात, अर्थसंकोच करतात. अर्थविस्तार करणार्‍या लोकांसोबत संघर्ष करतात. संत ज्ञानदेव आणि इतर संतांनी परंपरेच्या अर्थाचा विस्तार केला. गीतेच्या 9व्या अध्यायातील श्लोकात ‘स्त्रिया, वैश्य, शूद्र यांना मी सद्गती देतो,’ असे श्रीकृष्ण सांगतात. ज्ञानदेव त्याच्या पुढे जाऊन त्यात अतिशूद्रांचा समावेश करतात. त्यांना ‘अंत्यादी’ असे संबोधतात; म्हणजे ज्ञानदेवांनी विस्तार केला. असाच संतांच्या साहित्याच्या अर्थाचा विस्तार सुधारक करतात. परंपरेबाबत त्यांच्याकडे तुच्छतावाद नव्हता. डॉ. दाभोलकरांकडेही हा तुच्छतावाद नव्हता, तर आस्था होती. आपण या परंपरेचे घटक आहोत. परंपरेतील अनिष्ट गोष्टी दूर करण्याची आस्थेवाईक बांधिलकी डॉक्टरांनी पत्करली होती. साहजिकच हितसंबंध दडलेल्या लोकांना ते शत्रू वाटले; पण डॉक्टर धर्माचे शत्रू नसून मित्र होते. त्यांनी संत, सुधारकांची परंपरा अंधश्रद्धा निर्मूलनातून पुढे नेली. हे सगळे एकाच परंपरेचे घटक आहेत. त्या वेळीही संत, सुधारकांना विरोधक करणारे लोक होतेच. तसे डॉक्टरांनाही विरोध करणारे लोक असणार. हे लोक धर्माचा संकुचित अर्थ लावत आहेत. यात त्यांचे अडकलेले हितसंबंध आणि अज्ञानीपणाही आहे. जादूटोणाविरोधी विधेयकाची प्रक्रिया सुरू होती, तेव्हा या कायद्याच्या आधारे पंढरीच्या वारीवरही बंदी घातली जाईल, असे हे लोक सांगू लागले. मी आतापर्यंत पंढरीच्या वारीवर जेवढे लेख वाचले, त्यात सर्वोत्तम लेख मला दाभोलकरांचा वाटला. त्यातील गाभा त्यांनी बरोब्बर पकडला आहे.

आपल्याकडे काम करणारे, प्रामाणिक चळवळ करणारे लोक समाजापासून दूर गेले. त्यांची बेटे झाली. त्यातच राहणे त्यांना ‘भूषण’ वाटू लागले. असे करून चालणार नाही. मुक्ताई ज्ञानदेवांना म्हणाल्या, ‘लोक हे असेच वागणार, तरीही आपण लोकांशी फटकून न राहता लोकांतच राहून काम केले पाहिजे, त्यांना सोबत घेऊन गेले पाहिजे.’ ही संतांची मूळ दृष्टी सुधारकांनी पकडली. तीच दृष्टी डॉ. दाभोलकरांमध्ये होती.” या विचाराने प्राध्यापक सदानंद मोरे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, “मी कॉलेज जीवनापासून नरेंद्र काकांसोबत राहिले. 12 ऑगस्ट, 2013 रोजी मी ‘साधना’ विशेषांकाच्या प्रकाशनासाठी मुंबईहून पुण्यात आले होते. काकांच्या प्रत्येक भेटीत, संवादात, पत्रांतून माझ्यावर संस्कार झाले. सिनेमा क्षेत्रातही अशी कितीतरी माणसे आहेत, की त्यांच्या मनात नकारात्मक भावना आहेत. अंधश्रद्धेला ही माणसे बळी पडत असतात. आपण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने, न कंटाळता त्यांना समजावत राहायचे, असे मी ठरवले आहे. त्यासाठी आपल्या मनात आपुलकी, आस्था हवी, तरच आपण हा विचार पुढे नेऊ शकतो. माणसांना बोलते करून त्यांच्या मनातील शंका, भीती दूर केल्या, की ती व्यक्त होतात. मग त्यांना समजावून सांगता येते. पूजादी प्रपंच केल्याने माणसे वाचत नाहीत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करायला हवेत, हे सांगावे लागते. सोनी टीव्हीवर मी ‘क्राईम पेट्रोल’ मालिकेत सहभाग घेतला. त्यातील 50 भाग असे होते, की त्यात अंधश्रद्धेतून झालेले गुन्हे होते. पोलिसही त्यात हतबल होते. समजावून सांगताना मेटाकुटीला यायचे. एका मुलीने भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. तपासाअंती समजले, की तिनेच खून केलेला होता. भावाचा सडलेला सांगाडा तिच्या घरात मिळाला. तिच्यावर अंधश्रद्धेचा पगडा होता. ‘क्राईम पेट्रोल’मधून अशा अंधश्रद्धांबाबत जागृती करता आली, याबद्दल समाधान वाटते. माझी सर्वांना विनंती आहे, आपण आपले विचार पोचवताना मराठीपुरते मर्यादित राहू नये. इतर भाषांमध्येही आपले काम पोचवायला हवे.”

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारी समितीचे सदस्य डॉ.हमीद दाभोलकर म्हणाले, “जादूटोणाविरोधी कायद्याला 9 वर्षे झाली असून या कायद्यांतर्गत एक हजार गुन्हे दाखल झाले. या कायद्यांतर्गत पहिला गुन्हा एका मुस्लिम बाबावर दाखल झाला. सर्वच धर्मांतील बाबा-बुवांविरोधात या कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले. आपण योग्य दिशेने चालत आहोत. आव्हाने अनुभवणारे आपण पहिले नाही. संत तुकारामांचा गाथा बुडविण्यात आला. बसवण्णांना ‘बसवेश्वर’ करण्यात आले. सॉक्रेटीसला विष देण्यात आले. आपण विचारांची बीजे पेरत राहू. कदाचित आपल्या आयुष्यात या झाडांची फळे पाहायला मिळणार नाहीत. ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’ असा निर्धार दाभोलकर प्रत्येक भाषणाच्या शेवटी करत. आपण त्याला उजाळा देऊयात.”

कार्यक्रमाचे अध्यक्ष, अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, “वाचून, शिकून माणसे शहाणी होतातच, असे नाही. सारासार विचार आणि मूलभूत शहाणपण त्यासाठी महत्त्वाचे आहे. लहानपणी आमच्याकडे एक यदू महार येत असे. आईने त्याला चहासाठी फुटका कप दिला. त्यावर वडील म्हणाले, “यदूने स्पर्श केला तर कपाला काय भोकं पडतात का?” हल्ली, आजूबाजूला आव आणणारे लोक अधिक दिसतात. दाभोलकर तसे नव्हते. मी तमिळमध्ये एक ‘भारती’ नावाचा सिनेमा केला. भारती पत्रकार, सामाजिक कार्यकर्तेआणि स्वातंत्र्यसैनिक होते. ‘माझी गाणी बॉम्ब वाटतात की काय?’ असा सवाल ते विचारतात. दाभोलकरांचे विचार तसेच होते. अलिकडची अंधश्रद्धा ही देवा-धर्मापेक्षा श्रीमंतीत दडली आहे. पैशांसाठी लोक खोटं बोलतात, भ्रष्टाचार करतात. गरज नसताना पैसा कमावतात. देऊळ वाढताना दिसत नाही; झाड वाढताना दिसते. देव प्रसाद देत नाही; झाड प्रसाद देते, झोपल्यावरही ऑक्सिजन देते, म्हणून मी वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. आमच्या गावात देवळाशेजारी चिंच होती. देऊळ पडले; चिंच राहिली, म्हणून मी गावात दोन हजार झाडे लावली. देऊळही उभे राहिले. आम्ही आता ‘वृक्षप्रसाद’ योजना सुरू केली आहे. दगडूशेठ गणपती, सिद्धिविनायक, महालक्ष्मी यांच्या माध्यमातून ही योजना राबवणार आहोत. माझा एक नगरसेवक मित्र आहे. ‘दाभोलकरांना देव अमान्य होता. दाभोलकर हिंदूविरोधी होते,’ असे तो म्हणाला. याचा अर्थ आजही पुण्यात असे विचार आहेत. आपल्या आजूबाजूला आहेत. तसे पसरवणारी यंत्रणा आहे. त्यामुळे आपण लोकांना समजावून सांगायला हवे, की दाभोलकर देव, धर्मविरोधी नव्हते.

यावेळी दाभोलकरांच्या 10 भाषणांचा संग्रह असलेले साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘विवेक की आवाज’ या हिंदी पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

उपस्थितांचे स्वागत व सूत्रसंचालन मिलिंद देशमुख आणि आभार नंदिनी जाधव यांनी मानले. मिलिंद जोशी, राजीव देशपांडे, मुक्ता दाभोलकर, अनिश पटवर्धन, डॉ. अरुण बुरांडे, राहुल माने, सौरभ बागडे, मनोहर शेवकरी, श्रीराम नलवडे, अनिल वेल्हाळ, माधव गांधी या कार्यकर्त्यांनी संयोजन केले.

साभार ः टीम ज्ञानबा तुकाराम

dnyanbatukaram.com


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]