मराठवाड्यात अत्यंत उत्साहात साजरी होणारी – वेळ अमावस्या

डॉ. नितीन शिंदे - 9860438208

लातूर येथे दि. 17 ते 19 जानेवारी 2020 रोजी संपन्न झालेल्या महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने एका आगळ्या-वेगळ्या सणाची माहिती मिळाली. लातूरचे कार्यकर्ते उत्तरेश्वर बिराजदार यांनी पहिल्याच दिवशी समारोपाच्या वेळी देण्यात येणार्‍या एका वैशिष्ट्यपूर्ण जेवणाचा उल्लेख केला. या जेवणाचा मेनू होता ‘वेळ अमावस्या’ या सणादिवशीचा. नाव जरा इतरांना खटकण्याची शक्यता आहे. सणाचं नातं अमावस्येशी असतं; हे पण जरा विचित्रच वाटणं स्वाभाविक आहे. बहुजन शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या सणांचं हेच तर वैशिष्ट्य आहे. वर्णवर्चस्ववादी परंपरेने मात्र इथल्या शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या मूळ उत्सवांना बगल दिलेली आहे. केवळ बगलच दिलेली नाही, तर या उत्सवांना पर्याय म्हणून कर्मकांडांनी ओतप्रेत भरलेले अनेक ‘हाय प्रोफाईल’ उत्सव सर्वसामान्यांच्या माथी मारलेले आहेत. हे ‘हाय प्रोफाईल’ उत्सव सर्वसामान्यांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करण्यासाठीच आहेत की काय, याची शंका येते. ‘वेळ अमावस्या’ सणाच्या साजरेपणावरून ही बाब अधोरेखित होते. मूळ कर्नाटकी बाज असलेला आणि महाराष्ट्रातील सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या भागामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा होणारा सण म्हणून ‘वेळ अमावस्या’ या सणाचा उल्लेख केला जातो. अमावस्या ही खर तर अशुभ मानली गेलेली आहे. परंतु याच दिवशी सण साजरा केला जात असेल, तर मग अमावस्येची चिकित्सासुध्दा करणं गरजेचं आहे. अमावस्येच्या बदनामीला तथाकथित सुशिक्षितच कारणीभूत आहेत, हे ‘वेळ अमावस्या’ या सणाच्या साजरीकरणातून जाणवते. सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीसुध्दा जाणीवपूर्वक हा दिवस टाळला जातो. सध्या तर शिक्षण क्षेत्रसुध्दा अमावस्येला बदनाम करत सुटलेलं आहे. दहावी, बारावी अथवा इतर कोणत्याही महत्त्वपूर्ण परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी शुभ दिवसच ठरवला जातो आणि विशेष म्हणजे अमावस्या जाणीवपूर्वक टाळलीच जाते. राजकारण्यांचं सोडा; आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेचं हित पाहिलं तर बरं होईल! ज्यांनी अमावस्या कशी होते, हे शिकवण्याची गरज आहे, तेच शिक्षण क्षेत्रातील रथी-महारथी अमावस्या पाळायला सांगत असतील, तर मग समाज पुढे जाणार कसा? या पार्श्वभूमीवर ‘वेळ अमावस्या’ सणाचं महत्त्व पुरोगामीपणाचं ठरतं. ती साजरी करणारा महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर हा भाग तर फारच पुरोगामी म्हणावा लागेल.

मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येदिवशी हा सण साजरा केला जातो. ही अमावस्या ‘दर्शवेळ अमावस्या’ म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द ‘येळ्ळ अमावस्या’ हा आहे. कर्नाटकमध्ये पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे ‘येळ्ळ अमावस्या.’ याचा अपभ्रंश होऊन ‘वेळ अमावस्या’ शब्द रूढ झाला. ‘येळ अमोश्या’, ‘एलामास’, ‘येळी अमावस्या’, ‘येळवस’ अशा विविध उच्चारानेे सुध्दा हा सण उल्लेखला जातो. कानडी शब्द ‘येळ्ळ’ म्हणजे सात.

वेळ अमावस्येदिवशी सकाळी लवकर उठून शेतकरी आपल्या घरातील परिवारासह शेताकडे जातात. अगोदरच्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणार्‍या सर्व पिकांची व मातीपासून बनवलेल्या पांडवांची म्हणजे पंचमहाभूतांची पूजा करतात. या पूजेला पुरोहित किंवा भटजी नसतो, हे आणखी एक वैशिष्ट्य. नाही तर तुळशीचं लग्न लावायला सुध्दा हल्ली भटजीला डिमांड आलेलं आहे. अर्थात, भटजी फुकट येत नाही! विनाभटजी किंवा विनापुरोहित ही पूजा असल्यामुळे दान देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आर्थिक शोषणापासून वंचित असलेली ही पूजा घरातील वडीलधारी स्त्री-पुरुष मंडळीच करतात. त्या पूजेतही फारस अवडंबर असत नाही. या पूजेअंतर्गत शेतामध्ये चूल करून एका मडक्यामध्ये दूध तापवत ठेवले जाते. मडक्यातील दूध ज्या दिशेने ऊतू जाईल, त्या दिशेला चांगला पाऊस पडतो आणि पीक जोमात येते, ही एक अंधश्रध्दा यापाठीमागे आहे. प्रत्येकाच्या शेतातील दूध ऊतू जाण्याची दिशा वेगवेगळी असणं स्वाभाविक आहे. दूध ऊतू गेलेल्या दिशेला पीक जोमात येणं, ही एक अंधश्रध्दा असली तरी ती फार धोकादायक आहे, असं मात्र नाही. त्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागते, अशातलाही भाग नाही. शेतकरी वर्गाने अमावस्या साजरी करण्याच्या तुलनेत ही अंधश्रध्दा नगण्यच म्हणावी लागेल.

हुलगे हुलगे पावन पुलगे

होलग्या होलग्या सालन पलग्या

चांगो चांगभलं, पाऊस आला घरला चला

या व अशा उच्चाराने शिवार दुमदुमून जाते. एका रंगवलेल्या माठामध्ये अंबील भरून त्याचा गावातील ग्रामदेवास नैवेद्य दाखवून शेतात कोपीवर आणले जाते. ज्वारी व बाजरीचे उंडे, अंबील, भात, तिळगूळ, शेंगदाण्याची गोड पोळी, ज्वारी व बाजरीची भाकरी, धपाटे, सर्व भाज्यांपासून तयार केलेली भज्जी, खीर अशा एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो. भज्जी हा प्रकार तर विलक्षणच आहे. भज्जी म्हणजे तळलेली भजी नव्हेत, तर सर्व भाज्यांनी मिळून बनलेली भाजी. संक्रांतीच्या वेळी असलेली; भोगी पण नव्हे. तूर, हरभरा, वरण्याच्या शेंगा, मेथी, कांद्याची पात, वाटाणा, डाळीचं पीठ, कोवळी चिंच, शेंगदाणे आदींपासून तयार झालेली भाजी म्हणजेच भज्जी. अत्यंत चवीने खाल्ली जाणारी ही भाजी. ताकात ज्वारीचं पीठ कालवून केलेलं अंबील म्हणजे मठ्ठ्यासारखा स्वाद देणारा हा प्रकार, तर माठ भरूनच तयार केलेला असतो. दिवसभर त्याचा आस्वाद घेण्यातच वेळ कधी जातो, हे समजतसुध्दा नाही. येणार्‍या मित्रमंडळींनाही त्याचा लाभ दिला जातो. बनविलेल्या सर्व पदार्थांचा आस्वाद वनभोजनाच्या रूपात घेतला जातो. सणानिमित्त एकमेकांना जेवणासाठी आमंत्रणे दिली जातात. ज्यांना शेती नाही, अशांना आवर्जून जेवायला शेतात बोलावले जाते; किंबहुना बहुतेक जण न बोलवताही जेवणाला हजेरी लावतात, हे विशेष. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणीच असते. या दिवशी शहरात तर अघोषित संचारबंदीच असते. काश्मीरमध्ये जसा कर्फ्यू असतो, तसाच काहीसा प्रकार; फक्त सैनिकांशिवाय एवढं मात्र नक्की! काश्मीरमध्ये कर्फ्यू लावण्यासाठी किती खर्च येत असेल, याचं गणितच न केलेलं बरं. या भागातील शहरे व खेडी अक्षरश: ओस पडलेली असतात. सत्तेच्या बेधुंद दडपशाहीशिवाय, हे विशेष. शेतं मात्र माणसांनी व आनंदाने हर्षोल्हासित झालेली असतात. वाचकांना ही अतिशयोक्ती वाटेल; पण हे वास्तव आहे, हे मात्र नक्की. महाराष्ट्रातील संपन्न असलेल्या भागामध्ये यात्रा/जत्रांच्या वेळी मांसाहारी जेवणासाठी प्रचंड गर्दी करणारा वर्ग जसा खेड्याकडे मिळेल त्या वाहनातून हजेरी लावत असतो, तव्दतच वेळ अमावस्येच्या शाकाहारी जेवणासाठी लहान-थोर सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या भागातील शेतामध्ये हजेरी लावत असतात. शेतकरी वर्गाशी नातं सांगणारा हा सण विलक्षणच म्हणावा लागेल.

दिवाळीला फटाक्यांच्या आतषबाजीतून वातावरण प्रदूषित करणारा, गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीतून ध्वनिप्रदूषण करणारा आणि रंगपंचमीच्या माध्यमातून पाणी प्रदूषित करून निसर्गाची हानी करणार्‍या अनेकविध सणांपेक्षा हा एक वेगळाच सण आहे! माणसाला निसर्गाजवळ घेऊन जाणारा, त्याचे निसर्गाशी घट्ट नाते विणणारा, काळया आईशी म्हणजे मातीशी एकरूप होणारा आणि शेतीला मान देणारा हा सण! कापणीसाठी आलेली तूर, परिपक्व होऊन लगडलेला हरभरा, हवेच्या तालावर नाचणारा गहू, पाखरांना खुणावणारी ज्वारी, असा चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग! अशा वातावरणात ऊन, वारा, पाऊस या निसर्गशक्तीसमोर नतमस्तक होऊन केलेली ही पूजा म्हणजे शेतकरी व निसर्गाची शतकानुशतके चालत आलेली भागीदारीच दर्शविते. कन्नड संस्कृतीशी नाते सांगणारा आणि प्रांतवादाच्या पलिकडे घेऊन जाणारा उत्सव असंच याचं वर्णन करावं लागेल. संस्कृती कोणतीही असो, तिचा उद्देश निसर्गाशी नाते सांगणे, माणसाला माणूसपण देणे, प्राणिमात्रांशी हितगुज साधणे हा असतो. बहुसंख्यजण माझीच संस्कृती महान अशा वल्गना करत इतरांच्या संस्कृतीची हेटाळणी करतात. हे वागणं बरं नव्हे. सरकारी पातळीवरसुध्दा या सणाला मान दिला जातो. शासकीय सुट्टी या सणानिमित्त दिली जाते. व्यापारी वर्ग तर आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवतात. मला वाटतं, अमावस्येला केलेला हा मानाचा मुजराच होय.

सन 2019 मध्ये ‘वेळ अमावस्या’ हा सण दि. 25 डिसेंबर रोजी साजरा केला गेला आणि विशेष म्हणजे या दिवशी सूर्यग्रहण होते. यापेक्षाही हे ग्रहण हे अतिशय दुर्मिळ असलेले ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ होते. तमाम भारतीयांनी या ग्रहणाचा लाभ 26 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत घेतला. सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येलाच होते. याचाच अर्थ यावर्षीची ‘वेळ अमावस्या’ सूर्यग्रहणादिवशी आलेली होती. तथाकथित सुशिक्षितांच्या द़ृष्टीने सूर्यग्रहणाचा दिवस हा तर सर्वांत वाईट दिवस असतो. परंतु कोणतीही आडकाठी न येता सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूरकरांनी तो दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यापेक्षा ग्रहणाचं वेगळं वैशिष्ट्य काय असू शकतं? ग्रहणात खाण्या-पिण्याला मनाई करणार्‍या आणि गरोदर स्त्रीला ग्रहण पाळावयास लावणार्‍या धर्ममार्तंडांना सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूरकरांनी दिलेली ही चपराकच म्हणावी लागेल. या भागातील तमाम स्त्री-पुरुषांनी, छोट्या बालकांसह; आणि विशेष म्हणजे गरोदर स्त्रियांसह वेळ अमावस्येच्या जेवणावर यथेच्छ ताव मारलेला असणार, यात तिळमात्रही शंका नाही. तथाकथित संस्कृतीरक्षकांनी वेळ अमावस्येचं महत्त्व जाणलं तर बरं होईल. सन 2020 मध्ये ही अमावस्या दि. 14 डिसेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. यामध्ये निश्चितच सामील होण्याची नितांत गरज आहे. अमावस्या या बदनामीला बळी पडलेल्या अंधश्रध्देला मूठमाती देण्यासाठी.

अमावस्येचा छत्रपती शिवाजी महाराजांनी तर अत्यंत चाणाक्षपणे वापर करून घेतलेला आहे. आपल्या सैन्याची संख्या तुलनेने कमी असल्यामुळे शत्रूपक्षावर स्वारी करण्यासाठी अमावस्याच उपयुक्त ठरू शकते, हे त्यांनी जाणले आणि शत्रूपक्षाला नामोहरम केले. शिवाजी महाराजांनी अमावस्या अशुभ मानली असती तर कदापिही हे शक्य झाले नसते. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर धार्मिक आणि सांस्कृतिकतेच्या अंगाने करणार्‍यांनी त्यांच्या पुरोगामीपणाचा बाज ओळखावा. आपण स्वत:ला शिवाजी महाराजांचे शिलेदार समजत असू, तर अमावस्येला तुच्छ लेखण्याची भाषा आपल्या तोंडी शोभत नाही.

अमावस्या आणि पौर्णिमा या प्रत्येक महिन्यात येणार्‍या खगोलीय आविष्कारांची सांगड भारतीय समाजामध्ये धार्मिकतेशी जोडण्यात आलेली आहे. त्यामुळे हे आविष्कार कसे होतात? का होतात? याची कोणतीही कारणमीमांसा न करता त्याच्याशी संबंधित कर्मकांड करण्यास प्राधान्य दिले जाते. वेळ अमावस्या मात्र त्याला अपवाद आहे.

अमावस्या

पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा वेगवेगळ्या पातळीत आहेत. त्या एकमेकांना पाच अंशाचा कोन करतात. अमावस्येला सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो; पण ते तिघेही एका रेषेत नसतात. चंद्र हा पाच अंशाने वर उचललेला असतो. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो. तिथून परावर्तित झालेला प्रकाश पृथ्वीवरील अंधार्‍या भागामध्ये येऊ शकत नाही; परिणामी रात्रीच्या वेळी आकाश पूर्णपणे काळेकुट्ट दिसते. पूर्ण अंधाराचे साम्राज्य रात्रीच्या वेळेस पृथ्वीवर पसरते. प्रचंड अंधार असल्यामुळे वाहनांचे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. वाहन चालवताना काळजी घेणे हा त्यावरचा उपाय! वाहनाला नारळ फोडून अपघात टळणार नाही, हे शिकलेल्यांच्या डोक्यात कधी शिरणार?

पौर्णिमा

पौर्णिमेला सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते; पण तिघेही एका रेषेत नसतात. चंद्र हा पाच अंशाने वर उचललेला असतो. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो. चंद्रावरून प्रकाश परावर्तित होऊन पृथ्वीवरील अंधार्‍या भागामध्ये रात्रीच्या वेळी येऊ शकतो. त्यामुळे रात्रीही प्रकाश दिसतो. त्यालाच ‘चांदणं पडलं’ असे म्हणतात. खरं तर तो चंद्रावरून आलेला सूर्यप्रकाशच असतो. परंतु वस्तुस्थिती विसंगत असणारे वाक्यप्रचार समाजात आजही प्रचलित आहेत.

स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारेही अमावस्येला कामाचा शुभारंभ करीत नाहीत. पौर्णिमाच फक्त चांगली आणि अमावस्या वाईट, असे समजायचे काहीच कारण नाही. प्रत्येक दिवस हा चांगलाच असतो. तो महत्त्वपूर्ण करण्यासाठी आपल्याला निसर्गाच्या मदतीने प्रयत्न करावा लागेल, हे मात्र नक्की. या संदर्भातील भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे उदाहरण फार महत्त्वाचे आहे. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांनी स्वातंत्र्य जाहीर केल्यानंतर 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री 12 वाजता नेहरू ते स्वातंत्र्य स्वीकारणार होते. पण भारताने रात्री 12 वाजता स्वातंत्र्य स्वीकारू नये, असे अनेक धर्मपंडितांचे मत होते. कारण त्या दिवशी अमावस्या होती. वैज्ञानिक द़ृष्टिकोनाचे पुरस्कर्ते असलेले पंडित नेहरू म्हणाले, ‘आज स्वातंत्र्य स्वीकारले नाही, तर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलेले आहे. त्यांच्या हौतात्म्याशी ही प्रतारणा ठरेल. हुतात्मे अमावस्या बघून झालेले नाहीत. अमावस्या असो अथवा काहीही असो स्वातंत्र्य रात्री 12 वाजता स्वीकारले जाईल.’ पंडित नेहरूंनी अमावस्येदिवशीच भारताचे स्वातंत्र्य स्वीकारले. आजचे राजकारणी, मंत्रिमहोदय असा पुरोगामी विचार ज्या दिवशी करतील, तो सुदिन ठरेल, हे निश्चित.

एका आगळ्या-वेगळ्या सणांची माहिती लेखाच्या स्वरूपामध्ये देण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, लातूर शाखेचे उत्तरेश्वर बिराजदार, अनिल आणि ॠषी दरेकर, माधव बावगे, प्रकाश घादगिने, बाबा हलकुडे, अ‍ॅड. मनोहरराव गोमारे, वसंत गुंड, सुधीर भोसले, वडजे सर, हणमंत आणि सुरेखा मुंडे, रूक्साना आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मनापासून आभार! मुख्य म्हणजे येळ अमावस्येच्या जेवणाचा आस्वाद देणार्‍या रेखा बिराजदार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे विशेष आभार आणि कौतुक!


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]