डॉ. हमीद दाभोलकर -

सामाजिक पातळीवर छद्मविज्ञानाच्या दाव्यांचा प्रतिवाद करताना आपण अधिक रोखठोक भूमिका घेत आलो असलो, तरी त्या दाव्यांना बळी पडलेले लोक हे वरीलपैकी मानसिकतेचे बळी असतात. अशा स्वरुपाची मानसिकता केवळ कठोर चिकित्सेने बदलत नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे डॉ नरेंद्र दाभोलकर यांचे, ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे,’ हे वाक्य छद्मविज्ञानाच्या विरोधी लढ्यात देखील तितकेच लागू पडणारे आहे.
छद्मविज्ञानाला लोक कसे बळी पडतात, त्याच्या मागील मानसशास्त्रात काही बाबी या चमत्कारांच्या दाव्याला बळी पडणार्या लोकांच्या मानसिकतेशी साधर्म्य दाखवणार्या आहेत, तर काही अगदी पूर्ण वेगळ्या आहेत. त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. गेल्या वर्षीची गोष्ट आहे. माझ्या मुलाच्या शाळेत ‘मिडब्रेन अॅक्टिव्हेशन’ची कार्यशाळा घेण्यासाठी काही प्रशिक्षक आले होते. स्वाभाविक आहे की, जेव्हा मला आणि माझी पत्नी मुग्धाला हे कळले, तेव्हा आम्ही त्याला विरोध केला. मग त्या ‘मिडब्रेन अॅक्टिव्हेशन’ प्रशिक्षकांच्या वतीने माझाच एक प्रथितयश असलेला डॉक्टरमित्र मला भेटायला आला होता. प्राथमिक पातळीवर या ‘मिडब्रेन अॅक्टिव्हेशन’चा उपयोग मुलांना होणार आहे, याविषयी त्याचे सकारात्मक मत झाले होते. बरं, रूढ अर्थाने तो काही अंधश्रद्धाळू म्हणावा, असा अजिबात नाही. मी जेव्हा त्या डॉक्टरमित्राला विचारले की, “मिडब्रेन’ म्हणजे मध्य मेंदू आणि दिसणे याचा काही संबंध नाही, हे आपल्याला वैद्यकशास्त्रात शिकवलेले प्राथमिक ज्ञान आहे. मग ‘मिडब्रेन अॅक्टिव्हेशन’मुळे डोळ्यांवर पट्टी बांधून कसे काय दिसू शकेल? याचा तू विचार केला नाहीस का?” त्यावर तो अचंबित झाला आणि म्हणाला, “खरे आहे रे, मी असा विचार केलाच नव्हता.” हा माझा डॉक्टरमित्र प्रामाणिक होता. त्यामुळे त्याला इतके साधे प्रश्न आपण का विचारले नाही, याचे वैषम्य वाटले आणि थोडी चर्चा झाल्यावर त्याने आपले मत बदलले. या प्रसंगाच्या मधून मला मात्र एक गोष्ट स्पष्ट लक्षात आली की, विज्ञानाचे शिक्षण घेतलेली व्यक्तीदेखील दर वेळी वैज्ञानिक पद्धतीने विचार करेल, याची खात्री देता येत नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणायचे त्याप्रमाणे आपल्याकडे लोकांनी विज्ञानाची सृष्टी घेतली; पण दृष्टी घेतली नाही. त्याचाच एक भाग म्हणजे छद्मविज्ञान होय, असे मला वाटते. यामध्ये ज्या विज्ञानाचा आधार घेऊन आपण सत्य किंवा असत्य याचा शोध घ्यायचा, त्याचेच बाह्यरूप वापरून लोकांना फसवले जाते. कुठलीही चिकित्सा करणे हे कष्टदायक काम आहे, त्यापेक्षा समोर आलेल्या गोष्टींच्यावर विश्वास ठेवणे मानवी मनाला कायमच सोपे वाटते आणि मानवी मनाच्या या अंगभूत जडणघडणीचा गैरफायदा जसे अंधश्रध्दा पसरवणारे घेतात, तसेच छद्मविज्ञान देखील घेते.
मानवी मनाला असणारी अज्ञाताची भीती ही जसे अंधश्रद्धाच्या बाबतीत एक महत्त्वाचे कारण होते, तसेच ते छद्मविज्ञानाच्या बाबतीत देखील होते. उडत्या तबकड्या आणि परग्रहावरून येणारे एलियन ही अशीच एक विज्ञानाचा आधार घेऊन बनवलेली छद्मविज्ञानाची अभिव्यक्ती आहे. यामध्ये उडत्या तबकड्या, परग्रह अशा अनेक वैज्ञानिक संज्ञा वापरल्या असल्या तरी मानसिक पातळीवर अंधश्रद्धांमध्ये असलेली भूत, प्रेत, आत्मा यांच्यापेक्षा ते फारसे वेगळे नाहीत, हे आपण समजून घेतले पाहिजे.
आपल्या स्वत:च्या क्षमतेने ज्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात, त्यापेक्षा अधिक मिळण्याची आसक्ती ही देखील मानवी मनाचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. सध्याच्या काळात लहान मुलांच्या क्षमता वाढवण्याचा दावा करणार्या अनेक पद्धतींना बरेचसे पालक या मानसिकतेमधून बळी पडतात. हातावरील रेषांचा किंवा हस्ताक्षराचा अभ्यास करून मुलांची क्षमता वाढवण्याचा दावा करणारी ‘डेकटीलोग्राफी’ किंवा डोळ्यांवर पट्टी बांधून वाचायला येण्याची क्षमता देण्याचा दावा करणारे ‘मिडब्रेन अॅक्टिव्हेशन’ यासारख्या छद्मविज्ञानाच्या मदतीनेही आपली मुले कमीत कमी कष्टात कायम दुसर्याच्या पुढे राहावीत, अशी मानसिकता असलेल्या पालकांच्या अतिमहत्त्वाकांक्षेची बळी असतात.
आपल्या मानसिकदृष्ट्या वाढण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण साधारण 3 ते 6 वर्षांच्या दरम्यान असताना एक टप्पा येतो, त्याला ‘मॅजिकल थिंकिंग’ म्हणजे जादुई विचारांचा टप्पा असे म्हणतात. या टप्प्यामध्ये परिकथा, प्राण्यांच्या मानवी भावभावना असलेल्या कथा या त्या मुलांना खर्या वाटत असतात. छद्मविज्ञानाच्या दाव्यांवर विश्वास ठेवणार्या लोकांच्या मानसिकतेमध्ये ही जादुई विचारांवर अधिक विश्वास ठेवण्याची विचारपद्धती जास्त प्रमाणात दिसून येते.
माणसाच्या मनात खोलवर असलेली आरोग्य आणि मृत्यूविषयक भीती हे देखील लोक छद्मविज्ञानाच्या दाव्याला बळी पडण्याचे एक महत्त्वाचे कारण असते. चुंबक चिकित्सा, सेराजेम, प्राणिक हीलिंग, अॅक्युप्रेशर आणि अॅक्युपंक्चर अशा स्वरुपाच्या आरोग्यविषयक उपचारांचा दावा करणार्या गोष्टी या फसव्या विज्ञानात येतात. मतिमंदत्व, ‘स्किझोफ्रेनिया’सारखे दीर्घ मुदतीचे तीव्र स्वरुपाचे मानसिक आजार, कर्करोग, वयोमानानुसार होणारी पाठीच्या मणक्यांची झीज किंवा गुडघ्यांचे दुखणे अशा अनेक प्रकारच्या आजारांचे उपचार हे दीर्घकाळ चालणारे आणि ज्याच्यामध्ये आजार पूर्ण बरे होण्याची खात्री देता येत नाही, असे असतात. स्वाभाविकच, आपल्याला लवकर बरे न होणारा आजार झाला आहे, हे स्वीकारणे मनाला अवघड असते. त्यामुळे विज्ञानाचे नाव घेऊन फसवणारे आणि चुटकीसरशी आपले दुःख दूर करण्याचा दावा करणारे फसवे वैज्ञानिक उपचार मानवी मनाला भुरळ पाडतात. वरून दिसताना या उपचारांमध्ये वैज्ञानिक पद्धती किंवा वैद्यकीय शास्त्राशी संबंधित संज्ञा वापरलेल्या असतात, त्यामुळे लोक या उपचारांवर पटकन विश्वास ठेवतात.
कोरोनासारख्या तुलनेने नवीन आजारांच्या बाबतीत हे अधिक प्रमाणात दिसून येते. मृत्यूची भीती कोरोनाच्या आजाराशी निगडित असल्याने ज्याला शास्त्रीय वैद्यकीय आधार नाही, अशा अनेक फसव्या वैज्ञानिक दाव्यांनी या कालखंडात आपली पोळी भाजून घेतली. ‘अर्सेनिक अल्बम’ अशा नावाच्या औषधाची एक मोठी हवा कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी झाली होती. त्या घेतल्याने कोरोना होत नाही, असे सांगून अगदी शासनाने देखील या गोळ्यांचे वाटप केले. आज दुसरी लाट एवढा मोठा हाहाःकार माजवत असताना त्याविषयी कोणी चकार शब्द काढताना दिसत नाही. लोकांच्या मृत्यूविषयक भीतीचा फायदा अशा स्वरुपाचे उपचार करून घेतात, तर त्याला बळी पडणारे लोक फायदा झाला नाही, तरी काही तोटा तर होत नाही, या मानसिकतेमधून अशा फसव्या दाव्याला बळी पडतात.
छद्मविज्ञान आणि धर्माच्या नावाखाली पसरवल्या जाणार्या अंधश्रद्धा यांची देखील एक अभद्र युती झालेली आपण आजकाल पाहत आहोत. एकाच वेळेला आपण प्रागतिक आहोत, तरी देखील आपल्या मूळच्या संस्कृतीशी आपण कसे जोडलेले आहोत आणि त्याच्याशी आपण कृतघ्न कसे झालो नाही, हे स्वत:ला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना पटवण्याच्या मानसिक गरजेतून हे निर्माण होते. त्यामुळे मोठमोठे डॉक्टर, वैज्ञानिक, परदेशात उच्च पदावर चांगले काम करणारे लोकदेखील ‘गोविज्ञान’ या नावाखाली केल्या जाणार्या पूर्ण अशास्त्रीय फसव्या वैज्ञानिक दाव्याला बळी पडतात.
विज्ञानाच्या पद्धतीमध्ये नम्रता आणि निर्भयता या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या दोन्ही गोष्टींना फाटा देण्यास सुरुवात झाली की, कोणतेही वैज्ञानिक संशोधन हे छद्मविज्ञानाच्या दिशेने वाटचाल करू लागते, हे आपण समजून घेतले पाहिजे. आपले म्हणणे तेच खरे, असा विज्ञानाचा कधीच दावा नसतो, विज्ञान हे पुराव्याच्या पलिकडे जाऊन दावा करीत नाही; पण छद्मविज्ञानाचा प्रसार करणारे आणि त्यांना फसणारे देखील आपली उपचार पद्धती किंवा आपला दावा सांगणारी पद्धती ‘माझे तेच खरे,’ अशा स्वरुपाच्या मानसिकतेमधून येते. एका बाजूला अज्ञान आणि उद्धटपणा यांचा त्यामध्ये समावेश असतो. ‘पडले तरी नाक वर’ असे ज्याला आपल्याकडे म्हटले जाते, अशा स्वरुपाची स्वकेंद्री मानसिकता यामागे असते.
सामाजिक पातळीवर छद्मविज्ञानाच्या दाव्यांचा प्रतिवाद करताना आपण अधिक रोखठोक भूमिका घेत आलो असलो, तरी त्या दाव्यांना बळी पडलेले लोक हे वरीलपैकी मानसिकतेचे बळी असतात. अशा स्वरुपाची मानसिकता केवळ कठोर चिकित्सेने बदलत नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे डॉ नरेंद्र दाभोलकर यांचे, ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे,’ हे वाक्य छद्मविज्ञानाच्या विरोधी लढ्यात देखील तितकेच लागू पडणारे आहे. येत्या कालखंडात अशा प्रकारच्या अनेक दाव्यांना ‘अंनिस’ कार्यकर्ता म्हणून आपल्याला सामोरे जायला लागणार आहे. त्यामुळे त्यानिमित्ताने कार्यकर्ता म्हणून आपण आपली तयारी सुरू करायला हवी.
लेखक संपर्क – hamid.dabholkar@gmail.com