राजीव देशपांडे -
आजच्या घडीला भारतातील विवेकवाद्यांसमोर तीन गंभीर व गडद आव्हाने आहेत. एक लोकशाही जिवंत ठेवणे. दोन, विवेकवाद्यांनी स्वत:ला जिवंत ठेवणे. तीन, कट्टरतावादाचा, मूलतत्ववादाचा सामना शांततेच्या व तर्काच्या आधारे करणे हे उदगार आहेत ‘द हिंदू’ या दक्षिणेतील प्रसिद्ध वर्तमानपत्राचे माजी संपादक एन. राम यांचे. डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्याना’च्या निमित्ताने ते बोलत होते.
डॉ. दाभोलकरांच्या शहीदत्वाला या २० ऑगस्टला १२ वर्षे होत आहेत. आजही एन. राम यांनी वर उल्लेख केलेली तिन्ही आव्हाने कायमच आहेत. उलट यात संपूर्ण मूल्यव्यवस्थेच्या आक्रमक बाजारीकरणाविरोधात संघर्ष उभारण्याच्या आव्हानाची भर पडलेली आहे.
रशिया-युक्रेन, इस्त्रायल-इराण युद्ध, गाजातील नरसंहार, पहेलगाम मधील दहशतवादी हल्ला, ओडिशात बीएड करणार्या मुलीची पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेऊन केलेली आत्महत्या, हरियाणात टेनिस अकादमी उभारणार्या आपल्या तरुण मुलीचा तिच्या बापानेच गोळ्या घालून केलेला खून, उत्तर प्रदेशात दोन यादव जातीच्या कथावाचकांनी भागवत पुराणाचे पठण केले म्हणून सवर्णांनी केलेली जीवघेणी मारहाण, महाराष्ट्रात मुलीला मार्क कमी पडले म्हणून बापाच्या मारहाणीत झालेला मुलीचा मृत्यू, आमदाराने हॉटेलमधील कामगाराला केलेली मारहाण, विधानभवनातच आमदारांच्या समर्थकांची हाणामारी, संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला, आपल्या राजकीय फायद्यासाठी राजकीय पक्षांकडून पेटवल्या जात असलेल्या हिंदी-मराठी वादात दोन्ही बाजूकडून वापरली जात असलेली आक्रमक हिंसक भाषा, कट्टरतेला आळा घालण्याच्या नावाखाली सत्ताधार्याकडून आणला जात असलेला लोकशाहीविरोधी जनसुरक्षा कायदा, …….. केवळ गेल्या एक दोन महिन्यातीलच आपल्या आजूबाजूच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात घडलेल्या या घटना आठवल्या तरी विवेकवाद्यांसमोरची ही आव्हाने किती गंभीर आणि गडद होत चाललेली आहेत हे लक्षात येईल.
भाषा, धर्म, जात, देश यांच्या अस्मिता, प्रतिष्ठा, रूढी, परांपरा, चालीरीती यांचा अतिरेकी प्रचार व प्रसार करत समाजात अंधश्रद्धाळू, असहिष्णू, असंवेदनशील द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात आहे, ज्यामुळे भयानक हिंसाचाराला उत्तेजन मिळत आहे. हे वातावरण निर्माण करण्यासाठी सोशल मीडिया सारख्या तंत्रज्ञानाचा साधन म्हणून वापर केला जात आहे.
अशी जरी गंभीर आव्हाने असली, प्रतिकूल वातावरण असले तरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ. दाभोलकरांच्या शहीदत्वानंतरही त्यांनी दाखविलेल्या अहिंसक, विवेकी आणि संवैधानिक मार्गाने जातपात धर्माच्या पलीकडे जात समाजात सौहार्द, सहिष्णुता, वैज्ञानिक वृत्ती निर्माण व्हावी म्हणून आपला संघर्ष चालूच ठेवलेला आहे. डॉक्टरांच्या शहीदत्वानंतर झालेल्या जादूटोणाविरोधी आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याच्या प्रचार मोहिमा, जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह, भ्रामक विज्ञानाविरोधी मोहिमा, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचाराच्या मोहिमा, मानसिक आरोग्याच्या जागृतीचे कार्यक्रम, जटानिर्मूलन, कुर्बानीचे रूप नवे, मेळघाट या आदिवासी भागातील डंबा या अघोरी प्रथेविरोधातील मोहिमा, नुकतेच सुरू झालेले आंतरजातीय आंतरधर्मीय वधूवर सूचक केंद्र, असे विवाह करणार्यासाठी सेफ हाऊस, देशभरातील नामवंत व्यंगचित्रकारांचे अंधश्रद्धाविरोधी व्यंगचित्रांचे प्रदर्शन या सारख्या उपक्रमातून आपल्या कामाच्या कक्षा रुंदावत नेल्या आहेत. हे सर्व उपक्रम लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र करत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रकाशन विभागाने गेल्या वर्षभरात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक तारा भवाळकर यांच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये संत साहित्याचे योगदान’ आणि ‘वारकरी संप्रदायातील स्त्री संत’ अशा दोन पुस्तिका प्रकाशित केल्या. तसेच माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांची ‘डॉ. आंबेडकरांचे बंधुत्वाविषयीचे विचार’ ही पुस्तिका प्रकाशित केली. या पुस्तिकांना महाराष्ट्रभरातून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.
या वर्षी २० ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर आलेले सर्व लिखाण पाच पुस्तकांच्या रूपात प्रसिद्ध करत आहोत. ‘अपराजित योद्धा’ (मान्यवरांच्या आठवणीतील डॉ. दाभोलकर), ‘निर्मळ आणि निर्भीड’ (मान्यवरांच्या आठवणीतील डॉ. दाभोलकर), ‘आम्ही सारे दाभोलकर’ (कार्यकर्त्यांच्या आठवणीतील दाभोलकर), ‘नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्याने,’ ‘डॉ. दाभोलकर खून तपास आणि खटला’ ही या पुस्तकांची नावे आहेत. या सर्व पुस्तकातून डॉ. दाभोलकरांच्या व्यक्तिमत्वाचा, विचारांचा आणि कार्याचा देश परदेशातील मान्यवरांनी, कार्यकर्त्यांनी घेतलेला वेध एकत्रितपणे वाचावयास मिळेल. वाचक नक्कीच या पुस्तकांचे स्वागत करतील.
आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत अंधश्रद्धा निर्मूलन समिती विवेकी समाज निर्मितीसाठीची आपली वाटचाल अनेक उपक्रमातून व संघर्षातून करत आहेच. पण हे पुरेसे नाही ही जाण ठेवत आपल्या कामांचा व त्याचबरोबर आपल्या वैचारिकतेचा परीघ डॉ. दाभोलकरांनी दाखवलेल्या विवेकी मार्गाने जास्तीत जास्त व्यापक करण्यासाठी प्रयत्नशील राहणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.
