मंत्राची पॉवर दाखवणार्‍या डॉ. मेहता यांना अंनिसचे आव्हान!

डॉ. प्रदीप पाटील -

ऑरा! बॉडी चक्रा!! मंत्रा एनर्जी!!!

ही आहेत सुटाबुटातल्या मांत्रिकांची आधुनिक साधने. बुवाबाजी करण्यासाठीची.

मोबाईल-नेट-सोशल मीडिया-चॅट जीपीटी.. असं सारी काही वैज्ञानिक युगानं आणलंय. मग बुवा-महाराजांनी मागं का राहायचं? त्यांच्या ‘स्पिरिच्युअ‍ॅलिटी’चं सुद्धा एव्हल्यूशन नको का? म्हणूनच हे बुवा-महाराज-गुरु नव्या बाटलीत जुनीच दारू ओततात. त्यापैकी एक डॉ. अमरेश मेहता. न्यू एज गुरू. वास्तुशास्त्र, फेंगशुई आणि एनर्जी ऑडिटर या तीन अंधश्रद्धांचे प्रचारक, प्रसारक आणि पुजारी.

स्वत:चे नाव ठेवले आहे, एनर्जी डायनॅमिक्स ऑडिटर!

त्यांचे एक व्याख्यान कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावी झाले. त्यामुळे सांगलीतील एका संस्थेने त्यांचे व्याख्यान ठेवले. आणि जाहिरात झळकली…

“पॉवर ऑफ मंत्रा”

मंत्रो का चमत्कार देखो खुली आँखोसे।

म्हणजे मंत्रांचा चमत्कार चक्क वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध करणार यावर सांगली अंनिसने दखल न घेतल्यास नवलच. डॉ. अमरेश मेहतांच्या वेबसाईटवर जाऊन त्यांची माहिती घेतली. त्यांचे व्हिडिओज पाहिले आणि मग अवैज्ञानिक गोष्टींचा खजिनाच हाती लागला….

मंत्रांना पहिले घेऊ या. भक्तांमर स्त्रोत्र, णमोकार मंत्रातील मंत्रांनी अनेक चमत्कार करता येतात, असा ते दावा करतात. हे चमत्कार म्हणजे, सापाचे आणि विंचवाचे विष उतरविणे, आवडत्या व्यक्तीला आकर्षित करणे, पाणी गोड करणे, प्रजनन क्षमता व नि:संतान यावरील उपाय करणे, त्वचारोग घालविणे, गर्भाचे रक्षण करणे, काळी जादू आणि नजर लागणे दूर करणे… एक ना अनेक, काळी जादू आणि मंत्र म्हटल्याने ५० टक्के मार्क मिळविणारे ९० टक्के मिळवतात, मेमरी वाढते, मतिमंदांची बुद्धी ८० टक्के सुधारते, ब्लडप्रेशर कमी होते, थायरॉईड दुरुस्त होते, असे आरोग्यपूर्ण दावे देखील त्यांनी केले.

प्रथम भक्तांमर स्त्रोत्राकडे वळू या. इ. स. ७ व्या शतकात मांगी तुंगी आचार्यांना भोपाळचा राजा भोजने कैदेत टाकले. कारण आचार्यांनी राजा भोजचा अपमान केला. म्हणून ४८ खोल्यांच्या पलीकडे असलेल्या खोलीत त्यांना साखळदंडाने बांधले. मग मांगी तुंगींनी ४८ मंत्र रचले. तेव्हा प्रत्येक खोलीचे कुलूप निघून पडले. हा चमत्कार पाहून घाबरून जाऊन राजा भोज याने त्यांची सुटका केली. वास्तवात जैन धर्मातील २४ तीर्थंकरांनी चमत्काराचा दावा केलेला नाही. भगवान महावीरांनी वेदप्रामाण्य नाकारले आणि आकाशात कुठे तरी देव असतो, हे देखील नाकारले. म्हणून हिंदू तत्त्वज्ञानात जैन धर्म हा नास्तिक समजला जातो आणि त्याचा समावेश षड्दर्शनापैकी नास्तिक दर्शनात केला जातो. पण त्यांनी चमत्कारांचा दावा केला नाही, तर श्रम करून आपले भविष्य घडवता येते, असा दावा केला. म्हणून जैन संस्कृती ही श्रमण संस्कृती, जी बुद्धी व मनगटावर विश्वास ठेवते, तशी समजली जाते.

पण… तीर्थंकरांनंतर सुरू झाले चमत्कार! त्यापैकीच भक्तांबर स्तोत्र आणि त्यातील मंत्र. जर कुणाला स्वत:च्या घरात हे मंत्र म्हणायचे असतील, तर तेथे आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. कारण तो खाजगी मामला आहे; पण जेव्हा समाजात पत्रक काढून जाहीर कार्यक्रम घेऊन मंत्राने चमत्कार घडतात असे अंधश्रद्धा पसरवणारे कार्यक्रम सुरू होतात तेव्हा त्यास आव्हान देणे गरजेचे बनते.

सांगली अंनिसने पत्रकार परिषद घेऊन आव्हान जाहीर केले. कार्यक्रमावेळी मंत्रसामर्थ्याच्या पॉवरला सिद्ध करण्यासाठी ज्या विज्ञानाचा वापर ते करतात त्या विज्ञानावर खुली चर्चा देखील आम्ही करण्यास तयार आहोत हेही नमूद केले.

‘डॉ. अमरेश मेहता यांचा ‘पॉवर ऑफ मंत्रा’ नावाचा जाहीर कार्यक्रम सांगलीत होणार आहे. मंत्र-तंत्र विद्या ही अवैज्ञानिक संकल्पना आहे. डॉ. मेहता यांनी मंत्रसामर्थ्याचे अनेक दावे केेले आहेत. प्रजनन क्षमता व नि:संतानासाठी, त्वचारोग, गर्भ रक्षेसाठी, काळी जादू व नजर लागणे यासाठी, आवडती व्यक्ती आकर्षित करण्यासाठी मंत्र वापरावा असा प्रचार ते करतात. हा मंत्र म्हटल्याने ५० टक्के मार्क मिळविणारे ९० टक्के मिळवतात, मेमरी वाढते. मतिमंदाची बुद्धी ८० टक्के सुधारते, उच्च रक्तदाब नियंत्रित होतो, थायरॉईड दुरुस्त होते, असे अनेक दावे हे अवैज्ञानिक दावे आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे त्यांना आम्ही आव्हान देत आहोत की, त्यांनी मंत्रांचे सामर्थ्य वैज्ञानिक नियमांच्या आधारे सिद्ध करावे. शरीराभोवती आभामंडळ (ऑरा) असते, असे दावे छद्मविज्ञानात मोडतात. अशा मंत्रसामर्थ्याच्या सिद्धतेसाठी डॉ. मेहता यांनी नि:संतान स्त्री व पुरुष यांना मूल होणे सिद्ध करावे. मंत्र सामर्थ्याने त्यांनी दूर ठेवलेला पापड मोडून दाखवावा, दूर ठेवलेले पाणी गोड करून दाखवावे.

याचबरोबर, रविवारी होणार्‍या कार्यक्रमावेळी मंत्र सामर्थ्याच्या पॉवरला सिद्ध करण्यासाठी ज्या विज्ञानाचा वापर ते करतात त्या विज्ञानावर खुली चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत व त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात आम्हाला संधी द्यावी, अशी आम्ही विनंती करत आहोत. आमचा कोणत्याही धर्माला विरोध नसून धर्माच्या नावाखाली अवैज्ञानिकता पसरविणार्‍या कृत्यांना विरोध आहे. सर्व धर्मातील मंत्र-तंत्र, विद्या या अंधश्रद्धा पसरविणार्‍या असतात. मंत्रात कोणत्याही प्रकारचे सामर्थ्य (पॉवर) नसते, असे अं.नि.स.चे मत आहे. शरीरात सात चक्रे असतात. याला कोणताही आधार नाही व तसे सिद्धही झालेले नाही.

मंत्र, तंत्र अशा अवैज्ञानिक व अंधश्रद्धा पसरविणार्‍या व आरोग्य सुधारून रोग बरे होतील असा दावा करणार्‍या सर्व आधुनिक मांत्रिकांवर कठोर कारवाई शासनाने करून रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळण्याचे थांबवावे, असे आवाहन आम्ही करत आहोत.’

मंत्र हे बुवाबाजीचे धारदार हत्यार आहे. मंत्राने अनेक गोष्टी साध्य होतात, असा अंधश्रद्ध प्रचार शतकानुशतके या देशात आणि जगभरातही रुजविला गेला आहे. भाषा जेव्हा बाल्यावस्थेत होती तेव्हा हुंकार आणि त्यानुसार वर्तन यांना महत्त्व होते. ते सारे शब्दांत पकडून मांडताना त्यामागे दैवी कारण आहे, असे आदिम मानवास न वाटल्यासच नवल. विविध विधींची बांधणी या मंत्रतंत्रातून झाली आणि सर्वशक्तिमान अशा देवाशी ते मंत्र जोडले गेले. हे सारे कल्पनेचेच खेळ. त्यामुळे त्याच्या उपयोगांच्या दाव्यात वैज्ञानिकता असणे शक्य नाही.

दुसरा दावा होता ऑराचा. ऑरा म्हणजे शरीराभोवती एक प्रकाशमान मंडल असते. आध्यात्मिक व्यक्तींच्या डोक्यामागे फिरणारे प्रकाशचक्र वलय असते, ज्याला अमरेश मेहता ‘आभामंडल’ म्हणतात, ते अस्तित्वात नसते. पृथ्वीवरील काही जिवांमध्ये शरीरातून प्रकाश बाहेर उत्सर्जित करण्याची क्षमता असते. पण या जिवांमध्ये विशिष्ट प्रकारचे रसायन असते. याला ‘केमिलुमिनसन्स’ म्हणतात. छोट्या जीवजंतूमध्ये देखील असे असते. मात्र त्यासाठी ल्युसिफेरीन नावाचे एन्झाईम (वितंचक) शरीरात असावे लागते. त्याचा ऑक्सिजनशी संबंध आला की, प्रकाश पडतो. या प्रकाशाचा उपयोग त्यांना समागम करण्यासाठी होतो, संरक्षणासाठी होतो.

मानवात जेव्हा अल्ट्रा सेन्सिटिव्ह कॅमेर्‍याने फोटो काढले जातात, तेव्हा अतिशय कमी प्रमाणात प्रकाशाची चमक त्या कॅमेर्‍यात दिसते, त्याचे कारण ‘ऑरा’ वगैरे नसून आपल्या शरीरातील उष्णतेची चमक असते. ज्याला थर्मल इमेजेस म्हणतात. आपल्या डोळ्यांना हे उघडपणे दिसत नाहीत. कारण ते एक हजारपटीने सूक्ष्म असते. ही अत्यंत क्षीण व सूक्ष्म चमक कॅमेर्‍यात दिसते. कारण शरीरातील चयापचयाची क्रिया घडत असताना फ्लूरोफोर्स नावाच्या रसायनाचा संयोग प्रोटिन व स्निग्ध पदार्थाशी होऊन ही प्रकाशी चमक कॅमेर्‍यात टिपता येते. यात आध्यात्मिक शक्ती वगैरे काही नसते किंवा हा तथाकथित ऑरा वैश्विक शक्तीशी जोडला जाणे या कविकल्पना आहेत.

तिसरी गोष्ट म्हणजे शरीरातील आध्यात्मिक चक्रे. शरीरात अशी चक्रे असतात असे पतंजली योग सूत्रांपासून ते ज्ञानेश्वरीपर्यंत सार्‍यांनी सांगितले. पण वास्तवात अशी चक्रे नसतात. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, आनाहत चक्र, विशुद्ध चक्र, अजना चक्र, सहस्त्राधार चक्र अशी त्यांची नावे. याही पुढे जाऊन अध्यात्मवादी अशीही घोषणा करतात की, शरीरात साडेतीन वेटोळे घातलेली सुषुम्ना नाडी असते. आज शरीराचे विच्छेदन खूप सोपे झालेय. हजारो ऑपरेशन्स रोज होतात; पण अशी चक्रं एकाही माणसाच्या-स्त्रीच्या-प्राण्यांच्याही शरीरात सापडलेली नाहीत. कल्पनेच्या भरार्‍या मारणार्‍या आध्यात्मिकांना त्या जाणवतात. कारण, त्यांची ती निव्वळ भ्रामक कल्पना असते. वास्तव नाही.

या मानवचक्रांचा आणि शरीरातील अंत:स्त्रावी ग्रंथींचा काडीचाही संबंध नसतो; पण अध्यात्मवादी आणि डॉ. मेहतांसारखे ‘मॉडर्न गूढ’ वाट्टेल ते ठोकून देतात.

हे सारे लक्षात घेऊन सांगली अंनिसने एक तातडीची बैठक घेतली, जर डॉ. मेहता आले, तर त्यांना मंत्राने पाणी गोड करण्याचे आव्हान द्यायचे ठरले. पाणी गोड होते असा दावा एका ऑडिओमध्ये त्यांनी केला आहे. पाणी गोड करून दाखविण्याचा एक आव्हान मसुदा मी तयार केला. तो खालीलप्रमाणे.

१) भक्तांबर स्तोत्र नं. ११ मध्ये मंत्राने आपल्याला योग्य वाटणार्‍या व्यक्तीस आकर्षून घेता येते व पाणी गोड करता येते, असा दावा केला आहे.

२) यापैकी पाणी गोड करण्याचा दावा सिद्ध करायचा आहे.

३) अं.नि.स. पाण्याची पात्रे टेबलावर ठेवतील. त्यातील पाणी प्रथम आव्हान स्वीकारकर्ते व आव्हानदाते दोघेही पिऊन ते गोड नाही याची खात्री करतील, तेच पाणी अन्य दोघांना प्यायला दिले जाईल. हे दोघे हायड्रोमीटर तज्ज्ञ असतील.

४) आव्हानकर्ते व दाते दोघेही हायड्रोमीटरचे रिडींग ठेवतील.

५) पाणी ठेवल्यावर किती वेळ मंत्रोच्चार होणार ते मंत्र म्हणणार्‍याने सांगायचे आहे.

६) मंत्रोच्चार संपल्यावर किती वेळाने पाणी गोड होईल ते निश्चित करून मंत्रकार्याने सांगायचे आहे.

७) त्यानंतर वरील टेस्टिंग होईल. टेस्टिंगनंतर पाणी पिण्यास दिले जाईल.

८) गोड आहे किंवा नाही हे आव्हानकर्त्याने सांगावयाचे आहे, मात्र टेस्टचा निकाल अंतिम मानण्यात येईल.

९) आव्हान मध्येच रद्द करता येणार नाही. तसे केल्यास आव्हान न स्वीकारता रद्द केल्याने चमत्काराचा दावा खोटा ठरेल व तो तसा जाहीर केला जाईल.

१०) सदर संपूर्ण चाचणी ही सोशल मीडिया व प्रसिद्धी माध्यमांवर व्हिडिओसहित प्रसारित केली जाईल.

डॉ. मेहता यांनी संकलित केलेली भक्तांबर स्तोत्राची पुस्तिका आहे. त्यात चमत्कारांचे अनेक दावे आहेत. अशा रितीने रोग बरे करणे किंवा सापाचे विष उतरविणे वगैरे बेकायदेशीर आहे. ‘ड्रग्ज अँड मॅजिक रेमिडीज (ऑब्जेक्शनेबल अ‍ॅडव्हर्टाईजमेंट) अ‍ॅक्ट १९५४ प्रमाणे हा गुन्हा आहे. शिवाय ते महाराष्ट्र जादूटोणा कायद्यातील तरतुदींचा भंग करणारे देखील आहे. म्हणून सांगली अंनिसतर्फे आम्ही सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गेलो. तेथे पोलीस निरीक्षक गायकवाड होते, त्यांना भेटून तक्रार अर्ज दाखल केला. तो अर्ज असा –

१) दि. १६/०४/२०२३ रोजी सकाळी १० वाजता गाव इनाम धामणी, ता. मिरज, जि. सांगली येथे कथित डॉ. अमरेश मेहता (रा. अहमदाबाद) यांचा ‘पॉवर ऑफ मंत्राज’ हा अवैज्ञानिक आणि चमत्काराचा दावा करणारा कार्यक्रम ऐश्वर्य मल्टिपर्पज हॉल येथे आयोजित केलेला आहे.

२) या कार्यक्रमाची बातमी आम्हास कळताच आम्ही कथित डॉ. अमरेश मेहता यांची इंटरनेटद्वारे माहिती घेतली असता ते चमत्काराचे व अवैज्ञानिक दावे करत असल्याचे आढळून आले. या कार्यक्रमाच्या जाहिरात पत्रकावर ‘खुल्या डोळ्यांनी बघा… मंत्रांचा चमत्कार’ असे व इतर अनेक चमत्कारांचे व अवैज्ञानिक दावे करण्यात आलेले आहेत. म्हणून आम्ही दि. १४/०४/२०२३ रोजी पत्रकार परिषद घेऊन कथित डॉ. अमरेश मेहता यांना दावे सिद्ध करण्याचे आव्हान दिलेले होते.

३) कथित डॉ. अमरेश मेहता यांच्या यापूर्वीच्या कार्यक्रमाचे यू ट्यूब व्हिडिओ आणि त्यांनी प्रसिद्ध केलेले पुस्तक पाहिले असता त्यांचे एकंदरीत कृत्य ‘ड्रग्ज अ‍ॅण्ड मॅजिक रेमिडीज (ऑब्जेक्शनेबल अ‍ॅडव्हर्टाईजमेंट) अ‍ॅक्ट, १९५४ आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ या दोन कायद्यांमधील तरतुदींचा भंग करणारे आणि दखलपात्र गुन्हे आहेत.

४) कार्यक्रमामध्ये कथित ‘एनर्जी ऑडिट’ च्या नावाखाली तपासणी करण्यासाठी जी उपकरणे कथित डॉ. मेहता वापरतात ती वैज्ञानिक उपकरणे असल्याचे व त्याचा उपयोग एनर्जी ऑडिटसाठी होत असल्याचे भासवून त्याद्वारे ते रुग्णांची फसवणूक व दिशाभूल करतात. कथित डॉ. मेहता यांच्या वैद्यकीय व्यवसायाच्या प्रमाणपत्राची देखील पडताळणी करणे गरजेचे आहे.

५) अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही नेहमीच सनदशीर मार्गाने व शांततेच्या मार्गाने समाजप्रबोधनाचे काम करीत आलेली आहे. उद्या कथित डॉ. मेहता यांच्या कार्यक्रमात व्यत्यय आणणे हा आमचा उद्देश नाही. सबब उद्याच्या कार्यक्रमाबाबत आम्ही आयोजकांशी चर्चा केली असता आयोजकांनी उद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर कथित डॉ. मेहता यांच्याशी इनाम धामणी येथे समक्ष भेट, चर्चा घडवून आणून त्यांच्या दाव्यांबाबत पडताळणी करण्याची आम्हास संधी देणेत येईल असे आम्हास तोंडी आश्वासन देण्यात आलेले आहे. त्यास आम्ही संमती दर्शवलेली आहे. तथापि, सदर ठिकाणी भेट, चर्चा व पडताळणी वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि आमच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून आम्हास पोलीस संरक्षण मिळणे गरजेचे आहे.

६) तरी, याबाबत व्यापक जनहितार्थ विनंती पुढीलप्रमाणे-

अ) उद्या होणार्‍या सार्वजनिक कार्यक्रमात कथित डॉ. मेहता यांनी असे कोणतेही चमत्काराचे व अवैज्ञानिक दावे करू नयेत व त्याद्वारे दखलपात्र गुन्हा घडू नये याकरिता आपल्या स्तरावर योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण कराव्यात.

ब) उद्याच्या सार्वजनिक कार्यक्रमाचे आणि त्यानंतर आमच्याशी होणार्‍या मीटिंग, पडताळणी व चर्चेचे पोलीस प्रशासनामार्फत ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावे.

क) कथित डॉ. मेहता यांचा कार्यक्रम झाल्यानंतर डॉ. मेहता आणि अंनिसचे कार्यकर्ते यांची समक्ष भेट, चर्चा आणि त्यांच्या दाव्यांची पडताळणी करतेवेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि आमच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून सदर ठिकाणी आम्हास पोलीस संरक्षण मिळावे.

ड) यदाकदाचित उद्याच्या सार्वजनिक कार्यक्रमात कथित डॉ. मेहता यांनी चमत्काराचे किंवा अवैज्ञानिक दावे केल्याचे आढळून आल्यास त्यांचे विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

अर्ज घेतल्यावर पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी इनाम धामणीच्या आयोजकांनाही बोलावले. त्यांच्याशी तब्बल ३ तास चर्चा पोलीस ठाण्यात झाली. डॉ. मेहतांच्या कार्यक्रमामुळे काय-काय घडू शकेल याची कल्पना पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी संयोजकांना दिली. तक्रार अर्जानुसार जर ते चमत्कार करतील, तर त्यांच्यावर व संयोजकांवर गुन्हा दाखल होऊ शकतो असे पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले. त्यानंतर संयोजकांनी आम्ही कार्यक्रमच रद्द करतो, असा पवित्रा घेतला. व त्यांनी असे म्हणायला सुरुवात केली की, ही आमच्या धर्मकार्यातील ढवळाढवळ आहे. त्या वेळी मी त्यांना स्पष्ट केले की, तुम्ही धार्मिक कार्यक्रम घेण्यास अंनिसचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. खुद्द घटनेनेच तुम्हाला तसे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र कार्यक्रमात चमत्काराचा दावा व त्याचे फायदे उपाय म्हणून सांगितले गेले, तर मात्र अंनिसचा विरोध राहील. विरोध चमत्काराला आहे, धर्माला नाही.

कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी दहापासून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तेथे हजेरी ठेवली होती. पण डॉ. मेहता तेथे आले नाहीत. कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. आम्हाला आश्चर्य वाटले की, जगभरात १३ देशांमध्ये फिरून आलेले डॉ. मेहता सांगलीत का नाही आले?

त्याच दिवशी सायंकाळी डॉ. मेहतांशी संपर्क केला. त्या वेळी त्यांना विचारले. “तुम्ही रोग बरे करण्याचे, चमत्कार करण्याचे आव्हान स्वीकारणार आहात का? त्यांनी-

मी उपचार करत नाही, अंनिसने विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. मला त्यांना समजावून सांगत बसायला वेळ नाही. आव्हान सिद्ध करत बसणे माझे काम नाही, असे म्हणत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेले आव्हान डॉ. अमरेश मेहता यांनी इनाम धामणी येथे कार्यक्रम केलाच नाही आणि आव्हानही स्वीकारले नाही. ‘पॉवर ऑफ मंत्राज’ या कार्यक्रमातून ते ‘शरीराभोवती प्रकाशमंडल असते व त्याने शरीरास कोणतीही इजा होत नाही’, हा दावा करणार होते. मात्र त्यांनी हा दावा प्रकाशमंडल मोजणार्‍या यंत्राचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांना द्या व विचारा म्हणत या आव्हानास बगल दिली. अंनिसच्या कार्यकर्त्यांसमोर येऊन समोरासमोर येऊन तुम्ही याविषयी बोलाल का? असे विचारता “पुढील वेळी येईन तेव्हा बघू” अशी वेळ मारून नेली. मंत्राने विष कसे उतरवता असे विचारता, मी ते करत नाही व उपचारक नाही, असे सांगून टाकले. विष उतरणे म्हणजे मत्सर व राग कमी होणे असा अजब दावा देखील त्यांनी केला. मत्सर हिरवे असते, हे पूर्वी धर्मग्रंथात लिहिले होते. त्यामुळे ते त्यांनाच विचारा.

‘या गोष्टींचा तुम्ही प्रचार का करता?’ त्यावरील उत्तर त्यांनी दिले नाही. मंत्राने पाणी गोड कराल का, असे विचारता त्यांनी ‘असे मी म्हणत नाही’ म्हणत माघार घेतली. ज्यांची लग्ने होत नाहीत त्यांची लग्ने होण्यासाठी मंत्र असतात. शरीरात सात चक्रे असतात, असे जग्गी वासुदेव आणि रामदेवबाबा म्हणतात, तर त्यांना तुम्ही आव्हान का देत नाही? असे उलटेच अंनिसला विचारले. ते जर सांगलीत आले, तर त्यांनाही आम्ही आव्हान देऊ असे अंनिसने स्पष्ट केले. चक्र शरीरात कुठे असतात, असे विचारले असता, ‘मी डॉक्टर नाही, मी चक्रांची पी. एचडी. केली आहे, सायन्समध्ये नाही म्हणून काय झाले, अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली. पॉझिटिव्ह एनर्जी आणि नकारात्मक एनर्जी मोजता येत नाही व एनर्जीचे विज्ञानानुसारचे प्रकार मला माहिती नाहीत, असे त्यांनी कबूल केले.

खरे तर एनर्जी ही पॉझिटिव्ह व निगेटिव्ह तरंगातून वाहते, असे त्यांचे म्हणणे होते. जेव्हा एनर्जीची व्याख्या त्यांना विचारली तेव्हा त्यांना ती सांगता येईना.

विज्ञानानुसार एनर्जी किंवा ऊर्जा म्हणजे अशी शक्ती जी हालचाल करण्यास भाग पाडते. स्थितीज व गतीज ऊर्जा यापैकी कोणती ऊर्जा ऑरा, चक्रे वगैरेत असते, असे विचारल्यावर त्यावर उत्तर न देता दुसराच विषय त्यांनी काढला. ते म्हणाले, “आमची ऊर्जा म्हणजे कॉस्मिक ऊर्जा होय.” वास्तवात कॉस्मिक ऊर्जा नावाचा प्रकार हा भंपक विज्ञानात मोडतो. अध्यात्म आणि असिद्ध औषधोपचारात हा शब्द सर्रास वापरून लोकांना भुलवले जाते. अनेक मोठमोठे गुरू ‘कॉस्मिक अवेअरनेस’, ‘कॉस्मिक पॉवर’, ‘एनर्जी बॅलन्स’ वगैरे अवैज्ञानिक शब्दांचे खेळ खेळतात. कॉस्मिक म्हणजे अवकाश. तिथली एनर्जी शरीरात खेचली जाते, असा बावळट दावा, देखील केला जातो! आणि याला चक्क डॉक्टर, इंजिनिअर, वकील अशी मंडळी भुलतात तेथे सामान्यांची काय कथा? या लोकांमध्ये ‘कॉस्मिक कॉन्शसनेस’ नावाचे खूळ जोमदारपणे फैलावले आहे! डॉ. मेहता यांची अवैज्ञानिकता लक्षात घेऊन संयोजकांनी सुज्ञपणे हा ‘पॉवर ऑफ मंत्रा’ कार्यक्रम रद्द केला, त्याबद्दल त्यांचे अंनिसने आभार मानले आहेत. अवैज्ञानिक आणि अंधश्रद्ध दावे कोणी करत असतील, तर समाजाने सावध राहावे, असे आवाहनही अंनिसने केले आहे.

मंत्र-तंत्र हे हत्यार घेऊन कुणी चमत्कार आणि उपयोगाचे दावे करू लागला, तर त्याला ते सिद्ध करावेच लागेल; पण जर ते सिद्ध करता येणार नसेल, तर त्यांचा हा अवैज्ञानिक आणि अंधश्रद्ध चेहरा समाजासमोर आणणे गरजेचे आहे. अंनिस कार्यकर्त्यांनीच फक्त नव्हे, तर समाजातील प्रत्येकाने ही जबाबदारी घ्यायला हवी. मंत्र-तंत्र वगैरे काही नसतेच; पण धर्माचे व अध्यात्माचे नाव घेऊन त्याचा प्रचार हा आधुनिक बुवांचा फंडा आहे. तो मोडण्यास प्रत्येकाने जागरूक राहायला हवे एवढे लक्षात आले तरी पुरे!

लेखक संपर्क : ९८९०८४४४६८


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ]