छद्मविज्ञानाविरोधात संघर्ष करणारी बंगालची ब्रेक थ्रू सायन्स सोसायटी

-

Science for Society, Science for Man, Science in Thinking. अशी घोषणा करून १९९५ साली पश्चिम बंगालमध्ये ब्रेक थू सायन्स सोसायटीची स्थापना बंगालमधील काही शास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रेमी नागरिक यांनी एकत्र येऊन केली. ऑक्टोबर २००४ पासून ती भारतभरातील अनेक राज्यांमध्ये कार्यरत आहे. ही माहिती आम्हाला ब्रेक थ्रू सोसायटीचे पश्चिम बंगालचे कार्याध्यक्ष प्राचार्य निलेश मैती आणि सोसायटीचे पूर्ण वेळ कार्यकर्ते चंदन संत्रा जे पश्चिम बंगालचे उपाध्यक्ष हे दोघेजण देत होते.

मी आणि राहुल कोलकातामधील क्रीक लेन हे ठिकाण शोधत शोधत ब्रेक थ्रू सायन्स सोसायटीच्या मुख्य कार्यालयात पोहोचलो. दोन लहान खोल्यांचे कार्यालय होते. एक खोली पुस्तके आणि मासिकासाठी होती. तर दुसरी खोली टेबल, खुर्ची ठेवून ऑफिस कामासाठी होती. निवांत बसून मैती सर आणि चंदन सोबत चर्चा सुरू झाली. प्रोफेसर मैती हे टिपिकल बंगाली, अतिशय शांतपणे माहिती देणारे, अंतर्मुख, सद्गृहस्थ वाटले आणि चंदन संत्रा हे पूर्ण वेळ कार्यकर्ता असलेने भारतभर फिरून आल्यामुळे हिंदीसह त्यांना दोन-चार भाषा व्यवस्थित येत होत्या आणि ते बरेच बहिर्मुखी होते. संघटनेची रचना आणि उपक्रमांबाबत आम्ही विचारले असता, चंदन संत्रा यांनी माहिती दिली की, अध्यक्ष, सरचिटणीस, जनरल सेक्रेटरी ही सर्वोच्च पदे. नंतर वेगवेगळे तालुके, जिल्हे आणि राज्ये यांच्या समित्या अशी साधारण इतर कोणत्याही संघटने सारखीच त्यांची रचना आहे.

ब्रेक थ्रू सायन्स सोसायटीच्या उपक्रमाबाबत तपशीलवार माहिती देताना चंदन संत्रा म्हणाले, “सोसायटीच्या वतीने अनेक उपक्रम आम्ही चालवतो. जसे खगोलशास्त्राचे लोकप्रियीकरण आणि ज्योतिषशास्त्रावरील अंधविश्वासाच्या विरोधात आम्ही १९९५, १९९९ आणि २००९ च्या संपूर्ण सूर्यग्रहण, धूमकेतू हेल-ई १९९७ च्या आगमनानिमित्त मोठ्या प्रमाणात जाहीर कार्यक्रम आयोजित केले होते. लिओनिड मेटियर शॉवर १९९८, व्हीनसचे संक्रमण २००४. २०१२. इ. शालेय स्तरावर प्रयोगांद्वारे व्यापक विज्ञान शिक्षण, अँटी-सुपरस्टिशन मोहिमा, महान शास्त्रज्ञांचे जीवन आणि संघर्ष याबाबतची माहिती देणे, भूकंप, अतिवृष्टी, चक्रीवादळ, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींनी बाधित झालेल्या लोकांसाठी आम्ही मदत पुरवतो, वैज्ञानिक शेतीबद्दल आम्ही प्रबोधन करतो.”

ब्रेक थ्रू सायन्स सोसायटीची काय उद्दिष्टे आहेत असे विचारल्यानंतर राज्य कार्याध्यक्ष प्राचार्य निलेश मैती सर म्हणाले की, सोसायटीची पुढील काही महत्त्वपूर्ण उद्दिष्टे आहेत त्यामध्ये…

१. समाजात वैज्ञानिक संस्कृती प्रस्थापित करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मनाची तार्किक क्षमता जोपासणे आणि प्रोत्साहन देणे.

२. विज्ञानाचे विविध शोध आणि फायदे प्रसारित करणे आणि लोकप्रिय करणे.

३. अवैज्ञानिक कल्पना, अंधश्रद्धा, कट्टरता, सांप्रदायिकता, अस्पृश्यता, जातीयवाद आणि इतर रुढीवादाविरुद्ध चेतना वाढवणे

४. इतिहास आणि विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास जोपासणे

५. वैज्ञानिक प्रयत्नांच्या सर्व क्षेत्रांमध्ये नैतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी विकसित करणे.

६. अध्यापन आणि शिकण्याची योग्य पद्धत तयार करून वैज्ञानिक शिक्षण प्रणालीबाबत काम करणे.

७. समाजाचे नुकसान आणि मानवतेचा नाश होईल अशा विज्ञानाच्या विनाशकारी वापराविरुद्ध लढा देणे.

८. धर्मनिरपेक्ष, वैज्ञानिक आणि लोकशाही शिक्षण धोरणासाठी मोहिमा आणि चळवळ चालवणे.

९. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात योग्य आणि लोकसमर्थक सरकारी धोरण राबवण्यासाठी जनमत तयार करणे.

१०. नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि सामाजिकीकरणासाठी चळवळी उभारणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे.

११. नैसर्गिक आपत्तीवेळी लोकांच्या पाठीशी उभे राहणे आणि दिलासा देणे.

ब्रेक थू सायन्स सोसायटीचे काम कसे चालते? या आमच्या प्रश्नाला उत्तर देताना चंदन संत्रा म्हणाले की, आम्ही शाळा-कॉलेजमध्ये जाऊन मुलांना प्रयोगाद्वारे विज्ञान शिकवतो आणि प्रयोगशाळेतील विज्ञान हे समाजाच्या मोठ्या पटलावर आणतो. विज्ञानाचा खरा वापर कसा असू शकतो, हे आमच्या एका अतिशय महत्त्वपूर्ण आणि जिवावर उदार होऊन केलेल्या एका कॅम्पेनची माहिती दिल्यानंतर तुम्हाला कळू शकेल असे म्हणून चंदन संत्रा यांनी आम्हाला ब्रेक थ्रू सायन्स सोसायटीने चालवलेल्या ‘आरोग्य आणि स्वच्छतेची चळवळ’ या बद्दलची माहिती दिली. १९८० पासून पश्चिम बंगालमधल्या जवळपास १९ जिल्ह्यांमध्ये लोक गंभीर आजारी पडत. त्याचे कारण होते. जमिनीखालचे पाणी आर्सेनिक नावाचा रासायनिक घटक मिसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात दूषित होत होते. आर्सेनिकमुळे दूषित झालेले पाणी प्याल्यामुळे त्वचा, यकृत, फुप्फुस, हृदय अशा अनेक अवयवांवर गंभीर परिणाम होते. सरकारी पातळीवर याबाबतीत लपवाछपवी चालू होती. अशा आपत्ती काळामध्ये विज्ञान लोकांच्या मदतीला येणार नाही तर कोण येणार? ब्रेक थ्रू सायन्स सोसायटीच्या वतीने १९९५ ते २००५ या काळामध्ये आठ जिल्ह्यातील जवळपास ७० हजार पाण्याचे सॅम्पल टेस्ट करण्यात आले. या चाचणीमध्ये आर्सेनिकची मात्रा ही निर्धारित मात्रे पेक्षा कितीतरी जास्त होती. सरकारी पाणी तपासणीचा दर हा ३०० रुपये होता तर ब्रेक थू सायन्स सोसायटीचा दर हा केवळ २० रुपये होता. त्यांची स्वतःची सुसज्ज टेस्टिंग वाहने होते आणि वैज्ञानिक कार्यकर्ते या वाहनावर ‘बुडते हे जग, देखवेना या डोळा, म्हणोनि येतो कळवळा’ या कळवळ्याने राबत होते. परंतु सरकारी गुंडांकडून अनेक ठिकाणी त्यांच्या गाडीवर हल्ले झाले. काही ठिकाणी या वैज्ञानिकांना, कार्यकर्त्यांना मारहाण झाली. परंतु विज्ञानाची समाजोपयोगी भूमिका अशा तर्‍हेने आम्ही सिद्ध करून दाखवलेली आहे.

प्रकाशन आणि वार्तापत्र विभागाबद्दल विचारले असता, प्राचार्य निलेश मैती सरांनी सांगितले की, नियमितपणे आमचे ‘ब्रेक थ्रू – अ जर्नल ऑन सायन्स अँड सोसायटी’ हे इंग्रजी त्रैमासिक प्रकाशित केले जाते. ‘विज्ञान, संस्कृती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी कटिबद्ध’ असे ध्येयवाक्य असणारे त्रैमासिक जनमानसात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारं आहे. तसेच आम्ही लहान लहान पुस्तिकांच्या माध्यमातून चालू विषयावर माहिती पोहोचवण्याचे काम करतो. अत्यंत कमी दरामध्ये परंतु त्या त्या विषयातील तज्ज्ञांनी लिहिलेल्या या पुस्तिका समाजासाठी खूपच उपयुक्त आणि रेफरन्स बुक ठरत आहेत.

आपली संघटना विज्ञानाचा प्रचार-प्रसार करणारी संघटना आहे, त्यामुळे आपण छद्म विज्ञानाचा मुकाबला कशा प्रकारे करता? या प्रश्नावर प्रोफेसर निलेश मैती यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, ‘एनसीइआरटी’ने उत्क्रांतीचा सिद्धांत अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचे ठरवल्यानंतर आम्ही थेट कलकत्त्याच्या एनसीईआरटीच्या प्रादेशिक कार्यालयावर मोर्चा नेऊन निषेध नोंदवला. तसेच स्थानिक वृत्तपत्रांतून, आमच्या मासिकांतून याबाबतीत लेख लिहून याबाबतची जनजागृती केली. नियमितपणे होणार्‍या आमच्या राज्य अधिवेशनामध्ये संघटनात्मक बाबी सोबतच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२३ मधील अवैज्ञानिक बाबी, मिथके आणि ग्लोबल वॉर्मिंगबद्दलदेखील चर्चा करण्यात येते.

सध्याच्या काळात विज्ञानाचे अज्ञान हा काही मोठा प्रश्न नाही. परंतु विज्ञानाचा गैरवापर, ज्याला छदम विज्ञान असे आपण म्हणू. त्यामुळे मोठे प्रश्न निर्माण होत आहेत. म्हणून या विरोधामध्ये ब्रेक थू सायन्स सोसायटीने खूप आग्रही भूमिका घेतलेल्या आहेत. आमच्या ब्रेक थ्रू सायन्स जर्नलच्या आणि पुस्तकांच्या माध्यमातून आम्ही या संदर्भातली चर्चा घडवून आणलेल्या आहे. छद्मविज्ञानाविरोधात आम्ही आमच्या मासिकातून नेहमी प्रहार करत असतो. तसेच आम्ही आमच्या प्रकाशन विभागाच्या वतीने छद्मविज्ञानावर दोन पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. त्यामध्ये पहिले पुस्तक ‘खरोखरच जगाचा अंत जवळ आलेला आहे का?’ आणि दुसरे पुस्तक ‘प्राचीन भारतातील विज्ञान : वास्तव विरुद्ध मिथक.’

पहिल्या पुस्तकात ज्योतिषांकडून होणार्‍या जगाच्या अंताची जी विविध भाकिते केली जात आहेत. ती विज्ञानाच्या आधारे कशी असत्य आहेत. हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे या पुस्तकात माया सभ्यता आणि त्याच्या कॅलेंडरवर, त्या दिवशी काय होऊ शकते? लघुग्रहांच्या टक्करचा सिद्धांत, निबिरू किंवा प्लॅनेट-एक्स सिद्धांत, चुंबकीय क्षेत्र उलटेचा सिद्धांत, पृथ्वीच्या रोटेशनल अक्षात शिफ्ट, सुपर-भूकंप आणि सुपर-ज्वालामुखी सिद्धांत, सूर्यामध्ये ध्रुव उलटणे आणि सौर भडकणे सिद्धांत., ‘२०१२’ चित्रपटात वापरलेला सिद्धांत, गॅलेक्टिक विषुववृत्त सिद्धांत, ‘जगाचा अंत’ सिद्धांत पुन्हा पुन्हा का दिसून येतो? यावर शास्त्रीय लिखाण केले आहे.

प्रोफेसर मैती पुढे सांगू लागले की, २०१४ नंतर भारतीय समाज मनाची जास्त पकड घेत असणारा विषय म्हणजे ‘प्राचीन भारतातील विज्ञान’ हा आहे. यावर आमच्या सोसायटीने ‘भारतातील विज्ञान : वास्तव विरुद्ध मिथक’ या नावाचे एक अभ्यासपूर्ण पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकामध्ये आम्ही खालील बाबींची चर्चा केली आहे. इतिहास समजून घेण्याची काही वैज्ञानिक पद्धत आहे का? सिंधू संस्कृती, वैदिक युग, वैदिक युगातील गणित, वैदिक खगोलशास्त्र, वैदिक युगातील वैद्यकशास्त्र, वैदिक युगाची तात्विक सामग्री.

पुढे या पुस्तकात सिंधू आणि वैदिक संस्कृतींसंबंधीचे काय दावे आहेत? याचा उहापोह केला आहे. त्यामध्ये

दावा १ : सिंधू संस्कृती वैदिक काळाचा एक भाग होता.

दावा २ : वैदिक आर्य मूळ भारताचे रहिवासी होते.

दावा ३ : वैदिक गणित. उत्तर-वैदिक (किंवा सिद्धांतिक) कालखंडातील विज्ञान, वैद्यकीय विज्ञान.

भारतातील विज्ञानाचा र्‍हास, खोटे दावे उघडे करणे, मुस्लिम आक्रमणाने वैज्ञानिक गोष्टीचा नाश केला का? रामायण महाभारत महान साहित्य आहे की त्यांचे-गंभीर तथ्ये? प्राचीन भारतात उडणारी यंत्रे होती का? रामसेतू खरोखरच भगवान रामानी बांधला होता का? स्टेम पेशी, अवयव प्रत्यारोपण, अनुवांशिक अभियांत्रिकी हे आपल्या प्राचीन वेदात होते का? याबद्दल चिकित्सक माहिती या पुस्तकात आम्ही दिली आहे.

आमचे हे साहित्य सर्वसामान्य जनतेला छद्म विज्ञानाविरुद्ध लढण्यासाठी ज्ञानाचे हत्यार पुरवते.

आपला जिव्हाळ्याचा प्रश्न आम्ही विचारलाच. सध्या दुर्गा महोत्सव सुरू असल्याने त्याचे एक महत्त्वही होतेच. तो प्रश्न होता, तुमची धर्मासंदर्भात भूमिका काय? प्रोफेसर मैतींनी उत्तर दिले की, आमच्या कार्यकर्त्यांच्या खाजगी स्टडी सर्कलमध्ये या संदर्भात खूप साधकबाधक चर्चा होते. आमचे बहुतांशी कार्यकर्ते हे नास्तिकच आहेत. परंतु धर्मासंदर्भात आम्ही जाहीर भूमिका घेत नाही. कारण विज्ञान प्रसारामध्ये सध्या ती आम्हाला अडचणीची वाटत नाही.

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती बद्दल काय सांगाल? असे विचारले असता चंदन संत्रा म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर करत असणारे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आम्हाला थोडेबहुत माहीतच होते. परंतु २० ऑगस्ट २०१३ ला आम्हाला धका बसला. कारण, अशा प्रकारे अंधश्रद्धा निर्मूलनाचं आणि वैज्ञानिक विचारधारा पसरवण्याचं काम करणार्‍या व्यक्तीचा खून महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो हे धकादायक होते. परंतु आम्हाला त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची जास्त किंमत कळू लागली आणि डॉ. दाभोलकरांच्या बलिदानानंतर थोडं जास्त काम करावं असं वाटू लागलं. आम्ही त्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये देखील निषेध रॅलीचं आयोजन केलं होतं. महाराष्ट्रामध्ये डॉ. दाभोलकर यांच्या खुनानंतर जो जादूटोणाविरोधी कायदा झालेला आहे. तसाच कायदा पश्चिम बंगालमध्ये देखील व्हावा अशी जोरदार मागणी करीत आम्ही केलेली आहे. बंगालमध्ये काळी जादू करणार्‍याला ‘गुणीन’ असे म्हटले जाते. अशा लोकांना या कायद्याखाली आणावे. बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात ज्योतिषांकडून होत असलेल्या फसवणुकीला देखील आळा घालावा, या दृष्टीने आम्ही पश्चिम बंगाल शासनाकडे जादूटोणाविरोधी कायद्याची मागणी केलेली आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]