डॉ. टी. व्ही. वेंकटेश्वरन -

२० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्याच्या रस्त्यावर प्रसिद्ध विवेकवादी नरेंद्र दाभोलकर यांची झालेली हत्त्या ही देशासाठी एक धोक्याची घंटा होती. मॉर्निंग वॉकला निघाले असताना ओंकारेश्वर पुलाजवळ मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या निर्घृण हत्येची बातमी पसरताच महाराष्ट्रभर उत्स्फूर्त निदर्शने झाली. सातारा येथे अंधश्रद्धेविरोधी चळवळीच्या या अग्रगण्य प्रकाशाला आदरांजली वाहण्यासाठी हजारो लोक घराबाहेर पडले. दुसर्या दिवशी पुकारण्यात आलेला सर्वपक्षीय बंद यशस्वी झाला आणि इच्छुक सहभागींनी त्यांचे व्यवसाय आणि दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवली. पूर्वनियोजित हत्येचे पडसाद राज्यभर उमटले. जनक्षोभाची साक्ष देत, राज्य मंत्रिमंडळाने घाईघाईने महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३ या अंधश्रद्धा विरोधी अध्यादेश जारी केला. अनेक वर्षे विधानसभेत पडून असलेले हे विधेयक मंजूर व्हावे यासाठी दाभोलकर यांनी भरपूर प्रयत्न केले होते.
अंधश्रद्धा विरोधी क्रुसेडर
दाभोलकरांच्या पुरोगामी विचारांमुळे अनेकदा संघर्ष निर्माण झाले असले, तरी त्यांनी नेहमीच तडजोड आणि सलोखा शोधण्याचा प्रयत्न केला. ते नेहमीच शांत चित्ताने आणि तार्किक युक्तिवादाने विरोधकांचे तीव्र आणि अपमानास्पद विधानांचे खंडन करत असत. ते नेहमीच म्हणायचे की, “अज्ञान संपवण्याच्या संघर्षात कोणत्याही शस्त्रांची गरज नाही.” दाभोलकरांना काही हिंदू अतिरेकी गटांकडून जीवे मारण्याच्या अनेक धमक्या आणि द्वेषयुक्त ई-मेल्स येत होत्या. तरीसुद्धा त्यांनी पोलीस संरक्षण घेण्यास नकार दिला. या सौम्य स्वभावाच्या आणि मृदू बोलणार्या व्यक्तीची अशा प्रकारे दिवसाढवळ्या गोळ्या घालून निर्घृण हत्त्या कुणीतरी करतील याची कल्पना कुणीही केली नसेल.
दाभोलकरांच्या हत्येचा संशय असलेल्या सनातन संस्थेने या हत्येतील आपली भूमिका नाकारली असली, तरी संस्थेचे मुखपत्र असलेल्या ‘सनातन प्रभात’मध्ये संस्थेचे प्रमुख जयंत आठवले यांनी ‘दाभोलकरांचा मृत्यू ज्या पद्धतीने झाला, ही देवाची कृपा आहे’ असे लिहिले आहे. प्रदीर्घ आजाराने मरण्यापेक्षा किंवा शस्त्रक्रियेमुळे होणार्या वेदनांनी त्रस्त होण्यापेक्षा हे चांगले झाले.
दाभोलकर ही वैद्यकीय पदवी असलेली बहुआयामी व्यक्ती होती. त्यांच्या शालेय जीवनात ते एक उत्कृष्ट कबड्डीपटू होते. त्यांच्या जिल्हा संघाने केवळ अश्विनीकुमार भोईर गोल्ड कप जिंकला नाही तर त्याने बांगलादेशविरुद्धच्या कबड्डी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. कदाचित, ज्या चिकाटीने त्यांनी जादूटोणाविरोधी विधेयकाचा अनेक वर्षे पाठपुरावा केला होता, तो कबड्डीपटू म्हणून त्यांच्या प्रशिक्षणातून आला असावा. समाजवादी कामगार नेते बाबा आढाव यांच्या ‘एक गाव, एक पाणवठा’ या मोहिमेपासून प्रेरित होऊन दाभोलकर, सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक सुधारणा करण्यासाठी आपला फायदेशीर वैद्यकीय व्यवसाय सोडून, सामाजिक कार्यात उतरले. भारतीय समाजातील विषमतेच्या मुळाशी जातच आहे आणि सांस्कृतिक क्रांतीशिवाय समानता शक्य नाही अशी त्यांची धारणा होती. जातीबाहेर लग्न करण्याचे धाडस केल्यामुळे नाशिकमध्ये तिच्याच वडिलांनी केलेल्या मुलीच्या हत्येच्या संदर्भात जातपंचायतींच्या भूमिकेवरील एका टेलिव्हिजन पॅनेलच्या चर्चेत आपल्या मृत्यूच्या काही दिवस आधी, दाभोलकर यांनी सहभाग घेतला होता.
गेल्या तीस वर्षांत राजकीय फायद्यासाठी धर्माचा व सांप्रदायिक परंपरांचा अमाप वापर, धर्माचे व संस्कृतीचे नाव वापरून अस्पष्ट, मतलबी व अतार्किक प्रथांचा गौरव यांच्यात लक्षणीय प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. यामुळे सार्वजनिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही क्षेत्रांत काही वेळा क्रूर, अवैज्ञानिक कृतींना सैद्धांतिक आधार मिळत आहे. जात, लिंग आणि वांशिक अस्मितांच्या व त्यातून उद्भवणार्या अंधश्रद्धांच्या आधारावरील विषमता अजूनही मोठ्या प्रमाणावर प्रचलित असून दिने दिने वाढत आहे. इलेक्ट्रॉनिक व मुद्रित माध्यमांच्या मक्तेदारीमुळे तर्कहीन, अंधश्रद्धांना उत्तेजन देणार्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनांचा अभाव असलेल्या कार्यक्रमांचे चोवीस तास प्रसारण व त्यातील दृश्यमानता जनमानसाला प्रभावित करत असल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळत आहे.
भारतीय दंडविधान कलम २५९ A चा दुरुपयोग
भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांचा समावेश असलेल्या कलम ५१ A (h) प्रत्येक नागरिकाला ‘वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी आणि सुधारणा यांचा विकास करण्याच’ आवाहन करते. तथापि, हा प्रयत्न केवळ कठीणच नाही तर धोकादायक ठरत आहे. आणि दाभोलकरांच्या बाबतीत तर ती जीवघेणी ठरली. जेव्हा असहिष्णुतेचा अंमल वाढतो, तेव्हा केवळ अंधश्रद्धाच नव्हे, तर खग्रास सूर्यग्रहणासारख्या नैसर्गिक व वैज्ञानिक निरीक्षणासाठी मोठ्या संख्येने लोकांना बाहेर आणणे कठीण होऊन जाते. वाढत्या असहिष्णुतेमुळे सार्वजनिक हितांच्या ध्येय-धोरणांचे गंभीर मूल्यमापन करणेसुद्धा समस्याप्रधान होऊ लागते.
दाभोलकरांची निर्घृण हत्त्या आपल्यासमोर दोन प्रश्न उभे करत आहे. एक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध धार्मिक भावना दुखाविण्याविषयी असलेले निर्बंध वाजवी आहेत का आणि दोन, सांस्कृतिक विविधतेचे रक्षणाची आणि सामाजिक सुधारणा होत असल्याचे दावे कितपत खरे आहेत.
तिरस्कार, सूडबुद्धी व द्वेषयुक्त भाषणामुळे अल्पसंख्याकांची तोंडे बंद होतात आणि ही त्यांची घुसमट लोकशाही व्यवस्थेला मारक ठरू शकते. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही प्रमाणात वाजवी निर्बंध असणे संयुक्तिक ठरते. द्वेषयुक्त भाषणांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो; जातीय हिंसाचार होऊ शकतो; भीतीच्या छायेमुळे अल्पसंख्याकांचे एकत्रीकरण होते आणि त्यांना लोकशाही प्रक्रियेत आत्मविश्वासाने प्रभावीपणे आणि मुक्तपणे सहभागी होण्यापासून रोखले जाते. रवांडा किंवा नाझी जर्मनीमध्ये, द्वेषयुक्त भाषणांमुळेच मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. धर्म, वंश, जात, लिंग इत्यादींच्या भेदामुळे लोकसंख्येचा एक भाग काळाच्या पडद्याआड जाऊ शकतो. आपल्यासारख्या वैविध्यपूर्ण समाजात, केवळ वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धांचा आदर करणे एवढ्यापुरतेच नागरिकत्व सीमित नसून सर्वांच्या भावना आणि प्रथा यांचाही आदर राखला जावा हेही अपेक्षित असते. त्यांना कुरबुरी, अपमान, उपहास, निंदानालस्ती आणि द्वेषापासून संरक्षण देणे अगत्याचे ठरते. मात्र द्वेषयुक्त भाषण आणि धार्मिक चिकित्सा यांच्यामधील सीमारेषा पुसट असल्यामुळे त्या विवादास्पद ठरत आहेत.
भारतीय दंड विधानामध्ये द्वेषयुक्त भाषणासंबंधीच्या कायद्याप्रमाणेच अजून एक विवादास्पद कलम २९५ A आहे. ब्रिटिशांच्या काळात लॉर्ड मेकॉले यांनी प्रतिज्ञा केली होती की, “मी मुस्लीम नाही; परंतु जर मी भारतात न्यायाधीश असतो, तर मशिदीला दूषित करणार्या ख्रिश्चन व्यक्तीला शिक्षा करण्याबाबत मला कोणताही आक्षेप नसावा.” भारतीय दंड विधानामध्ये कलम २९५ घालण्यात आला व त्यातील कलमाप्रमाणे कोणत्याही प्रार्थनास्थळाची नासधूस, नुकसान किंवा अपवित्र करणार्या कृत्यांना गुन्हा ठरवावे असे नमूद करण्यात आले. परंतु या कलमांतर्गत ‘कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये’ यांना बेकायदेशीर ठरवणारी तरतूद वादाचा मुद्दा बनली आहे. सामाजिक आणि सांप्रदायिक सौहार्दाचे रक्षण करण्यासाठी असलेल्या या कलम २९५ अ चा गैरवापर आणि मनमानी लादण्याचा इतिहास आहे. जर एखाद्याला भीती किंवा धमकीशिवाय वादग्रस्त विचार धैर्याने व्यक्त करता येत नसतील तर लोकशाहीच्या भरभराटीची अपेक्षा आपण कशी काय करू शकतो? सर्वोच्च न्यायालयाने अजाणतेपणे किंवा निष्काळजीपणे धर्माबद्दल केलेली टीका व जाणीवपूर्वक किंवा दुर्भावनापूर्ण हेतूने केलेल्या धर्माचा अपमान यांच्यात फरक केला. तरीही इतिहास हा अंधश्रद्धा आणि तथाकथित धर्मगुरुंच्या विरोधात लढणार्यांना शिवीगाळ व छळवणुकीच्या घटनांनी भरलेला आहे.
भा.दं.वि. कलम २९५ (A) चा दुरुपयोग केलेल्याची उदाहरणे
उदाहरणार्थ सनत इदमारुकूचेच प्रकरण घेता येईल. एका दशकाहून अधिक काळ आपल्या संघटनेतील सहकार्यांसह मानवतावादाचा प्रचार ते करत आहेत. त्यांच्या नावीन्यपूर्ण ‘रॅशनॅलिस्ट रिअॅलिटी थिएटर’ गटाचे सदस्य देवमाणसांच्या वेषात गावांना भेटी देतात. ते श्रोत्यांसमोर ‘चमत्कार’ करतात. जमलेल्या प्रेक्षकांना वाटते की ते खरोखरच पवित्र-पुरुषांनी केलेले चमत्कार पाहात आहेत. मग अचानक कार्यकर्ते या तथाकथित चमत्कारामागील वैज्ञानिक आधार उघड करतात. अशा उपक्रमांचा हेतू समाजात वैज्ञानिक वृत्ती जागृत करणे हा आहे.
इदमारुकू आणि त्यांच्या सहकार्यांनी मुंबईतील विलेपार्ले येथील कॅथॉलिक चर्च ऑफ अवर लेडी येथील येशू ख्रिस्ताच्या पुतळ्यातून पाणी टपकण्याच्या कथित चमत्काराची चौकशी केली. केशिका क्रियेने पुतळ्यापर्यंत पाणी वाहून जाणारे एक गळती पाईप हे कारण असल्याचे प्रस्थापित केल्यानंतर, सनत इदमारुकू या तथाकथित चमत्काराला खोडून काढण्यासाठी प्राईम टाइम मुंबई टीव्हीवर दिसले. दुसर्या दिवशी, त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये आयपीसीच्या कलम २९५ (अ) नुसार सतरा तक्रारी दाखल करण्यात आल्या; अटकपूर्व जामीन नाकारण्यात आले. चौकशीपूर्व कारावासाच्या भीतीने सनलने युरोपमध्ये आश्रय घेतला. गेली कित्येक वर्षे ते कोर्टरूमला भेटी देण्यात वेळ खर्ची घालत आहेत.
शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरातील तथाकथित चमत्कारी दिव्य ज्योत ही मानवनिर्मित आहे हे विधान करणार्या शिक्षकाच्या विरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्या तक्रारीवरून शिक्षकाच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आली. परंतु कर्नाटक उच्च न्यायालयाने हे प्रकरण केवळ रद्दच केले नाही तर गृहसचिवांना न्यायालयात बोलावून संपूर्ण यंत्रणेला दोषी ठरवले.
शबरीमला मंदिराच्या गर्भगृहात मासिक पाळीच्या १२ ते ६० वर्षांच्या वयोगटातील महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे. परंतु कन्नड चित्रपट अभिनेत्री जयमाला हिने मंदिराला भेट दिल्याबद्दल याच तरतुदीचा वापर करून त्यांचा छळ करण्यात आला.
तमिळनाडू सायन्स फोरम या विज्ञान प्रसाराचे काम करणार्या संस्थेला सूर्यग्रहण सार्वजनिकपणे पाहण्याचा आणि ग्रहणाच्या वेळी अन्न शिजवून खाण्याचा उपक्रम करायचा होता, तेव्हा पोलिसांनी त्यांना अनिच्छेने व काही अटींसह परवानगी दिली.
गोमूत्र हे इतर प्राण्यांच्या मूत्रासारखेच आहे आणि त्यात पवित्र असे काहीही नाही, असा युक्तिवाद करणार्या डॉ. नरेंद्र नायक यांच्यावरही कलम २९५A अनुसार गुन्हा नोंदविला होता. परंतु ते थोडक्यात बचावले.
हनुमान जयंतीच्या शुभेच्छांना देव नाही अशी टिप्पणी केल्याबद्दल एका तरुणावर गुन्हा भरला होता. कलम २५९ A लागू करणार्या धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून त्याला पोलीस कोठडीत टाकले गेले.
आजकाल कोणीही कशाच्याही विरोधात आपल्या भावना दुखावल्या गेल्या असे म्हणत गुन्हा दाखल करण्यास दडपण आणू शकतो. परंतु अशा प्रकारे भावना कुरवळणे सामाजिक हिताचे ठरणार नाही. उदारमतवादी पुरोगामी करत असलेली सकारात्मक टीका मानवी हकांचे उल्लंघन करणार्या धर्मातील कुप्रथांना उघड करण्यात मदत करते. सती किंवा हुंडा यांसारख्या वाईट प्रथांच्या विरोधात समाजसुधारकांनी या प्रथांचे रक्षण करणार्या गटांच्या विरोधाला तोंड देत कठोरपणे निषेध केला. त्यानंतर, या पद्धतींना प्रतिबंध करणारे कायदे स्वीकारले गेले. जर आपण टीका करण्यास घाबरत असल्यास वा धार्मिक आणि सांस्कृतिक प्रथांचा निषेध करत नसल्यास कोणतीही सामाजिक सुधारणा शक्य झाली नसती. धर्मस्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे धर्मपालन करत असतानाच दुसर्यांनी केलेल्या आक्षेपार्ह किंवा असहमत विचारांना सहिष्णुता दाखवणे. कुप्रथांच्या समर्थनार्थ होत असलेला वितंडवाद एकीकडे अभिव्यती स्वातंत्र्यावर व दुसरीकडे सामाजिक सुधारणांवर आघात करू शकते. त्यामुळे रास्त टीकेबद्दल नाराज होण्याचे कारण नाही.
वास्तवात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील ‘वाजवी निर्बंध’ योग्य पद्धतीने लागू केले जात नसल्यामुळे, भाषण आणि विचार स्वातंत्र्याचे गळचेपी करणारे वातावरण तयार झाले आहे. कलम २९५ A चा वारंवार होत असलेल्या दुरुपयोगामुळे सार्वजनिक वातावरण अधिकाधिक कलुषित होत चालले आहे, हे उघड आहे. खरे पाहता पुरोगामी करत असलेल्या धार्मिक व्यवहारातील कुप्रथांचा तीव्र निषेध हा देखील मानवतावादाने प्रेरित केलेली कृती असून तीच सामाजिक सुधारणांना प्रेरणा देणारी ठरू शकेल व कुप्रथांच्या ओझ्याखाली दबलेल्यांच्या मूक वेदनांना आवाज देईल. द्वेषयुक्त भाषणाचा मूळ हेतू सुधारणेचाही नाही वा मानवतावादाचाही नाही. लोकशाही सक्षम करण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लोकशाहीच्या इतर गरजेबरोबर संतुलन साधण्याची आवश्यकता आहे.
कदाचित द्वेषयुक्त भाषणासंबंधी कॅनडा, दक्षिण आफ्रिका व युरोपियन युनियन इत्यादी देशांनी लागू केलेल्या कायद्याचे प्रारूप वापरून भादंवि २९५ कलमाची पुनर्रचना करण्याची गरज भासत आहे. हा पुनर्रचित नियम सर्व बाजूने संतुलन राखत धर्मचिकित्सेला वाव देईल व धार्मिक, सांस्कृतिक व लैंगिकदृष्ट्या अल्पसंख्याक असलेल्यांच्या हिताचे व त्यांच्यावर सातत्याने होत असलेल्या द्वेषयुक्त निंदानालस्तीच्या भडिमारापासून रक्षण करू शकेल.
बहुसंख्याकांच्या संस्कृती(?)चे वाढते दडपण
संस्कृतीतील विविधतेची ढाल वापरून आपल्याच संस्कृतीचे घोडे दामटविण्याचे प्रयत्न बहुसंख्याक करू लागतात. संविधानातील धर्मनिरपेक्षतेला, वैज्ञानिक दृष्टिकोनाला तिलांजली देत सरकारी कार्यालयात धार्मिक समारंभ, धार्मिक चिन्हांचा वारेमाप वापर आणि त्यांचे सार्वजनिक प्रदर्शन बिनदिकतपणे केले जात असताना त्याकडे डोळेझाक केली जाते. वैज्ञानिक परिषदांच्या उद्घाटनादरम्यान धार्मिक पूजा, समारंभ केले जातात. संस्कृतीच्या नावाखाली रॉकेट उड्डाणापूर्वी तिरुपतीच्या मंदिरात जाऊन आशीर्वादाची याचना केली जाते.
सांस्कृतिक विविधतेचे गुणगान गात असताना एकट्या दुकट्याचे नव्हे, तर सर्व समुदायांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांना समान स्थान देणे आवश्यक ठरते. सरकारी कार्यालयात बहुसंख्याकांच्या संस्कृतीचे प्रदर्शन होत असताना अल्पसंख्याकांच्या गंडे, दोरे, तावीज इत्यादींना नाक मुरडण्यात हशील नाही. सनातन हिंदू परंपरांचे अभिमान बाळगताना इतर धर्मातील प्रथांना अंधश्रद्धा म्हणून हिणवण्याला अर्थ नाही. वंचित, पददलित, विस्थापित यांच्या श्रद्धा बहुसंख्यांकांना अंधश्रद्धा वाटतात. हा दुटप्पीपणा योग्य नसून सर्व समुदायातील कुप्रथांच्या विरोधात लढा देणे आवश्यक ठरते.
त्यामुळेच समाजातील अंधश्रद्धांच्या विरोधात लढलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांची निर्घृण हत्त्या ही समाजातील श्रद्धा व रूढी-प्रथांवर टीका करणार्यांच्या प्रति दाखविलेली असहिष्णुता असेच म्हणावे लागेल. धार्मिक भावनांना दुखविण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये याविषयीच्या भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ A चा सर्रासपणे होत असलेला गैरवापर थांबविण्याची गरज आहे. जोपर्यंत रचनात्मक आणि तर्कसंगत टीकेसाठी अवकाश उपलब्ध केला जात नाही तोपर्यंत प्रतिगामी आणि वाईट रूढी-प्रथांवर शिकामोर्तब होतच राहील व कुठल्याही सामाजिक सुधारणा होणार नाहीत.
(डॉ. टी. व्ही. वेंकटेश्वरन दिल्ली येथील भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातील विज्ञान प्रसार या शाखेशी निगडित आहेत.)
– डॉ. टी. व्ही. वेंकटेश्वरन
स्वैर व संक्षिप्त अनुवाद : प्रभाकर नानावटी
संदर्भ : https://www.epw.in/journal/2013/36/web-exclusives/dilemmas-and-challenges-faced-rationalist-indian.html