श्याम गायकवाड - 5314974417
रमाबाई आंबेडकरनगर, मुंबई महानगरातील घाटकोपर या उपनगराच्या मधून जाणार्या पूर्व द्रूतगती महामार्गालगत असलेली झोपडपट्टीसदृश वसाहत. लोकसंख्या अंदाजे 50 हजार. वस्ती बहुसंख्य दलितांची. वस्तीच्या प्रवेशद्वारालगतच अगदी नाक्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. अर्धाकृती. रमाबाईनगरच्या कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून बसविलेला. पुतळ्याच्या पाठीमागे पोलीस चौकी. आजूबाजूला लोकवस्ती, दुकाने, हॉटेल वगैरे.
11 जुलै 1997. पहाटे कुणीतरी अज्ञाताने बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याला चपलांचा हार घालून त्याची विटंबना केली. बातमी वस्तीत पसरली. पुतळ्याभोवती लोक जमा झाले. त्यात कार्यकर्तेही होते. पुतळ्याभोवती हळूहळू गर्दी वाढत गेली. थोड्या वेळाने पोलीस जीप आली. त्यात पोलीस अधिकारी होते. ते जीपमधून उतरले व गर्दी पांगवत पोलिसांसह पुतळ्याजवळ आले. गर्दीतून आवाज आला, “तो चपलांचा हार काढू नका, अगोदर पंचनामा करा.” दुसरा आवाज आला, “डॉग स्क्वॉड ताबडतोब बोलवा.” पोलीस आणि कार्यकर्त्यांची बोलाचाल चालू असतानाच पुतळ्यासमोरील महामार्गावरील सिग्नलजवळ ‘रास्ता रोको’ सुरू झाला. वातावरण तापत गेले होते, तरी लोकांचा राग नियंत्रणात होता. महामार्गावरील वाहतूक एव्हाना थांबली होती. उजाडले होते. वस्ती जागी झाली होती. पुतळ्याभोवतीची गर्दी वाढतच होती. आपापल्या कामाला जाणार्या लोकांनी रमाबाईनगरचा रस्ता फुलून गेला होता. लोक पुतळ्याजवळ जमा होत होते. काहीजण महामार्गावरील सिग्नलजवळ चाललेल्या ‘रास्ता रोको’त सामील होत होते. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो!” “पुतळ्याची विटंबना करणार्या नराधमास अटक झालीच पाहिजे,” अशा घोषणांनी परिसर दणाणून जात होता. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या गळ्यातील तो चपलांचा हार पाहून काहीजण अक्षरश: रडत होते, तर काहीजण संतापत होते.
सात वाजून गेले होते. पुतळ्यासमोरील महामार्गावर सिग्नलजवळ आंदोलन सुरू होते. इतक्यात चेंबूरच्या दिशेकडून एक ‘एसआरपी’ची मोठी गाडी आली आणि तिने यू टर्न घेतला आणि ती सिग्नलपासून हजार फूटभर अंतरावर असलेल्या सार्वजनिक बुद्ध विहाराजवळ महामार्गावरच थांबली. सार्वजनिक बुद्ध विहाराजवळच भिक्खू सार्वजनिक निवास आहे. एस.आर.पी.च्या गाडीतून दहा-बारा पोलीस रस्त्यावर उतरले. त्यांनी हातातील बंदुकांनी पोझिशन घेतली आणि भरवस्तीच्या दिशेने गोळीबार सुरू केला. गोळीबाराच्या आवाजाने सिग्नलजवळील गर्दी पांगली. पुतळ्याजवळील गर्दीत घबराट निर्माण झाली. लोकांची पळापळ झाली. गोळीबार सुरू होता. थोड्या वेळानंतर गोळीबार थांबला. भरवस्तीत पोलिसांनी केलेल्या अंधाधुंद आणि बेछूट गोळीबारामुळे दहाजण जागीच ठार झाले होते. सव्वीस जण गंभीररित्या जखमी झाले होते. वस्तीत हल्लकल्लोळ माजला होता. पोलिसांनी एकूण पन्नास फैरी झाडल्या. वस्तीवर रक्ताचे सडे पडले होते. पोलिसांच्या गोळीबाराच्या खुणा जागोजागी दिसत होत्या.
या हत्याकांडाने उभा देश हादरून गेला. महाराष्ट्रात हत्याकांडाची तीव्र प्रतिक्रिया उमटली. जनतेने उत्स्फूर्तपणे बंद पुकारला. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, तर भाजपचे गोपीनाथ मुंडे हे गृहमंत्री होते. हे हत्याकांड घडले, तेव्हा विधानसभेचे अधिवेशन सुरू होते. हत्याकांडाचे तीव्र पडसाद विधानसभेच्या सभागृहात उमटले. सर्व स्तरांतून या अमानुष आणि बेछूट गोळीबाराचा निषेध झाला. निषेधाच्या आंदोलनाचे केंद्र महाराष्ट्र राज्य होते, तरी भारतभर जवळजवळ प्रत्येक राज्यात या हत्याकांडाचा निषेध झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा निषेध नोंदला गेला. इंग्लंड, अमेरिकेतही याचा निषेध झाला. ‘युनो’च्या कचेरीसमोर सुद्धा निषेध निदर्शने झाली.
महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युतीचे सरकार मात्र हे हत्याकांड घडविणार्या ‘एसआरपी’ फौजदार मनोहर कदमच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले. गृहमंत्री गोपीनाथ मुडेंनी तर असत्य, खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केली. सरकारच्या मदतीने तत्कालीन पोलीस आयुक्तांची बनावट ‘टँकर कथे’ची कथा पुढे आणली. महामार्गावर ‘एलपीजी’ गॅस भरलेले टँकर्स होते आणि ते उभे टँकर्स पेटविण्यासाठी दंगेखोर लोक हातात पेटते गोळे घेऊन टँकर्स पेटविणार होते आणि टँकर्सचा स्फोट झाला असता, तर मुंबई, दादरचा बराचसा भाग उद्ध्वस्त आणि बेचिराख झाला असता, म्हणून मुंबई वाचविण्यासाठी हा गोळीबार मनोहर कदमला नाईलाजाने करावा लागला, अशी थिअरी बनावट ‘टँकर कथे’च्या निमित्ताने मांडली गेली. सरकारधार्जिण्या प्रसारमाध्यमांनी; विशेषत: मुंबईस्थित वृत्तपत्रांनी मनोहर कदमचे कौतुक केले. शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरेंनी फौजदार मनोहर कदमला जाहीर शाबासकी दिली; पण या ‘टँकर कथे’चा खोटारडेपणा नंतर उघड झाला. टँकर पेटवायला निघालेले लोकसुद्धा वाचणे शक्य होते का? त्यामुळे टँकर पेटविण्याचा मूर्खपणा ते स्वत:हून करतील, अशी शक्यताच नव्हती. नंतर न्यायालयासमोर आलेल्या साक्षी-पुराव्यांनुसार ही ‘टँकर स्टोरी’च तकलादू निघाली.
केंद्रात तेव्हा पुरोगामी जनमोर्चाचे आघाडी सरकार सत्तेवर होते. इंद्रकुमार गुजराल हे पंतप्रधान होते. इंद्रजित गुप्ता गृहमंत्री होते. युती सरकार महाराष्ट्रातून बरखास्त करावे, अशी जोरदार मागणी जनतेतून पुढे येत होती. 8 ऑगस्ट रोजी विरोधकांचा ‘युती सरकार चले जाव मोर्चा’ लाखोंच्या संख्येने विधानभवनावर निघाला होता. मोर्चासमोर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. 9 ऑगस्ट रोजी पंतप्रधान गुजराल स्वत: रमाबाई आंबेडकरनगरात आले. त्यांच्या समवेत तत्कालीन मंत्री रामविलास पासवान होते. पंतप्रधानांनी हत्याकांडास कारणीभूत असलेल्या गोळीबाराचा निषेध केला.
महाराष्ट्र शासनाने जनतेच्या रेट्यामुळे चौकशी आयोग नेमण्याची घोषणा केली. रमाबाई आंबेडकरनगरचे हत्याकांड घडविणार्या गोळीबाराची व इतरप्रश्नी चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. सुधाकर गुंडेवार यांचा चौकशी आयोग नेमला गेला. गुंडेवार आयोगाचे कामकाज मुंबई उच्च न्यायालयात सुमारे वर्षभर चालले. आयोगासमोर हत्याकांडाचे प्रत्यक्ष साक्षीदार, जखमी यांनी सत्यप्रतिज्ञा लेख दाखल केले होते. गुंडेवार आयोगासमोर प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘रमाबाई आंबेडकरनगर हत्याकांडविरोधी संघर्ष समिती’ गठित झाली आणि तिच्या ‘न्याय सहाय्यक समिती’द्वारे रमाबाई आंबेडकरनगरच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ प्रभाकर हेगडे यांनी वकीलपत्र घेतले. त्यांना अॅड. संघराज रुपवते, अॅड. बी. जी. बनसोडे यांनी सहाय्य केले. महाराष्ट्र शासनातर्फे अॅड. उज्ज्वल निकम, गोविलकर वगैरे विधिज्ञ होते; तर आयोगाचे वकील म्हणून अॅड. विजय प्रधान होते. आयोगाचे कामकाज आटोपल्यानंतर आयोगाचा निवाडा सभागृहाच्या दोन्ही पटलांवर ठेवण्याच्या मागणीसाठी संघर्ष समितीला पुन्हा न्यायालयीन संघर्ष करावा लागला. गुंडेवार आयोगाच्या निवाड्यात स्पष्टपणे निर्देशित केले गेले की, ‘जमाव हिंसक नव्हता. गोळीबार करण्याची आवश्यकता नव्हती. ज्या अधिकार्याने गोळीबाराचा आदेश दिला, तो पोलीस खात्यात पदावर राहण्याच्या लायक नाही.’ गुंडेवार आयोगाचा निवाडा दोन्ही सभागृहाच्या पटलावर कृती अहवालासह ठेवण्यात आला.
हत्याकांडास जबाबदार असणार्या मनोहर कदम या फौजदारावर सदोष मनुष्यवधाच्या अपराधानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यावर दोषारोपपत्रही ठेवण्यात आले. त्याच्या विरोधात न्यायालयात सुनावणीही झाली व तिच्यात तो दोषी ठरविला जाऊन त्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. परंतु मनोहर कदमच्या या शिक्षेला उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली व हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सजा होऊनही फौजदार मनोहर कदम हा मुक्त आहे. त्याचा जामीन मंजूर झाला नाही. तो रमाबाईनगर हत्याकांड प्रकरणात एक दिवसही तुरुंगात गेलेला नाही.
रमाबाई आंबेडकरनगरचे भीषण हत्याकांड डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा विटंबनेमुळे घडले. तो नगरातील पुतळा वस्तीतील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून स्थापन केला होता. ज्यांनी पुतळा बसविला, त्यांनाच पुतळा विटंबनेच्या गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणून शासनाने ठरविले व त्यांच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयात त्याची सुनावणी झाली आणि सर्व कार्यकर्त्यांची पुतळा विटंबनेच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली; परंतु रमाबाई आंबेडकर नगरातील बाबासाहेबांच्या त्या पुतळ्याची विटंबना कुणी केली, याचा शोध पोलीस आजतागायत घेऊ शकलेले नाहीत. हे एक रहस्य म्हणून कायम आहे.
जे नागरिक मनोहर कदमच्या गोळीबारातून बालंबाल वाचले, गंभीररित्या जखमी होऊनही मेले नाहीत, त्यांच्यावरच दंगा केल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांनी उलट पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात येऊन तो न्यायप्रविष्ट झाला. त्याचीही सुनावणी झाली व सारे आरोपीत जखमी त्या गुन्ह्यातून न्यायालयात निर्दोषपणे मुक्त झाले.
जेव्हा रमाबाई आंबेडकरनगरात हत्याकांड घडले, त्याचा तीव्र परिणाम त्यावेळच्या दलित तरुणांच्या मानसिकतेवर झाला होता. गटबाज दलित नेत्यांबद्दलची घृणा तरुणाईत व्यक्त झाली. नेत्यांना चोप मिळाला. अनेक दलित नेत्यांनी रमाबाई आंबेडकर नगरातून पळ काढला होता. आज या घटनेला तेवीस वर्षे होताहेत. आंबेडकरी समाजात तेव्हा होती तशीच गटबाजी आजही आहे. रमाबाई आंबेडकरनगरमध्ये विटंबना करण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या अर्धकृती पुतळ्याऐवजी तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. एक शहीद स्मारकाची इमारत उभी राहिली आहे. तिथे लग्नादी समारंभ होतात. ज्यांच्या घरातील माणसे मेली, ती घरे उद्ध्वस्त झालेली आहेत. रमाबाई आंबेडकरनगरची जखम भळभळतच आहे, तेवीस वर्षे लोटून गेल्यानंतर सुद्धा.
रमाबाईनगरातील हत्याकांडानंतर तेथेच राहणार्या डाव्या चळवळीतील लोकशाहीर विलास घोगरे यांनी हत्याकांडाचा निषेध करीत आत्महत्या केली. त्याला आदरांजली वाहणारी कविता मार्क्सवादी कवी मनोहर वाकोडे यांनी आत्महत्येच्या दुसर्याच दिवशी केली. आज दोघेही हयात नाहीत. त्या दोघांच्या स्मृतीला व त्या हत्याकांडात शहीद झालेल्यांना अभिवादन करत ती कविता येथे देत आहोत…
रमाबाईनगरच्या रस्त्यावरून परतताना शाहीर झाला अबोल हृदयात स्फोटक तारांगण,
अस्वस्थ पृथ्वी आणि जखम खोल
माँ, आपली रुजली नाहीत का या मातीत मुळं
त्याने शोधले कवितेला अन्न शोधणार्या
मुलांसोबत कचरापेटीत
कविता शयनगृहात शोधण्याच्या कालखंडात
त्याने शोधले कवितेला कोयत्याच्या धारेत
आणि ज्वारीच्या कणसात
पण त्याला आली आत्ताच चीड
वांझ कवितांची आणि स्वयंघोषित महाकवींची
म्हणून त्यानं बांधलाय खोपटातल्या
पंख्याला दोर दोन रुपयेवाला…
(लेखक दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते आहेत)