कोरोना : समाजमन आणि संशोधन

डॉ. नितीन शिंदे - 9860438208

कोरोनाहे नाव सध्या चांगलंच सुपरिचित झालेलं आहे; चांगल्या अर्थाने नक्कीच नाही. कोरोना या विषाणूने निर्माण केलेल्या कोव्हिड19’ या आजाराने सर्व जग अचंबित झालेलं आहे. जात, धर्म, लिंग, देश यांच्या सीमारेषा त्याने कधीच ओलांडलेल्या आहेत. पाश्चात्यांच्या हस्तांदोलनाची खिल्ली उडवत आपल्या संस्कृतीतील नमस्कार पूर्वजांनी किती दूरचा विचार करून योजला आहे, याची महती व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रसारित करण्यात संस्कृतीचे ठेकेदार गुंतलेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप याचे जवळपास सात वेळा आलिंगन देऊन स्वागत करणार्‍या पंतप्रधानांचे तोंडभरून कौतुक करणारा आणि आलिंगन संस्कृतीचे गुणगान गाणारा हाच वर्ग त्यावेळी कार्यरत होता. भारतीय आलिंगन देऊन किती प्रेमाने आदरातिथ्य करतात, हे आपण आणि चॅनेलवाले अभिमानाने त्यावेळी सांगत होतो. आज मात्र ते आपण सोयीस्कररित्या विसरलो. आजाराचा प्रसार होऊ नये, म्हणून चीनमध्ये लोकांना घरात कोंडून ठेवल जात होतं, अशा वेळी आपल्याकडे कोरोनाकडे गांभीर्याने पाहिलं जात नव्हतं, हे काही सन्माननीय व्यक्तींची वक्तव्ये पाहिल्यानंतर लक्षात येतं.

‘गो कोरोना, गो कोरोना, कोरोना गो,’ असं म्हणून कोरोनाची खिल्ली उडवायला गेलेल्या केंद्रीय मंत्रिमहोदयांच्या बुध्दीची कोरोनानेच खिल्ली उडवली, असं आज खेदाने म्हणावं लागतंय. मंदिरामध्ये भजनाच्या माध्यमातूनसुध्दा महिलांनी कोरोनाला जायला सांगितलं होतं. तीच मंदिरं आता मात्र भक्तांमुळे ओस पडायला लागलेली आहेत. हे खरं तर बुमरँगच म्हणावं लागेल; फक्त ते भक्तांवर उलटलं की मंदिरावर की देवावर की सर्वांच्यावर, हे विचार करणार्‍यानं ठरवावं. ‘डॉक्टरांना देव म्हणा आणि रुग्णालयालाच मंदिर म्हणा’ असा एक ट्रेेंड सध्या जोरात सुरू आहे. परंतु समाजाची मानसिकता विचारात घेतली, तर भारतात तरी हा ट्रेेंड फार काळ चालणार नाही. एकदा का कोरोनावर लस उपलब्ध झाली (लस शोधणारे बाहेरचे असणार!) की, आपलं परावलंबित्व संपलं आणि डॉक्टरांचं गुणगौरवत्वही तात्काळ समाप्त. ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ याची प्रचिती येण्यासाठी डॉक्टरांनाही फार काळ वाट पाहायला लागणार नाही. अर्थात, डॉक्टरांना याची कल्पना आहेच आणि सर्वसामान्यांच्या तर हे अंगवळणीच पडलेलं आहे.

पंधरा मिनिटे उन्हात उभे राहिल्यास कोणताही व्हायरस नष्ट होतो, हे सांगणारे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी कोणत्या विद्यापीठाची डॉक्टरकी घेतलेली आहे, हेच समजत नाही. पंतप्रधानांनी त्यांच्याकडे हे खातं का दिलं असावं, याचा शोध घ्यावा लागेल. भाजपच्या आसामच्या आमदार सुमन हरिप्रिया यांनी गोमूत्र आणि गोबर हे कोरोना विषाणूवर उपयुक्त ठरेल, असे सांगितले. आणखी पुष्टी देत त्यांनी कॅन्सर बरा करण्यासाठीसुध्दा याचा वापर होतो, असे सांगितले. धन्य त्या सुमनजी!

‘कोरोना से बचने के लिए सिध्द किया हुआ ताबीज यहाँ मिलता है!’ अशी जाहिरात करणारा उत्तर प्रदेश येथील ‘कोरोनावाले बाबा’ अहमद सिद्दिकी अत्यंत मार्मिकपणे जाहिरात करतो आणि जनतेच्या जीवाशी खेळतो. ‘जो लोग मास्क नहीं ले सकते, वो लोग ये ताबीज लेकर पास में रखें कोरोना वाइरस से हिफाजत रहेगी! किंमत सिर्फ 11 रुपये है!’ मास्कच्या तुलनेत अत्यंत कमी किमतीला मिळणार्‍या वस्तूचे काम व्हायरस कमी करणे असेल, तर सर्वसामान्यांच्या खरेदी करण्यासाठी उड्या पडतात. एका बाजूला सर्व जग अहोरात्र कोरोना व्हायरसच्या संशोधनात गुंतले असताना अकरा रुपयांमध्ये जाहिरात करणारा बाबा आणि खरेदी करणारी जनता आपण अनुभवलेली आहे. फसवणुकीची जाहिरात केल्याबद्दल संबंधित बुवाला मार्च 20 मध्ये अटक सुध्दा झाली. तसेच पालघर जिल्ह्यातील वसई येथील आयुर्वेद एम. डी. डॉ. सर्वराजे खान यांनी कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असल्याची जाहिरात केल्याबद्दल मार्च 20 मध्ये त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

रामदेव बाबा यांनी चॅनेलव्दारे ‘कोव्हिड-19’ या आजारावर योगांचा उपचार सांगितलेला आहे. तसेच तुळस, अष्टगंध, हळद, काली मिर्च यांचं मिश्रण केलेल्या गोळ्या आणि काढा ‘पतंजलि’मार्फत लाँचसुध्दा केलेला आहे. जनतेची काळजी! गोळ्या किंवा काढा मात्र फुकट नाही! अंथरुणावर खिळलेल्याने योगा कसा करायचा, हा प्रश्नच आहे. उत्तर रामदेव बाबाच जाणोत. बाबांकडे सर्व रोगांवर एकमेव उपाय, योग आणि योग! आपल्या संस्कृतीतून आलाय, असं सांगितलं की, करणार्‍याला अभिमान आणि शिकवणार्‍याला आर्थिक फायदा. बाबांचे दुसरे साथी आयुर्वेद सिध्दहस्त म्हणून ओळखले जाणारे बाबा बालयोगी सध्या काय करत आहेत, हे मात्र गुलदस्त्यात आहे. कोरोनाने निर्माण केलेल्या आणीबाणीच्या वेळी यांचा ‘सिध्दहस्त’ माशा मारत बसलाय काय? अयोध्येमध्ये संत परमहंस यांनी ‘जय श्रीराम’ हा नारा एक तासभर करा, म्हणजे कोरोना व्हायरस दूर पळून जाईल, असं वक्तव्य चॅनेलव्दारे केलं. एवढंच नाही, तर कोरोनाला पळवून लावण्यासाठी चक्क यज्ञसुध्दा केला! यज्ञ केल्यानंतर कोणावर पळायची वेळ आली, हे तुम्ही विचारू नका आणि मी पण सांगणार नाही.

कोरोना व्हायरसचा फैलाव जसजसा वाढत जात आहे, तसतसा वैदिक उपचार पध्दती सांगण्याचा जोर वाढत असल्याचे दिसून येते. गोमूत्राचा आणि गोबरचा पर्याय लगेच समोर येतो. गोमूत्रामध्ये कोरोना विषाणू थोपवण्याची क्षमता आहे, असे स्वामी चक्रपाणी जाहीरपणे सांगतात. केवळ हे सांगून ते थांबले नाहीत, तर 14 मार्च 2020 रोजी अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष (सगळेजण स्वत:ला राष्ट्रीय अध्यक्षच म्हणवून घेतात; फक्त यांची कोठेच शाखा नसते) स्वामी चक्रपाणी महाराज यांनी कोरोना व्हायरसच्या निर्मूलनासाठी गोमूत्र पार्टीचे आयोजन केले होते. जवळपास दोनशे जणांनी यात सहभाग घेतला. देशात विविध ठिकाणी अशा पार्ट्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. अर्थात, या पार्टीचे आयोजन करताना मोठ्या प्रमाणात एकत्रित जमू नका, असा पंतप्रधानांनी दिलेला आदेश धाब्यावर बसवण्यात आलेला होता. गोमूत्र पार्टीमध्ये जाहीरपणे टीव्ही चॅनेलसमोर गोमूत्र पिणारे तरुण आणि शिक्षितांची संख्या पाहिली तर शिक्षणाचा हेतू साध्य झाला, असं म्हणण्याचं धाडसच होत नाही.

या पार्टीच्या वेळी कोरोनाला राक्षस म्हणून संबोधण्यात आले. त्याच्या पोस्टरची पूजा करण्यात आली व ‘कोरोना शांत हो’ असं म्हणून पोस्टरवर गोमूत्र शिंपडण्यात आले. कोरोना हा व्हायरस नसून तो अवतार असून, गरीब जनावरांचे रक्षण करण्यासाठी आलेला आहे, असे स्वामी म्हणाले. चीनी लोक हे कोणत्याही प्राण्याचे मांस खातात, त्यामुळे ते राक्षस आहेत. कोरोना मांसाहारी लोकांसाठी मृत्यू आणि शिक्षा देण्यासाठी आलेला आहे. भारतीय लोक कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यास समर्थ आहेत. कारण ते गोरक्षक आहेत, असेही वक्तव्य स्वामींनी दि. 17 फेब्रुवारी 2020 रोजी चॅनेलव्दारे अधिकृतरित्या केले आहे. एवढंच नाही, तर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोरोनाची मूर्ती तयार करून क्षमा मागावी, असाही सल्ला त्यांनी अध्यक्षांना दिलेला आहे. स्वामींचा सल्ला मानायचा की नाही, हे चीनने ठरवावे. आम्हाला मात्र स्वामींच्या बुध्दिमत्तेची कीव करावीशी वाटते. ही वक्तव्यं कमी पडली म्हणून की काय, कोरोनाच्या निर्मूलनासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनासुध्दा गोमूत्र पाठवणार असल्याचे संयोजकांनी सांंगितले. धन्य ते संयोजक, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सल्ला देणारे!

कोरोनापासून बचाव करण्यासाठी गायीच्या गोबरचा लेप लावावा, असं सांगून धर्माचे रक्षक थांबले नाहीत, तर कर्नाटकमधील एका गावामध्ये गोबरमध्ये आंघोळ केलेली सुध्दा टीव्ही चॅनेलव्दारे सर्वांनी पाहिलेली आहे. गोमूत्र आणि गोबरमुळे गायीचे शेण 500 रुपये किलो तर गोमूत्र 500 रुपये लिटर या दराने महामार्गावर विकले जात होते. चहा अथवा कॉफी जशी थर्मासमधून विकली जाते, त्याचप्रकारे गायीच्या या टाकाऊ पदार्थाची विक्री अभिमानाने केली जात होती. अर्थात, दुधाचा दर मात्र 54 रुपये लिटर होता. कशाला किंमत द्यावी, हेच अजून आम्हाला समजलं नाही! गोमूत्र पार्टीमुळे ही कल्पना सुचल्याची माहिती विक्रेत्याने दिली. कोणत्याही आजारावर रामबाण उपाय म्हणून गोमूत्र आणि गोबरचा मारा करणारे, हे भंपक लोक भारताची वैज्ञानिक जाण चुकीच्या पध्दतीने जगासमोर उभी करत आहेत.

विशेष बाब म्हणजे आजअखेर ‘पतजंलि’च्या गोळ्या खाल्यावर कोरोना होत नाही, गोमूत्र पिल्यावर कोरोना होत नाही, श्रीरामाचा जप केल्यावर कोरोना होत नाही किंवा गोबरमध्ये आंघोळ केल्यावर कोरोना होत नाही, अस वक्तव्य करणारे बाबा, स्वामी, परमहंस अथवा त्यांचे भक्त यापैकी कोणालाही कोणत्याही प्रकारच्या नोटिसा गेलेल्या नाहीत; अटक होणं तर दूरची गोष्ट आहे. सत्ताच गोमूत्र आणि गोबर धार्जिणी असेल तर मग असंच होणार!

कोरोनावरील संशोधनातून एकदा का लस सापडली आणि ती सार्वजनिकरित्या उपलब्ध झाली की, कालांतराने ज्याला कुणाला ‘कोव्हिड-19’ हा आजार होईल त्याच्यावर उपचारासाठी बाबा, स्वामी, परमहंस हे सर्वजण आपल्या औषधाची जाहिरात उघडपणे करणार. रुग्ण एकाचवेळी लस पण टोचणार आणि आपल्या संस्कृतीची, आयुर्वेदाची परंपरा म्हणून ताबीज घेणार, गोमूत्र पिणार, शेणामध्ये आंघोळ करणार, श्रीरामाचा जप करणार. विशेष म्हणजे रुग्ण बरा झाला की, आमच्यामुळेच बरा झाला, हे सांगायला सर्वजण समर्थ आहेतच ना! कोरोनाच्या कचाट्यात न सापडलेली त्या काळातील पिढी त्यावर विश्वास ठेवणार. कारण त्या पिढीला लस कशी निर्माण झाली? इतर उपाय कसे कुचकामी ठरले? या विषाणूच्या वेळी जगाची अवस्था कशी होती? काय उपाय योजले जात होते? याची प्रचिती नसल्यामुळे बाबा, स्वामी, परमहंस आणि त्यांची पलटण सगळे आबादीआबाद.

गोमूत्र आणि गोबरच्या मार्केटिंगचं इंगित

कोरोनावर उपाय म्हणून गोमूत्र, शेण अर्थात गोबर, तूप आणि श्रीरामाचा जप यांची जाहिरात करणार्‍यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ शकलेली नाही; किंबहुना ती होणारच नाही. याचं कारण दडलेलं आहे गोमूत्राच्या संकल्पनेमध्ये. गोमूत्र हे औषधी आहे, हे वेदवाक्य आहे. गायीपासून मिळणार्‍या उत्पादनांपासून कर्करोग बरा हेऊ शकतो, शेणामध्ये सोने आढळते, अशा विविध अवैज्ञानिक संकल्पना समोर येत असतानाच केंद्र सरकारने मात्र पंचगव्यावर संशोधन करण्यासाठी 2017 मध्ये ‘राष्ट्रीय सुकाणू समिती’ची स्थापना केलेली आहे. पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणारे पाच पदार्थ दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण यांचे मिश्रण. हे पंचगव्य अनेक व्याधींवर गुणकारी आहे, असा दावा आज एकविसाव्या शतकातील तथाकथित वैज्ञानिक रथी-महारथी वेद आणि पुराणातील माहितीच्या आधारावर करत आहेत. या पंचगव्यामध्ये तूप, दही कसे काय, हा प्रश्न निर्माण होतोच ना! लोणी, ताक, खरवस, चीज अशांना का वगळण्यात आलेलं आहे? खरं तर तीनच पदार्थ गाय देऊ शकते. दूध, गोमूत्र आणि शेण. यापैकी दोन पदार्थ तर गाय टाकाऊ म्हणून टाकून देते. त्याला मात्र संस्कृतीचे रक्षक गोंडस नाव देतात, याचं आश्चर्य वाटतं. विशेष म्हणजे फेब्रुवारी 2020 मध्ये केंद्र शासनाने भारतीय गायींवरील संशोधनासाठी Scientific utilization through research augmentation prime product from ingenious cows (SUTRA-PIC) ही योजना जाहीर केलेली आहे. विज्ञान-तंत्रज्ञान विभाग, आयुष विभाग आणि जैवतंत्रज्ञान विभाग एकत्रितपणे ही योजना राबवत आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पामध्ये पंचगव्याचा वेदांमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचा उल्लेख असल्याचा अभिमानास्पद दाखला देण्यात आलेला आहे. या योजनेसाठी 14 मार्चअखेर प्रकल्पसुध्दा मागवलेले आहेत. या योजनेसाठी तयार केलेला प्रस्ताव पूर्णपणे अशास्त्रीय आहे. अनेक संशोधन प्रकल्प निधीअभावी थंडावले आहेत. संशोधकांना त्यांची शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. अशा वेळी या योजनेवर निधी खर्च करणे योग्य नाही. खरं तर पैसा आणि वेळ यांचा हा अपव्यय आहे. एवढंच नाही, तर केवळ देशप्रेमाच्या खोट्या नावाखाली देशाचीच बदनामी, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुरू आहे.

वैज्ञानिक संशोधनासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद न करता गायीचे शेण आणि मूत्र यावर खर्च करणारी अफलातून विचारसरणी भारताला कोणत्या दिशेने घेऊन जाईल, हे सांगता येत नाही. आज खरं तर कोरोनासारख्या विषाणूवर आपण संशोधनाला सुरुवात करण्याची गरज आहे. दुसरे देश शोधतील. लस उपलब्ध झाली की तिचा वापर करू, असं म्हणणे म्हणजे पुन्हा एकदा परावलंबित्व स्वीकारण्याचाच प्रकार आहे. कोरोनावर संशोधनासाठी प्रचंड खर्च कशाला करायचा, असं म्हणणारा फार मोठा वर्ग आपल्याकडे कार्यरत आहे. हे संशोधन अत्यंत बिकट आहे, याची कल्पना सगळ्यांनाच आहे. अशा बिकट प्रसंगामध्ये आपण न उतरता सर्वांत सहज आणि सोप्या असणार्‍या शेण आणि मूत्रामध्ये आपण काय संशोधन करणार! काळाची पावलं ओळखली नाहीत, तर कायमस्वरुपी शेण आणि मूत्रामध्येच घुसळत बसावं लागेल. शेणाचा खत म्हणून आणि दुधाचा पेय म्हणून होणारा वापर हे ठीक आहे. पण गायीने टाकलेल्या टाकाऊ पदार्थांचे सेवन अभिमानाने करणं म्हणजे जरा अतिच वाटतं. सेवन करणारे बिनदिक्कतपणे खुलेआम ते करतात. यात ते स्वत:चा अभिमान दाखवतात की भारतीयांची बौध्दिक दिवाळखोरी, हेच कळत नाही. आज आपण कोरोनावर संशोधन करायला सुरुवात केली, तर भविष्यामध्ये उत्पन्न होणार्‍या नवीन विषाणूवर संशोधन करण्याची ऊर्मी पुढच्या पिढ्यांना मिळेल. सुरुवातीचा खर्च प्रचंड असणं स्वाभाविकच आहे; पण तो करायलाच पाहिजे; अन्यथा संशोधन म्हणजे काय असतं, हे भावी पिढीला कळणारच नाही.

व्हॉट्सअ‍ॅपने दिला पोल्ट्रीला दणका

एका प्रतिथयश (भक्तांच्या द़ृष्टीने) चॅनेलने चीनमध्ये वटवाघळावर संशोधन सुरू असल्याची लॅबच दाखवली. जवळपास एक तासभर सुरू असलेल्या कार्यक्रमातून त्यांनी असं सांगितलं की, संशोधन सुरू असताना एक वटवाघूळ एका शास्त्रज्ञाला चावले. रक्तामार्फत कोरोना या विषाणूने शास्त्रज्ञाच्या शरीरात प्रवेश केला. तदनंतर सर्व चीनमध्ये कोरोनाचा प्रसार झाला. आणखी एक पुष्टी त्यांनी या कार्यक्रमामध्ये जोडली. चीनमध्ये वटवाघूळ, पाली, उंदीर खाल्ले जातात. त्यामुळेच या विषाणूचा प्रादूर्भाव जास्त प्रमाणात झाला. चीनचे राज्यकर्ते या चॅनेलवर आक्षेप घेणार नाहीत. कारण असाही टीव्ही चॅनेल असू शकतो, यावर त्यांचा विश्वासच बसणार नाही. ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने चीनमधील खाण्या-पिण्याच्या माहितीचा प्रचंड खजिना सर्वसामान्यांच्या समोर खुला केलेला आहे. आपण मात्र सोयीस्कररित्या आपल्या इथेसुध्दा असं काही खाल्लं जातं, हे जाणीवपूर्वक विसरतो. ज्यांना खाण्यासाठी काहीच नसतं, तेव्हा सहज उपलब्ध होणार्‍या खाद्यपदार्थांकडे ते वळतात, हे समजण्याची गरज आहे. डुक्कर म्हटलं की नाकं मुरडणारे आपले सगेसोयरे आहेत आणि रानडुक्कराचं मटण खाल्लं, असं अभिमानानं सांगणारीसुध्दा आपलीच भावकी! ‘व्हॉट्सअ‍ॅप युनिर्व्हसिटी’च्या माध्यमातून आज चीनी माणसं विविध प्राणी खात असलेले व्हिडीओ आपणाकडे सर्रास येत असतात. डिस्कव्हरी चॅनेलवर सुरू असलेल्या ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या मालिकेमध्ये काम करणारा बेअर ग्रिल्स तर कोणताही प्राणी अथवा कीटक न भाजतासुध्दा खाल्लेला आपण पाहिलेला आहे. आपल्या पंतप्रधानांनी त्याच्याबरोबर काम केलेल्याचा किती मोठा प्रोपोगंडा याच चॅनेलवाल्यांनी केलेला होता. हे ते विसरले की काय? बेअरला नाव न ठेवता आपल्या पंतप्रधानांचं आपणच कौतुक केलं. आपला तो बाब्या आणि दुसर्‍याच ते कार्ट, दुसरं काय! एक मात्र निश्चित की, आज जगातील कोणताही देश अथवा संयुक्त राष्ट्र संघटनेने चीननेच हा विषाणू निर्माण केला आहे, असा आरोप केलेला नाही. विषाणूनिर्मिती ही निसर्गदत्त आहे. असं असूनसुध्दा ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने पसरवलेला गैरसमज आज समज म्हणून प्रसारित झालेला आहे, हे मात्र नक्की.

कोरोना हा कोंबड्यांच्यामुळे पसरणारा विषाणू आहे, या ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या अफवेचा सर्वांत मोठा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसलेला आहे. हा व्यवसाय करणारा वर्ग प्रामुख्याने शेतकरी आणि बहुजन वर्गच आहे, कापणारा फक्त खाटीक समाज आहे. मांसाहार करण्यामध्ये सर्व धर्मातील जनता सामील आहे, हे आपण सोयीस्करपणे विसरतो. खाटीक समाजाच्या व्यवसायावर गदा आली असं समजून आनंदात मश्गुल असणार्‍या वर्गाने जरा चिंतन करण्याची गरज आहे, अफवा कोणाकोणावर आफत आणते याची! फक्त महाराष्ट्रात पन्नास हजार शेतकरी या उद्योगाव्दारे वार्षिक 6000 कोटी रुपयांची उलाढाल करत तीस लाख व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. आज ती सर्व धुळीस मिळाली, ती केवळ एका अफवेने. सांगली जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने साडेचार हजारांवर जिवंत कोंबड्या जेसीबीच्या सहाय्याने पुरल्या तर यवतमाळमधील शेतकर्‍याने जवळपास साडेसहा हजार कोंबड्या पुरल्या; अंड्यांची तर गोष्टच वेगळी. पोल्ट्री उद्योग पूर्णपणे उखडला, केवळ एका अफवेने. शेअर बाजार ढासळणे, एसटी तोट्यात, रोजगार बंद, पर्यटनस्थळे बंद, व्यवसाय बंद, शाळा बंद, कार्यालये बंद, यात्रा-उरुस बंद, मंदिर बंद, तमाशा बंद, चित्रपटगृहे बंद, हे सर्व कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी जाणीवपूर्वक सरकारने केलेली बंदी आहे. त्यामुळे तोटा झाला तर याचं फार वाईट वाटण्याचा प्रश्नच नाही. कोरोनाच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहिलं, तरच भविष्यात होणारी मोठी हानी आपण टाळू शकणार आहोत. परंतु एखादी अफवा जर आपल्या तोट्याला कारणीभूत ठरत असेल, तर विचार केलाच पाहिजे. मुंबई येथील कोरोना व्हायरस संबंधातील पत्रकार परिषदेमध्ये मेडिकल ऑफिसर डॉ. यशश्री यांनी भरपूर मांसाहार करा; फक्त शिजवण्यामध्ये काळजी घ्या, एवढाच वैज्ञानिक सल्ला दिलेला होता. परंतु वैज्ञानिक सल्ल्यापेक्षा सोशल मीडियाचा सल्ला ग्राह्य मानण्यातच एकविसाव्या शतकातील भारताची आधुनिक पिढी मग्न आहे.

संशोधन कसे करतात?

कोरोनोच्या निमित्ताने एखाद्या रोगाचे निदान करणे, तो कोणामुळे होतो, हे शोधून काढणे आणि त्याच्या निर्मूलनासाठी औषधरुपाने एखादी लस शोधून काढणे, यासाठीची प्रक्रिया समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे, वैज्ञानिक द़ृष्टिकोनाच्या प्रसारासाठी! कोरोना नावाच्या विषाणूचा अभ्यास करावा लागेल. त्याचे गुणधर्म शोधावे लागतील. त्याचा कालावधी, तो निर्माण कसा होतो? त्याचे पोषणभरण कोण करतं? शरीरातील कोणत्या भागांना तो इजा पोचवतो? व्यक्तीमध्ये कोणते शारीरिक बदल घडवतो? या सर्व बाबींचा अभ्यास करावा लागेल. हे काम वाटत तेवढं सोपं नाही; अत्यंत जिकिरीचे आहे, हे मात्र नक्की. पण काहीजण ते करतात, हे समजून घ्यावं लागेल. संकटाला अंगावर घेण्याची ऊर्मी त्यांच्याकडे असते. असो, या विषाणूचा सर्व बाजूंनी जोपर्यंत अभ्यास होत नाही, तोपर्यंत त्याला नष्ट करण्याचे उपाय शोधता येत नाहीत. नोव्हेंबर 2019 मध्ये हा विषाणू असल्याचे समजल्यानंतर आजअखेर (लेख लिहीपर्यंत) तरी त्यावर उपाय सापडलेला नाही. उपाय शोधण्यासाठी संशोधन करावे लागते. नवीन साधनांनीयुक्त अशी प्रयोगशाळा असावी लागते. त्या प्रयोगशाळेसाठी खर्च करावा लागतो. संशोधकांना आपला जीव गहाण ठेवून काम करण्याची ऊर्मी असावी लागते. दिवस-रात्र केवळ कोरोना आणि कोरोनाचाच ध्यास मनी असेल, तरच त्यावर उपाय सापडू शकतो. एखादी लस शोधून काढलीच तर तिचे परीक्षण करावे लागते. ती लस लगेच माणसाला लागू करता येत नाही. प्रथमत: तिचा प्रयोग प्राण्यावर करावा लागतो. उंदीर हा पहिला प्राणी त्यासाठी निवडला जातो. त्यानंतर ‘गिनी पिग’ या प्राण्यावर याची चाचणी केली जाते. या यशस्वी चाचण्यानंतर माणसाचा पूर्वज म्हणून ओळखला गेलेल्या माकडावर या लसीचा प्रयोग करावा लागतो.

संशोधनातून सापडलेली लस माकडाला टोचण्यापूर्वी, त्या माकडाला कोरोना विषाणूची लस टोचली जाते, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एका अर्थाने माकडाला आपण आजारात ढकलतो, मानवी जीवन सुखी करण्यासाठी. त्यानंतर संशोधनातून मिळालेली लस टोचली जाते. काही कालावधीसाठी या माकडाला निरीक्षणात ठेवलं जातं. ही चाचणी यशस्वी ठरली की, त्यानंतर माणसावर चाचणी स्वरुपामध्ये उपचार करण्यासाठी ती लस उपलब्ध होते. काही व्यक्तींवर यशस्वी चाचणी झाल्यानंतर ही लस सर्वसामान्यांसाठी खुली होते. एवढे सगळे संशोधन होण्यासाठी भरपूर कालावधी लागतो. माणसावर चाचणी केल्यानंतर जवळपास दोन महिने तरी त्याच्या सत्यतेसाठी थांबावं लागतं. परंतु भारतीय समाजामध्ये लगेचच उत्तराची अपेक्षा केली जाते. ज्यांना संशोधन म्हणजे काय? आणि संशोधन पध्दती कशी कार्यरत असते, याची बिलकूल कल्पना नसते, असे धर्माचे ठेकेदार मात्र गोमूत्र आणि गोबर यांचा औषध म्हणून प्रचार करत सुटतात आणि रामदेव बाबांसारखे त्याचा व्यवसाय करण्यात माहीर असतात.

संकटाला केवळ सामोरे न जाता, त्याचं मुळासकट उच्चाटन करण्यासाठी सत्ताधार्‍यांकडे धैर्य असावं लागतं. सध्याचे राजकारणी हे धैर्य दाखवताहेत, हे निश्चितच अभिनंदनीय आहे. महाराष्ट्रातील राज्यकर्ते अत्यंत जागरुकतेने कोरोनाचा सामना करत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, डॉक्टर, हॉस्पिटलचा स्टाफ अत्यंत जागरुकतेने आणि न थकता कोरोनाचा मुकाबला करत आहेत. परंतु काही संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने धर्माचे ठेकेदार असलेले गायीचे भक्त (ज्यांनी कधीही गायी सांभाळल्या नसणार!) जागतिक स्तरावर आपलीच नाचक्की करत आहेत, हे निश्चितच भूषणावह नाही. कोरोनाचे हे संकट केवळ विज्ञानच दूर करणार, हे मात्र निश्चित. इतिहास याचा साक्षीदार आहे; नव्हे हे वास्तव आहे आणि ते स्वीकारावंच लागेल, कोणी काहीही म्हणोत. कोणाचाही धावा न करता, अहोरात्र मेहनत करून वैज्ञानिक सर्व मानवजातीला या संकटातून बाहेर काढतील, यात तिळमात्रही शंका बाळगण्याचं कारण नाही. केवळ एक धर्माच्या हितासाठी न करता माणसाच्या कल्याणासाठी आपले संशोधन कारणी लावणार्‍या संशोधकांना सलाम!


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]