मुक्ता दाभोलकर -
महात्मा फुले यांच्या द्वि-जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने डॉ. मिलिंद कसबे यांच्या संकल्पनेतून व संपादनातून सिद्ध झालेली ‘डायरी ऑफ लीगसी’ ही माहितीयुक्त डायरी ‘पुस्तक मार्केट पब्लिकेशन’, नारायणगाव यांनी १ मे २०२६ रोजी प्रसिद्ध केली आहे.
डायरी किंवा रोजनिशीमध्ये विचार नोंदवता येतात व पुस्तिकेच्या माध्यमातून विचार समजून घेता येतात. ‘डायरी ऑफ लीगसी’मध्ये डायरी व पुस्तिका ही दोन्ही माध्यमे एकत्र केली आहेत. परिवर्तनवादी विचारांच्या प्रवाहाशी तरुण पिढीला जोडून घेण्यासाठी नवनवे मार्ग वापरणे, हा या मागचा हेतू आहे. डायरीसाठी वापरलेला कागद व डायरीची छपाई दर्जेदार आहे. डायरीचे मुखपृष्ठ परशुराम गोसावी यांनी केले आहे आणि बुद्धभूषण साळवे यांनी तिची अंतर्गत रचना केलेली आहे. मुखपृष्ठ व अंतर्गत रचना आकर्षक झाली आहे. महात्मा फुल्यांच्या विचारांचा वारसा समाजात रुजवण्याचे हेतूने हे ‘डायरी ऑफ लीगसी, ए हॅण्डबुक बुक फॉर सोशल चेंज’ तयार केलेले आहे.
सर्वसामान्यपणे डायरी किंवा रोजनिशीमध्ये असतात त्या पर्सनल इन्फॉर्मेशन, प्लॅनर, पासवर्ड कीपर, पत्ता व दूरध्वनी क्रमांक इ. विभागांसाठी या डायरीमध्ये काही पाने राखीव ठेवलेली आहेत. या पानांवर महिना किंवा साल घालण्यात आलेले नाही. त्यामुळे वर्ष संपल्यावर ही डायरी बदलणे आवश्यक नाही. डायरी संपेपर्यंत ती वापरता येईल. डायरी विकत घेणार्या व्यक्तीला एकापेक्षा अधिक वर्षे तिची सोबत व्हावी आणि त्या निमित्ताने ती व्यक्ती महात्मा फुले यांच्या विचारांच्या अधिकाधिक संपर्कात राहावी, अशी यामागची कल्पना आहे.
रोजनिशीसाठी सोडलेली काही पाने व महात्मा फुले यांचे जीवन, कार्य, साहित्य इ. विषयांबद्दलची माहिती देणारी काही पाने अशी डायरीची रचना केलेली आहे. महात्मा फुले यांच्या जीवन व कार्यपटातील महत्त्वाच्या घटना आठ पानांमध्ये उलगडल्या आहेत. त्यामध्ये त्यांचा जन्म, कुटुंब, मिशनरी शाळेतील प्राथमिक शिक्षण, सावित्रीबाईंशी विवाह, लहुजी बुवांकडे तालीम, मुलींसाठी पहिली शाळा, स्त्री-शूद्रांना शिक्षण देण्यासाठी गृहत्याग, मुलींची दुसरी शाळा, पुण्यातील मोफत वाचनालय, रात्रीच्या शाळेची स्थापना, शिक्षण खात्याकडून सत्कार, हत्येचा प्रयत्न, बाल प्रतिबंधक गृहाची स्थापना, लोकमान्य टिळक आणि आगरकर यांना जामीन, नगरपालिकेतील कामगिरी, बांधकाम व्यावसायिक फुले, व्यापार व गुंतवणूक तज्ज्ञ फुले इ. वेगवेगळ्या मुद्यांबद्दलची महत्त्वाची माहिती थोडक्यात दिलेली आहे. डायरीमध्ये महात्मा फुले यांची ग्रंथसंपदा असाही एक विभाग आहे. त्यामध्ये महात्मा फुले यांनी लिहिलेले ‘तृतीय रत्न’ हे नाटक, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, ब्राह्मणांचे कसब हे अखंड काव्य, गुलामगिरी हा ग्रंथ व इतर सर्व पुस्तकांचा थोडक्यात परिचय करून देण्यात आलेला आहे. महात्मा फुले यांचा पत्रव्यवहार या विभागामध्ये त्यांनी लिहिलेले दुष्काळविषयक विनंती पत्र, हंटर कमिशन समोर त्यांनी सादर केलेले निवेदनपत्र, त्यांनी मराठी ग्रंथकार सभेस उद्देशून लिहिलेले पत्र आणि १८८० साली त्यांनी मद्यपानगृहाच्या वाढीला विरोध करण्यासाठी लिहिलेले पत्र या महत्त्वाच्या पत्रांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या मृत्युपत्राचा समावेश देखील या डायरीमध्ये केलेला आहे. त्यांनी स्वतः लिहिलेली पत्रे व मृत्युपत्र यामुळे सामान्य वाचकाला महात्मा फुले यांचे स्वतःचे लेखन वाचून त्यांचे विचार जाणून घेता येतील.
महात्मा फुले यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा व त्या काळाचा संदर्भ घेऊन तयार केलेली दोन शब्दकोडी डायरीमध्ये आहेत. डायरीतील माहिती ज्या ग्रंथांमधून घेतलेली आहे त्यांच्या नावाची यादी डायरीत दिलेली आहे. सत्यशोधक विवाहाचे विधी या डायरीत संकलित स्वरूपात दिलेले आहेत. ‘निर्मिकाने जर एक पृथ्वी केली’ यासारखे महात्मा फुले लिखित निवडक अखंड या डायरीत आहेत. डायरीची किंमत पाचशे रुपये असून ७३८५४८६८३२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून ही डायरी विकत घेता येईल.
-मुक्ता दाभोलकर
