कार्यकर्ते डॉ. लागू

राहुल थोरात - 9422411862

नव्वदच्या दशकात अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात पोचविण्याचे श्रेय निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू या जोडगोळीला जाते. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी निळूभाऊ आणि डॉ. लागू यांच्या प्रसिध्दिवलयाचा वापर करून ग्रामीण भागात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शेकडो कार्यक्रम घेतले. या प्रसिद्ध व्यक्तींना बघण्यासाठी गर्दी व्हायची आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर त्या गर्दीला आपला अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार सांगायचे. निळूभाऊंची ‘क्रेझ’ ग्रामीण भागात अधिक होती; तर डॉ. लागूंची ‘क्रेझ’ शहरी भागात होती. त्यामुळे दोन्ही ठिकाणचा प्रेक्षकवर्ग अंधश्रद्धा निर्मूलन सभेचा श्रोता म्हणून जमायचा.

डॉ. दाभोलकरलागू वादसंवाद कार्यक्रम

डॉ. श्रीराम लागू हे प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी होते. त्यांची ‘देवाला रिटायर करा’ ही भूमिका होती; तर दाभोलकरांची भूमिका होती की, राज्यघटनेने सर्वांना उपासना स्वातंत्र्य दिले असल्यामुळे आमचा देवा-धर्माला विरोध नाही, तर देवा-धर्माच्या नावाने होणार्‍या शोषणाला आहे. एकदा चिपळूण येथे डॉ. श्रीराम लागू यांची डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी मुलाखत घेतली. डॉ. लागूंनी त्यांच्या रोखठोक व तर्कसुसंगत शैलीत देवाबद्दलची मते मांडली. ही मुलाखत खूप गाजली. त्यावेळेला ते म्हणाले की, सवड मिळाली तर महाराष्ट्रभर ही माझी मते जाहीरपणे मांडण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी भरपूर शिव्या खाण्याचीही तयारी मी ठेवली आहे.

त्यानंतर दाभोलकरांनी ‘वाद-संवाद’ या कार्यक्रमाची आखणी संपूर्ण महाराष्ट्रभर केली आणि विवेकजागराचा हा ‘वाद-संवाद’ महाराष्ट्रभर झडत राहिला. या विवेकजागराचे शेकडो कार्यक्रम ‘अंनिस’ च्या कार्यकर्त्यांनी गावोगावी लावले. या कार्यक्रमाचा उपयोग संघटनेला अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम वाढण्यासाठी झाला. या कार्यक्रमात अनेकदा धर्मांध संघटनांनी गोंधळ घातला. एका ठिकाणी तर डॉ. लागू आणि दाभोलकरांच्यावर हल्ला केला गेला, तरीही लागू डगमगले नाहीत. त्यांनी निर्भयपणे हे कार्यक्रम महाराष्ट्रभर केले.

कार्यकर्त्यांच्या घरी डॉ. लागूंच्या गृहभेटी

डॉ. श्रीराम लागू आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हे ‘वाद-संवाद’ कार्यक्रमासाठी गावोगावी फिरत होते. ज्या गावामध्ये कार्यक्रम आहे, त्या गावातील ‘अंनिस’ कार्यकर्त्याच्या घरी डॉ. लागूंचा नाश्ता, जेवण होत असे. एवढा मोठा कलाकार असूनही त्यांनी कधी खाण्या-राहण्याची कोणतीही अट न घालता कार्यकर्त्याने जी सोय केली असेल, त्यात ते आनंद मानत. डॉ. दाभोलकर मुद्दामहून लागूंना ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या घरी घेऊन जात. त्यावेळी लागू ‘अंनिस’ कार्यकर्त्याच्या सामाजिक कामाचे कौतुक त्याच्या कुटुंबासमोर करत, कुटुंबासोबत फोटो काढत. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींना कार्यकर्त्याच्या कामाबद्दल आणखी आदर निर्माण होत असे. डॉ. लागूंच्या गृहभेटीमुळे कार्यकर्त्याचे कुटुंब उत्साहित होत असे. त्यामुळे कार्यकर्त्याला ‘अंनिस’ चे काम करण्यात अधिक मोकळीक मिळत असे.

अंनिस’ च्या अधिवेशनास उपस्थिती

दर दोन वर्षांनी ‘अंनिस’ची राज्यस्तरीय अधिवेशने महाराष्ट्रातील विविध भागात होत असत. त्यावेळी प्रत्येक अधिवेशनाला डॉ. लागूंची उपस्थिती असायची. कितीही लांबचा प्रवास असला, तरी ते संघटनेच्या प्रेमाखातर पदरमोड करून येत असत. त्यांनी कधीही ‘अंनिस’ कडून प्रवासखर्चासाठी एक रुपयाही घेतला नाही; मानधनाचा तर विषयच नसे. अधिवेशनास ते आल्यानंतर कार्यकर्ते त्यांच्याकडे एक सेलिब्रेटी म्हणून न पाहता एक प्रखर बुद्धिवादी विचारवंत म्हणून पाहत असत. कार्यक्रमात तेही एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून वावरत असत. कोणत्याही व्ही.आय.पी. ट्रिटमेंटची त्यांना अपेक्षा नसे. इतर वक्त्यांची भाषणे ते लक्षपूर्वक आणि वेळ काढून ऐकत.

‘अंनिस’ च्या विविध अधिवेशनांत ते आपल्या बुद्धिवादी व नास्तिक भूमिकेचे अत्यंत अभ्यासपूर्ण समर्थन करीत असत. ते म्हणत की, माणसाचा मेंदू अजूनही 80 टक्के जनावराचाच आहे, त्यामुळे माणूस हिंसा करतो, मत्सर करतो आणि बिनडोक वागतो. डॉ. लागूंचे भाषण ऐकताना कार्यकर्ते मंत्रमुग्ध होत. डॉ. लागू दिलेल्या वेळेतच भाषण संपवत. हा एक त्यांचा गुणविशेष होता.

अंनिस’ मुळे लागूंना प्रथमच तुरुंगवारी

शनि शिंगणापूर येथील चौथर्‍यावर महिलांना प्रवेश दिला जात नाही. त्याविरोधात स्त्री-पुरुष समतेच्या आग्रहासाठी डॉ. दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली ‘अंनिस’ ने राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन छेडले. ‘महिलांना घेऊन शनि मंदिरात प्रवेश करणार,’ अशी घोषणा दाभोलकरांनी केली. यासाठी ’अंनिस’ चे शेकडो कार्यकर्ते अहमदनगर येथे एकवटले. तेथील एका मंगल कार्यालयात जाहीर सभा झाली. या सभेमध्ये ‘अंनिस’ चे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील, डॉ. बाबा आढाव, प्रा. पुष्पा भावे, व्यंकट अण्णा रणधीर असे अनेक मान्यवर सहभागी झाले. या सभेनंतर शनि शिंगणापूरकडे सर्वांनी कूच करण्याचे ठरले. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचे कारण देऊन सत्याग्रह आंदोलनास परवानगी नाकारली. परंतु सत्याग्रही महिलांना शनि शिंगणापूरला घेऊन जाणारच, यावर ठाम होते. वरील मान्यवरांची पहिली तुकडी शनि शिंगणापूरकडे जाण्यासाठी सभागृहातून बाहेर पडली. त्यांना पोलिसांनी लगेच अटक करून न्यायालयासमोर नेले. सर्व सत्याग्रहींनी जामीन नाकारला. त्यामुळे नाईलाजास्तव सर्वांना पोलीस नगरच्या तुरुंगात घेऊन गेले. ‘अंनिस’ च्या या आंदोलनामुळे डॉ. लागूंना तुरुंगवारी घडली. डॉ. लागूंना तुरुंगात पाहून कैद्यांना वाटले की, आज तुरुंगात कोणत्या तरी चित्रपटाचे शूटिंग असावे, तेथील तुरुंग अधिकार्‍यांना मान्यवरांच्या सोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

प्रसिद्धीच्या शिखरावर असणार्‍या माणसाने चळवळीसाठी तुरुंगवारीचा मार्ग पत्करणे, हे लागूंचे मोठेपण आहे. प्रसिद्धीच्या झोतात असणारी काही माणसे फक्त ‘बोलके’ सुधारक असतात. ते शक्यतो आंदोलनाच्या भानगडीत पडत नाहीत; पण डॉ. लागू हे चळवळीसाठी, स्त्री-पुरुष समतेच्या आग्रहासाठी तुरुंगात जाणारे कर्तेसुधारक होते. अशा माणसामुळेच ‘अंनिस’ ची जनमानसातील प्रतिमा अधिकच उजळ होत असते.

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मानधनासाठी धडपड

महाराष्ट्रामध्ये विविध पुरोगामी चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्त्यांना काही अल्प मानधन देता यावे, म्हणून एक मोठा निधी उभा करण्यासाठी ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ या संस्थेची स्थापना झाली. तिच्या पहिल्याच अध्यक्षपदी डॉ. श्रीराम लागू, तर सचिवपदी डॉ. दाभोलकर होते. या संस्थेसाठी निधी उभारण्यासाठी डॉ. लागूंसह निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, रीमा लागू, रोहिणी हट्टंगडी या कलाकारांनी विनामानधन ‘लग्नाची बेडी’ हे नाटक सर्व महाराष्ट्रभर केले. या नाटकाचा फायदा या निधीसाठी दिला, तरीही या निधीला अजून पैशाची गरज होती, म्हणून डॉ. दाभोलकरांनी शाळेतील विद्यार्थ्यांकडून निधी संकलन करण्याची कल्पना मांडली. या कार्यक्रमाला ‘एक उपवास कृतज्ञतेचा’ हे नाव दिले. विद्यार्थ्यांनी एक वेळ उपवास करून त्यातून वाचलेले पाच रुपये या निधीसाठी द्यावेत, अशी ही कल्पना होती. यासाठी डॉ. लागूंना घेऊन दाभोलकरांनी सातारा जिल्ह्यातील सहाशे मुख्याध्यापकांची बैठक बोलावून या कामासाठी राजी केले. डॉ. लागू या बैठकीला उपस्थित राहिल्यामुळे सर्व मुख्याध्यापकांनी हे काम आनंदाने करण्याचे ठरविले आणि राज्यातून त्याकाळी चक्क 25 लाखांचा निधी जमा झाला. आपल्या प्रसिध्दिवलयाचा उपयोग सामाजिक कामासाठी करू देणारे लागू हे एक आमच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते.

लागूंच्या हस्ते सत्यशोधकी लग्ने

महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या ‘सत्यशोधक विवाहा’ची चळवळ ‘अंनिस’ ने पुन्हा एकदा महाराष्ट्रात पुनरुज्जीवित केली. ‘अंनिस’ च्या शेकडो कार्यकर्त्यांचे आणि कार्यकर्त्यांच्या मुलांचे विवाह कोणतेही धार्मिक विधी न करता साध्या पद्धतीने होत असत. या विवाहामध्ये वधू-वरांना समतेने सहजीवन जगण्याची शपथ दिली जात असे. ही शपथ डॉ. लागू किंवा निळूभाऊंच्या हस्तेच द्यावी, असा आग्रह कार्यकर्ते डॉ. दाभोलकरांच्याकडे करत. दाभोलकरही अशा विवाहांसाठी डॉ. लागू आणि निळूभाऊंना महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांत घेऊन जात. नेवाश्याचे आमचे कार्यकर्ते बाबा आरगडे यांच्या मुलाच्या लग्नात वधू-वरांना शपथ डॉ. लागूंनीच देऊन या विवाहाचे पौरोहित्य केले. त्यावेळेला ते गमतीने म्हणाले की, मी पौरोहित्य करून लुबाडणारा ब्राह्मण नाही, एका नास्तिक माणसाला तुम्ही अशी धार्मिक कामे करायला लावता, हे बरे नाही; परंतु अशी लग्ने महात्मा फुलेंनी सांगितलेल्या सत्यशोधक पद्धतीने होत आहेत, त्यामुळे मी हे पौरोहित्य आनंदाने करतोय.

अंनिस’ च्या वतीने आगरकर पुरस्कार

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दरवर्षी एका मान्यवरांना ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार देऊन गौरविते. डॉ. लागू यांच्यावर आगरकरांचा मोठा प्रभाव होता. ‘इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार, ’ हा आगरकरी विचारांचा बाणा डॉ. लागूंच्याही व्यक्तिमत्त्वात होता. डॉ. लागू नेहमी आपल्या भाषणात आगरकरांच्या अनेक उतार्‍यांचा संदर्भ देऊन धर्मसत्तेच्या शोषणाला विरोध करीत. आगरकरांचे बुद्धिप्रामाण्यवादी विचार मनोमन जगत होते. त्यामुळेच सन 2012 सालचा ‘महाराष्ट्र अंनिस’ चा आगरकर पुरस्कार डॉ. लागूंना प्रा. एन. डी. पाटील यांच्या हस्ते व डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथे दिला गेला. त्यावेळी डॉ. लागूंनी आगरकरांच्यावर केलेले भाषण अत्यंत अभ्यासपूर्ण होते.

अंनिस’ कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेले ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ हे मासिक गेली 30 वर्षे सांगलीतून प्रसिद्ध होत असते. ते महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून आजही प्रसिद्ध आहे. याचे वर्गणीदार करण्याचे काम ‘अंनिस’ चे कार्यकर्ते विनामोबदला करीत असतात. शंभर वर्गणीदार करणार्‍या कार्यकर्त्यांचा गौरव डॉ. दाभोलकर हे निळूभाऊ आणि डॉ. लागू यांच्या हस्ते दरवर्षी करत असत. कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यासाठी डॉ. लागू येत असत. यावेळी जवळजवळ 50-60 कार्यकर्त्यांचा गौरव करण्यासाठी डॉ. लागू हे तास-दीड तास मंचावर उभे राहून न थकता कार्यकर्त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करत असत. त्यावेळी ते म्हणायचे की, तुम्ही कार्यकर्ते मासिकाचे वर्गणीदार करण्याचा नॉन-रिवॉर्डिंग जॉब करता आहात, याबद्दल मला तुमचा आदर आहे. डॉ. लागूंच्या हस्ते सत्कार केल्यानंतर कार्यकर्ते उत्साहित होत आणि नेटाने अजून वर्गणीदार करण्याची त्यांना प्रेरणा मिळत असे.

युवकांच्या हाती ‘अंनिस’ ची चळवळ

डॉ. दाभोलकरांच्या वयाला 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. संघटनेचे पुढील काम कोणीतरी नव्या दमाच्या तरुणाने करावे, अशी त्यांची इच्छा होती म्हणून ‘अंनिस’ नं पूर्णवेळ युवा कार्यकर्ते अविनाश पाटील यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड केली. ’अंनिस’ ची चळवळ युवकांच्या हाती देण्याचा एक प्रतीकात्मक कार्यक्रम दाभोलकरांनी महात्मा फुलेंच्या वाड्यात आयोजित केला. युवकांच्या हाती चळवळ देणे, ही कल्पना डॉ. लागूंना भयंकर आवडली. ते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विचारांची प्रतीकात्मक मशाल ’अंनिस’ च्या तरुण कार्यकर्त्यांच्या हातात त्यावेळी दिली गेली.

कार्यकर्त्यांच्या लिखाणाचे लागूंकडून कौतुक

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे ते नियमित वाचक होते. दर महिन्याचा अंक ते काळजीपूर्वक वाचत असत. त्यातील आवडलेल्या लेखांच्या प्रतिक्रिया ते दाभोलकरांच्याकडून पोचवत. ‘अंनिस’ चे कार्यकर्ते आणि खगोल अभ्यासक प्रा. नितीन शिंदे यांनी विश्वाची निर्मिती आणि फलज्योतिषाचा फोलपणा दाखवणारे ‘सफर विश्वाची’ हे पुस्तक लिहिले, ते त्यांनी डॉ. लागूंना पाठवून दिले. ते संपूर्ण पुस्तक डॉ. लागूंनी वाचून प्रा. शिंदेंना फोन केला. फलज्योतिषासारखा किचकट विषय सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल प्रा. शिंदेंचे त्यांनी कौतुक केले. जवळजवळ तासभर ते फोनवर बोलत होते. अशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या लिखाणांचे कौतुक करून त्यांना प्रेरणा देणारे डॉ. लागू होते. डॉ. लागूंनी लिहिलेल्या ‘वाचिक अभिनय’ या पुस्तकाची सगळी ‘रॉयल्टी’ अंधश्रद्धा निर्मूलन समितीला त्यांनी दिली आहे. ‘अंनिस’ च्या अनेक कार्यकर्त्यांच्या आजारपणात त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या सन 2015 च्या दिवाळी अंकात डॉ. ठकसेन गोराणे यांना दिलेल्या मुलाखतीत डॉ. लागू म्हणतात की, ‘विवेकवादी व्हा!’ बस्स! समाज अतिशय दैववादी आहे, धर्मवेडा आहे, धर्मभाबडा आहे. आपण ‘धर्म’ ज्याला म्हणतो, तो धर्म काय आहे? भारतीय समाजामध्ये ‘धर्म’ हा शब्द आपण फार व्यापक अर्थाने वापरतो. तहानलेल्यांना पाणी पाजणे, शरणागतांना अभय देणे, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणे, हा माझा रोजचा धर्म आहे. त्याच्यामध्ये परमेश्वराचा संबंध येतो कुठे? माझा विवेकवाद मला माझ्या आयुष्यातील चांगल्या-वाईट प्रसंगांना तोंड द्यायला पुरेसा आहे. स्वतंत्र बुद्धीने मी विचार करू शकतो, हे गेल्या चारशे वर्षांमध्ये ‘विज्ञान’ नावाच्या शक्तीने दाखवून दिले आहे.

डॉ. लागूंचा हाच वैचारिक वारसा पुढे घेऊन जाणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]