पहिल्या सत्यशोधक महिला संपादक : तानुबाई बिर्जे

डॉ. छाया पोवार - 9850928612

पहिल्या सत्यशोधक महिला संपादक म्हणून तानुबाई बिर्जेयांचा उल्लेख केला जातो. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘दीनबंधु’ या पत्राच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, वासुदेवराव लिंगोजी बिर्जे यांच्यानंतर 1909 ते 13 या काळात तानुबाई बिर्जे यांनी अत्यंत धैर्याने आणि चिकाटीने ‘दीनबंधू’ पत्रक चालू ठेवले. ब्राह्मणेतर पत्रकारितेतील त्या पहिल्या महिला संपादक आहेत.

तानुबाई बिर्जे या देवराव कृष्णाजी ठोसर यांच्या कन्या. देवराव ठोसर मूळचे नाशिकचे. पुणे येथे त्यांनी पोलीस खात्यात नोकरी केली. सेवानिवृत्तीनंतर ते पुणे येथे स्थायिक झाले. त्यांनी सत्यशोधक समाजात सक्रिय सहभाग घेतला. महात्मा फुले यांचे जवळचे व विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जात. देवराव ठोसर यांचा मुलगा लक्ष्मणराव ठोसर आणि तिन्ही जावई – तुकाराम हणमंत पिंजण, बापूराव रामजी आवटे आणि वासुदेवराव लिंगोजी बिर्जे हे सर्वच सत्यशोधक समाजाचे अनुयायी होते. तानुबाई बिर्जे यांच्या घरातच असा सत्यशोधक चळवळीचा वारसा त्यांना लाभला होता.

पुणे येथे ठोसरांच्या वेताळ पेठेतील वाड्यात (फुले पेठ) 1876 मध्ये तानुबाई बिर्जे यांचा जन्म झाला. महात्मा फुले यांनी 15 मार्च 1852 मध्ये वेताळ पेठ येथे जी शाळा सुरू केली होती, त्याच शाळेत तानुबाईंचे शिक्षण झाले. मात्र तानुबाईंचा या शाळेत प्रवेश होण्यापूर्वीच ही शाळा महात्मा फुले यांनी पुणे नगरपरिषदेकडे हस्तांतरित केली होती. महात्मा फुले आणि इतरही सत्यशोधक कार्यकर्ते नेहमी ठोसरांच्या घरी येत. त्यांच्या चर्चा, बैठका बर्‍याचदा तेथेच होत. तानुबाईंनी महात्मा फुले यांच्या पुस्तकांचेही वाचन केले होते. सत्यशोधक विचारांच्या तालमीतच त्या तयार झाल्या होत्या.

दि. 22 जानेवारी, 1893 रोजी तानुबाईंचा विवाह वासुदेवराव बिर्जे यांच्याशी झाला. वासुदेव बिर्जे यांचा जन्म 1864 मध्ये बेळगाव येथे झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण बेळगाव येथेच झाले. 1893 मध्ये ते नारायणराव लोखंडे संपादित ‘दीनबंधु’ पत्रात सहाय्यक संपादक म्हणून लेखन करीत होते. त्याच वेळी कृष्णराव भालेकर यांच्या ‘शेतकर्‍याचा कैवारी’मध्येही सहाय्यक संपादक म्हणून ते लेखन करीत होते. तानुबाई आणि वासुदेव बिर्जे यांचा विवाह पुणे सत्यशोधक समाजाच्या पुढाकाराने पार पडला. वेताळ पेठेतील दैवज्ञ मंडळी धर्मशाळेत हा विवाह सत्यशोधक पद्धतीने झाला. विवाहासाठी मुद्दाम ‘सत्यशोधकी मंगलाष्टके’ नव्याने रचून छापून आणली होती. या विवाहासाठी सत्यशोधक समाजातील प्रमुख नेते, कार्यकर्तेमोठ्या संख्येने हजर होते. ‘दीनबंधु’ आणि ‘शेतकर्‍याचा कैवारी’ या पत्रांमधून या विवाहाचा विस्तृत असा वृत्तांत प्रसिद्ध झाला. विवाहानंतर बिर्जे दांपत्य एखादे वर्ष मुंबईत वास्तव्यास होते. त्यानंतर 1894 मध्ये बिर्जे बडोदा येथे ग्रंथपालपदी रूजू झाले. 1905 पर्यंत त्यांनी बडोदा येथे ग्रंथपाल म्हणून सेवा केली. या अकरा वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी वैचारिक संशोधनपर ग्रंथ लिहिले. त्यांचा ‘क्षत्रिय आणि त्यांचे अस्तित्व’ हा ग्रंथ 1903 मध्ये प्रसिद्ध झाला. या ग्रंथाने मराठी मुलुखात एक वैचारिक वादळ निर्माण केले. 1905 मध्ये ग्रंथपालपदाचा राजीनामा देऊन वासुदेवराव बिर्जे मुंबईस परतले. त्यांनी ‘दीनबंधु’ पत्राचे पुनरुज्जीवन केले. ‘दीनबंधु’मधून ‘मराठा शिक्षण परिषद’ स्थापन करण्यासाठी त्यांनी लेखन केले. 1907 मध्ये ‘मराठा शिक्षण परिषदे’ची स्थापना झाली. ‘मराठा शिक्षण परिषदे’चे पहिले अधिवेशन डिसेंबर 1907 मध्ये धारवाड येथे झाले. नाशिक येथील ‘मराठा शिक्षण परिषदे’च्या दुसर्‍या अधिवेशनाच्या नियोजनासाठी बिर्जे नाशिक येथे जाऊन राहिले. दरम्यान, तेथे उद्भवलेल्या कॉलराच्या साथीस ते बळी पडले. त्यांच्या निधनाने ‘दीनबंधु’चे काम थांबले. बिर्जे यांच्या निधनानंतर भगवंतराव पाळेकर यांनी काही महिने ‘दीनबंधु’ची धुरा सांभाळली.

श्रीमती तानुबाई बिर्जे या आपल्या पतीचे अपुरे कार्य चालविण्यासाठी पुढे सरसावल्या. तानुबाई बिर्जे यांनी बंधू लक्ष्मणराव ठोसर आणि मेहुणे बापूराव आवटे यांच्या मदतीने ‘दीनबंधू’ पत्र काही वर्षे मोठ्या धडाडीने चालविले. त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1909 पासून सप्टेंबर 1913 पर्यंत तानुबाई ‘दीनबंधु’च्या संपादक होत्या.

तानुबाई बिर्जे संपादित ‘दीनबंधु’ दर शनिवारी सायंकाळी मुंबईहून प्रसिद्ध होत असे. या पत्राच्या मुखपृष्ठाच्या शिरोस्थानी देवनागरीत ‘दीनबंधु’ आणि रोमन लिपीत ‘ढकए ऊखछइअछऊकणफ असे शीर्षक घातले जात असे. हे साप्ताहिक चार पानी, चार कॉलम स्वरुपात प्रसिद्ध होत असे. मुखपृष्ठावर औषधांच्या जाहिराती, मलपृष्ठावर सत्यशोधक ग्रंथांच्या जाहिराती, सत्यशोधक समाजाच्या देणगीदारांची नामावली आदी मजकूर असे. पान क्रमांक दोनवर संपादकीय लेख, विविध वैचारिक वृत्तं, तर पान क्रमांक तीनवर वृत्त संकलन, वाचकांची पत्रे, वर्तमानसार आदी मजकूर प्रसिद्ध होत असे. याच पृष्ठावर; प्रसंगी उद्बोधक विचारही प्रसिद्ध होत असत. अंकाची किंमत अर्धा आणा होती. या अंकाच्या मलपृष्ठाच्या अगदी शेवटच्या टोकाला “हे पत्र हार्नबी रोड, सीताराम बिल्डिंग येथे ‘दीनबंधु’ छापखान्यात तानुबाई वासुदेवराव बिर्जे यांनी छापून प्रसिद्ध केले.” (‘दीनबंधु’ दि. 6 एप्रिल, 1912 अंक 28) अशा मजकुराची प्रेसलाईन (चौकट) प्रसिद्ध केली जात असे.

1910 नंतर सत्यशोधक समाजाला राजर्षी शाहू महाराजांचा भक्कम पाठिंबा मिळाला. कोल्हापूर, पुणे, नाशिक, खानदेश, विदर्भात सत्यशोधक मतांचे वारे घोंगावू लागले. अ‍ॅड. गणपतराव कदम यांनी सत्यशोधक समाजासाठी एक आचारसंहिता (घटना) नव्याने लिहिण्याचे आवाहन ‘दीनबंधु’मध्ये प्रसिद्ध केले. प्रस्तुत आवाहनाला प्रतिसाद देऊन भास्करराव जाधव यांनी सत्यशोधक समाजाची नव्याने घटना लिहून काढली. ही घटना ‘दीनबंधु’पत्रातून 1910 च्या डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झाली. (सत्यशोधक हीरक महोत्सव ग्रंथ – माधवराव बागल) यामुळे सत्यशोधक समाजाचे पहिले अधिवेशन 17 एप्रिल, 1911 रोजी पुणे येथे पार पडले. या अधिवेशनाचा सविस्तर वृत्तांतही तानुबाई बिर्जे यांनी ‘दीनबंधु’मधून प्रसिद्ध केला. याचदरम्यान 11 जानेवारी, 1911 रोजी कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. चिकोडी येथेही एक शाखा स्थापन करण्यात आली. सत्यशोधक समाजाचे कार्य पुन्हा नव्या जोमाने सुरू झाले. याबाबत गणपतराव बिरमल म्हणतात, “त्या वृक्षास कै. जोतिरावांसारखा पाणी घालणारा व त्याची जोपासना करणारा माळी मिळाल्याकारणाने त्याच्या फांद्या चोहोकडे पसरल्या. परंतु त्यानंतर उत्तम माळ्याच्या अभावी हा समाजरुपी वृक्ष दिवसानुदिवस सुकत जाऊन काही काळ अगदी नाहीसा होतो की काय, असे वाटू लागले होते. पण ‘दीनबंधु’सारखा पाणी घालणारा भेटल्याकारणाने त्या वृक्षास नवी पालवी फुटू लागली. ‘दीनबंधु’ने चालविलेल्या प्रयत्नास ‘दीनमित्र’ची साथही मिळाल्याकारणाने सत्यशोधक समाजबंधूंत बरीच जागृती उत्पन्न झाली.” (सत्यशोधक समाज परिषद, अध्यक्षीय भाषणे पृ. 67) तानुबाईंनी त्यांच्या कालखंडात सत्यशोधक वृत्तांत सतत प्रसिद्ध केलेले दिसतात. सत्यशोधक समाजाचे दुसरे एकदिवसीय अधिवेशन नाशिक येथे 5 एप्रिल, 1912 रोजी पार पडले. या अधिवेशनाचा इत्यंभूत वृत्तांत ‘दीनबंधु’ने प्रसिद्ध केला आहे. (‘दीनबंधू’ 13 एप्रिल, 1912).

तानुबाई बिर्जे यांनी ज्या वेळी ‘दीनबंधु’ची जबाबदारी स्वीकारली, त्याप्रसंगी दलित, बहुजन समाजाच्या जातवार शिक्षण परिषद आयोजनांना प्रचंड उधाण आले होते. मराठा शिक्षण परिषदांच्या आयोजनामुळे दलित बहुजन समाज कूस बदल होता. ‘माळी शिक्षण परिषद’, ‘शिंपी शिक्षण परिषद’,‘सत्यशोधक समाज परिषद’, ‘मुसलमान शिक्षण परिषद’ आदी परिषदांचे आयोजन होत होते. जातवार शिक्षण परिषदा भरत असल्या तरी प्रामुख्याने समाजाच्या मागासलेपणाचा धांडोळा घेतला जात असे. या परिषदांमध्ये ‘शिक्षण’ हाच विषय केंद्रस्थानी राहत असे. विद्यासंवर्धनासाठी चर्चा, कृती कार्यक्रम दिले जात. या परिषदांचे सविस्तर वृत्त तानुबाई बिर्जे यांनी दिले आहे.

‘पुणे येथील मराठा विद्यार्थ्यांचे दुसरे संमेलन’, ‘मराठा शिक्षण परिषदेस महत्त्वाच्या सूचना’, अहमदनगर येथील माळी शिक्षण परिषदेचा वृत्तांत, ‘सत्यशोधक समाजाची दुसरी परिषद’ या मथळ्यांवरून निरनिराळ्या परिषदांचा वृत्तांत ‘दीनबंधु’मध्ये प्रसिद्ध झालेला दिसतो. 27 एप्रिलच्या अंकात ‘अगत्याची सूचना’ या उपमथळ्याखाली वाचकाने अधिवेशनाच्या अनुषंगाने ‘वर्गणी’च्या संदर्भात आपले विचार व्यक्त केले आहेत.

पुणे येथील ‘वसंत व्याख्यानमाले’बाबतही तानुबाईंनी आपला अभिप्राय व्यक्त केला आहे. 1912 च्या ‘वसंत व्याख्यानमाले’तील प्रा. विजापूरकरांचे ‘प्राचीन शिक्षणाचा हेतू’ या व्याख्यानातील काही मुद्द्यांवर असहमती दर्शवून तानुबाईंनी टीका-टिप्पणी केली आहे. तसेच 1911 च्या व्याख्यानमालेतील एक वक्ते प्रो. भानू यांच्या व्याख्यानातील काही अंशांवर असहमती व्यक्त केली आहे.

कृष्णाजी काकाजी चौधरी आणि मो. तु. वानखडे या सत्यशोधकांची अनेक पत्रे ‘दीनबंधु’मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. ‘सत्य समाज बंधूस सूचना’ यामधून त्यांनी दुसर्‍या अधिवेशनाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. सत्यशोधक शाहीर भीमराव महामुनी विदर्भामध्ये सत्यशोधक समाजाचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. यासोबतच ते सभासद नोंदणी करून सभासदांना मार्गदर्शन करणार असल्याची माहितीही एका पत्रातून मिळते. ‘सत्यशोधक काष्टक’ हे मो. तु. वानखडे यांचे पुस्तक दि. 12 नोव्हेंबर 1910 च्या ‘दीनबंधु’मधून प्रसिद्ध झाल्याची माहिती मिळते.

‘बहुमत लोकानुसारी राज्यपद्धतीस हिंदुस्थान देश लायक आहे काय?’ ही अग्रलेख मालिका 3 ते 31 ऑगस्ट, 1912 पर्यंत चार अग्रलेखांतून गुंफली आहे. सलग महिनाभर प्रसिद्ध होणार्‍या या अग्रलेखांतून तीन हजार वर्षांचा हिंदुस्थानचा राजकीय प्रवास कवेत घेतला आहे. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत यांचा आढावाही घेतला आहे. ब्राह्मणेतरांसाठी बळीराजाचा कालखंड सोडता इतर कालखंड तमोयुग असल्याची नोंद तानुबाईंनी केली आहे. या तमोयुगाचे कारण ‘मनुस्मृति’ असल्याचे निक्षून सांगितले आहे. दरम्यान, इंग्रजी राजवटीमुळे सामाजिक समतेला चालना मिळाली. सामाजिक विषमता नष्ट झाल्याशिवाय येथील जनता सुखी होणार नसल्याचे प्रतिपादन शेवटी केले आहे.

दि. 27 जुलै, 1912 च्या अंकात ‘मुंबई इलाख्यातील लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आणि बहुजन समाज’ हा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. मुंबई इलाख्यात बहुसंख्येने असणार्‍या बहुजन समाजाचा कोणीही वाली नाही, ही वस्तुस्थिती मांडताना त्या म्हणतात, “परंतु दु:खाची बाब अशी आहे की, या प्रश्नासंबंधाने आमच्या कौन्सिलमध्ये क्वचितच ऊहापोह होतो. बहुजन समाजाच्या हिताविषयी कायदे कौन्सिलात अगोदर प्रश्न निघणे कठीण आणि क्वचित निघालाच तर त्याला पुष्टी देणारे मिळणे कठीण -????—. बहुजन समाजातील सुशिक्षित लोक पुढे आल्याशिवाय त्यांची दाद सरकार दरबारात लागणे कठीण आहे, असे आमचे खास मत आहे.” (स. स. परिषद अध्यक्षीय भाषणे, पृ.67)

ऐतिहासिक, राजकीय विचारांसोबत सामाजिक आशयाचे विचारही या अग्रलेखांतून व्यक्त झाले आहेत. दि. 8 जून, 1912 च्या अंकात ‘सार्वजनिक सत्यनारायण – एक नवीन टूम’ या अग्रलेखात तत्कालीन धार्मिक, सामाजिक व्यवस्थेवर उपहासात्मक शैलीत प्रहार केले आहेत. सार्वजनिक सत्यनारायण म्हणजे अज्ञानी जनसमूहांत अंधश्रद्धा वाढवून स्वत:चा स्वार्थ साधण्याचा ब्राह्मणी डावपेच असल्याची टीका तानुबाई बिर्जे यांनी केली आहे. त्या म्हणतात – “सार्वजनिक सुधारणेचा विचार करण्यास अल्पशिक्षण प्राप्त झालेल्या माणसास अवकाश मिळू नये, यासाठीच अशा नवीन हुलकावण्यांचे पेटंट मिळवण्याचे प्रयत्न चालू राहावेत आणि सुधारकाग्रणी ब्रह्मवृंदांनी ह्याबाबत मूग गिळून गप्प बसावे, हे खरोखरच निराशाजनक आहे.” (‘दीनबंधु’ जून, 1912) सत्यनारायणाच्या नावाखाली एका बाजूला ब्राह्मण पुरोहित धार्मिक शोषण करतात आणि दुसर्‍या बाजूला सुधारक म्हणवणारी मंडळी त्यांना मूकसंमती देतात. या दोहोंवर तानुबाईंनी प्रखर टीका केली आहे.

20 जुलै, 1912 च्या अंकात ‘रुढी’ या विषयावर विचार मांडले आहेत. ‘नव्या नव्या युक्त्या व शास्त्रीय शोधांनी ज्ञानप्रकाशाचे क्षितिज वाढत जाईल, तसतसा रुढींना आळा बसेल,’ असा विचार त्यांनी मांडला आहे. बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबाबतही सांगोपांग विचार मांडले आहेत. तत्कालीन शिक्षण प्रणाली प्रतिगामी शैलीची असल्याचे मत तानुबाई बिर्जे यांनी व्यक्त केले आहे.

17 ऑगस्ट, 1912 च्या अंकात ‘मुसलमान शिक्षण परिषदे’चा वृत्तांत दिला आहे. पुणे येथे आयोजित केलेली ‘मुसलमान शिक्षण परिषद’ सर जॉर्ज क्लार्क यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सर जॉर्ज यांनी उपस्थितांना समाजाच्या उन्नतीसाठी न डगमगता कार्यरत राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच अलिगड विद्यापीठ, सक्तीचे शिक्षण, उर्दू भाषा आदी मुद्द्यांवरही अध्यक्षांनी विचार मांडल्याचे नमूद केले आहे. 3 ऑगस्टच्या अंकात न्या. अब्दुल रहीम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बेंगलोर येथील ‘मुसलमान शिक्षण परिषदे’चे सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

23 मार्च, 1913 रोजी ठाणे येथे सत्यशोधक समाजाचे तिसरे एकदिवसीय अधिवेशन प्राचार्य म. ग. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली भरले. प्रस्तुत अधिवेशनाने ‘दीनबंधु’चे ऋण व्यक्त केले आहेत.

तानुबाई बिर्जे यांच्या संपादकपदाच्या काळात ज्या ठिकाणी संपादक म्हणून महिला कार्यरत आहेत, अशा काही साप्ताहिक – मासिकांची नावे आढळतात. (आर्य भगिनी, स्वदेश भगिनी, गृहिणी रत्नमाला… इ.) पण आज या वृत्तपत्रांची नावेही कोणाला ठाऊक नाहीत. याउलट तानुबाईंच्या ‘दीनबंधु’ पत्राने शतकपूर्ती केली आहे. ‘दीनबंधु’ पत्राच्या शतकोत्तर वाटचालीचे श्रेय भालेकर, लोखंडे, जाधव, वासुदेवराव बिर्जे, तानुबाई बिर्जे, डॉ. विठ्ठलराव नवले अशा अनेक सत्यशोधकांचे आहे. सत्यशोधक चळवळीमुळे ‘दीनबंधू’ पत्राने शतकोत्तर वाटचाल पूर्ण केली आहे.

तानुबाई बिर्जे अतिशय बुद्धिमान आणि निर्भीड होत्या. ज्यावेळी मुद्रण प्रकाशन व्यवसाय उच्चभू्र मंडळींच्या हाती होता, त्या काळात तानुबाईंनी ‘दीनबंधु’ला लौकिक प्राप्त करून दिला. सत्यशोधक विचार, पुरोगामी विचारांचा वसा घेऊन त्यांनी ‘दीनबंधु’ची धुरा वाहिली. त्यांनी ‘दीनबंधु’मध्ये शिक्षण, कृषी, राजकारण, सत्यशोधक समाज, मराठा शिक्षण परिषदा यांचे सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध केले. स्फूट, लेख छापले. त्या काळातील महत्त्वाच्या ग्रंथांवर, नाटकांवर अभिप्राय व्यक्त केले. सत्यशोधक समाज परिषदा, मेळावे, कार्यकर्त्यांची कामे यांची दखल त्यांनी वेळोवेळी घेतलीच; त्याचबरोबर अनिष्ट रुढी, परंपरांवर टीका करून समाजाचे प्रबोधन केले. ‘दीनबंधु’चा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सत्यशोधक विचारांची अनेक वृत्तपत्रे पुढील काळात सुरू झाली. अनेक सत्यशोधक संपादक, पत्रकारांची जबरदस्त फळी निर्माण झाली. ज्या काळात महिलांच्यावर अनेक बंधने लादलेली होती, त्यांचे शिक्षणही कमी असावयाचे, अशा काळात बहुजन समाजातील एक स्त्री पतीच्या निधनानंतर वृत्तपत्र व्यवसायासारख्या क्षेत्रात धाडसाने उतरून ‘दीनबंधु’ वृत्तपत्र यशस्वीपणे चालू ठेवते, हे तानुबाई बिर्जे यांचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे.

संदर्भ :
1.माधवराव बागल (संपा.) – सत्यशोधक हीरक महोत्सव ग्रंथ
2.जी. ए. उगले – दीनबंधु आणि तानुबाई बिर्जे, स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद – 2009
3.गजमल माळी (संपा.) – सत्यशोधक समाज परिषद : अध्यक्षीय भाषणे व कार्यवृत्तांत, राजमुद्रा प्रकाशन 2000.
4.अरुण शिंदे – सत्यशोधकीय नियतकालिके, कृष्णा संशोधन व विकास अकादमी, मंगळवेढा, 2019.
5.डॉ. संभाजी खराट – पहिल्या ब्राह्मणेतर संपादिका – तानुबाई बिर्जे- म. जोतिराव फुले यांचे वारसदार (संपा.)
6.डॉ.विश्वनाथ शिंदे, पुणे विद्यापीठ, 2020.

लेखिका संपर्क : 9850928612


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]