कल्याणमध्ये अंधश्रद्धेचा बळी; भूत उतरवण्यासाठी मारहाण; काकासह आजीचा जीव घेतला

उत्तम जोगदंड -

अंगात संचारलेले भूत उतरवण्यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून मंत्र-तंत्रानंतर केलेल्या बेदम मारहाणीत आजी आणि काकाचा मृत्यू झाल्याची घटना कल्याणमधील खडकपाडा परिसरात घडली. पंढरीनाथ तरे (वय 50) आणि चंदूबाई तरे (वय 76) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पंढरीनाथ यांची पुतणी कविता कैलास तरे (वय 27), विनायक कैलास तरे (वय 22) आणि मांत्रिक सुरेंद्र पाटील (वय 35) यांच्यासह मृताच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. खडकपाडा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मृताची पुतणी कविता तरे हिच्या अंगात दैवीशक्ती संचारत असल्यामुळे तिला पंढरीनाथ यांची पत्नी आणि कविताची आई सुरेंद्र पाटील या मांत्रिकाकडे नियमित घेऊन जात असत. ढोंगी मांत्रिक सुरेंद्र याने त्यांना पंढरीनाथ आणि चंदूबाई या दोघांना भुतानं पछाडलं असून, घराला त्याचा त्रास होत असून हे भूत उतरवल्यास घरात भरभराट येईल, असे सांगितले. त्यांच्या अंगातील भूत मंत्र-तंत्र करून पळवावे लागेल, अशी बतावणी केली. या अंधश्रद्धेला बळी पडत विनायक आणि कविता यांनी काका आणि आजीचे मन वळवून त्यांना अंगातील भूत उतरवून घेण्यास तयार केले. यानंतर पंढरीनाथ तरे यांच्या अटाळी येथील राहत्या घरातच भूत उतरविण्याची तयारी केली गेली. 25 जुलैला दुपारी 4 वाजल्यापासून हा जीवघेणा प्रकार सुरू झाला. त्यात मृताचा अल्पवयीन मुलगादेखील सामील झाला. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास चंदूबाई आणि पंढरीनाथ यांच्या अंगावर हळद टाकून त्यांना काठीने बेदम मारहाण करण्यात आली. हा अघोरी प्रकार दुपारी 4 वाजल्यापासून रात्री पावणेनऊ वाजेपर्यंत सुरू होता. मांत्रिकासह इतर तिघांनी पंढरीनाथ आणि चंदूबाई यांना मारहाण केली. या मारहाणीत या दोघांचाही अखेर दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मृताचा भाचा देवेंद्र भोईर याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. देवेंद्र याच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी पहाटे गुन्हा दाखल केला असून, चारही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. तिघांना अटक केली असून, अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे, अशी माहिती खडकपाडा ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली.

कल्याणजवळील अटाळी परिसरात एकाच परिवारातील एक वयस्कर महिला आणि मध्यम वयाचा पुरुष यांच्या अंगात भूत आहे, असे मांत्रिकाने नातेवाईकांना सांगितले आणि हे भूत बाहेर काढण्यासाठी त्यांना काठीने मारहाण करण्याचा उपाय सुचवला. बुवाने सांगितल्यानुसार जवळच्या नातेवाईकांनी या दोघांना काठीने एवढे झोडपले की, त्यात त्यांचा मृत्यू झाला, असे कळले आहे. कल्याणसारख्या मुंबईच्या शेजारच्या परिसरात अशी भयंकर घटना घडणे, हे खरोखरच अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. जादूटोणाविरोधी कायदा आल्यानंतर मांत्रिक बुवांचा उपद्रव कमी झालेला असला, तरी आपली कार्यपद्धती बदलून व कायद्यातून पळवाटा काढून त्यांनी आपला ‘धंदा’ सुरू ठेवला आहे, हे अशा प्रकरणांतून दिसून येते. या प्रकरणात अन्य कायद्यातील कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहेच; तसेच जादूटोणाविरोधी कायद्याचे सुद्धा कलम लावले गेले आहे, असे कायदा विभागाच्या राज्य सहकार्यवाह अ‍ॅड. तृप्ती पाटील यांनी कळवले आहे. या प्रकरणातील मांत्रिकाची भूमिका पाहता त्याच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी बरीच मेहनत घेतलेली असावी, असे वाटते. ‘महाराष्ट्र अंनिस’ प्रबोधन कार्यक्रमाच्या मार्गाने जनतेत अशा बाबांविषयी आणि एकूणच अंधश्रद्धेविषयी गेल्या तीस वर्षांपासून जागृती करीत आहे. त्यामुळे हे प्रकार बर्‍याच अंशी कमी झाले असले, तरी ते संपूर्ण थांबविण्यासाठी पोलीस, सामाजिक संस्था, राजकारणी यांची योग्य आणि सक्रिय साथ मिळणे आवश्यक आहे; तसेच अंधश्रद्धेच्या प्रश्नात धर्मकारण आणणार्‍या लोकांना विवेकी जनतेने रोखले पाहिजे, नाहीतर अशा घटना अधून-मधून होतच राहतील.