त्रिशला शहा -
सोडा अंधश्रध्दा, विज्ञान हाती धरा
घेऊन आले मी गं
विवेकाचा नारा…. ॥धृ॥
ग्रहतारे आकाशी, पत्रिकेमध्ये नाही
साडेसाती शनीची कसली,
जीवन आपल्या हाती
ज्योतिषाने चालविला,
सारा धंदा खोटा
घेऊन आले मी… ॥1॥
माणूस गेला चंद्रावर, संकष्टी मग कसली?
‘नासा’नेही धाडले हो
यान मंगळावरती
घडते सारे विज्ञानाने
अज्ञान मग कशाला
घेऊन आले मी… ॥2॥
करणी झाली म्हणुनी,
लिंबू-मिरची बांधली,
भूताच्या भीतीने दारी,
काळी बाहुली टांगली
भूत करणी भानामती,
सारा खेळ मनाचा
घेऊन आले मी… ॥3॥
अंगी देव आला
बाई लागली घुमायला
मळवट भरुनी नाचते
पाया पडती सार्या
असा कसा तो देव
हिच्याच अंगी आला
घेऊन आले मी… ॥4॥
माणुसकीचे नाते
जोडूया सार्यांशी
जाती-धर्माची बेडी
तोडून टाकू आम्ही
एक होऊ सारे
दुरावा कशाला
घेऊन आले मी… ॥5॥
त्रिशला शहा, मिरज