-
प्रति,
मा. सरपंच,
उपसरपंच व ग्रामसेवक,
सर्व ग्रामपंचायत सदस्य.
ग्रामपंचायत…….
विषय– विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव आपल्या ग्रामपंचायतीमार्फत करणेबाबत…
संदर्भ : महाराष्ट्र शासन, ग्रामविकास मंत्रालयाचे 17 मे 2022 चे परिपत्रक
महोदय, नमस्कार!
महाराष्ट्रातील संतपरंपरा, फुले-शाहू-आंबेडकर व परिवर्तनवादी समाजसुधारकांनी एकोणिसाव्या व विसाव्या शतकात स्त्रियांशी निगडित विविध अमानुष प्रथांच्या निर्मूलनासाठी केलेल्या प्रयत्नातून परिवर्तनास चालना मिळाली. परंतु आजही बहुतेक सर्व जाती-धर्मांतील विधवा स्त्रियांना विविध प्रथांच्या नावे मानवी सन्मान व प्रतिष्ठा नाकारण्यात येते. 21 व्या शतकात विज्ञानवादी व प्रगतिशील समाज म्हणून आपण वावरत असलो, तरीही पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे अशा अनिष्ट प्रथांचे समाजात आजही पालन केले जात आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्व जाती, धर्म यांचा आदर ठेवून विविध प्रकारच्या प्रथा; ज्यामुळे लोकशाही मूल्यांची जपणूक होत नाही, याबद्दल सतत प्रबोधन करण्याचा प्रयत्न करते. पतीच्या निधनानंतर पत्नीस विधवा म्हणून समाजात वावरत असताना अवहेलनेस सामोरे जावे लागते. तसेच समाजातील कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही. त्यामुळे विधवांना सन्मानाने जगण्याचा मानवी अधिकार आणि भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्काचे उल्लंघन होते. त्यामुळे अशा प्रथांचे निर्मूलन होणे ही काळाची गरज आहे.
ग्रामपंचायत हेरवाड, ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांनी अशा पद्धतीच्या अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेबाबतचा ठराव दिनांक 05/05/2022 रोजी मंजूर केला आहे. त्यास अनुसरूनच महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन परिपत्रक दि. 17 मे 2022 रोजी ‘समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन होणेबाबत’ या नावाने निघालेले आहे आणि या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ठराव करावेत, असे म्हटले आहे. याबद्दल समाजात व्यापक जनजागृती निर्माण करून कार्य व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपणास करीत आहे. यासाठी ‘अंनिस’चे स्थानिक कार्यकर्ते आपणांस मदत करायला तत्पर आहेतच.
माझी आपणास विनंती आहे की, आपल्या गावच्या परंपरेस शोभेल अशा पद्धतीचा विधवा प्रथेविरुद्धचा ठराव आपल्या गावाने करून एका नवीन क्रांतिकारी विचाराच्या प्रवाहात सहभागी व्हावे, ही अपेक्षा !
दिनांक : 23 मे 2022
ठिकाण ः इस्लामपूर
मा. सरोज (माई) नारायण पाटील
राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती