प्रभाकर नानावटी -

२३ ऑगस्ट २०२३ रोजी इस्रो या संस्थेतील भारतीय संशोधकांनी चंद्राच्या दक्षिण धृवाजवळ चंद्रयान ३ या कृत्रिम उपग्रहाला उतरवून उड्डाण यशस्वी करून दाखविले. या वैज्ञानिक यशामध्ये अनेक संशोधकांचा, तंत्रज्ञांचा, या प्रकल्पाला हातभार लावलेल्या इतर सर्व उद्योगसंस्थाचा फार मोठा वाटा होता, हे विसरता येत नाही. परंतु या उद्दिष्टपूर्तीचे श्रेय देताना इस्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एस सोमनाथ यांनी मात्र याप्रकारच्या विज्ञानक्षेत्रातील सर्व श्रेय आपल्या हिंदू संस्कृतीला देत वेदासारख्या आपल्या धर्मग्रंथात याविषयीचे संदर्भ सापडतील, असा दावा केला. समाज माध्यमामध्ये या त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ हजारो नोंदींचा अक्षरशः पाऊस पडला. वैदिक संस्कृती इतर कुठल्याही संस्कृतीपेक्षा कशी उच्च प्रतीची आहे हे दाखवून इतर टीकाकारांना हिणवण्याची एकही संधी समाजमाध्यमांनी सोडली नाही. त्यांच्या अट्टहासापायी ‘वेदो से विज्ञान’ या हॅशटॅगवर हजारोंनी टिप्पणी केली.
सोमनाथ यांनी सूर्य सिद्धांत नावाचे मूळ संस्कृत भाषेतील खगोलशास्त्रावरील ग्रंथ वाचत असताना त्यात सौरमाला, कालपरिमाण व पृथ्वीच्या परिघाविषयीचे उल्लेख सापडल्याची आठवण सांगितली. त्यांच्या मते खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, भौतिकी, रसायनशास्त्र व विमानसंचारशास्त्र विषयीचे अनेक उल्लेख वेदामध्ये सापडत असल्यामुळे याबद्दलचे विशेष ज्ञान त्या वैदिक काळात होते व ते सर्व त्यांनी संस्कृतमध्ये लिहून काढले होते. परंतु त्यावर इतकी शतके कुठलेही संशोधन न केल्यामुळे त्याचा फायदा घेता आला नाही.
एवढेच नव्हे तर बीजगणित, कुठल्याही संख्येचे वर्गमूळ काढण्याची रीत, काळाची संकल्पना, ब्रह्मांडाची रचना, धातुशास्त्र शिवाय विमानचालनसुद्धा या संस्कृत ग्रंथात लिखित स्वरूपात सापडतात. या गोष्टी भारतातून अरबदेश व तेथून युरोपियन राष्ट्रात गेल्या व नंतरच्या काळात तेथील वैज्ञानिकांनी यांचा आपणच शोध केला म्हणून शेखी मिरवली. फक्त या ऋषी-मुनींच्या संकल्पनांची सुबकपणे पॅकेजिंग केले असे सोमनाथ यानी ब्रेकथ्रू सायन्स सोसायटीच्या एका कार्यक्रमात वक्तव्य केले. तेथे जमलेल्या वैज्ञानिकांनी सोमनाथ यांचे निवेदन केवळ बकवास असून सोमनाथ भारतीय इतिहासाचे टोकाचे उदात्तीकरण करत आहेत व सामान्यांच्या मनात गोंधळ उडविणारी ती विधानं आहेत, अशा स्पष्ट शब्दात निषेध केला.
व्याख्यान ऐकण्यासाठी जमलेल्या काही प्रेक्षकांनी एक निवेदन प्रस्तूत करून सोमनाथ यांना एक साधा प्रश्न विचारला, जर खगोलशास्त्र, विमानरचनाशास्त्र इत्यांदीचे एवढे मोठे ज्ञानभंडार पुरातन काळातील संस्कृतमध्ये लिहिलेल्या वेद-पुराणात सापडत असल्यास इस्रोंनी त्याचा वापर का केला नाही? वेदातील सिद्धांत व तंत्रज्ञान वापरून रॉकेट वा उपग्रहातील एखाद्या यंत्रणेचा विकास केल्याची उदाहरणं सोमनाथ देऊ शकतील का?
गंमत म्हणजे अशा प्रकारचे सोमनाथ यांनी केलेले पुरातन ग्रंथातील विज्ञान-तंत्रज्ञानविषयीचे अचरट दावे पहिल्यांदाच केले जात आहेत असे काही नसून त्याचा विरोधही नवीन नाही. यापूर्वीही अनेक भारतीय वैज्ञानिकांनी त्याचे पोल खोललेले आहेत.
काळाच्या पडद्याआड व विस्मरणात गेलेले सुप्रसिद्ध खगोलभौतिक शास्त्रज्ञ, मेघनाद सहा यांनी १९३९ च्या सुमारास ‘भारतवर्ष’ या बंगाली नियतकालिकेमध्ये या प्रकारच्या तद्दन फसव्या दाव्यांच्या विरोधात एक लेखमालिकाच लिहून प्रसिद्ध केली होती. कदाचित त्यांचे इतर भाषेत भाषांतर झालेले नसल्यामुळे त्याचा परिचय नसावा. गेली वीस वर्षे मी वेद, उपनिषद, पुराण व फलज्योतिषांतील विज्ञानविषयक उल्लेखांचे संशोधन व अभ्यास करत आहे. परंतु मला त्यात आधुनिक विज्ञानाशी संबंधित एकही संदर्भ सापडले नाहीत, असे विषादपूर्वक म्हणावे लागते. असे सहा यांना त्यांच्या आधुनिक ‘विज्ञान ओ हिंदू धर्मो’ या लेखात म्हटले आहे. फक्त बुद्धीमंद हिंदूच अशा जीवाष्मासदृश वेदातील विज्ञानविषयक गोष्टीवर विश्वास ठेवतील, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
जगभरातील पुरातन संस्कृतीत पृथ्वी व ब्रह्मांड, सूर्य-चंद्र व इतर ग्रहांच्या भ्रमण, प्राणीशास्त्र व रसायनशास्त्र इत्यादीविषयी अनेक उल्लेख सापडतील. तसे असले तरीही आधुनिक विज्ञान हे गेली तीनशे वर्षे युरोपियन संशोधकांनी केलेल्या श्रमांचे फलित आहे, हे आपण नाकारू शकत नाही.
हिंदूंच्या परमेश्वराच्या दशावताराची कल्पना डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताशी मिळतीजुळती आहे, या विधानाची त्यांनी खिल्ली उडवली आहे. मुळात हिंदू धर्मग्रंथात याविषयी एकमत नसून उत्क्रांतीशी त्याचा संबंध जोडणे चुकीचे वाटते, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. डार्विनचा सिद्धांताच्या शोधामागे डार्विनचे अपार कष्ट होते. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने सजीवांची उत्क्रांती होत गेली हे त्याचे मुख्य प्रतिपादन होते. सजीव प्राणी स्वत:चे वंश टिकवण्यासाठी गरजेपेक्षा जास्त पिलांना जन्म देतात, परंतु त्यातील फारच कमी सजीव जिवंत राहून वंशसातत्याला हातभार लावू शकतात. दुसर्या निरीक्षणाप्रमाणे सर्व सजीव आरश्यातील प्रतिबिंबासारखे एकसारखे नसतात. ही विविधता आनुवंशिकतेतून आलेली असली तरी प्राणी स्वत:चे क्लोन तयार करत नाहीत. या निरीक्षणांची गोळाबेरीज करून प्राणी जगतात, वंशसातत्याची सहजप्रवृत्ती असते; नैसर्गिक परिस्थितीतील बदलांना तोंड देऊन जे जगू शकतात, त्यांनाच वंशसातत्य टिकवता येत; अशा बदलांना तोंड देऊन वंश चालवू शकणारे हेच खरे जगण्यायोग्य सजीव, या निष्कर्षाप्रत डार्विन पोचला. दशावताराच्या हिंदू संकल्पनेत या निरीक्षणांच्या जवळपास जाणारे एकसुद्धा उदाहरण नाही.
आयझ्याक न्यूटनने (१६४३-१७२३) गुरुत्वाकर्षण नियमांचा शोध लावण्यापूर्वीच भारतातील भास्कराचार्य या गणितज्ञाने चारशे वर्षापूर्वीच १२ व्या शतकात शोध लावला होता. या हिंदू राष्ट्रभक्तांच्या दाव्याचाही सहा यांनी समाचार घेतला होता. खरोखरच भास्कराचार्य यांना गुरुत्वाकर्षणाचे नियम माहीत असते तर सूर्याभोवती फिरणार्या ग्रहांचा भ्रमण मार्ग व गतीशीलता वर्तुळाकार नसून दीर्घ लंबवर्तुळाकार असतो हे त्यांना नक्कीच कळले असते व तशी नोंद त्यांनी केली असती. संस्कृत पंडित शशधर तर्कचूडामणी यांनी तर अगस्त्य ऋषींचे एका घोटात समुद्रातील पाणी पिऊन समुद्र रिकामे केल्याचा संबंध विद्युतविघटनाशी (electrolysis) जोडल्याचे वाचून सहा यांना तर रडावे की हसावे असे वाटले असेल.
सहा यांच्या लेखनाची धार तीक्ष्ण वाटत असली तरी हिंदू संस्कृतीतील पुरातन संस्कृत ग्रंथांचा संदर्भ देत वैदिक संस्कृतीत आधुनिक विज्ञानाचे मूळ शोधणार्यांचा पर्दाफाश केला आहे; हे मात्र निश्चित. न्यूयॉर्क येथील रोचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे भौतिकी व मानव्यशास्त्राचे प्राध्यापक असलेले व्ही. व्ही. रामन यानी आपल्या ‘सायंटिफिक एंटरप्राइज’ या प्रबंधात उल्लेख केल्याप्रमाणे अलीकडील भारतीय वैज्ञानिक अशा प्रकारच्या फसव्या दाव्यांच्या विरोधात आवाज उठवत नाहीत, म्हणून तर सोमनाथसारखे उच्चपदस्थ सत्ताधार्यांना आवडेल असे बोलण्यास धजावतात. विरोध करावासा वाटत असला तरी गप्प बसणारे वैज्ञानिक कदाचित ‘आपण बरे व आपले काम बरे’ म्हणून लॅबच्या चार भिंतीच्या आड कोंडून घेत असावेत. थोडासा विरोध केला तरी विरोध करणार्यांना ‘मेकॉलेचे औलाद वा युरोप-अमेरिकेच्या वैज्ञानिकांचा ताटाखालचे मांजर’ वा ‘आपल्या महान संस्कृतीचा अभिमान नसणारे’ म्हणून ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. त्यामुळे वैदिक संस्कृती किती उच्च आहे असे जनसामान्यांना वाटू लागते.
वैज्ञानिकांचे अशा प्रकारचे (गैर)वर्तन फक्त आजच्या परिस्थितीमुळे झाले आहे, असेही वाटण्याची शक्यता आहे. परंतु विज्ञानाचे इतिहासकार असलेले मीरा नंदा यांच्या मते २०व्या शतकातसुद्धा आधुनिक विज्ञानाचे मूळ भारतीय परंपरेतील वैदिक वाङ्मयात सापडतात या विधानाला फार विरोध झाला नाही. १८व्या शतकातसुद्धा वैदिक विज्ञान व आधुनिक विज्ञान हे दोन्ही गुण्या-गोविंदाने नांदत होते याची अनेक उदाहरणं त्यानी त्यांच्या एका पुस्तकात दिलेली आहेत. वैदिक संस्कृतीचा हा वरचढपणा त्याकाळापासून आहे असे त्या विषादपूर्वकपणे म्हणतात.
मेघनाद सहा नंतरच्या जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक जयंत नारळीकर यांनीसुद्धा संस्कृत भाषेतील प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून आपली मतं मांडली आहेत.
नारळीकर यांनी लिहिलेल्या ‘दि सायंटिफिक एड्ज- दि इंडियन सायंटिस्ट फ्रॉम वेदिक टु मॉडर्न टाइम्स’ या पुस्तकात बौधायन, आपस्तंभ, आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त व भास्कर II या पुरातनकालीन ऋषी-मुनींच्या ग्रंथातील विज्ञानासंबंधींच्या विधानांचा आढावा घेतला आहे. त्याचवेळी त्याकाळच्या प्रथेप्रमाणे ग्रंथातील ‘आम्हाला सर्व काही माहीत आहे’ याप्रकारच्या उल्लेखाविषयीसुद्धा ते आपल्याला धोक्याचा इशारा देत आहेत.
आपण नेहमीच आपल्या पूर्वजांकडे आधुनिक युगातील तंत्रज्ञानाच्या तोडीचे ज्ञान होते असे ऐकत आलो आहोत. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथातील काही तात्विक विधानांचा अर्थ समजून घेताना आधुनिक विज्ञानाच्या आघाडीवरील क्वांटम सिद्धात, स्ट्रिंग थेअरी (string theory), युनिफाइड फील्ड थेअरी (unified field theory), सापेक्षता सिद्धांत यासारख्या विषयांच्या मूळ कल्पना त्या विधानात आहेत की काय असे वाटू लागते. परंतु या विधानांच्या पुष्ट्यर्थ जास्त माहिती न मिळाल्यामुळे या दाव्यामध्ये काही तथ्य नसावे या निष्कर्षाप्रत ते पोचले.
वैज्ञानिक सिद्धांताची मांडणी करताना ते जास्तीत जास्त स्पष्ट असणे व त्यातून वर्तविलेले अंदाज व त्या अंदाजांचे मोजण्यायोग्य तपशील – त्यात असावे हे अपेक्षित असते. सिद्धांत जितका आधुनिक त्याच अनुषंगाने त्यातील अंदाज अधिक तंतोतंत असणे गरजेचे आहे. परंतु प्राचीन कालातील ग्रंथामध्ये याचाच नेमका अभाव असतो. त्यांच्या वैज्ञानिक विधानातून केलेले दावे आधुनिक विज्ञानाची मुळं आहेत असे म्हणताना नंतरच्या खरे ठरलेल्या अंदाजावरून तो सिद्धांत असावा असे वाटू लागते.
ऋग्वेदातील नारदीय सूक्तामधील काही उल्लेख आधुनिक विश्वशास्त्रज्ञांनी विचारलेल्या प्रश्नांच्यासारखे वाटतील वा शुल्व सूत्रातील काही उल्लेख नंतरच्या काळातील ग्रीक तत्वज्ञ डायफोंटसच्या समीकरणाशी तंतोतंत जुळत असतीलही. यातून आपले वैदिक पूर्वजांच्यातसुद्धा विज्ञानासंबंधी प्रचंड कुतूहल होते, त्याच्यात आपल्या भोवती काय घडत आहे हे जाणून घेण्याची जबरदस्त इच्छा होती, असे म्हणता येईल. परंतु ते सर्व आजच्या आधुनिक विज्ञानाशी जोडता येईल, असे काही त्यात नव्हते.
‘क्वांटम सिद्धांताचे ज्ञान वैदिक सिद्धांतातून स्पष्ट होऊ शकते’ हे विधान वैदिक संस्कृती व आधुनिक विज्ञान या दोन्हींनाही मारक ठरू शकेल. कारण वैदिक संस्कृतीतील काही तुरळक उल्लेख वैज्ञानिक कसोटीला उतरू शकत नाहीत व त्यामुळे कदाचित आधुनिक विज्ञानातील संशोधनापासून चित्त विचलित होण्याची शक्यताच जास्त आहे.
आपण आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाबद्दल एवढे संवेदनशील का आहोत याचा विचार केल्यास युरोपियन राष्ट्राच्या वसाहतवादात सापडू शकेल व आपला देश पारतंत्र्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होता, असे मत रामन त्यांच्या प्रबंधात व्यक्त करतात. जे काही पाश्चिमात्य राष्ट्राशी संबंधित आहे, ते सर्व निकृष्ट दर्जाचे असून आपला देश एके काळी फार पुढारलेला होता, हे पटवण्याची अहमहमिका १९ व्या शतकात लागली असावी व त्याच गोष्टींची री ओढत आजही -व तेही २१ व्या शतकात- आपण आपली अस्मिता कुरवळत आहोत की काय, असा संशय येतो. १९ व्या शतकातील धार्मिक गुरुंना धार्मिक असलेल्या सामान्यांना राष्ट्रभक्तीने प्रेरित व पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी त्यांची अस्मिता जागृत करणे अत्यावश्यक ठरले असेलही. काही बाबतीत हे मान्यही असेल. परंतु आधुनिक विज्ञानालाही त्यात ओढणे अयोग्य ठरेल. हिंदू वा इतर धर्मग्रंथात आधुनिक विज्ञानातील सिद्धांत शोधणे वा त्या काळातसुद्धा तंत्रज्ञान होते असे विधान करणे निश्चितच हितावह ठरणार नाही.
आपण अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीत पूर्वजांना ओढणे योग्य ठरणार नाही व असे केल्यामुळे आपण आपलेच हसे करून घेत आहोत. आपल्याला आता व्यावहारिक शहाणपण, अंतर्दृष्टी व कॉमन सेन्स या गोष्टी एकीकडे आणि विज्ञानासाठीची सर्जनशीलता व परिश्रम दुसरीकडे हे लक्षात घेतच पुढे जायचे असून याची जाण असणे आवश्यक ठरणार आहे.
वर फेकलेला चेंडू जमिनीवर परत येतो व हा त्याचा स्वभाव आहे असे नमूद करणार्या आपल्या पूर्वीचे हिंदू विचारवंताची आकर्षणाविषयीची कल्पना नक्कीच अभिमानास्पद आहे. परंतु वस्तुभार व त्यातील अंतर यांच्या संबंधाचा न्यूटनचा सिद्धांत नक्कीच वरचढ ठरणारा आहे, हे लक्षात घेतल्यास अशा प्रकारचे वेद-पुराणकथातील विज्ञानविषयक फुकाचे दावे करणार्यावर अंकुश बसू शकेल.
संदर्भ : वायर या संस्थळावरील विज्ञानविषयीचे लेख
–प्रभाकर नानावटी
(लेखक हे डी.आर.डी.ओ.चे निवृत्त शास्त्रज्ञ आहेत)
लेखक संपर्क : ९५० ३३३ ४८९५