खुशबू हूँ, हवाओं में जिंदा रहूंगा मैं।

डॉ. गणेश गायकवाड -

बंधुवर्य नरेंद्र लांजेवार शेवटी आपल्याला सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेले. अतिशय धक्कादायक, अविश्वसनीय, वेदनादायक ही बातमी; पण जड अंतःकरणाने आपणा सर्वांना स्वीकार करावं लागतं आहे. ‘नरेंद्र लांजेवार हे माझे अतिशय जीवलग मित्र होते,’ हे वाक्य बोलणारे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे लाखो चाहते आहेत.

एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व, एक प्रयोगशील ग्रंथपाल, एक मुक्त आणि शोधक पत्रकार, विदर्भ साहित्य संघाचे महत्त्वाचे आधारस्तंभ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आजीवन सदस्य-कार्यकर्ते, बुलढाण्यात नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्रात वाचनसंस्कृती निर्माण करणारा सजग लेखक, लहान मुलांना वाचनाची प्रेरणा देण्यासाठी जिल्हाभर वाचनालये सुरू करणारे लांजेवार. एक व्यक्ती किती क्षेत्रामध्ये आपले योगदान देऊ शकते; आणि ते सुद्धा स्वतःला झोकून! ते शेवटच्या श्वासापर्यंत अविरत कार्यरत होते. अशा हरहुन्नरी चतु:रस्त्र कलावंताला दुर्मिळ आजार झाला.

प्लमोनरी फायब्रोसीस; ज्यामध्ये फुफ्फुसाच्या कोशिका अकार्यक्षम होत जातात आणि फुफ्फुसाचा तेवढा भाग निकामी होत जातो. तीन वर्षांपूर्वी या आजाराचे निदान झाले आणि एका जीवघेण्या संघर्षास सुरुवात झाली. अगदी निदान झाल्यापासून सर्व प्रकारच्या उपचारांसाठी नरेंद्र मला फोन करायचे. औरंगाबाद येथील प्रसिद्ध फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. बर्दापूरकर यांची औषधी तीन वर्षांपासून सुरू होती; पण डॉक्टरांनी सांगितले की, हा आजार प्रोग्रेसिव्ह असतो, तरी सुद्धा नरेंद्रची प्रचंड सकारात्मक इच्छाशक्ती, माझ्या तोटक्या ज्ञानावर अगाध विश्वास, ‘तुम्ही असले म्हणजे मला काही होणार नाही,’ हे त्यांचे नेहमीचे वाक्य. बरे, नरेंद्रसारखे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व साहित्य, संस्कृती, समाजकारण, राजकारण, डाव्या विचारसरणीशी बांधिलकी आणि प्रचंड मानवतावादी जीवनशैली. बाबा आमटे, साने गुरुजी, विनोबा भावे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, मेधा पाटकर अशा मानवांच्या तालमीत तयार झालेले नरेंद्र लांजेवार आम्हा सर्वांसाठी एक आश्चर्य होते.

विदर्भ साहित्य संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, हिंदू-मुस्लिम एकता मंच, सहर-ए-गजल अकादमी अशा सर्वच संघटनांशी त्यांची बांधिलकी होती आणि ती त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली.

त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रात वाचनसंस्कृती आणि एकंदर साहित्यसंस्कृतीचा आत्माच हरवला आहे, असे मला वाटते. त्यांच्या या प्रचंड जनसंपर्कामुळे बुलडाणा शहरातील संपूर्ण वैद्यकीय चमू अक्षरशः तीन महिन्यांपासून रात्रंदिवस झटत होता. बुलडाणा शहरातील प्रसिद्ध फिजिशियन डॉ. दीपक लधड, डॉ. दीपक काटकर, डॉ. निकम, डॉ. विनायक हिंगणे, पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ. स्वप्निल थोरात स्वतः बुलडाणा येथे येऊन उपचार करीत होते.

पण सप्टेंबर महिन्यात आजाराने जास्त उचल खाल्ली आणि भाऊला घरीच आॉक्सिजन लावण्यात आला. त्यांच्यावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाला हे पाहणे फार वेदनादायक होते. परंतु एक डॉक्टर या नात्याने मी सांगू शकतो, नरेंद्रने फार हिमतीने हा लढा दिला.

जेव्हा नरेंद्रसारखी समाजासाठी आवश्यक असणारी व्यक्ती हे जग सोडून जाते, तेव्हा तो फक्त कौटुंबिक र्‍हास नसून आपल्या समाजजीवनाचेही फार मोठे नुकसान झाले, याची जाणीव झाली.

पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर सर परवा स्वतः घरी आले त्यांनी सर्व चेकअप केले आणि शेवटी फुफ्फुसाच्या प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला. त्यासाठी अपोलो हॉस्पिटल, हैदराबाद येथे नोंदणी करण्यासाठी काल फोन लावला; पण असे वाटते, आमच्या कामाच्या वेगापेक्षा मृत्यूचा वेग जास्त होता.

काल संध्याकाळी 7 वाजता तपासणी केली, त्यावेळी तब्येत बरी होती. बोलताना धाप लागते म्हणून नरेंद्र फक्त ऐकून घेत असे. अशा वेदनादायी अवस्थेतही चेहर्‍यावर प्रचंड आशावाद होता. मध्यरात्री 2 वाजता मकरंदचा फोन आला, ‘सर, पप्पांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. तुम्ही या.’ लगेच आमच्या टीमसोबत पोचलो. इमर्जनसी औषधी दिली. थोडा आराम वाटला. अशा मध्यरात्रीसुद्धा ‘तुम्ही कशाला त्रास घेतला,’ हे त्यांचे वाक्य. आम्ही घरी आलो. सकाळी मकरंदचा फोन आला आणि लगेच डॉ. लधड सरांकडे हलवले; परंतु हृदयविकाराचा तीव्र आघात बसला आणि भाऊंनी प्राण सोडला.

सरांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु नियतीला हे मान्य नसावे. ‘नरेंद्र, तू खूप घाई केली दादा.’

आपल्या अकाली जाण्याने बुलडाणा जिल्ह्याची सांस्कृतिक चळवळ पोरकी झाली आहे. आपण जोपर्यंत होता आमचे जीवन समृद्ध करून गेलात –

खुशबू हूँ हवाओं में जिंदा रहूंगा मैं

अहबाब की दुआओं में जिंदा रहूंगा मैं

आयेंगी रूत बहारों की ढूंढेंगे सब मुझे

मासूम इलतजाओ में जिंदा रहूंगा मैं


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]