-

लोकांचे प्रबोधन करायचे असेल तर नुसते उठाव आणि भाषणे करून उपयोग नाही, तर त्यांना चळवळीच्या विचारांमध्ये खिळवून ठेवणारे माध्यम हवे हे पेरियारना फार लवकर उमगले होते. त्यासाठी त्यांनी दृक्श्राव्य माध्यमाचा फार चांगला उपयोग करून घेतला. आजकालच्या सत्ताधार्यांनादेखील या चित्रपट माध्यमाने भलतीच भुरळ घातलेली आहे. त्यामुळेच आपल्याकडे निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रचारकी चित्रपटांचा सुकाळ येतो. पूर्णपणे एकाबाजूने रचलेले कथानक, जुन्या राजकीय व्यक्तीच्या जीवनावर आणि जीवनातील चढ-उतारांवर रचलेले मसालेदार कथानक, एखाद्या समाजघटकाला खलनायक ठरविण्याच्या दृष्टीने रचलेले कथानक, जुन्या घटना-प्रसंगांवर बेतलेले; पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चिरफाड केलेले कथानक, असे एक ना अनेक. या चित्रपटामुळे लोकांच्या मनावर भुरळ घालून, आधीच भयग्रस्थ समाजाला आणखी बिथरवण्यात हे लोक काही प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहेत. द्रविड कळघमनेदेखील चित्रपट माध्यम फार प्रभावीपणे वापरले; परंतु त्यातून समाजापुढील ज्वलंत प्रश्न मांडण्यावर तसेच प्रबोधनावर भर दिला. दैनंदिन जीवनात समाजात जागरूकता आणून राजकीय बदल घडवून आणणे हे द्रविड चळवळीचे प्रमुख उद्दिष्ठ होते. द्रविडीय राजकारण्यांनी अशा क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपट माध्यमाला एक योग्य साधन म्हणून पाहिले.
पटकथा लेखक अण्णादुराई

पेरियारच्या कामाच्या कलात्मक पद्धतीमुळे त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेले आणि कलेच्या माध्यमातून कार्यरत असणारी माणसं त्यांच्याशी आपोआप भराभर जोडत गेली. त्यातले पहिले नाव म्हणजे डी.एम.के. पक्षाचे संस्थापक, अण्णादुराई. अण्णादुराई हे तमिळ चित्रपट उद्योगातील एक प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित पटकथा लेखक होते. त्यांनी अनेक कादंबर्या, लघुकथा आणि नाटके लिहिली होती- ज्यात राजकीय विषयांचा समावेश आहे. द्रविड कळघमच्या काळात त्यांनी स्वतःदेखील त्यांच्या काही नाटकांमधून अभिनय केला. द्रविडीय विचारांच्या प्रचारासाठी त्यांनी चित्रपट माध्यमांची ओळख करून दिली. अण्णादुराई यांनी एकूण सहा पटकथा लिहिल्या. त्यांचा पहिला चित्रपट नल्लाथांबी (गुड ब्रदर, १९४८) ज्यात जमीनदारी प्रथा रद्द करून देऊन सहकारी शेतीचा विचार मांडला गेला होता. अण्णादुराई यांच्या वेलायकारी (नोकर दासी, १९४९) आणि ‘ओर इरावू’ या कादंबर्यांवरदेखील सामाजिक चित्रपट बनवले गेले.
विनोदी अभिनेते एन. एस. कृष्णन

एन. एस. कृष्णन (एनएसके) हे तमिळ चित्रपट क्षेत्राच्या सुरुवातीच्या काळातले एक अभिनेते, विनोदी कलाकार, पार्श्वगायक आणि पटकथा लेखक होते. तामिळ प्रेक्षक त्यांना कलाईवनार (कलेवर प्रेम करणारे) म्हणून ओळखतात. त्यांना भारताचे चार्ली चॅप्लिनदेखील म्हटले जाते. कलाईवनार हे द्रविड चळवळीचे सक्रिय सदस्य होते. अण्णादुराई यांच्या वर उल्लेखलेल्या नल्लाथांबी या चित्रपटात एन. एस. कृष्णन यांची भूमिका होती. ते कधीही अधिकृतपणे कोणत्याही द्रविड पक्षाचे सदस्य नव्हते, परंतु त्यांनी डी.एम.के.ची मोठ्या प्रमाणात सेवा केली. ब्राह्मणांचे वर्चस्व असलेल्या तमिळ चित्रपट उद्योगात लोकप्रिय असलेल्या त्यांच्या काळातील काही ब्राह्मणेतर लोकांपैकी ते एक होते. एनएसके पेरियारच्या विचारसरणीने खूप प्रभावित होते आणि त्यांनी त्यांच्या स्क्रिप्टमध्ये ब्राह्मण्यविरोधी बीजे पेरली.
कलाईनार एम. करुणानिधी
अण्णादुराईनंतरचे डी.एम.के.चे प्रमुख नेते एम. करुणानिधीदेखील त्यांच्या द्रविडी चळवळीच्या विचारांसोबतच कलेच्या माध्यमातून पुढे आले. करुणानिधी इसाई वेल्लार समुदायातील होते. मंदिरे आणि इतर सामाजिक संमेलनांमध्ये संगीत वाजवण्याचे काम करणारी ही एक तथाकथित खालची समजली जाणारी जात होती. फार लहानपणापासूनच जातव्यवस्थेचे चटके सहन करत त्यांनी त्याचे भयाण वास्तव अनुभवले होते. फक्त १४ वर्षांचे असताना त्यांनी द्रविड कळघमची पहिली विद्यार्थी शाखा सुरू केली. पेरियार यांनी करुणानिधींचे कलागुण फार लवकर हेरले आणि त्यांना इरोड येथे आणले. इरोड येथील पेरियार यांच्या कुडी अरासु मासिकात त्यांनी एक वर्ष साहाय्यक संपादक म्हणून काम केले. कौटुंबिक पार्शवभूमीतून आलेल्या उपजत कलागुणांमुळे त्यांनी लहान वयातच नाट्यनिर्मितीत भाग घ्यायला सुरुवात केली. पुढे त्यांनी चित्रपटांसाठी लेखन सुरू केले. लेखक म्हणून त्यांनी पटकथा, ऐतिहासिक कादंबर्या, पटकथा, चरित्रे, कविता आणि कादंबर्या लिहिल्या. त्यांनी आपल्या लेखनाचा उपयोग सुधारणावादी विचारांचा प्रभावीपणे प्रचार करण्यासाठी केला. त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये असमानता, असहिष्णुता आणि दुराचार यांच्या विरोधात लढा देणारी आणि समाजवाद आणि विवेकवादाची तीव्र भावना असलेल्या सशक्त पात्रांचे चित्रण केले गेले. त्यांच्या ‘नाम’ या चित्रपटामध्ये कामगार वर्गाच्या दुर्दशेवर चर्चा करण्यात आली होती. त्या चित्रपटाने समाजवादी चळवळ आणि समानतेच्या आदर्शाबद्दल खोलवर रुजलेली उत्कटता दर्शविली होती. त्यांचा ‘पराशक्ती’ (१९५२) हा चित्रपट एक टर्निंग पॉईंट होता, कारण तो बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला होता. या चित्रपटाने जातिव्यवस्थेद्वारे स्थापित केलेल्या सामाजिक उतरंडीच्या विरोधात मूलगामी टिप्पण्या केल्या आणि द्रविड चळवळीचा गौरव केला. या चित्रपटात शिवाजी गणेशन आणि एस एस राजेंद्रन यांच्या भूमिका होत्या. एम.जी. रामचंद्रन (एमजीआर.) यांच्या ‘राजकुमारी’ या नायकाच्या भूमिकेतील पहिल्या चित्रपटासाठी त्यांनी पटकथा आणि संवाद लिहिले. चित्रपटासोबतच करुणानिधीनी ‘ओरे रथम,’ ‘पलाईनप्पन,’ ‘मणिमागुडम,’ ‘नाने अरिवली’ आणि ‘उदयसूर्यन’ ही नाटके पण लिहिली. ही नाटके प्रामुख्याने दलितांच्या समतेच्या लढाईवर भाष्य करणारी होती जी राज्यभर गाजली. या नाटकांनी आणि त्यातून मांडलेल्या विचारांनी तमिळनाडूतील राजकारणाची दिशाच बदलून टाकली. करुणानिधींच्या नाटक आणि चित्रपट कथांमधून द्रविड विचारधारा लोकांच्या मनात खोल रुजली.

करुणानिधी यांनी जवळ जवळ ७५ चित्रपटांचे लेखन केले. त्यांच्या लेखनातून ते संघटित धर्म आणि अंधश्रद्धेवर टीका करायचे. ते स्वतःला नास्तिक आणि तर्कवादी म्हणवून घ्यायचे. त्यांच्या चित्रपटामधून त्यांचा मुलगा स्टॅलिन याने प्रमुख भूमिका केल्या आहेत. स्टॅलिन हे तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. ६० वर्षांपेक्षा जास्त राजकीय कार्यकाळात करुणानिधी एकूण ५ वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी एका मुलाखतीमध्ये जाहीर टिपणी केली होती की, त्यांनी कायम त्यांचे द्रविडियन मनावर राज्य करणारे गुरू पेरियार आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री सी.एन. अण्णादुराई यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल केली. तमिळ साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना ‘कलाईनार’ (कलेवर प्रेम करणारा) आणि ‘मुत्थामिझ अरिग्नार’ (तमिळ विद्वान) म्हणून ओळखले जाते.
एम.जी.आर.

एम.जी. रामचंद्रन म्हणजेच एमजीआर हेदेखील तमिळ चित्रपट क्षेत्रातले आणि अण्णादुराईच्या विचारांनी प्रभावित होऊन राजकारणात आलेले नाव. करुणानिधींबरोबर मतभेद झाल्यान डी.एम.के. मधून बाहेर पडून त्यांनी ए.आय.ए.डी.एम.के. या पक्षाची स्थापना केली होती. ते काही काळ तामिळनाडूचे मुख्यमंत्री पण राहिले होते. एमजीआरनी जास्त करून अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्यांच्या चित्रपटांनी सामाजिक न्यायाचा संदर्भ कमी दिला, परंतु समकालीन राजकीय परिस्थितींवर भाष्य करण्यावर अधिक जोर दिला. त्यांच्या चित्रपटांमध्ये एमजीआरना कायम द्रविड कळघमच्या विचारसरणीचा प्रोटॅगॉनिस्ट प्रतिनिधी म्हणून दाखवण्यात यायचे. प्रत्यक्षात जीवनात मात्र त्यांनी द्रविड कळघमच्या विचारप्रवाहापासून स्वतःला दूरच ठेवले.
एस. एस. राजेंद्रन

एस. एस. राजेंद्रन (एसएसआर) सुरुवातीला शिवाजी गणेशनसारखे थिएटर कलाकार होते ज्यांनी द्रविड कळघमसाठी अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या होत्या. गणेशनप्रमाणेच त्यांनी पराशक्ती या चित्रपटामधून अभिनयात पदार्पण केले. १९५० आणि ६० च्या दशकात तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक असल्याने, त्यांनी डी.एम.के. साठी निधी उभारला आणि द्रविड विचारसरणीचा गौरव करणार्या चित्रपटांमध्ये काम केले.
एम. आर. राधा
एम. आर. राधा एक नाट्य अभिनेते होते, जे त्यांच्या खलनायकाच्या भूमिकेसाठी जास्त लोकप्रिय होते. ते पेरियार यांचे कट्टर अनुयायी होते आणि द्रविड कळघमपासून वेगळे होण्यापूर्वी ते बहुतेक डीएमके नेत्यांच्या जवळ होते.
अण्णादुराई आणि करुणानिधी हे दोघेही वेगवेगळ्या वेळी एम.आर. राधा यांच्या गटाचा भाग होते आणि त्यांनी त्यांच्या नाटकांमध्येही अभिनय केला होता. पेरियारनी राधा यांना ‘नदीगवेल’ (अभिनयाचा राजा) ही पदवी दिली होती.
शिवाजी गणेशन

शिवाजी गणेशन हे तमिळ चित्रपट क्षेत्रातले एक मोठे नाव. अण्णादुराई यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कांडा हिंदू राज्यम’ या नाटकामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका अगदी उत्तम निभावल्यामुळे त्यांना ‘शिवाजी’ ही उपाधी मिळाली होती आणि ही उपाधी त्यांना दुसरे तिसरे कोणी नाही तर खुद्द पेरियारनीच बहाल केली होती. गणेशन यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात द्रविड कळघमचा कार्यकर्ता म्हणून केली. १९४९ मध्ये सी.एन. अण्णादुराई यांनी स्थापन केल्यानंतर गणेशन द्रविड मुनेत्र कळघममध्ये सामील झाले. १९५६ पर्यंत, गणेशन द्रविड मुनेत्र कळघमचे कट्टर समर्थक होते. १९५० च्या दशकात शिवाजी गणेशन यांच्यावर तिरुपतीच्या भेटीदरम्यान ‘बुद्धिवादाच्या सांगितलेल्या मूल्यांच्या विरुद्ध’ गेल्याबद्दल टीका करण्यात आली. १९५६ मध्ये त्यांनी द्रमुक सोडला.
भारती दासन
भारती दासन हे २० व्या शतकातील तमिळ कवी आणि तर्कवादी लेखक होते. तामिळ कवी सुब्रमण्य भारती यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता आणि त्यांनी स्वतःला ‘भारती दासन’ म्हणजे भारतीचे अनुयायी असे नाव दिले.

भारती दासन पेरियार यांच्या विचारांचे आणि त्यांनी सुरू केलेल्या सेल्फ रिस्पेक्ट चळवळीचे मोठे पुरस्कर्ते होते. यांच्या लेखनाने तमिळनाडूमधील सेल्फ रिस्पेक्ट चळवळीच्या वाढीसाठी उत्प्रेरक म्हणून काम केले. त्यांच्या साहित्यकृतींनी मुख्यतः सामाजिक-राजकीय समस्या हाताळल्या. त्यांची स्वतःची एक शैली होती. त्यांनी मुख्यतः स्त्री मुक्ती आणि जातिभेदाविरुद्ध सामाजिक-राजकीय विषयांवर बुद्धिवादी आणि विचार करायला लावणारे लेखन केले. कवितेबरोबरच नाटके, चित्रपटाच्या पटकथा, लघुकथा आणि निबंध यामधून त्यांनी त्यांच्या अभिव्यक्तीला वाव दिला. १९९१ मध्ये तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी भारती दासनच्या लेखनाचे राष्ट्रीयीकरण केले होते, म्हणजेच त्यांचे सर्व साहित्य जनतेसाठी सार्वजनिकरीत्या उपलब्ध केले होते.
साथयराज (कट्टप्पा)
साथयराज हे तमिळ चित्रपट क्षेत्रातले एक मोठे नाव. हे नाव आपल्याला अपरिचित असले तरीही त्यांनी केलेल्या भूमिकांमधून आपण त्यांना ओळखतो. चेन्नई एक्सप्रेसमधले नायिकेचे वडील आणि बाहुबलीमधले कट्टप्पा या त्यांच्याच भूमिका. पहिल्यापासून पेरियार विचारांचे समर्थक असलेले साथयराज हे स्वतः कट्टर नास्तिक आहेत. पेरियारनी स्त्रीमुक्ती आणि अस्पृश्यता निवारणासाठी दिलेल्या लढ्यामुळे ते जास्त प्रभावित झाले. ते स्वतःला पेरियार यांच्या विचारसरणीचा प्रभाव असलेला विवेकवादी मानतात.

२००७ मध्ये आलेल्या पेरियार यांच्या जीवनावरील चित्रपटात त्यांनी पेरियारचीच भूमिका अतिशय उत्कृष्टरीत्या वठवली होती, ज्याच्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते.
–रुपाली आर्डे-कौरवार, राहुल थोरात, प्रा. डॉ. अशोक कदम
त्यांच्या भावना आमच्या भावनांपेक्षा काही श्रेष्ठ नाहीत! – पेरियार
ते तुम्हाला स्वतंत्रपणे विचारही करू देत नाहीत. देव, धर्म, धर्मगुरू आणि इतर काही गोष्टींबद्दल जे बोलले जाते त्यावर तुम्हाला विचार करण्याचा अधिकारच नाही. आपला विवेकाचा प्रचार हा त्यांच्या देव, धर्म आणि शास्त्रविरोधी आहे, असा त्यांचा गैरसमज आहे. आपल्या प्रचाराने त्यांच्या भावना दुखावतात, अशी ओरड ते करतात.
आपण कुठपर्यंत स्वतः शूद्र म्हणून अपमान सहन करायचा! खरेतर मला माझ्या लोकांची काळजी वाटत आहे? कुठपर्यंत आपण इतरांचे वर्चस्व कबूल करून अपमान व मानखंडना सहन करायची? कुठपर्यंत आपण ते म्हणतील त्यावर अंधपणे विश्वास ठेवायचा? मग आपल्या मेंदूचा काय उपयोग? आपण पाहत आहोत की, लोक आता हवेतून प्रवास करीत आहेत. आपण मात्र अजूनही ब्राह्मणांचे पाय धुवून पाणी पिण्यातच समाधान मानायचे का? आपल्या प्रचाराने त्यांच्या भावना दुखावतात अशी ते ओरड करीत असतील तरी आपण का म्हणून त्याची दखल घ्यायची? त्यांच्या भावना आमच्या भावनांपेक्षा काही श्रेष्ठ नाहीत. आपण आपले काम करायचे. आपणास धोके आणि अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे, याची आपणास जाणीव आहे. आपण आपले प्राणही धोक्यात घालण्यास तयार आहोत. कोणत्याही क्षणी मृत्यू येण्याची शक्यता आहे!