माधवी -
कुणी कुलपे लाविली?
कुणी मंदिरे खोलली?
तिथे नव्हतोच मी! तर
का ही उठाठेव केली? ॥
नको प्रसादाची ताटे
नको-नको अन्नकोट
पुरे झाले हार-तुरे
हवी फक्त कर्मभेट ॥
कुणी सांगितले तुला
मी वसतो मंदिरी
कुणी घडवीला तुला
साक्षात्कार तो गाभारी ॥
मी नसतोच तेथे
जेथे तुला वाटतेच
मी असतोच नित्य
हीन-दीन वसतीत ॥
जिथे राबताती हात
सेवा करिती दीनांची
तिथे नांदतो मी भक्ता
आहे तुला ठाऊकची! ॥
किती वेड पांघरीशी
खोट्या आणाभाका घेशी ?
भक्ता चीड येते मनीं
अशा तुझ्या स्वभावाची… ॥
कुणी मांडीला दगड?
आणि फाशीला शेंदूर?
तुला चांगलेच ठावे
आणि मलाही आठवे ॥
सत्य, शिव, सौंदर्याने
भरू दे रे मन तुझे
नको करू यातायात
यात हित खरे तुझे ॥
कशाला हे दंगेधोपे?
वितंडवाद हे फुटके
याचसाठी उभा का मी
तुला न कळे इतुके ॥
– माधवी