प्रा. प्रविण देशमुख -
रविवारी (दि. 13 फेब्रुवारी) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने जोंधळे हायस्कूल, डोंबिवली (प.) येथे आयोजित केलेल्या महिलांसाठीच्या एकदिवसीय चमत्कार प्रशिक्षण शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, ठाणे शहर, मुरबाड अशा विविध ठिकाणांहून जवळपास 35 हून अधिक महिलांनी प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग नोंदवला.
बुवा, बापू, महाराज, तांत्रिक-मांत्रिक व पूजा-पाठ कर्मकांडाच्या माध्यमातून स्त्रियाच जास्त शोषणाला बळी पडतात. समाजातील स्त्रियांना प्रशिक्षित करून त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत जोडून घेऊन त्यांच्यामार्फत इतर महिलांना जागृत करण्याचे काम करावे, समाज प्रबोधन करावे, हा या शिबिराचे आयोजन करण्यामागचा उद्देश असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रा. प्रवीण देशमुख यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले.
या एकदिवसीय शिबिराच्या सकाळच्या सत्रात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संबंधित विविध विषयांची माहिती प्रशिक्षणार्थी महिलांना करून देण्यात आली. सुरुवातीला वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रसाद खुळे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर डोंबिवलीचे मनोविकार तज्ज्ञ डॉ. दुष्यंत भादलीकर यांनी विविध सामान्य मानसिक आजारांची लक्षणे समजून घेणे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत काम करणार्या कार्यकर्त्यांना आवश्यक आहे, असे सांगून मन व मनाचे आजारांवर मार्गदर्शन केले.
जगदीश संदानशिव यांनी फलज्योतिष हे कसे थोतांड आहे, हे साध्या व सोप्या भाषेत उदाहरणांसह समजावून सांगितले. ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक वानखेडे यांनी स्त्रियांच्या अंधश्रद्धांवर भाष्य करत स्त्री ही धर्म आणि कर्मकांडांमुळे अंधश्रद्धांची वाहक कशी बनते, हे समजावून सांगितले. यावेळी प्रशिक्षणार्थी महिलांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
प्रशिक्षणाच्या दुसर्या सत्रात वंदनाताई शिंदे आणि राजू कोळी यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना विविध चमत्कार शिकविण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडली.
एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या शेवटी शिबिरार्थींना चमत्काराचे सर्व साहित्य विनामूल्य देण्यात आले. सगळ्या महिला शिबिरार्थींनी यापुढे ‘अंनिस’चे काम करणार असल्याचा मानस व्यक्त केला. या कार्यशाळेच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी बदलापूर शाखेचे ‘अंनिस’ कार्यकर्ते प्रदीप बर्जे यांनी उत्कृष्टपणे पार पाडली. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रवीण देशमुख, वैज्ञानिक जाणिवा विभागाच्या राज्य पदाधिकारी किरणताई जाधव, सांस्कृतिक विभागाचे राज्य पदाधिकारी राजू कोळी, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक वानखडे, जिल्हा सचिव सचिन शिर्के, छाया शिर्के आदींनी विशेष परिश्रम घेतले. हे शिबीर भोजन, चहासहित विनामूल्य होते. अशाच प्रकारचे शिबीर पुन्हा लवकरच घेण्यात यावे, अशी मागणी आता इतर कार्यकर्त्यांकडून होत आहे, हेच या कार्यक्रमाचे यश आहे.
– प्रा. प्रवीण देशमुख, डोंबिवली