होय होय, वारकरी…

ह. भ. प. देवदत्त परूळेकर -

पंढरीच्या वारीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी सहभागी होत असतात. हे तरुण-तरुणी येथे काय करत आहेत, असा प्रश्न आपल्या मनाला पडू शकतो. या संदर्भात ख्यातनाम समाजवादी विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. ना. य. डोळे सर लिहितात, ‘समजा , विद्यार्थी पंधरा दिवस शाळेमध्ये आला नाही आणि वडिलांबरोबर वारीला गेला, तर तो तिथून जेवढं समतेचं तत्त्वज्ञान शिकून येईल, तेवढं वर्गात शिकता येत नाही. मग उलट तो वारीला गेला तर त्याची प्रेझेंटी मांडायला पाहिजे. शिक्षकांनी गैरहजेरी मांडू नये.’

डोळे सर पुढे लिहितात, ‘हे वारकरी वयाने मोठे असलेले माझ्या पाया पडले. तोंडाने विठ्ठल म्हणाले. मी म्हटलं की, अहो, माझ्या कशाला पाया पडता? ते म्हणाले की, तुमच्या कुठे पाया पडतो, मी विठ्ठलाच्या पाया पडतोय. तुमच्या हृदयातला जो विठ्ठल आहे, त्याच्या पाया पडलो. वारकरी जे एकमेकांच्या पाया पडतात, ते त्या माणसाच्या पाया पडत नसतात.

समतेचे तत्त्वज्ञान कृतिशील पद्धतीने आचरणात आणण्याचा वारकर्‍यांचा हा एक मार्ग आहे. पंढरीच्या वारीची वारकरी संप्रदायाची तात्त्विक भूमिका काय आहे? वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी या संदर्भात केलेले विवेचन खालीलप्रमाणे आहे.

‘वारीची चर्चा करताना पहिल्यांदा एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. ती म्हणजे, वारकरी संप्रदायाला अभिप्रेत असलेला परमार्थ हा सामूहिक आहे. जप, तप, ध्यान, धारणा या साधना वैयक्तिक आहेत. वारी ही गोष्ट अनेकांनी मिळून करायची आहे.एकमेका साह्य करू| अवघे धरू सुपंथ॥असा हा मामला आहे. म्हणून तर तुकाराम महाराज

स्वल्प वाटे चला जाऊ|

वाचे गाऊ विठ्ठल॥

तुम्ही आम्ही खेळमेळी|

गदारोळी आनंदे॥’

असे आवाहन सर्वांनाच करतात. या आवाहनातील खेळीमेळी, ‘गदारोळी’, ‘आनंदे’ हे शब्द लक्षणीय आहेत. वैयक्तिक पद्धतीने साधना करणारे साधक असे शब्दप्रयोग करू शकत नाहीत.

या मुद्याचा संबंध वारकरी संप्रदायाच्या विश्वदृष्टीशी पोचतो. सृष्टीच्या मुळाशी असलेल्या चैतन्यतत्त्वाचा जगाशी व जिवाशी संबंध काय हा तत्त्वज्ञानामधील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. इसवी सनाच्या आठव्या शतकात आद्य शंकराचार्यांनी उपनिषदांमधील तत्त्वज्ञानाची म्हणजेच वेदान्ताची व्यवस्था लावताना मायावादाचा अंगीकार केला. मायावादाच्या या सिद्धांतात सत्याचे पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभासिक स्तर अथवा पातळ्या गृहीत धरल्या आहेत. आपणाला झोपेत जे स्वप्न पडते, तेव्हा त्या स्वप्नातील घडामोडी आपल्याला खर्‍याखुर्‍या वाटत असतात; पण त्या तशा नव्हत्या. तो केवळ आभास होता, असे आपणाला स्वप्नभंग होऊन आपण जागे झाल्यावर समजते. मृगजळ किंवा दोरीवर होणारा सर्पाचा भास हा यांसारखाच प्रकार आहे.

स्वप्नसृष्टीचा किंवा प्रातिभासिक सत्तेचा विचार आपल्या जागृतीमधील व्यवहारात लागू केला, तर त्यातील सत्याला व्यावहारिक सत्य असे म्हणता येते. हे व्यावहारिक सत्य प्रातिभासिक सत्याचीच सुधारित आवृत्ती आहे, हे त्या सत्याची अंतिम अथवा पारमार्थिक सत्याशी तुलना केली तर लक्षात येईल. पारमार्थिक सत्य याचा अर्थ जे भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांत अबाधित राहते ते! व्यावहारिक जगाला वा सत्याला असे अबाधित अस्तित्व नसते. व्यावहारिक जगातील कोणतीही वस्तू काळाच्या ओघात कोणत्या तरी बिंदूवर अस्तित्वात येते. त्या आधी ती नसते. ती अस्तित्वात आल्यानंतर काही काळ टिकते आणि त्यानंतर ती नष्ट होते. न्यायशास्त्रातील परिभाषा वापरून सांगायचे झाल्यास, तिचा प्राग्भाव (प्राक् अभाव) आणि प्रध्वंसाभाव (प्रध्वंस अभाव) असतो. तिचे भावरूप काही काळापुरते व्यावहारिक स्वरूपाचे असते. याउलट ज्याला पारमार्थिक सत्य किंवा सत्ता म्हणण्यात येते, त्याला प्राग्भावही नसतो व प्रध्वंसाभावही नसतो. ते अनादि व अनंत असते. ते कधी नव्हते असे नाही व ते कधी नसेल असेही नाही. ते त्रिकालाबाधित असते. अशा सत्य किंवा सत् वस्तूला ब्रह्म किंवा परब्रह्म असे म्हणतात. हेच पारमार्थिक सत्य अथवा सत्ता होय. व्यवहारातील वस्तूंना सत्य मानून आपण व्यवहार करतो ती खरे तर अविद्या किंवा अज्ञान होय. तो पारमार्थिक सत्तेवरील अध्यास किंवा आभास होय, जसे मृगजळ हा वाळवंटावरील अध्यास किंवा सर्प दोरीवरील आभास.

शंकराचार्यांच्या या विचारव्यूहामुळे त्यांना कदाचित विशेषतः बौद्ध विरोधकांशी तार्किक मुकाबला करणे सोपे गेले असेलही, पण त्यामुळे लौकिक जग आणि त्याच्यातील मनुष्याचे जगणे याविषयी एक प्रकारची नकारात्मक विरक्तीची भावना निर्माण झाली आहे, हे नाकारण्यास अर्थच नाही.

अशा परिस्थितीत संत ज्ञानेश्वरांनी जगाविषयीचा एक सकारात्मक, आशावादी सिद्धांत मांडला. त्याला ‘चिद्विलास’ असे म्हणतात. त्यानुसार विश्व हे ब्रह्मावरील विवर्त किंवा अध्यास नसून परब्रह्माचा म्हणजेच चिद्वस्तूचा विलास होय. या जगात जन्मलेल्या जिवाला बंध प्राप्त होतो आणि त्यातून मोक्ष किंवा सुटका होण्यासाठी त्याच्यातील व्यवहारांचा पूर्णतः किंवा अंशतः त्याग करायला हवा, ही मायावादी वेदान्ताची भूमिका जाऊन विश्वातले जगणे ही परमात्म्याच्या ऐश्वर्याची व वैभवाची प्रचिती होय, अशी भूमिका पुढे आली. पूर्वीच्या विचारांनुसार मोक्ष किंवा मुक्ती, म्हणजे जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून सुटून परत या लोकांत न येणे हेच मानवी जीवनाचे ध्येय किंवा इतिकर्तव्यता होती. परम पुरुषार्थ होता. परमार्थाचे हे आदर्श प्रारूप किंवा पॅरेडाइमच आता बदलले. या उलट इहलोकात परमात्मसुख भोगण्यासाठी वारंवार जन्म घ्यावा. या सुखापुढे जन्म-मरणाचे दुःख काहीच नाही. सृष्टी अज्ञान किंवा अविद्येतून निर्माण झालेली नसून, परमेश्वराच्या इच्छेतूनच निर्माण झाली आहे. ती परमेश्वराचेच स्फुरण किंवा स्फूर्ती आहे. ती माणसाला हवी असो अथवा नसो, परमेश्वरालाच हवी आहे. याचाच अर्थ, ती नाकारणे म्हणजे परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध जाणे.

वारकर्‍यांच्या प्रत्येक कीर्तनाचा व भजनाचा समारोप ज्या मागण्याच्या अभंगाने होतो, तो सर्व प्रसिद्ध आहे.

हेचि दान देगा देवा|

तुझा विसर न व्हावा|

गुण गाईन आवडी|

हीच माझी सर्व जोडी|

न लगे मुक्ती आणि संपदा|

संतसंग देई सदा|

तुका म्हणे गर्भवासी|

सुखे घालावे आम्हांसी॥’

हा तो अभंग आहे. अर्थ स्पष्ट आहे. मनुष्यजन्माची महती सांगत तो वारंवार हवा असल्याचे सांगणारा हा वारकरी संप्रदाय आहे.

आवडी न पुरे सेविता न सरे|

पडियेली धुरेसवे गाठी॥

न पुरे हा जन्म हे सुख सेविता|

पुढती ही आता हेचि मागो॥

अशी त्याची बैठक आहे.

हे परमात्मसुख सामूहिकरीत्या लुटण्याचा आणि वाटण्याचा, ‘शेअर’ करण्याचा मार्ग म्हणजे वारी. वारी हा मनुष्यजन्माचा महोत्सव किंवा सेलिब्रेशन आहे. पंढरपूरला जायचे ते एकट्याने नव्हे आणि गुपचुपही नव्हे. एकत्रितपणे, गात, नाचत, खेळत. अशा प्रकारे पंढरीला जाणार्‍या वारकर्‍यांच्या समूहाला ‘दिंडी’ म्हणतात. दिंडीत पाच, पंचवीस, शंभर, पाचशे, हजार, पाच हजार इतके म्हणजे कितीही लोक असू शकतात. दिंडीत चालणार्‍या अशा लोकांचा प्रमुख किंवा संचालक असतो त्याच्या गळ्यात वीणा असतेे. तो सूत्रधार असून, दिंडी त्याच्या इशार्‍याने चालते. वारकर्‍यांच्या हातात टाळ नावाचे कांस्य धातूचे वाद्य असते. शिवाय तालवाद्य म्हणून पखवाज किंवा मृदंग असतो. अशा प्रकारे तालावर गात-नाचत पंढरीची वारी करणे म्हणजे ईश्वरी प्रेमाचे अधिकारी व वाटेकरी होणे. ‘लावोनि मृदंग श्रुती टाळ घोष| सेवू ब्रह्मरस आवडीने॥’ हा तुकोबांचाच अभंग आहे.

संतांना जन्माचा आणि देहाचा तिटकारा नाही. ‘तुका म्हणे आम्ही देह उपकारे| गाऊ निरंतर नाचू लागो॥’ असे ते म्हणतात. पण म्हणजे ते देहाला चिकटूनही बसत नाहीत. शरीराला क्लेशही द्यायचे नाहीत व लाड करून भोगही द्यायचे नाहीत, हा त्यांचा मध्यम मार्ग आहे. तुकोबांनी या दोन्हीही टोकांचे वर्णन करून ती टाळावीत असे सांगितले आहे.

शरीरा सुख न द्यावा भोग।

न द्यावे दुःख न करावा त्याग।

शरीर बोखटे ना चांग

तुका म्हणे वेग करा हरिभजनी॥

या संपूर्ण भूमिकेचे वारी हे जणू महाप्रतीक आहे. म्हणून तर पंढरीला कसे जायचे, तर ‘नाचत जाऊ याच्या गावा रे खेळिया| सुख देईल विसावा रे|’ विठ्ठलाचे हे गाव म्हणजे अर्थातच पंढरपूर. तेथे कसे जायचे, तर खेळगड्यांसह गात, नाचत आणि खेळ खेळत! वारीत चालणारे वारकरी महाराष्ट्रात प्रचलित असलेले सर्व लोकखेळ चालता चालता खेळत असतात, हे आवर्जून सांगायला हवे. अगदी हुतूतूपासून जोरबैठकांपर्यंत. काही खेळ कदाचित प्रत्यक्ष क्रीडाजीवनातून लुप्त झाले असतील; पण वारकर्‍यांनी ते त्यांच्याच पद्धतीने म्हणजे त्या खेळांच्या नाट्यात्मक अनुकरणाने जिवंत ठेवले आहेत. विश्वामधील वस्तू नाशवंत आहेत. उत्पन्न होतात आणि विनाश पावतात. खरे तर हा नियम समग्र विश्वालाच लागू आहे, हे संतांना ठाऊक नव्हते, अशातला भाग नाही; पण त्याच्याकडे सौंदर्यदृष्टीने पाहता येते. जे इतरांना अनित्य भासते ते यांना ‘नित्यनूतन’ वाटते. उत्पत्ती, विनाश प्रक्रियेकडे ज्ञानेश्वर महाराज नृत्य म्हणून पाहतात. ‘वामांगीचा लास्यविलासु। तो हा जगद्रूप आभासु।’ निर्मिती ही शक्तीचे किंवा पार्वतीचे लास्य नावाचे सृजन नाट्य आहे, तर विनाश म्हणजे शिवाचे तांडव!

एवढी तात्त्विक उंची गाठणारा हा वारकरी संप्रदाय प्रत्यक्षात शेतकर्‍यांचा संप्रदाय होता, हे लक्षात घ्यायला हवे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]