गर्भसंस्कार : वास्तव आणि गैरसमज

डॉ. संजय निटवे - 9890091776

भ्रूणवाढीसाठी ‘डेव्हलपमेंटल जीन्स’ ही गर्भाचे अवयव तयार करण्यामध्ये क्रियाशील असतात. ही जनुके भ्रूणाच्या वाढीसाठी, अवयव निर्मितीसाठी तसेच उजव्या व डाव्या बाजू निश्चित करण्यासाठी शरीराचा पुढील व मागील भाग ठरविण्याचे काम करत असतात. यामध्ये WNT, SOX, HOX व इतर अनेक जीन्सचा समावेश असतो. ही सर्व जनुकीय रचना चांगली व निर्दोष असेल तर चांगले नॉर्मल मूल जन्माला येत असते. जनुकांद्वारे नियंत्रित असलेल्या गर्भवाढीच्या प्रक्रियेवर बाहेरून गर्भसंस्कार करून बदल करता येत नाही.

नेचर आणि नर्चर (निसर्ग आणि संगोपन) या दोघांचा मुलांच्या वाढीवर प्रभाव होत असतो. पण गर्भावस्थेमध्ये यातील काय परिणामकारक असते व कसे? हे लेखामधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

डी. एन. .- गुणसूत्रे जनुके

सर्व प्राण्यांच्या शरीरातील पेशींमध्ये केंद्रक असते. या केंद्रकामध्ये डी.एन.ए. (डिऑक्सिरायबोन्यूक्लिक अ‍ॅसिड) या नावाच्या चार प्रकारच्या मॉलेक्युलची एक मोठी साखळी असते. या साखळीतच मनुष्याची 46 गुणसूत्रे (23 जोड्या) बनतात. या गुणसूत्रांचा जो भाग कार्यशील असतो, त्याला ‘जनुके’ असे म्हणतात.

जनन करतात ती जनुके. प्राणिमात्रातील व वनस्पतीतील मूळ रचनात्मक व क्रियाशील घटक, जो आपले गुणधर्म आनुवांशिकतेने पुढील पिढीला देत असतो, तो घटक म्हणजे जनुके होय. याचाच अर्थ आनुवांशिकतेचा मूळ घटक म्हणजे जनुके असतात.

स्त्री व पुरुषाच्या शरीरातील तयार होणार्‍या बीजाचे व शुक्राणूंचे मिलन होऊन गर्भाचे फलन होते. तेव्हा या बीज आणि शुक्राणूंवर असलेल्या 23-23 गुणसूत्रांचे मिळून 46 गुणसूत्रांचा गर्भ तयार होतो; म्हणजेच या गर्भावर 23 जोड्या असतात. या जोड्यांपैकी प्रत्येकी एक गुणसूत्र आईकडून आलेले व दुसरे वडिलांच्याकडून आलेले असते. ही गुणसूत्रे डी.एन.ए.पासून बनलेली असतात. डी.एन.ए.च्या साखळीचे उभे विभाजन होते. तंतोतंत त्याच्यासारखाच ‘मॉलिक्युलर सिक्वेन्स’ असणारी दुसरी साखळी तयार होत असते. या प्रक्रियेद्वारेच आपले गुणधर्म पुढील पेशींमध्ये उतरविणे गुणसूत्रांना शक्य होते. अशा तर्‍हेने आई-वडिलांकडून आलेले गुणधर्म गर्भात उतरतात. काही जनुके अधिक प्रभावी असतात, तर काही कमी प्रभावी असतात. त्यानुसार आई-वडिलांचे वेगवेगळे गुणधर्म वेगवेगळ्या प्रमाणात मुलांच्यात व्यक्त होतात. काही वेळेस जनुकांमध्ये म्युटेशन होऊन नवीन जनुक तयार होते व त्याचा मुलावर प्रभाव पडतो, असेही होते.

जनुके हा या गुणसूत्रांवरील क्रियाशील घटक असणारा भाग. ही जनुके मुख्यत: प्रोटिन्स बनवत असतात. उदा. त्यामध्ये रंगतत्त्वे बनविणार्‍या प्रोटिन्सचा समावेश असतो; म्हणजेच त्वचेचा, डोळ्यांचा, केसांचा रंग हा या जनुकामार्फत पुढील पिढीमध्ये जात असतो. तसेच शरीरयष्टी, नाक व चेहर्‍याची ठेवण हे गुणधर्मही ही जनुके आपल्या प्रोटिन्समार्फत ठरवत असतात.

काही जनुके ही प्रतिकारशक्तीची प्रोटिन्स म्हणजे अँटिबॉडीज बनवित असतात; जनुकांमुळेच गर्भाचे लिंग ठरते, तसेच संवेदना निर्माण करणारे रिसेप्टर्स, रक्तगट, हिमोग्लोबीन हे सुद्धा जनुकांवरच अवलंबून असते. अनेक प्रकारची एन्झाईम्स जनुके बनवित असतात. या एन्झाईम्स मार्फत सर्व पेशींमधील रोजची चयापचय व इतर कामे केली जात असतात. या जीन्सना ‘हाऊस किपींग जीन्स’ असे संबोधले जाते.

दुसर्‍या प्रकाराची जनुके ज्यांना ‘डेव्हलपमेंटल जीन्स’ म्हणतात ती गर्भाचे अवयव तयार करण्यामध्ये क्रियाशील असतात, ही जनुके भ्रूणाच्या वाढीसाठी, अवयव निर्मितीसाठी तसेच उजव्या व डाव्या बाजू निश्चित करण्यासाठी शरीराचा पुढील व मागील भाग ठरविण्याचे काम करत असतात. यामध्ये WNT, SOX, HOX व इतर अनेक जीन्सचा समावेश असतो. या जनुकांचे काम ही एखादी क्रिया चालू अथवा बंद अर्थात स्वीच ऑन किंवा स्वीच ऑफ या पद्धतीने चालते. ही जीन्स अशी प्रोटीन्स तयार करत असतात की, ज्या प्रोटिन्समुळे पेशींमधील इतर काही ठराविक जीन्स क्रियाशील होतात किंवा क्रियाशील होणे थांबते अशा प्रकारच्या नियंत्रणामुळे गर्भाच्या/भ्रूणाच्या अवयव तयार करण्यात यांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. या कामासाठी सिग्नलिंग मॉलिक्यूल्स – जी पेशींबाहेर राहून कार्य करतात, ट्रान्सक्रिप्शन मॉलिक्यूल्स – जी पेशींच्या आत, केंद्रकात असतात, यांच्या माध्यमातून संदेशवहन (Signalling) केले जाते.

स्त्री-पुरुषांच्या समागमातून तयार झालेल्या एकपेशीय गर्भापासून नऊ महिन्यांत जन्माला येणारे मुल कसे तयार होते, याचा अभ्यास करणार्‍या विज्ञानाच्या शाखेला गर्भशास्त्र किंवा गर्भविकास शास्त्र अर्थात एंब्रीओलॉजी असे म्हणतात. अलिकडच्या काळात मॉलेक्यूलर जिनेटिक्स मधील संशोधनामुळे गर्भशास्त्राच्या ज्ञानात फार मोठी क्रांती झाली आहे. या वैज्ञानिक शाखेच्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, गर्भाची वाढ व विकास होताना त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण असते ते जनुकांचे. एका पेशीपासून विविध प्रकारच्या पेशींनी बनलेले प्राण्यांचे शरीर विकसित होते, ते त्यातील लाखो जनुकांमुळेच. ही जनुके नुसतीच एकाचे दोन, दोनाचे चार अशी संख्येने पेशींची वाढ करीत नाहीत, तर कोणत्या पेशीचे रूपांतर हृदय, मेंदू, हाडे, स्नायू, पोटातील आतडे, लिव्हर, किडनी इत्यादी इत्यादी वेगवेगळ्या अवयवांमध्ये कसे करावयाचे, ते नियंत्रण करत असते. एकाच गर्भपेशीमधून इतके सारे अवयव तयार होण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असते. निसर्गाने केलेल्या पिढ्यान्पिढ्यांच्या उत्क्रांतीने हे शक्य झाले आहे.

जनुकांच्या प्रभावाने गर्भाची रचनात्मकदृष्ट्या घडण पहिल्या आठ आठवड्यात जवळजवळ पूर्ण होत असते व पुढे नऊ महिन्यांपर्यंत त्याच्या आकारात वाढ व विकास होत असतो.

आईच्या शरीरातून मिळणारा रक्तपुरवठा गर्भवाढीस नियंत्रित करीत असतो; पण तेही आईच्या शरीरातील जनुकांमुळे घडत असते; म्हणजे आईच्या जनुकांमध्ये काही दोष असतील तर गर्भवाढीवर परिणाम होणार असतो. गर्भाशयातील रक्तवाहिन्या चांगल्या विकसित होणे, वार चांगली तयार होणे हे सर्व आईच्या जनुकांवर अवलंबून असते. गर्भाला चांगला रक्तपुरवठा मिळाला व त्याद्वारे मिळणारा ग्लुकोज, ऑक्सिजन, प्रोटिन्स आदींचा पुरवठा चांगला झाला तर गर्भाची वाढ चांगली होते.

संस्कार म्हणजे काय ?

संस्कार = 1) विधी किंवा Rites. 2) छाप, ठसा किंवा परिणाम – Impression 3) विकास, सुधारणा – Elaboration गर्भसंस्कार करतो, असे म्हणत असताना यापैकी कोणत्या अर्थाने आपण ते करतो?

संस्कारक्षम वयात मुलांचे शिक्षण किंवा त्यांच्या विचारांवर व वर्तनावर केलेला बदल म्हणजे मुलांवरचे संस्कार होत. येथे ‘संस्कारक्षम वय’ महत्त्वाचे असते. तीन ते चार वर्षांच्या मुलाला आपण जे काही शिकवतो, त्यापेक्षा सहा-सात वर्षांच्या मुलाला देतो, ते शिक्षण किंवा संस्कार वेगळे असतात; तसेच नऊ-दहा वर्षे किंवा 15 ते 17 वर्षे वयाच्या मुलांवर वेगळे संस्कार करीत असतो. मेंदूची आकलन व बोधनक्षमता यांच्यावर हे अवलंबून असते. गर्भातील मेंदूची आकलनशक्ती विकसित झालेली नसते. कारण त्यात मेंदूतील मज्जासंस्थेचे ‘मायलिनेशन’ अजूनही झालेले नसते. त्यामुळे हळूहळू मूल मोठे होत गेल्यानंतरच व आकलनशक्ती वाढल्यावरच त्याच्यावर आपण संस्कार करू शकतो. पोटातील गर्भाला एखादा मंत्र कळेल किंवा संगीत कळेल, त्याचा अर्थबोध होईल, असा त्याचा मेंदू विकसित झालेला नसतो; नाहीतर मराठी, गणित विषयांच्या शिक्षिकेला जे मूल होते, ते जन्मतः त्या-त्या विषयाचे ज्ञान घेऊनच जन्माला आले असते. संस्कृत श्लोक शिकविणार्‍या शिक्षिकेच्या मुलाला जन्मत:च संस्कृत येईल व इंग्रजीच्या शिक्षिकेच्या मुलाला जन्मत:च इंग्रजी येईल! असे होते का? मुळीच नाही (त्यामुळेच अभिमन्यूची कथा ही अविश्वसनीय वाटते). आकलनशक्ती नसल्यामुळे गर्भावर आपण बाहेरून संस्कार करू शकत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

तयार होणारी जनुके चांगली असतील तर गर्भ चांगला तयार होतो. जनुकीय दोषांमुळे होणारे बाळाचे व्यंग आपण गर्भसंस्कार करून थांबवू शकत नाही.

गर्भवती स्त्रीने काय खावे? कसा व्यायाम करावा, हे सांगणे म्हणजे ‘मातृत्वशिक्षण’ किंवा ‘मातृत्वसंस्कार’ म्हणू शकतो. यात गर्भसंस्कार नसतात – आईवर असतात.

आधुनिक वैद्यकशास्त्रीय प्रसुतीपूर्व तपासण्या व सल्ला

आधुनिक वैद्यकशास्त्र जो सल्ला देत असते, त्यावर विश्वास ठेवायला हवा. प्रसुतीपूर्व तपासण्या (A.N.C.- Ante Natal Care) मध्ये डॉक्टर्स आईच्या शारीरिक तपासण्या, वजनवाढ, ब्लडप्रेशर इत्यादींबरोबरच सोनोग्राफी, डबल किंवा कॉड्रुपल मार्कर्स व इतर रक्ततपासण्या करीत असतात व बाळ नॉर्मल आहे का नाही व वाढ चांगली आहे की नाही, हे पाहत असतात. आईला आयर्न, कॅल्शियमच्या गोळ्या खायला देणे, थायरॉईडची कमतरता असल्यास ते देणे, इतर सर्व व्हिटामिन्स व प्रोटीन्स योग्य प्रमाणात देणे, मानसिक शांती ठेवणे व पुरेशी शारीरिक विश्रांतीसाठी रात्री आठ तास व दुपारी दोन तास झोप घेणे, हे सर्व मातृत्वाचे शिक्षण होय. त्यामुळे चांगल्या वजनाचे बाळ जन्माला येण्यास मदत होणार असते. बाळाची बुद्धिमत्ता ही आई-वडिलांकडून आलेल्या जनुकांवर काही प्रमाणात अवलंबून असते, तशीच ती प्रसूतिपूर्व व प्रसूतिकाळात बाळाला मिळणार्‍या ऑक्सिजनपुरवठ्यावर अवलंबून असते, तसेच ते बाळ मोठे होताना त्याला मिळणारे शिक्षण, वातावरण यावर त्याच्या बुद्धिमत्तेचा विकास अवलंबून असतो.

थोडक्यात असे म्हणता येईल की, गर्भसंस्काराने बाळाची बुद्धिमत्ता वाढवितो, असा दावा केला जातो तो चुकीचा आहे. मूल सद्गुणी होणे, हे संगोपनातील संस्कारांद्वारेच शक्य असते. आयुर्वेदातील प्राचीन शास्त्रानुसार गर्भसंस्कार शिकविले जातात; परंतु आधुनिक विज्ञानाला हे मान्य नाहीत. कारण त्याला पुरावा नाही. तसेच या गर्भसंस्कारांकरिता होणारा खर्च हा सर्वसामान्यांना पडणारा भुर्दंडच आहे. त्यामुळे त्याचा अट्टाहास धरू नये. त्यापेक्षा त्यातील अपेक्षाभंगाचा धोका अधिक मोठा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

(हा लेख पुर्णत्वास नेण्यास जनुकशास्त्र तज्ञ डॉ. चैतन्य दातार, पुणे मोलाचे सहकार्य दिले आहे.)

लेखक संपर्क – 98900 91776


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]