वैज्ञानिक दृष्टिकोनासमोरील आजची आव्हाने

राजीव देशपांडे -

नुकताच पुण्यात दैवी चमत्कारांचे विविध दावे करणार्‍या बागेश्वर बाबाच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या कार्यक्रमावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. यापूर्वी कायद्याचा बडगा आपल्याला बसेल म्हणून नागपुरातून या बाबाला पळ काढावा लागला होता. पण पुण्यातील कार्यक्रमाकडे मात्र पोलीस, प्रशासनाने दुर्लक्ष केले. उलट याच बाबाच्या दैवी चमत्कारांच्या दाव्यांना तसेच तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्यांना सोयीस्करपणे बाजूला सारत महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी या बाबाची स्वत:हून भेट घेऊन आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर ज्या संतांनी बुवाबाजीवर सडकून प्रहार केले त्या संतांचे दैवत असलेल्या विठोबाची पूजा करण्याकरता ते पंढरपूरला रवाना झाले. चांद्रयानाच्या यशस्वितेमुळे निर्माण झालेल्या वैज्ञानिक वातावरणाचा वापर विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या जागरासाठी करण्याऐवजी बाबा, बुवा आणि ज्योतिषी यांच्याबरोबर खुद्द इस्त्रोचे अध्यक्षच फसव्या विज्ञानाचे अवैज्ञानिक दावे करत आहेत आणि त्याला अवास्तव प्रसिद्धी दिली जात आहे.

अलीकडील काळात ज्या भारतीय सायन्स काँग्रेसचे भारतातील वैज्ञानिक क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे त्या भारतीय सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनातही या फसव्या विज्ञानावरील शोध(?) निबंध सादर होऊ लागले होते आणि आता तर भारतीय सायन्स काँग्रेसमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने घेतलेला आहे. नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी पाठ्यपुस्तकात कोणते बदल करावेत यासाठी १९ तज्ज्ञांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने महाभारत आणि रामायण ही महाकाव्ये इतिहास म्हणून शिकवावे, वैदिक गणितासह वेद आणि आयुर्वेदही शालेय अभ्यासक्रमात शिकवावे अशा शिफारशी अहवालात करण्यात आल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.

अशा या सर्व वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत घटना, व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर या वेळचा वार्षिक अंक आपण प्रसिद्ध करीत आहोत. त्या अनुषंगाने स्वतंत्र भारतातील वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाटचाल रेखाटणारा सुबोध मोहंती यांचा भाषांतरीत लेख तसेच भारतीय राज्यघटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन कसा समाविष्ट झाला याची माहिती देणारा लेख आणि भारतातील नामवंत शास्त्रज्ञांनी प्रसारित केलेले वैज्ञानिक दृष्टिकोनाचे जाहीरनामे असे वाचकांच्या माहितीत भर घालणारे लेख हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे.

२०१४ सालच्या सत्ताबदलानंतर अलीकडील काळात या वाटचालीला रोखणार्‍या वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत सरकारी धोरणांमुळे आपल्या समोरील बुवाबाजी, धर्मांध राजकारण, फेक न्यूज, शिक्षण क्षेत्रात होत असलेली फसव्या विज्ञानाची घुसखोरी यामुळे निर्माण झालेल्या गंभीर आव्हानांची जाणीव वाचकांना व्हावी या हेतूने आम्ही ‘वैज्ञानिक दृष्टिकोनासमोरील आजची आव्हाने’ हा अलका धुपकर, आशिष दीक्षित, प्रतीक सिन्हा व प्रसन्न जोशी या तरुण व धडाडीच्या पत्रकारांचा सहभाग असलेला परिसंवाद देत आहोत. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात, सामाजिक सुधारणा तसेच विज्ञान चळवळीत पश्चिम बंगाल हे मोठी कामगिरी करणारे राज्य आहे. त्या राज्यातील अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञान चळवळींचा सध्याच्या स्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष तेथे जाऊन राहुल थोरात आणि फारूक गवंडी यांनी केला आहे. आज तेथे कार्यरत असणार्‍या भारतीय विज्ञान आणि युतिवादी समिती, पश्चिम बंगाल विज्ञान मंच, ब्रेक थ्रू सायन्स सोसायटी यांच्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांची कार्यशैली प्रत्यक्ष पाहून त्यांनी बनवलेला सविस्तर ‘रिपोर्ताज’ केवळ रिपोर्ताज न राहता एक दस्तऐवजच बनलेला आहे. त्याचबरोबर आज वेगाने वाढत असलेल्या इंद्रजाल, सुवर्णप्राशन आणि पाथथेरपी या भ्रामक विज्ञानाच्या प्रकारात सामान्य माणसांची कशी फसवणूक केली जाते हे अनिल चव्हाण यांचा लेख उघड करतो.

तसेच या अंकात महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी यांची आम्ही मुलाखत घेतली आहे. यामध्ये अलीकडील काळात म. गांधींबद्दल होत असलेल्या अपप्रचाराविरोधात त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण मांडणी वाचकांना नकीच भावेल. प्रभाकर नानावटी यांनी हिंदीतील ‘खट्टरकाका’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या लेखकाच्या अनुवादित केलेल्या कथेतील देव-धर्माविषयीची चर्चा वाचकांना नकीच आनंद देईल. सोलापूरच्या कार्यकर्त्या निशा भोसले यांची कार्यकर्ता मुलाखत निश्चितच प्रेरणादायी आहे.

‘अंनिवा’च्या या वार्षिक अंकात लिहिणारे लेखक, वार्तापत्राचे हितचिंतक, देणगीदार जाहिरातदार, वार्तापत्रासाठी अतिशय कष्टाने जाहिरात, देणग्या, वर्गणीदार मिळवून वार्तापत्राचा आर्थिक भार सांभाळणारे चळवळीतील कार्यकर्ते या सर्वांचे संपादक मंडळातर्फे आभार! अंनिवाचा हा वार्षिक अंक वाचकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा व्यक्त करतो.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]