डॅनिअल मस्करणीस -

आम्ही वसईत ख्रिस्तीबहुल परिसरात गेली बारा वर्षे ‘विवेकमंच’ हा उपक्रम चालवत आहोत. या उपक्रमाचे उद्घाटन डॉ.दाभोलकर यांच्या हस्ते (हत्येच्या ६ महिने अगोदर) झाले होते. दर रविवारी आमची सभा होते. विवेकातून समाजपरिवर्तन करण्याच्या जाणिवेतून दर रविवारी विविध विषयांवर मुक्त-चर्चा घडवून आणणे व त्यात सर्व उपस्थितांना सहभागी करून घेणे, असे या उपक्रमाचे स्वरूप. आमच्या रविवारच्या सभेत अजून खंड पडला नाही. कोवीड काळातही नाही. आम्ही झूम मीटिंगच्या मार्फत ऑनलाइन संपर्कात राहिलो. सुरुवातीच्या काळात विवेकमंचच्या सभेत बरेच जण म्हणायचे- ‘दर रविवारी लोक जी चर्चमध्ये जातात, ती केवळ सोशलायझेशनसाठी. त्यादिवशी त्यांना जर नवीन पर्याय मिळाला तर, कदाचित चर्चला जाण्याची संख्या कमी होईल.’ गंमत म्हणजे गेली बारा वर्षे विवेकमंचाचे सदस्य चर्चला जातील न जातील; पण विवेकमंचच्या दहाच्या सभेस नक्कीच हजर असतात. एखादी कृती ती कितीही छोटी का असेना, त्यात सातत्य असेल तर त्याचा परिणाम साधला जातोच.
अंनिसने विषय दिलाय की, आपापल्या धर्माकडे समकालीन चिकित्सक नजरेतून पाहिल्यावर कोणते धर्मबदल करावेसे वाटले? कोणते बदल करणे शक्य झाले? व ही प्रक्रिया कशी प्रत्यक्षात आली व येत आहे?
ढोबळमानाने तीन प्रमुख बदल करावेसे वाटले ते असे :
१. धर्मचिकित्सेचे normalization करणे
आज धर्म हा कळीचा मुद्दा बनलाय. आपल्या चटकन भावना दुखावल्या जातात. तू माझ्या धर्माविषयी काही वाईट बोलू नको, मीही बोलणार नाही ही भूमिका आपण सोडून दिली पाहिजे. धर्माचा पगडा, जर कमी करायचा असेल तर आज एक नवीन भूमिका अंगीकारण्याची गरज आहे. मी माझ्या धर्मातील काही खटकणार्या गोष्टी सांगतो, तू तुझ्या धर्मातील तुला खटकलेल्या बाबी सांग असे म्हणून आपण तरुणांनी आज नवीन संवादाला सुरुवात करणे गरजेचे आहे.
डॉक्टर नेहमी म्हणायचे, ‘विवेकवादी विचारसरणीच्या समाजावरील परिणामाचे मोजमाप करण्यासाठी शतकांच्या एककांचा वापर करावा लागेल.’ खरेच आहे ते. धर्माचा आपणा सर्वांवर हजारो वर्षांचा मोठा प्रभाव आहे. विवेकवादाची चळवळ सर्व स्तरात सर्वदूर पोहोचावी, असे वाटत असेल तर, धर्मचिकित्सेसाठी अनुकूल वातावरणनिर्मिती तयार करणे ही महत्त्वाची पहिली पायरी आहे. त्यामुळे परिसरात या विषयासंबंधी व्याख्याने, चर्चासत्रे भरविणे, त्यात पुरोहित आणि प्रापंचिक दोघांना सहभागी करून घेणे हे आलेच. त्या जोडीला, वर्तमानात ख्रिस्ती धर्मात नवीन बदल करू पाहणार्या ज्या कृती जगभरात घडत आहेत, त्या विषयावर लिखाण करून त्याची जाणीव येथील स्थानिक ख्रिस्ती समाजास करून देणे. त्या व्यक्तींना, विचाराला पाठबळ देणे हे एक प्रमुख ध्येय समोर होते.
एकदा एक बाई मला म्हणाल्या, ‘मी तुमच्या विवेकमंचातील चर्चेविषयी खूप ऐकलंय. मला तुमच्यात सामील व्हायचीही इच्छा आहे; पण मला तेथे येण्यास भीती वाटते. मी नास्तिक वगैरे झाली तर?’ नास्तिकतेला चिकटलेली (की चिकटवली गेलेली?) नकारात्मकता काही गळून पडण्यास तयार नाही.
तुम्हाला देवळात जावं वाटत असेल तर तुमचा विवेक शाबूत ठेवून खुशाल जा .. परंपरागत धर्माची सवय अशी एकदम कशी सुटणार? पण चर्चला गेल्यावर तुम्हाला तेथे काही चुकीचे दिसले तर, तेही बिनदिक्कतपणे मांडा. ‘तो विवेकी झालाय तो चर्चला जात नाही’ याबरोबरच ‘तो चर्चलाही जातो आणि टीकाही करतो’ या भूमिकेचीही आज (अंमळ जास्त) गरज आहे.
२०२० मधील मार्च महिना. नुकतीच, कोवीडच्या काळ्या संकटाची आपल्याला चाहूल लागली होती. १४ मार्च रोजी महाराष्ट्र सरकारने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे येथील जमावबंदीवर तत्काळ बंदी आणण्याचे आदेश दिले. सामान्य जनता या कोरोनाच्या नवीन घडामोडीमुळे सतर्क होत होती; परंतु तोपर्यंत साथीचं गांभीर्य कोणालाच जाणवलं नव्हतं. त्यामुळे सरकारकडून आदेश येऊनही मुंबईतील चर्चमध्येही जमावबंदीवर बंधन आणण्यासाठी काही हालचाल केली जात नव्हती. मरीन लाइन्स, मुंबई येथे राहणारी ‘सविना क्रास्टो’ नावाची एक ख्रिस्ती महिला १७ मार्च रोजी तिच्या परिसरातल्या चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेली, तेव्हा सरकारच्या जमावबंदीच्या आदेशाचं पालन पुरेशा सतर्कतेने चर्चमध्ये केलं जात नाहीये हे तिने पाहिलं. तिने या विविध प्रार्थनाविधीदरम्यानचे अनियंत्रित जमावाचे स्वतःच्या मोबाईलमधून फोटो काढले. आणि त्याच दिवशी मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टीस यांना पत्र लिहिले. सोबत तिने ते फोटो पुरावा म्हणून जोडले. दुसर्याच दिवशी तिने या विषयासंबंधी जनहितार्थ याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली. तेव्हा या याचिकेची दखल घेत मुंबई हायकोर्टाने ‘चर्चेसमध्ये अजून प्रार्थनाविधी का सुरू आहेत?’ म्हणून राज्य सरकारकडे विचारणा केली आणि यथावकाश सर्वत्र चर्चेस बंद केली गेली. इंडियन एक्सप्रेसमध्ये एका कोपर्यात मी ही बातमी वाचली. एक ख्रिस्ती महिला (चर्चमध्ये जमावबंदीच्या आदेशाचं पालन केलं जात आहे या अपेक्षेनं) सकाळी प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जाते काय आणि ते होत नाहीये हे पाहताच त्या दिवशी कोर्टात याचिका दाखल करते काय, हे पाहून मला तिचं खूप कौतुक वाटलं. तिने सकाळी चर्चमध्ये जाऊन नाही तर, संध्याकाळी कोर्टात जाऊन येशूच्या शिकवणुकीचं खरं दर्शन दाखवलं होतं! ‘हे एवढं सोप्पं नसणार. तिला नक्कीच ख्रिस्ती समाजाकडून त्रास झाला असेल’ असा विचार करून अधिक जाणून घेण्यासाठी मी सविनाला फेसबुकवर मेसेज टाकला. त्याला उत्तर तब्बल एक वर्षानंतर आले. माझा तर्क खरा ठरला. मुंबईसारख्या उच्चभ्रू ख्रिस्ती वस्तीत तिला बर्याच मानहानीला सामोरं जावं लागलं होतं. ‘तू जे धैर्य दाखवलंस, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे’ म्हणून सविनाची मी मुलाखत घेतली. ती मुलाखत ‘लोकसत्ते’त आली. ख्रिस्ती लोकांत सविनाची ही धैर्यगाथा पोहोचली.
अशीच गोष्ट ‘Women Church World’ या व्हॅटिकनतर्फे चालविल्या जाणार्या मासिकाच्या माजी संपादिका ‘लुसेटा स्काराफिया’(Lucetta Scaraffia) हिची. ख्रिस्ती धर्मभगिनी यांना चर्चमध्ये मिळणार्या दुय्यम वागणुकीने हताश होऊन, ‘स्त्रिया चर्चमध्ये धर्मभगिनी होण्यासाठी येतात त्या गरीब आणि दुःखी लोकांची सेवा करण्यासाठी, धर्मगुरूंची धुणीभांडी करण्यासाठी नाही’ असे वैतागून संपादकीयात नमूद केले होते. त्याची दखल खुद्द पोपमहाशयांना घेणं भाग पडलं होतं. चिली या देशातील ‘वूहान क्रूज’ या सामान्य तरुणाचीही अशीच एक संघर्षाची कथा. चिली येथील एका बड्या ख्रिस्ती धर्मगुरूच्या लैंगिक शोषणास वूहान बळी पडलेला. त्याने कोर्टात त्या धर्मगुरूविरोधात कोर्टात तक्रार केली. पुढे बरीच वर्षे एकट्याने लढा दिल्यानंतर व्हॅटिकनने २०११ साली त्या फादरांना वयाच्या ८७ व्या वर्षी दोषी ठरविले. आज वूहान ’ख्रिस्ती धर्मगुरूंचे चर्चमधील लहान मुलांचे लैंगिक शोषण’ या मुद्द्यावर प्रबोधन करत जगभर प्रबोधन करतो.
चिली येथील हा वूहान असेल, व्हॅटिकन येथील लुसेटा असेल वा आपल्या मुंबईची सविना. ही काही नास्तिक वगैरे नाहीत. ही तिघं चर्चला जाणारी; मात्र आपला विवेक शाबूत ठेवलेली सामान्य माणसं. त्यांच्या देशानं त्यांना संविधानांतर्गत दिलेल्या हक्कांचा वापर करून, योग्य वेळी ठाम भूमिका घेऊन किती मोठा बदल घडवू शकली! अशी माणसं समाजात पाच टक्के जरी असली तरी, किती मोठा बदल होईल! चर्चला जायचंय? जा. जे आवडतं ते करा… पण तेथे काही खटकलं तर त्याची रीतसर तक्रार करा… किती सोप्पं… किती सुलभ!
चर्चमधील जे जे काही खटकतं आहे त्या त्या सर्व विषयावर (केरळमधील एका धर्मभगिनीने बिशप फ्रँकोवर बलात्काराचा आरोप केला ती केस, ख्रिस्ती धर्मगुरू आणि लहान-मुलं-स्त्रिया आदींचं लैंगिक शोषण, चर्चमधील आर्थिक गैरव्यवहारासारखे समकालीन विषय असतील वा येशूची शिकवणूक आणि चर्चचे किंवा ख्रिस्ती लोकांचे विसंगत वागणे असे विषय असतील) आम्ही विवेकमंचचे विविध सदस्य स्थानिक नियतकालिकांतून वा इतर राज्यपातळीवरील मासिकांतून वेळोवेळी यावर लिहून ख्रिस्ती समाजात हे normalization रुजविण्याचा प्रयत्न करत आहोत. अगोदर विवेकी विचार रुजवावा लागेल… कृती मग आपसूक होईलच!
२. श्रद्धा–अंधश्रद्धा आधुनिक विज्ञानाच्या प्रकाशात तपासून घेणे
कितीही म्हटलं तरी एक मान्य करावे लागेल की, सामान्य लोकांना त्यांच्या रोजच्या बेभरवशाच्या संघर्षमय आणि अन्यायी आयुष्यात श्रद्धा हवीहवीशी वाटते. कितीही कपोलकल्पित कथा असो, ती त्याला एका आदर्श काल्पनिक जगात घेऊन जाते, त्याला त्याच्या खडबडीत वर्तमानापासून घटकाभर सुटका देते. मानवी (विशेषतः भारतीय) मन श्रद्धेच्या आधाराशिवाय जगू शकत नाही; पण जर त्या श्रद्धेत शंकेला जागा नसली तरी तीच श्रद्धा अविवेकीही ठरू शकते. प्रत्येक माणसाला आपली श्रद्धा ही खरी श्रद्धा व दुसर्याची ती अंधश्रद्धा वाटते. त्यामुळे श्रद्धा-अंधश्रद्धेऐवजी विवेकी-अविवेकी श्रद्धा हा शब्दप्रयोग करावा, असं काही वर्षांपासून वाटू लागलंय. ज्या श्रद्धा मानवाला पुढे नेणार्या, आपल्यात प्रेम, सहकार्य यासारख्या उपयुक्त भावना जागवणार्या असतील तर, त्या विवेकी श्रद्धा होत आणि त्या सामाजिक जीवन सुसह्य करतात; पण ज्या श्रद्धा मानवाला मागे ढकलणार्या, राग, भीती यासारख्या विनाशक भावना निर्माण करणार्या असतील तर, त्या श्रद्धा अविवेकी होत. श्रद्धा विवेकी की अविवेकी यामधील फरक करण्यासाठी डॉ. दाभोलकर यांनी केलेली व्याख्या मार्गदर्शक ठरावी- ‘जी श्रद्धा तुमचे आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण करते वा करू शकते ती अविवेकी श्रद्धा होय’
बायबलमध्ये सांगितलंय म्हणून मी शरीराला त्रास देऊन चाळीस दिवसांचा उपवास केलाच पाहिजे, ही अविवेकी श्रद्धा ठरेल; पण जे आरोग्यास घातक आहे अशा एखाद्या वस्तूचा पूर्णपणे त्याग करण्यासाठी जर मी याच चाळीस दिवसांचा नावीन्यपूर्वक उपयोग केला तर, ती विवेकी श्रद्धा ठरेल. त्यामुळे कालानुरूप आपल्या या श्रद्धांना नवीन विवेकी अर्थ देणे, कालबाह्य श्रद्धांना तिलांजली देणे हे एक दुसरे मोठे काहीसे कठीण; पण महत्त्वाचे ध्येय समोर होते.
बायबलमधील जे काही चमत्कार लिहिलेले आहेत त्याकडे प्रतिकात्मकरीत्या पाहावे म्हणून आम्ही विविध उपक्रमांद्वारे सातत्याने प्रयत्न करत असतो. आम्ही वसईत भरविलेला ख्रिस्ती अंधश्रद्धांचा कार्यक्रम बराच वादग्रस्त ठरला. कुमारी असून मरीया गर्भवती कशी राहू शकते म्हणून ख्रिस्ती धर्मातील मूळ श्रद्धांची त्या जाहीर कार्यक्रमात चिकित्सा केली गेली होती. त्यावर खूप गदारोळ झाला. विवेकमंच बंद पाडण्याचेही प्रयत्न झाले. आम्ही माघार घेतली नाही. त्या संघर्षाला तोंड दिले (याविषयी सविस्तरपणे ‘मंच’ या पुस्तकात मी लिहिलेलं आहे). पण त्यामुळे हा विचार जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचला. काही वर्षांपूर्वी प्रार्थनेद्वारे चमत्कार करण्याचा दावा करणारे एक वसईतील पास्टर यांच्या विरोधात अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मोहीम उघडली, तेव्हा विवेकमंच ठामपणे त्यांच्यासोबत उभे राहिले. जे चुकीचं आहे त्याला विरोध केला तर आपण धर्मविरोधी ठरत नाही ही भावना किती लोकांपर्यंत पोहोचलीय माहिती नाही; पण चर्चच्या कारभारावर ताशेरे ओढणार्या निनावी पोस्ट्सची संख्या वसईत वाढू लागलीय. लोक धाडस करू लागलीयेत. वसईतील चर्चही (अर्थात, ते कबूल करणार नाहीत पण) विवेकमंचमुळे सतर्क झाले.
३. विवेकवादाचा आनंद लोकांपर्यंत पोहोचविणे.
जेव्हा ‘असेल माझा हरी..’ ही भावना आपण सोडून देतो तेव्हा ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या वचनाचा अर्थ लक्षात येऊ लागतो. आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, जोडीदारासोबतचे सहजीवन, मुलांचं संगोपन, त्यांचं शिक्षण, वृद्ध आई-वडील, करिअर, अचानक उद्भवलेली संकटं हे असे आपलं आयुष्य व्यापून टाकणारे विषय ‘तो आहे, बघेल सारं’ म्हणून धर्माच्या दावणीला बांधून सोडता येत नाही. आपल्यालाच त्याची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागते. आपसूक आपण या सर्व विषयात काय नवीन चालले आहे म्हणून चाचपडू लागतो. नवनवीन पुस्तकांतून शोध घेण्याचा, ते ट्राय करून आपलं आयुष्य सोप्पं करण्याचा एक इंटरेस्टिंग प्रवास सुरू होतो. धार्मिक कर्मकांडात न गुरफटल्यामुळे अधिकचा मिळालेला वेळ सत्कारणी लावता येतो. विवेकी होण्यात किती ‘व्यवहारी शहाणपण’ आहे हे आपल्याला उमगू लागतं…
विवेकवादाच्या मार्गावर चालण्याने आयुष्य कसे आनंददायी होते हे अनुभवल्यानंतर, सर्वसामान्य हतबल लोकांपर्यंत हे सर्व का पोहोचत नाही? असा विचार करून वाईट वाटतं आणि मग धार्मिक जंजाळात अडकलेल्या या सामान्य लोकांकडे आपण रागाने किंवा तुच्छतेने न पाहता दयेने पाहू लागतो. विवेकवादी असण्याची एक नवीन जबाबदारी खांद्यावर येते. विवेकवाद म्हणजे फक्त धर्मावर टीका नाही तर इतर बरंच काही आहे .. हे ‘बरंच काही’ लोकांपर्यंत पोहोचावं असं कळकळीने वाटू लागलं.
अल्बर्ट एलिस, इमोशनल इंटेलिजन्स, विवेकी पालकत्व, लैंगिकता, मोबाइल आणि तरुणाई या विषयांवर आम्ही ऑनलाईन माध्यमातून चर्चा/कार्यक्रम करत असतोच; पण अजूनही खूप काही करण्यासारखं आहे. नवीन काही करण्यापेक्षा या विषयावर युट्युबवर जी चांगली व्याख्यानं आहेत, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचवता येतील आणि विवेकवादाचं सामर्थ्य सामान्य लोकांपर्यंत कसं पोहोचेल यावर थोडं अजून काम करता येईल. विवेकमंचाचं सध्याचं कार्यक्षेत्र आणि प्रभावक्षेत्र वसईच असलं, तरी देशातील इतर ख्रिस्ती विवेकी लोकांशी कसा संपर्क साधता येईल यावरही थोडा विचार करणं गरजेचं आहे. तत्कालीन धर्मसत्तेच्या विरोधात उभा ठाकलेला येशू त्याच्या शिष्यांना म्हणायचा तसा- ‘पीक भरपूर आहे; पण कामकरी थोडे आहेत’ अगदी तशी अवस्था आहे.
विवेकवादी चळवळीची वसईतील ख्रिस्ती लोकांना सवय होऊ लागलीय. हे विवेकमंचचं मर्यादित अर्थानं यश म्हणता येईल. फक्त यात सातत्य राखायचे प्रयत्न सुरू ठेवावे लागतील.
धर्म हा मानवजातीच्या कल्याणासाठीच होता, आहे. पण सध्याच्या काळात कुठेतरी त्याचा सूर हरवलाय… त्याचबरोबर ‘आपल्या अवतीभोवती जे काही चाललंय’ याचा शोध घेण्याच्या उदात्त कारणापासून सुरू झालेला विज्ञानाचा प्रवास ‘निसर्ग, असाहाय्य नागरिक आणि मुक्या जनावरांवर हुकूमत गाजविण्याच्या दिशेने तर होणार नाही ना?’ अशी चिंता वाटण्यासारखी आजूबाजूला परिस्थिती आहे. धर्म आणि विज्ञान दोन्हीकडे, दुधात बेमालूमपणे पाणी मिसळून गेलंय. त्यामुळे या दुधातून पाणी वेगळं करून देईल, अशा ‘नीरक्षीर’ विवेकाची जोपासना करण्याची आपणा सर्वांनाच कधी नव्हे एवढी आज गरज आहे.
– डॅनिअल मस्करणीस, वसई
Email: danifm2001@gmail.com
संपर्क : ९१५८९ ८६०२२