भडकाऊ भाषणे कशासाठी?

राजीव देशपांडे -

कोरोना महामारीचे 2021 हे अखेरचे वर्ष असेल, समाजजीवन पूर्वपदावर येईल असे वाटत होते. पण वर्ष संपता संपता सार्‍या जगभर कोरोनाचा नवा अवतार ‘ओमायक्रॉन’ ज्या वेगाने पसरत आहे त्यावरून या वर्षीही या संकटाला तोंड द्यावे लागणार आणि लोकांचे दैनदिन जीवन या महामारीने प्रभावित होत राहाणार. कोरोना विषाणूविरोधाची ही लढाई माणसाला आता प्रदीर्घ काळ लढावी लागणार हे निश्चित. सतत रचना बदलणार्‍या या विषाणूंना पराभूत करणारी शक्तिशाली लस विज्ञानाच्या सहाय्याने शोधून त्यावर माणूस मात करेल व पुन्हा करोनापूर्व स्थितीत जगाचा व्यवहार चालू होईल याबाबत काहीच शंका नाही. पण आज नव्या वर्षात प्रवेश करताना सर्वात कळीचा प्रश्न आहे भारतीय समाजजीवनात आपल्या सत्ताप्राप्तीच्या राजकारणासाठी पसरवल्या गेलेल्या धर्मांधता, असहिष्णूता, अविवेक, जाती जाती-धर्मा धर्मातील द्वेष आणि स्त्रियांवरील अत्याचार या विषाणूंवर आपण कशी मात करणार?

हा विषाणू मॉब लिंचिंग, गोहत्या, गोली मारो, लवजिहाद, कोरोना जिहाद, धर्मांतर, पलायन, सीएए, एनआरसी, कामरा-फारूकी, स्वस्त मिळालेले स्वातंत्र्य, हाथरस, लखीमपूर, सुल्ली डील्स, बुल्ली बाई या मार्गाने 24 तास काना-डोळ्यांवर आदळणार्‍या प्रसार माध्यमाच्या सहाय्याने मेंदूत किती खोलवर पसरवलेला आहे याची जाणीव सर्वांनाच आहे पण जुन्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना सामोर्‍या आलेल्या दोन घटना कोणत्याही विवेकी समाजमनावर ओरखडा उमटवणार्‍याच आहेत.

पहिली घटना आहे स्वत:ला संत म्हणवून घेणार्‍यानी हरिद्वार आणि छत्तीसगढ येथील रायपुरमध्ये येथे भरवलेल्या तथाकथित धर्मसंसदेत केलेली ‘भडकाऊ भाषणे.’ धर्मसंसदेतील भाषणातून हिंदू धर्मातील सर्वसामान्य जनतेपुढील प्रश्नांची, धर्मातील जातीयता नष्ट करण्याची, दलित, आदिवासीच्या शोषणासंबंधी, स्त्रियांवरील अत्याचारासंदर्भात किंवा हिंदू तत्वज्ञानाविषयक वैगेरे अशा कोणत्याही खर्‍याखुर्‍या धार्मिक प्रश्नांबाबत खरेतर चर्चा व्हावयास हवी पण हरिद्वार येथील धर्मसंसदेतील अनेक वक्त्यांचा भर होता भारताला आणि हिंदुंना मुसलमानांचा कसा धोका आहे, हे सांगत केवळ मुसलमानाविरोधात द्वेष पसरवण्याचा व ‘मरण्यासाठी तरी तयार व्हा किंवा मारण्यासाठी’ हा संदेश देण्याचा. तर रायपूरमधील धर्मसंसदेत कालीचरण नावाच्या तथाकथित संताने तर महात्मा गांधीसारख्या स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवून घेणार्‍या नेत्याबाबत अपशब्द उच्चारत गरळ ओकली आणि गांधींच्या खुन्याची गोडसेची भलामण केली. ही अशी भडकाऊ भाषणे कशासाठी?

पुढील दोन महिन्यात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या राज्यात विधानसभेच्या निवडणूका आहेत. यातील पंजाब वगळता इतर राज्यात भाजप सत्ताधारी आहे. उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा सत्ताधारी होण्याच्या आशा धूसर दिसत आहेत आणि केंद्रीय निवडणूकीच्या दृष्टीने उत्तर प्रदेशची सत्ता महत्वाची आहे आणि धर्माच्या आधारावर राजकारण ही तर त्यांची मूलभूत प्रवृत्ती आहे. त्यामुळे आपले हे राजकारण अशा तथाकथित साधू, संत, बुवा, महाराज यांना पुढे करत केले जात आहे आणि त्यांच्या भडकाऊ भाषणांतून भीतीचे, दहशतीचे, द्वेषाचे वातावरण तयार करून त्याचा वापर आपल्या सत्ताप्राप्तीसाठी केला जात आहे.

दुसरी घटना आहे मुस्लिम समाजातील मान्यवर महिलांची छायाचित्रे आणि व्यक्तिगत माहिती इंटरनेटवर टाकून त्यांचा जाहीर लिलाव पुकारणारे संकेतस्थळ निर्माण करण्याची. असाच प्रकार सहा महिन्यांपूर्वीही झाला होता. त्यावेळेस यात सामाजिक कार्यकर्त्या, कलावंत, पत्रकार अशा महिला होत्या. त्याबद्दल तक्रार झाली आणि गुन्हेगारावर कोणतीही कारवाई न होता ते संकेतस्थळ बंद करण्यात आले. या वेळेसही असाच प्रकार घडला आहे, मुस्लिम समाजातील 100 हून अधिक महिलांची छायाचित्रे व खासगी माहिती टाकून त्या लिलावास उपलब्ध असल्याचे जाहीर केले गेले आहे. यातही सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार, कलावंत तसेच ज्या स्त्रियांवरील अन्यायाविरोधात मुख्यत: सरकारच्या धोरणाविरोधात संघर्ष करीत आहेत अशा 23 वर्षांपासून 66 वर्षांच्या स्त्रियांचा समावेश आहे. हे काही एखाद्या विकृत किंवा वाहवत गेलेल्या तरुणांचे कृत्य नाही तर हे कृत्य अशा स्त्रियांवर मनोवैज्ञानिक दबाव टाकून त्यांचा आवाज बंद करण्याच्या विशिष्ट हेतूनेच करण्यात आलेले आहे. त्यामुळे या घटनेकडे केवळ मुस्लिम महिलांचा प्रश्न म्हणून बघताच कामा नये तर आधुनिक, सुशिक्षित, अन्यायाविरोधात आवाज उठवणार्‍या कोणत्याही सावित्रीच्या लेकीबाबत ही घटना घडू शकते. तेव्हा अशा घटनेचा प्रत्येकाने तीव्रपणे निषेध केला पाहिजे.

वर्षअखेरीस व नव वर्षाच्या सुरुवातीस सुरू झालेली महामारीच्या तिसर्‍या लाटेची सुरुवात असो अगर घडलेल्या या दोन घटना पुढील काळात कोणत्या संघर्षाला सामोरे जावयाचे आहे याची चाहूल देणार्‍या आहेत हे मात्र निश्चित!


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]