भूतबाधा उतरविण्याच्या बहाण्याने चौघींवर मांत्रिकाचा बलात्कार

गौरव आळणे - 8600145219

कुटुंब दहशतीत… ‘फास्ट कोर्ट’मध्ये केस चालवण्याची नागपूर अंनिसची मागणी

अंधश्रद्धेचा, धार्मिक भावनेचा; तसेच कमकुवत आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन मांत्रिक धर्मेंद्र विठोबा निनावे ऊर्फ दुलेवाले बाबा (वय 50, रा. आंबेनगर, अनिकेत डेकोरेशनच्या मागे, पारडी, नागपूर) या नराधम मांत्रिकाने भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने 17 वर्षीय बारावी विज्ञान शाखेत शिकणार्‍या पीडित विद्यार्थिनीसह 46 वर्षीय आई, 32 वर्षीय मामी तर 60 वर्षीय आजी या चारही महिलांवर मागील सात महिन्यांपासून संधी मिळेल तेव्हा अनेकदा बलात्कार केला.

या खळबळजनक किळसवाण्या घटनेमुळे नागपूर शहरच नव्हे; तर अख्ख्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे कृत्य एका मांत्रिकाने केले आहे.

भूतबाधा नाहीशी करण्याच्या बहाण्याने मांत्रिकाने पीडितेच्या वडिलांशी मैत्री करून त्याच्या घरात प्रवेश केला. पीडितेचा वडील आर्थिक परिस्थितीमुळे ग्रस्त होता; त्यातच मुलीची प्रकृती बरी नसल्यामुळे चिंताग्रस्तही. याचा गैरफायदा घेत मांत्रिक धर्मेंद्र निनावे 17 मे रोजी पीडित मुलीच्या घरी आला व ‘तुमच्या घरात भूतबाधा झाली आहे, मोठे संकट येणार आहे. वेळीच पूजा न केल्यास भूत अनेकांचा बळी घेईल,’ अशी भीती दाखविली. यामुळे पीडित मुलीचे वडील पार घाबरून गेले. त्यांनी धर्मेंद्रला उपाय विचारला. त्यावर ‘21 दिवसाची पूजा करावी लागेल,’ असे धर्मेंद्रने मुलीच्या वडिलांना सांगितले. धर्मेंद्रने 21 दिवसांच्या पूजेचा खर्च एक ते दीड लाख रुपये सांगितला व सतत रकमेची मागणी करू लागला.

आरोपी महेंद्र निनावे (दुलेवाले) हा पारडी भागात राहतो. त्याच भागात पीडित परिवारही राहतो. 17 वर्षीय पीडित मुलगी बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे. पीडितेच्या वडिलांची आरटीओ दलालाच्या व्यवसायामुळे मांत्रिक महेंद्र निनावे सोबत जुनी मैत्री होती.

या मैत्रीच्या नात्यामुळे तो अधून-मधून कुटुंबातील सदस्यांना अंगारे-धुपारे करायचा. कोरोनाच्या काळात, मे 2020 दरम्यान पीडित मुलीची प्रकृती वारंवार बिघडत होती, त्यावेळी खाजगी दवाखाने बंद असल्यामुळे मेडिकल स्टोअरमधून गोळ्या घेऊन तिचे कुटुंब तिच्यावर औषधोपचार करत होते.

एके दिवशी आरोपी निनावेने त्यांना काय प्रॉब्लेम आहे, अशी चौकशी केली. पीडित मुलीची प्रकृती वारंवार बिघडत असल्याने तिला आपल्या दरबारात आणायला सांगितले. त्यामुळे मुलीचे आई-वडील तिला मांत्रिक निनावेच्या घरी घेऊन गेले. उपचारांकरिता निनावेने पीडितेला स्वतःच्या घरी 21 दिवस ठेवून घेतले. त्याने अंगात आल्याचा बहाणा करून मुलीला भयंकर भूतबाधा झाल्याचे सांगितले. त्यानंतर अंगारे-धुपारेसोबत गुंगीचे औषध देऊन रात्रीच्यावेळी निर्जन ठिकाणी नेऊन तो विधीच्या नावाखाली पीडित मुलीवर बलात्कार करू लागला. ‘तुझ्या अंगातील भूत पळवायचे आहे. त्यामुळे तू कुणाला या विधीबद्दल सांगितले तर तुझ्या कुटुंबातील सर्व जणांना भूत ठार मारेल,’ अशी भीती घालून त्याने मुलीला गप्प केले. हे करतानाच त्याने मध्यंतरी एक दिवस पीडितेच्या आईवरही बलात्कार केला. तिलाही भूत ठार करेल, अशी भीती दाखवून गप्प केले. कधी आरोपी स्वतःच्या घरी, तर कधी पीडितेच्या घरी, तर कधी घराबाहेर नेऊन दुष्कृत्य करायचा. असेच एका दिवशी त्याने पूजेच्या नावाखाली बाजूलाच राहणार्‍या मुलीच्या मामीच्या घरी जाऊन तिच्यावरही बलात्कार केला. एवढेच नाही, तर पीडितेच्या 60 वर्षीय आजीसोबतही त्याने तोंड काळे केले.

असा फुटला पापाचा घडा

डिसेंबरच्या शेवटपर्यंत त्याचे हे कुकर्म सुरू असताना चौघीही लाजेखातर एकमेकींना झालेला प्रकार सांगत नव्हत्या. मात्र एक दिवस मांत्रिक निनावे बलात्कार करताना दुसरीला दिसला. ते बघून दुसरीने आपल्यासोबतही असेच दुष्कृत्य केल्याचे पहिल्या पीडितेला सांगितल्यानंतर मामी, आई, आजीसोबत चर्चा झाली असता त्यांनी आपल्यावरही अत्याचार केल्याचे कबूल केले.

मांत्रिक निनावे हा वेळोवेळी पैशांसाठीही त्रास देऊ लागला. त्यामुळे सर्व पीडितांच्या संतापाचा भडका उडाला. कुटुंबातील पुरुषांसोबत चर्चा करून पीडित चौघींनीही पोलिसाकडे तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे मांत्रिक निनावेच्या पापाचा घडा फुटला. त्यानुसार पारडी ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली व संशयिताला तात्काळ अटक करून त्याची पोलीस कोठडीही मिळविली. पुन्हा सखोल चौकशीकरिता पोलीस कोठडी वाढवून घेण्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले. विशेष म्हणजे संशयिताला अटक करून बरेच दिवस होऊनही पारडी पोलिसांनी या संतापजनक प्रकारचे वृत्त बाहेर कळणार नाही, याची पुरेपूर दखल घेतली.

परराज्यात व लगतच्या जिल्ह्यात नेऊन करायचा अत्याचार

नराधम महेंद्र निनावे हा माय-लेकीला परराज्य छत्तीसगडच्या डोंगरगड व राजनांदगाव येथे पूजेकरिता घेऊन जात असायचा. त्या ठिकाणी भाड्याने खोली करून दोघींवरही अत्याचार करायचा. एक वेळी तर कालिमाता मंदिराच्या संस्थानमध्येच तोंड काळे केले. शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वेळा हॉटेलच्या रूममध्ये थांबायचा. त्यावेळीही अनेक वेळा संधी मिळेल तेव्हा अत्याचार करायचा.

कुटुंब दहशतीत

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागपूरतर्फे मी आणि कोराडी शाखेचे पदाधिकारी गुलाब साबळेंसह पीडित कुटुंबाच्या धैर्याकरिता संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण अख्खे कुटुंब दहशतीत असल्यामुळे कुणीही काहीही सांगायला तयार नाहीत. अशाप्रकारे एकीकडे कुटुंबावर मांत्रिकाची दहशत व दुसरीकडे समाजातील बदनामीची दहशत आहे.

संशयित मांत्रिक धर्मेंद्र निनावे वर लावण्यात आलेले गुन्हे

1) भारतीय दंड संहिता 1860 कलम 376 (2) (ज्ञ)

2) भारतीय दंड संहिता 1860 कलम 376 (2) (प)

3) बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम चार

4) बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 6

5) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 कलम 3

महाराष्ट्र अंनिस’ने काय केले?

स्थानिक वृत्तपत्रांमधून बातमी मिळताच राज्य सरचिटणीस संजय शेंडे, जिल्हाध्यक्ष जगजित सिंग, जिल्हा प्रधान सचिव रामभाऊ डोंगरे, जिल्हा वार्तापत्र कार्यवाह विजयाताई श्रीखंडे यांच्याशी ऑनलाईन कॉन्फरन्स बैठक तात्काळ घेऊन पारडी येथील पोलीस स्टेशनला भेट देण्याचे; तसेच पीडित कुटुंबाला धैर्य देण्याकरिता भेटण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार मी कोराडी शाखेचे प्रशिक्षण विभाग शाखा कार्यवाह गुलाब साबळे यांच्यासह पारडी पोलीस स्टेशन येथील निरीक्षक सुनील गांगुर्डे व त्यांचे सहकारी दशरथ मुळे यांच्याशी संपर्क साधला व त्यांची नियोजित भेट घेतली. भेटीदरम्यान सुनील गांगुर्डे यांचे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा 2013 या कायद्याची चित्रमय पुस्तिका देऊन उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल अभिनंदन केले. ‘महाराष्ट्र अंनिस’ने नराधम निनावे या संशयिताला कठोरात कठोर शिक्षेची मागणी केली.

तसेच पीडित कुटुंबीयांची केस ‘फास्ट कोर्ट’मध्ये चालविण्यात यावी अशी मागणी केली. सोबतच अत्याचार पीडित कुटुंबाला सामाजिक न्याय मिळावा, याकरिता शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे मदतही मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे थांबविण्याकरिता व पोलीस जनजागृतीकरिता पोलीस प्रशासनामार्फत जादूटोणाविरोधी कायद्याचे प्रशिक्षण लावण्यात यावे, अशीही सूचना यावेळी पोलीस निरीक्षकांना देण्यात आली.

– गौरव आळणे

संपर्क : 86001 45219


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]