हा नवा भारत जुन्या बाटलीतलाच आहे!

डॉ. प्रदीप पाटील -

निखार्‍यावरून चालणे हे दैवी नसते हे समजायला इथल्या समाजाने स्वतःची दारे सतत बंद करून ठेवली आहेत. कारण विज्ञानाऐवजी धर्माचा शब्द अंतिम माना असे सांगणार्‍या पुरोहित-मांत्रिक-मुल्ला वर्गाचे नियंत्रण आणि धाक. जळत्या निखार्‍यावरून चालणे दैवी वगैरे काही नाहीये. जळत्या निखार्‍यावरून चालणे हे सर्व धर्मांत आहे. मुसलमानांमध्ये जळत्या निखार्‍यांना ‘अलावा’ तर हिंदूंमध्ये ‘किच’ म्हणतात. भारतात फकीर बनलेल्यांनी ही प्रथा निर्माण केलीय. त्यांचे म्हणणे असते की दैवी शक्तीमुळे पाय भाजत नाहीत. हा अडाणी युक्तिवाद आहे. यात दैवी वगैरे काहीही नाही. यामागे आहे विज्ञान. फिजिक्स व बायॉलॉजी. भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र.

बर्नार्ड लिकंद आणि विल्यियम मॅकार्थी यांनी यावर सखोल संशोधन केले. जळता कोळसा जो वापरला जातो त्यामध्ये उष्णता ही इतर ठिकाणी व इतर पदार्थांमध्ये असलेल्या उष्णतेपेक्षा खूपच कमी असते हे एक कारण आहे आणि दुसरे कारण म्हणजे जेव्हा आपण जळत्या कोळशाच्या निखार्‍यावर पाय ठेवतो तेव्हा तो अर्ध्या सेकंदापेक्षा कमी ठेवला तर भाजणारी संवेदना ही मेंदूपर्यंत पोहोचत नाही आणि चटका बसत नाही. फार पूर्वीपासून चटका बसू नये म्हणून लोखंडाला सुके लाकूड जोडून त्या सुक्या लाकडाला धरून लोखंड उचलले जायचे. याचा अर्थ उष्णता प्रतिबंधक म्हणून लाकडाचा वापर केला जातो. कोळसा तर सुक्या लाकडापेक्षा चार पटीने जास्त उष्णता प्रतिबंधक असतो. मग चालताना जेव्हा जळत्या निखार्‍यांचा चटका बसतो असे आपण म्हणतो तर तो चटका निखार्‍यांचा नसतो तर निखार्‍यावर जमा झालेल्या पांढर्‍या राखेचा असतो. ही राख ही अतिशय भाजणारी असते. म्हणूनच अलावा किंवा कीच याच्यावरून चालताना त्याच्यावर मीठ मारले जाते. मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड आणि ते जळत्या निखार्‍यांच्या राखेवर मारले तर राख बाजूला होते आणि लालबुंद निखारा दिसू लागतो. राख बाजूला झाली तर ती पायाला चिकटत नाही आणि जळत्या लालबुंद निखार्‍यावरून चालताना चटका फारसा बसत नाही.

कोणत्याही वस्तूचे तापमान हे जेव्हा दुसर्‍या वस्तूमध्ये किंवा शरीरामध्ये जाते तेव्हा ते तीन प्रकारे जात असते. संवहन किंवा कनव्हेक्शन जे पाणी, द्रव वा हवा-वायू यातून होते, उत्सर्जन किंवा रेडिएशन जे विद्युतचुंबकीय रूपातले असते, उदाहरणार्थ, सूर्याची उष्णता. आणि वहन किंवा कंडक्शन जे दोन वस्तू एकमेकांना स्पर्श केल्यावर घडते. या प्रकारामध्ये जेव्हा आपण जळत्या निखार्‍यावर पाय ठेवतो तेव्हा जळत्या निखार्‍याची उष्णता ही कणस्वरूपामध्ये असते आणि आपल्या पायाच्या तळव्यात जेव्हा तिचे वहन होते तेव्हा कोळशांची उष्णता कमी असल्याने फारसा चटका बसत नाही. दुसरे म्हणजे संपूर्ण पायाचा तळवा हा कोळशावर ठेवला जात नाही. मुख्य भाग टाचेचा असतो आणि अंगठ्याकडील भाग हा कमी स्पर्शला जातो. बर्‍याच वेळा अलाव्याच्या जागेच्या शेवटी पाणी मारून ठेवलेले असते. किंवा पाण्याचे कापड ठेवलेले असते. या ठिकाणी पाणी हे चटका बसू नये म्हणून प्रतिबंधाचे काम करते. पण यातही काळजी घ्यावी लागते. कारण जर पायाचे तापमान हे विशिष्ट तापमानापेक्षा जास्त असेल तर त्याचा फारसा उपयोग होत नाही, ज्याला ‘लेडनफ्रॉस्ट इफेक्ट’ असे म्हणतात. डेव्हिड विले हा अवलिया माणूस सातत्याने अशा किचातून किंवा अलाव्यातून शेकडो वेळा चाललेला आहे. त्याने याच्यावर संशोधन देखील केले आहे. तो आणि त्याच्या बायकोने मिळून १८ ऑक्टोबर १९९७ मध्ये सर्वांत जास्त लांबीच्या म्हणजे ६ फुटांपेक्षा जास्त कोळशाच्या निखार्‍याच्या खड्ड्यातून आणि १८०० डिग्री फॅरेनहाईट या उष्णतेतून चालण्याचा जागतिक विक्रम केला आहे.

१९३० मध्ये ‘युनिव्हर्सिटी ऑफ लंडन कौन्सिल फॉर सायकिकल रिसर्च’ या संस्थेने पहिल्यांदा जाहीर अभ्यास केला. भारतातील खुदाबक्ष नावाच्या व्यक्तीला घेऊन तेथील वैज्ञानिक सुमारे १२ फूट जळत्या ओक झाडाच्या निखार्‍याच्या खड्ड्यातून चालले होते. ज्याचे तापमान त्या वेळी सुमारे ८०० डिग्री होते व त्याच्या नोंदी घेतल्या होत्या. यापैकी कोणालाही भाजले नव्हते. अलीकडे ‘होली ग्रेल’वाल्या टोनी रॉबिन्सनने आपल्या मानसिक शक्तीच्या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी निखार्‍यावरून चालण्याचा प्रयोग केला होता. ‘द फायर वॉकिंग इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च अँड एज्युकेशन’ नावाची संस्था जागतिक पातळीवर यावर अनेक संशोधन व प्रबोधन करत असते. याचा अर्थ जळत्या निखार्‍यावरून चालणे दैवी वगैरे काही नसते. मी स्वतः आणि अंनिसचे शेकडो कार्यकर्ते आजही जाहीर कार्यक्रमांतून अशा जळत्या निखार्‍यावरून चालत आहोत. जळत्या निखार्‍यावरून स्वेच्छेने चालणारे दैवी नसतात आणि जळत्या निखार्‍यात ढकलून देणारे हे मानवतेचे गुन्हेगार असतात!

..आणि असे गुन्हे वारंवार घडू देण्याला जे वातावरण असते ते अतिशय धोकादायक असते हे मात्र खरे!


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]