अनिल चव्हाण -
अमावास्येची रात्र
१८ जानेवारीची तारीख! अमावस्येचा दिवस! रात्री बाराची वेळ! सगळा गाव गाढ झोपेत; म्हणजे गावात स्मशानशांतता! पण स्मशानात मात्र जाग दिसत होती!
गावात दूध संघाच्या निवडणुका! उद्या मतदान या पार्श्वभूमीवर काही कार्यकर्ते रात्रीचा दिवस करण्यासाठी जागे राहिले होते. त्यांची गस्त चालू होती. त्यांच्या लक्षात आलं की स्मशानाच्या दिशेने गेलेली गाडी तिथेच थांबली.
स्मशानात पूजा
स्मशान गावापासून अर्धा किलोमीटरवर! इतक्या रात्री स्मशानात कोण उतरले? हे लोक कोण आहेत? का आलेत? गस्त घालणारे कार्यकर्ते स्मशानाच्या दिशेने वळले!
त्यांना दिसले की, फोर व्हीलरमधून पाच लोक खाली उतरले. त्यांच्या हातात पिशव्या आणि गठळी आहेत. खाली उतरल्याबरोबर त्यांनी गठळी बाजूला ठेवली, सोडली, आणि त्यामधून काही वस्तू बाहेर काढल्या. कार्यकर्ते स्मशानाकडे पोहोचेपर्यंत तिथं पूजा मांडलेली होती.
काळ्या बाहुल्या आणि खिळे
एका बाजूला भोपळा, दुसर्या बाजूला कोहळा, मध्ये पपई, हळदी कुंकवाच्या पुड्या, बुका आणि मुख्य म्हणजे काळ्या बाहुल्या. शेजारी खिळे. बाहुल्यांची संख्या ४० आणि प्रत्येक बाहुलीच्या शेजारी एक खिळा ठेवलेला! आणि हे सर्व सुरू असताना कोणी टाळ्या वाजवून ओरडत आहे. कुणी हातातले तांदूळ त्यावर टाकून मंत्र म्हणतेय. एकूण भीतिदायक आणि भयानक दृश्य तिथे दिसत होते.
गावकर्यांची प्रतिक्रिया
आपल्या गावच्या स्मशानात प्रेत जाळण्याच्या ठिकाणी असा काही उद्योग सुरू असल्याचे पाहून पहिल्यांदा गावकरी घाबरले, भेदरले. तर काहीजण धीटपणे पुढे आले. त्यांनी या पूजेचा अर्थ काय? कशासाठी पूजा करता? असा जाब विचारला! काहीजण त्याही पुढे जाऊन वस्तू न्याहाळू लागले! आपल्या पूजेला असा काही विरोध होईल अशी शक्यता बहुधा मांत्रिकांना वाटत नव्हती! त्यांनी व्यवस्थित उत्तरे देण्याऐवजी गावकर्यांशी वाद घालायला सुरुवात केली. त्यातून बोलाचाली वाढली. प्रकरण हातघाईवर आले.
अशा वेळी मांत्रिकांनी पळून जाण्याचा मार्ग स्वीकारला. तिघे जण अंधारात पळून जाण्यात यशस्वी ठरले. पण फोर व्हीलर टाकून जाणे दोघांना जड झाले. ते दोघेही अलगद गावकर्यांच्या हाती लागले.
स्मशानात आरडाओरडा, गोंधळ सुरू आहे हे तिथून शंभर-दोनशे मीटरवर असलेल्या राहणार्या नागरिकांच्या लक्षात आले. कोणीतरी मोबाईलचा वापर केला आणि ही बातमी पोलीस पाटलांपर्यंत पोहोचवली. पोलीस पाटील माळी ताबडतोब घटनास्थळी हजर झाले. पोलिसांना कळवले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने त्या दोन मांत्रिकांना ताब्यात घेतले आणि इस्पुर्ली पोलीस स्टेशनमध्ये आणले. सोबत सगळे पूजेचे साहित्य ताब्यात घेतले. दर्याचे वडगाव इस्पुर्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते.
चौकशी
रात्री दोनचा सुमार. पोलिसांनी चौकशी सुरू केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्मशानात पूजा का करत आहात? तुम्हाला इथे कोणी बोलावून आणले आहे? पूजा कोणासाठी करता आहात? पण यावर समाधानकारक उत्तरे मिळेनात. इकडे गावात स्मशान पूजेची बातमी पसरली. सगळा गाव जागा झाला आणि गटागटाने चर्चा करू लागला. तर्कवितर्कांना उधाण आले. भीतीचे वातावरण पसरले. उत्साही तरुणांनी मांत्रिकांना पाहण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले. रात्रभर लोक जागेच. दुसर्या दिवशी पोलिसांनी पलायन केलेल्या तीन मांत्रिकांना सुद्धा पकडले.
मांत्रिकाचे म्हणणे
मांत्रिकाचे म्हणणे आहे, “आमच्या वैयतिक अडचणी आहेत. त्यासाठी आम्ही पूजा करत आहोत, याचा गावकर्यांशी काही संबंध नाही.” एकही मांत्रिक स्थानिक नाही. पाचगाव, इचलकरंजी, टाकळी, टाकळीवाडी, तोरणानगर अशा विविध ठिकाणांहून ते एकत्र आले आहेत.
तुम्ही इतक्या लांब का आलात?
या प्रश्नावर त्यांचे उत्तर होते, “आम्हाला पूजा करण्यासाठी शांततेची गरज होती, रस्त्यात इतर काही स्मशानात सुद्धा आम्ही पूजा करण्यासाठी शोधाशोध केली! पण शांतता नसल्यामुळे आम्ही तिथे पूजा करू शकलो नाही!”
खरी गोष्ट काय आहे ते पोलीस शोधून काढतील. पण काहीही असलं, तरी स्मशानात पूजा केल्यामुळे एक प्रकारची भीती तयार झाली.
जारण मारण
काळ्या बाहुल्या आणि त्यांच्या पोटात खुपसण्यासाठी खिळे, यावरून मांत्रिकांचा विचार स्वतःची अडचण दूर करावी, असा दिसत नाही. त्यामुळे गावकरी मांत्रिकांच्या कथांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. काळी बाहुली आणि खिळे यामुळे हा जारण मारणचा प्रकार आहे असा समज तयार होतो; आणि भीतिदायक वातावरण तयार होते. एपीआय क्रांती पाटील या गुन्ह्याचा तपास करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गुरव आणि इतर कर्मचारी यांनी सर्व आरोपींना शिताफीने पकडले. त्यांच्याकडून सत्य माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात ते आहेत.
बातमी टीव्हीवर
आता गावोगाव वार्ताहर तयार झालेत. या भागातील वार्ताहर आणि बातमी यू ट्यूबवर आणि टीव्हीवर सुद्धा पाठवली. तत्परतेबद्दल या वार्ताहरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. स्मशानात पूजा आणि लोकांमध्ये घबराट ही बातमी टीव्हीवर पाहिल्यावर आम्ही अधिक चौकशी केली. माहिती घेतली. तेव्हा एफआयआर दाखल करण्यासाठी कोणी गावकरी पुढे येत नसल्याचे लक्षात आले.
कोल्हापूर अंनिसची बैठक
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये या घटनेसंबंधी ऊहापोह झाला. अॅडव्होकेट अजित चव्हाण कॉम्रेड चंद्रकांत यादव, आनंदराव चौगुले यांनी, “शासकीय दक्षता समिती स्थापन करण्यात आलेली आहे, या समितीने अशा प्रकरणात हस्तक्षेप केला पाहिजे”, असे मत मांडले.
जयंत मिठारी, राजेंद्र खद्रे, अमर जाधव यांनी “असे मांत्रिक पुढे गुप्तधन काढून देतो, पैशाचा पाऊस पाडतो, संपत्ती मिळवून देतो, कोर्ट केसमध्ये यश मिळवून देतो, निवडणुकीत जिंकून देतो, अशा तर्हेच्या भूलथापा देऊन लोकांना लुबाडत असल्याची” उदाहरणे दिली.
जिल्हाध्यक्ष प्रा. विलासराव पोवार, सीमा पाटील आणि रमेश वडणगेकर यांनी “पोलिसांना अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची माहिती देऊन सहकार्य करण्याची” भूमिका मांडली. अमोल नाईक, प्रभंजन चव्हाण, शशांक चव्हाण, शर्मन पाटील यांनी “जिल्ह्यात मांत्रिकांच्या टोळ्या असून, मुळ्या आणि जाडी बुटी विकणार्या आयुर्वेदिक औषधी दुकानदाराकडे मांत्रिकांची ये-जा असल्याचे” मत मांडले.
महिला मांत्रिक
मीना चव्हाण, छाया पोवार, सुनंदा चव्हाण, समृद्धी नाईक, अस्मिता चव्हाण यांनी “मंत्र तंत्र करण्यामध्ये पुरुष मांत्रिक असतात, महिला मांत्रिक नाहीत” यावर बोट ठेवले. शेवटी सर्वानुमते “आपल्याच कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन एफआयआर दाखल करावा,” असे ठरले. त्यानुसार अनिल चव्हाण यांनी एफआयआर दाखल केला.
अधिनियम
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा याला प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत, अधिनियम २०१३ कलम तीन (एक), तीन (दोन), तीन (तीन), तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ कलम तीन ( पाच) या अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, कमिटी स्थापन करण्यात आली आहे. “या कमिटीने लोकजागृती करावी आणि अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालावे, मांत्रिकांची नोंद पोलिसांकडे असावी,” असे निवेदन देण्याचे ठरले.
अशा मंत्र तंत्र प्रकरणांची पुढची पायरी म्हणजे, मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक, दहशत आणि खून मारामार्या. याच संबंधी बातम्या वृत्तपत्रातून नेहमी वाचायला मिळतात. यावर उपाय म्हणजे गुन्हा नोंदण्याबरोबरच लोकजागृती करणे हा आहे.
-अनिल चव्हाण
लेखक संपर्क : ९७६४१ ४७४८३
