अॅड. देविदास वडगावकर -
– अॅड. देविदास वडगावकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात समता येण्यासाठी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहाचा पुरस्कार केला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक जानेवारी हा आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांचे स्वागत समारंभ करण्याचा दिवस साजरा करते.
समाजात अशी रूढ कल्पना आहे की, आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह सामान्यपणे टिकत नाहीत. या विवाहांचा विवाह छेद, घटस्फोट लवकरच होतो. हे पूर्णपणे खरे किंवा पूर्णपणे खोटे नाही. पूर्णपणे खोटे यासाठी नाही की, जे आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह टिकले नाहीत. अगदी कूळ, पत्रिका, नक्षत्र, गुण पाहून विवाह झाले तरी त्यांचा घटस्फोट होऊ शकतो. म्हणजे यापैकी कोणत्याही गोष्टीचा घटस्फोटाशी संबंध नाही. पण हेतूपूर्वक आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहित त्यांचा घटस्फोट झाला की त्याची उदाहरणे समोर केली जातात. पण आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह टिकलेले आहेत. नव्हे, ३०-३५ वर्षे ज्यांच्या विवाहाला झालेली आहेत अशा विवाहित जोडप्यांचा, आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांशी हिनाकौसर खान यांनी संवादक म्हणून संवाद साधून त्यांच्या विवाहाची प्रक्रिया, विवाहानंतर त्यांच्यासमोर निर्माण झालेले प्रश्न, सद्य:स्थिती यावर त्यांना बोलते केले आहे व या संवादाच्या आधारे त्यांनी ‘धर्मरेषा ओलांडताना’ हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. ते साधना प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले आहे ज्यांची आंतरधर्मीय विवाह यशस्वी झाली आहेत. त्यांच्या कथा थोडक्यात या पुस्तकात आहेत. या पुस्तकाचा आढावा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्मृतिदिन लक्षात घेऊन करणे मला उचित वाटते.
संवादक हिनाकौसर खान यांनी एकूण आंतरधर्मीय विवाह केलेला पंधरा जोडप्यांच्या जोडप्यांशी संवाद साधून, त्याची एक मालिका ‘साप्ताहिक साधना’मध्ये प्रसिद्ध केली होती. त्या मालिकेचे पुढे पुस्तक म्हणून आलेले हे पुस्तक होय. सामान्यपणे जे धर्म महाराष्ट्रात आढळतात त्यात मुस्लीम, हिंदू, ख्रिश्चन, शीख व बौद्ध या धर्मियांचीच आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांशी संवाद साधण्यात आलेला आहे. ही सर्व जोडपी, वैवाहिक जीवनात यशस्वी झालेली आहेत. त्यांच्या लग्नाला कुटुंबाने विरोध केला, बर्याच कुटुंबाच्या बाबतीत तो नंतर मावळला. काही कुटुंबांच्या बाबतीत तो आजही अस्तित्वात आहे. पण ती संख्या खूपच नगण्य आहे. सर्वच विवाहितांनी विशेष विवाह नोंदणी कायद्यांतर्गत विवाह केले आहेत. त्यामुळे या कायद्यांंतर्गत विवाह करणार्यांची संख्या ही केवळ आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाहच होतात ही गोष्ट एकदा अधोरेखित झालेली आहे. वास्तविक, हा कायदा तसे सांगत नाही. कोणत्याही विवाहित इच्छुक जोडप्यांना या कायद्यांतर्गत नोंदणी विवाह करता येतो. पण आजपर्यंत या कायद्याचा वापर अशा विशेष विवाहासाठी झालेला आहे. पण त्यातील गैरसमज समजून घेणे महत्त्वाचे आहे. आंतरधर्मीय विवाहित जोडपी ही कुठल्यातरी पुरोगामी विचाराशी संबंधित आहेत. त्यांना तो विचार पटल्यानंतरच त्यांनी विवाह केलेला आहे. बहुसंख्य विवाह प्रेमविवाह आहेत, पण काही एक-दोन जोडपी असे आहेत की, त्यांनी ठरवून अांतरधर्मीय विवाह केलेला आहे. ही गोष्ट जवळपास अशक्य असताना त्यांनी ते घडवून आणलेली आहे. चळवळीच्या विविध आघाड्यांवर काम करताना एकमेकांची ओळख, त्यातून प्रेम आणि चळवळीचा समता प्रस्थापित करण्याचा विचार प्रत्यक्षात करण्याची संधी घेणे असेच अनेक जोडप्यांच्या बाबतीत घडलेले दिसते. ज्या जोडप्यांना घरून विरोध झाला त्यांना चळवळीतील त्यांचे सहकारी यांनी मोठी मदत केली. त्यांचे लग्न घडवून आणले. त्यांचे प्रपंच सुरळीतपणे चालतील, असा काही दिवसांपर्यंतचा संपर्कही ठेवला, ही गोष्ट विलक्षण आहे. आंतरधर्मीय विवाह ही गोष्ट डाव्या आणि पुरोगामी चळवळीत शक्य आहे. उजव्या चळवळीवर धर्माचा पगडा असल्यामुळे त्यातून कोणाचेही उदाहरण समोर येऊ शकत नाही. क्वचित प्रसंगी उजव्या चळवळीत काही लोकांनी आंतरजातीय विवाह केल्याचे समोर येते. पण तेथेसुद्धा उभयता एकाच धर्मातील असल्यामुळे, त्यातील जाती गळून पडणे शक्य आहे. अर्थात, काही प्रमाणात त्याही विवाहाला विरोध झालाच असणार. पण सरसकट विरोध सुरुवातीला होतो आणि नंतर तो मावळतो. असे चित्र आहे. याचा अर्थ असा की, माणूस धर्म आणि जातीच्या मर्यादा या प्रेमाच्या पलीकडे सांभाळू शकत नाही. प्रेम ही अत्यंत निर्मळ गोष्ट आहे. ती धर्माच्या पलीकडे असल्याचे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहितांच्या बाबतीत सुद्धा निदर्शनास आलेले आहे. ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे.
अनेक उदाहरणे अशीही घडलेली असतात की, त्यात ‘ऑनर किलिंग’चा प्रकार घडलेला असतो. म्हणजे त्या मुलीने किंवा त्या मुलांनी आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह केला म्हणून त्यांच्याच कुटुंबीयांकडून किंवा अन्य समाजातील लोकांकडून त्यांचा खून केलेला असतो, असे आपल्याला आढळून येते. पण हे सरसकटपणे घडते असे निदर्शनास येत नाही. या विवाहांना विरोध होतो, पण कालांतराने तो मावळतो. कारण प्रेमसंबंध ठेवणे आवश्यक असते. कुटुंबातील नातेसंबंध ठेवणे प्रत्येकाला गरजेचे असते ही गोष्ट ‘जगाला प्रेम अर्पावे’ याचा प्रत्यय देणारी आहे. आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर जोडप्यांना अपत्य प्राप्ती झाली. त्यांनी अपत्यांची नावे अशी ठेवली की ती, कोणत्याही धर्माच्या चौकटीत नाहीत. ही गोष्ट विलक्षण आहे. याशिवाय इतर धर्मीय असलेल्या आपल्या जोडीदाराला तिचे धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य पूर्णपणे बहाल केलेले आहे. केवळ धर्माचारांच्या कारणावरून या जोडप्यात विसंवाद निर्माण झालेला नाही. एवढा विशाल दृष्टिकोन दोघांनी ठेवलेला आहे. त्याचा अर्थ असा धर्मही संकल्पना प्रेमाच्या संकल्पनेच्या अलीकडची आहे. प्रेम, आत्यंतिक प्रेम आणि एकमेकांच्या मतांचा आदर करणे हा लोकशाहीचा विचार जर जोपासला तर आंतरधर्मीय विवाह करून सुद्धा धर्माच्या कारणावरून विवाहछेद होऊ शकत नाही. उभयतांमध्ये वादविवाद होऊ शकत नाहीत. काही धर्म संकल्पना अशा आहेत, ज्या दोन्हीही धर्मात पाळल्या जाऊ शकतात. त्यांचा या जोडप्यांनी आपल्या जीवनात अंमल केलेला आहे. दिवाळी सारखा हिंदू धर्माचा सण सर्व सर्वधर्मीय आज साजरा करतात. याशिवाय प्रत्येक धर्मियांनी आपापल्या जोडीदाराचा धर्म त्याला त्या निमित्ताने येणारे सण, वार पाळलेले आहेत. हा मनाचा मोठेपणा दाखवल्यामुळे त्यांचे आपापसातील संबंध दृढ राहिलेले आहेत. हा मोकळेपणा अर्थातच ‘धर्मनिरपेक्षता’ ही संकल्पना समजून घेतल्याने, लोकशाही संकल्पना प्रत्यक्षात आणल्यामुळे आणि विचारांना मोकळीक देण्याचा विचार प्रत्यक्ष आणल्यामुळे होऊ शकली. ही गोष्ट महत्त्वाची आहे, असा मोकळेपणा समाजात यायला हवा. तो येईल तरच आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह हे जातिअंताच्या संकल्पनेचा एक महत्त्वाचा टप्पा असू शकतील, असे या पुस्तकाचे थोडक्यात निरीक्षण मांडता येईल. या पुस्तकाचे मुखपृष्ठ रविकांत रोहितकर यांनी केलेले असून त्यात त्यांनी विजेच्या खांबावर पक्षी बहुतांशी कावळेच बसलेले असे दाखवलेले आहे. विजेच्या खांबाच्या भोवती ताराचे जाळे विणलेले आहे. बहुधा यातून धर्म संकल्पनांचे जाळे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. पण सगळेच पक्षी समांतर तारेवर असले, तरी ते एकाच समांतर तारेवर विसावलेली दिसतात हे महत्त्वाचं आहे. साधना प्रकाशनच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून त्याची किंमत तीनशे रुपये आहे. या पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना हिनाकौसर खान यांनी आपल्या एकूण त्यांना अशा जोडप्यांशी संवाद साधताना आलेली निरीक्षणे मांडलेली आहेत, ती सुमारे १८ पानांची आहेत. पण ती मुळातून वाचण्यासारखी आहेत. म्हणजे पुस्तकाच्या विचाराची बैठक निर्माण होते. त्यातून मग माणूस पुस्तक वाचण्यास उद्युत होतो. एकूण काय, हे पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह ही समता आणण्यासाठीच्या टप्प्याची महत्त्वाची गोष्ट असल्याचे विचार समजून घेण्याचा एक प्रत्यक्षात आलेला अनुभव आहे, असे माझे मत आहे. काही ठिकाणी मुद्रणातल्या चुका आहेत.
या पुस्तकात आलेल्या जोडप्यांनी आपापल्या मुलांच्या, मुलींच्या नावांची केलेली निवड ही धर्म संकल्पनेच्या पलीकडे आहेत. शिवाय भिन्न धर्मांची जोडपी आपापल्या धर्मानुसार आचरण करत असतात. त्यांना तशी मोकळी दिलेली आहे. ही महत्त्वाची धर्मनिरपेक्ष विचारधारा सोपी पद्धतीने समजून घेण्यास आवश्यक ठरणारी बाब आहे, असे मला वाटते. ‘धर्मनिरपेक्षता’ समजून घेण्यासाठी मोठ्या शब्दजंजाळ, शब्द व्यवहारात पडण्यापेक्षा असा व्यावहारिक अर्थ समजून घेणे अधिक सोयीचे आहे. या अर्थाने हे पुस्तक खूपच उपयुक्त आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्या विचारांचा पुरस्कार करते त्या विचाराचा प्रतिवाद करण्यासाठी या पुस्तकाचा कार्यकर्त्यांना निश्चित उपयोग होईल.
पुस्तकाचे नाव : धर्मरेषा ओलांडताना, आंतरधर्मीय विवाहितांच्या मुलाखती
संवादक : हिनाकौसर खान
प्रकाशक : साधना प्रकाशन, पुणे
किंमत : ३०० रुपये