डॉ. हमीद दाभोलकर -
सुरुवातीला केवळ काही देशांपुरती मर्यादित असलेली कोरोनाची साथ गेल्या महिन्यात जगभरात पसरली आहे. यापूर्वीच्या साथीच्या आजारांचा मानवजातीचा इतिहास बघितला तर या साथींवर ताबा मिळवण्यासाठी साधारण एखाद्या वर्षाचा कालवधी लागू शकतो. कोरोनासारखे साथीचे आजार जसे माणसाच्या शरीरावर हल्ला करतात, तसेच समाजजीवनाच्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात देखील प्रभाव टाकून जातात. आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील प्रभाव तर आपल्याला दिसू लागले आहेतच; पण मानसिक आरोग्यावरचे परिणाम देखील आता दिसू लागले आहेत. गेल्या काही वर्षांत समाजात मानसिक आरोग्याविषयी समाजात वाढती जागृती दिसून येत असल्याने कोरोनाच्या मानसिक आरोग्याविषयीच्या प्रभावाविषयी आपल्या समाजात चर्चा सुरू झाली आहे, हे देखील कमी महत्त्वाचे नाही. त्यानिमित्ताने कोरोनाच्या मानसिक परिणामांविषयी जरा समजून घेऊया.
ज्या गोष्टींची आपल्याला पुरेशी माहिती नाही, अशा कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराला मानवी मन तीन प्रकारे प्रतिसाद देऊ शकते. व्यक्तीने दिलेल्या भावनिक प्रतिसादाचे रूपांतर पुढे त्या-त्या समाजाच्या कोरोनासारख्या साथीला दिलेल्या मनो-सामाजिक प्रतिसादात होते. त्यामधील पहिला भाग आहे, तो साथीच्या संभाव्य परिणामांकडे ‘दुर्लक्ष’ करण्याचा. चीनमध्ये सुरुवातीला काही प्रमाणात आणि इटलीमध्ये देखील या स्वरुपाची प्रतिक्रिया समाजमनामधून देण्यात आली, त्याचे तोटे आपण समोर बघतो आहोतच. दुसरी प्रतिक्रिया असते ‘चिंताग्रस्त’ होण्याची. आता आपले कसे होईल? आपल्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला हा आजार होईल का? आपल्याला मृत्यूची तर भीती नाही ना? इथपासून ते जगाचा अंत आता जवळ आला आहे…. इथपर्यंत कोणत्याही प्रकारची ही प्रतिक्रिया असू शकते! देवी उपचाराचा दावा करणारे बाबा, मौलवी, पाद्री हे मानवी मनाच्या या आदिम कमजोरीचा फायदा करून घेतात. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यात कोरोनावर उपचार म्हणून विविध प्रकारची तेले, गोमुत्रापासून ते ज्या गादीवर झोपल्याने कोरोना होत नाही, अशा गाद्यांपर्यंत अनेक गोष्टी बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. तिसरा प्रतिसाद असतो, त्या आजाराच्या साथीच्या वास्तवाला सामोरे जाण्याचा. यामध्ये लोक आजाराविषयी योग्य माहिती तज्ज्ञ व्यक्तींकडून घेतात आणि त्यानुसार शास्त्रीय पद्धतीचा अंगीकार करून कोरोनाच्या साथीला सामोरे जातात. कोरोनासारख्या साथीच्या आजाराला सामोरे जाताना आजपर्यंतच्या मानवी इतिहासामध्ये शास्त्रीय पद्धतीने सामोरे जाण्याची पद्धत सर्वांत प्रभावी ठरली आहे. असे असले तरी सगळेच मानवी समूह हे या पद्धतीचा वापर करतील, असे नाही. राजकीय नेते, प्रशासन, आरोग्य यंत्रणा माध्यमे आणि नागरिक हे सगळे मिळून त्या देशाचा एखाद्या साथीविषयी मनो-सामाजिक प्रतिसाद ठरवत असतात. धर्म, जात, देश यांच्या मानवनिर्मित सीमांमध्ये अडकणे किंवा आपत्तीच्या वेळी लोकांच्या अडचणींचा फायदा करून घेऊन नफेखोरी करणे अशा देखील प्रवृत्ती जगभरात दिसून येतात. युवाल नोह्वा हरारीसारखे विचारवंत खासकरून अमेरिकेसारख्या देशाने अशा स्वरुपाचा मनो-सामाजिक प्रतिसाद कोरोनासारख्या साथीची तीव्रता अनेक पटींनी वाढवू शकेल, अशी भीती व्यक्त करीत आहेत, हे या निमित्ताने आपण समजून घेतले पाहिजे.
हे झाले सामाजिक, मानसिक पातळीवरचे परिणाम. आता व्यक्तिगत पातळीवरचे परिणाम समजून घेऊ.
कोरोनासारख्या साथीच्या आजाराचा मानसिक परिणाम सगळ्यात जास्त हा मुळात अतिचिंता करण्याचा आजार आणि स्वभाव असलेल्या व्यक्तींना होतो. अतिचिंता करण्याचा आजार किंवा स्वभाव हा समाजात मोठ्या प्रमाणत दिसून येणारा प्रकार आहे, त्यामुळे याचे गांभीर्य वाढते. अशा लोकांचा असलेला त्रास कोरोनासारख्या साथीच्या काळात वाढतो. यामध्ये झोप आणि जेवण कमी होणे, चिडचिड वाढणे, कोणतेही शारीरिक कारण नसताना डोके दुखणे, असलेली चिंतेची तीव्रता वाढणे, आपल्याला कोरोनाचा आजार होईल, या भीतीने ग्रासले जाणे, अशा स्वरुपाची लक्षणे दिसून येतात.
‘ओब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर’ नावाचा एक मानसिक आजार असतो. यामध्ये आजारी व्यक्ती स्वच्छतेविषयी अतिरिक्त संवेदनाशील असतात. कोरोनाच्या आजारात ज्या वेळा सर्वच लोकांना स्वच्छतेचे नियम अधिक जागरूकपणे पाळावे लागतात. त्यावेळी हा आजार असलेल्या लोकांचा त्रास काही कालवधीपुरता वाढू शकतो.
दुसरा महत्त्वाचा मानसिक परिणाम हा ज्या व्यक्तींना विलगीकरणाला सामोरे जावे लागते त्यांच्यावर होतो. विलगीकरण करण्याची सुविधा आपल्या देशात बहुतांश वेळा सरकारी इस्पितळात असते. या इस्पितळांमधील बाथरूम, संडासपासून ते पिण्याचे पाणी, स्वच्छता या गोष्टी खूप वेळा अत्यंत दुर्लक्षित स्थितीत असतात. केवळ संशयावरून विलगीकरण केलेल्या व्यक्तीला, आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे का नाही, याविषयीच्या अनिश्चितेने ग्रासलेले असते. अशा विलगीकरण कक्षात करमणुकीची साधने नसतात. अशा अडचणीच्या आणि अनिश्चित परिस्थितीत मानसिक ताण वाढणे, ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. काही वेळा हा तणाव टोकाचा वाढला तर व्यक्ती अशा विलगीकरण कक्षातून पळून जाणे किंवा स्वत:ला इजा करण्याची शक्यता असते. दिल्लीमधील एका विलगीकरण कक्षात कोरोनाच्या संशयित रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना विलगीकरण करताना मानसिक आरोग्याची जी काळजी घ्यावी लागते, त्याविषयी जागरूक होणे आवश्यक आहे.
केरळसारख्या राज्यात विलगीकरण कक्षातील लोकांशी संवाद साधण्याचे वेगळे प्रशिक्षण आरोग्य यंत्रणेला देण्यात येत आहे. विलगीकरणातील व्यक्तीशी नीट संवाद केला, योग्य माहिती दिली, मनोरंजनाची साधने उपलब्ध ठेवली, तर विलगीकरणाच्या कालखंडातील ताणतणाव हाताळणे संशयित अथवा बाधित व्यक्तीला सोपे जाऊ शकते.
हातावर पोट असलेल्या व्यक्तींना विलगीकरणाच्या कालखंडात आर्थिक समस्या भेडसावू लागतात. त्याचा मानसिकतेवर मोठा परिणाम होतो. त्याचा देखील विचार यंत्रणेने आणि समाजाने करायला हवा. विलगीकरण कक्षातून बाहेर आल्यावर देखील अनेक वेळा समाजाने घाबरून जाऊन अशा रुग्णांना बहिष्कृत करणे किंवा त्यांच्या कुटुंबाला बहिष्कृत करणे अशा गोष्टीदेखील आपल्या समाजात दिसून येऊ लागल्या आहेत. ज्या व्यक्तीला आधाराची गरज आहे, त्यांना अशा प्रकारे बहिष्कृत करणे हा कायद्याने तर गुन्हा आहेच; पण अमानवी कृती देखील आहे.
शाळा आणि कार्यालये बंद झाल्याने किंवा घरून काम करायचे असल्याने सुरुवातीला रोजचे काम नाही, याचा आनंद वाटू शकतो; पण एका मर्यादेनंतर ते देखील कंटाळवाणे होऊ लागते. या पार्श्वभूमीवर अचानक उपलब्ध झालेल्या या वेळेचा आपल्या आनंदाच्या गोष्टी करण्यासाठी, कुटुंबाच्या सोबत वेळ घालवण्यासाठी, काही नवीन छंद जोपासण्यासाठी करता येऊ शकतो. आपले मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
आरोग्य सुविधा पुरवणार्या व्यक्तींना या कालखंडात अधिक ताणाला सामोरे जायला लागते. रुग्णाच्या सान्निध्यात आल्याने आजार होण्याची शक्यतादेखील जास्त असते. याचा ताण त्यांच्या स्वत:वर आणि कुटुंबीयांच्या वर देखील पडतो. त्यामुळे त्यांना भावनिक आधार देणे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे देखील समाज म्हणून आपले कर्तव्य आहे.
प्लेग किवा देवीच्या साथीच्या तुलनेत आजचे जग हे कोरोनाच्या साथीला सामोरे जायला खूपच अधिक सक्षम आहे. कोरोनासारखी साथीच्या रोगांची संकटे मानवी मनाला अस्वस्थ करून घाबरवून टाकतात, हे जरी खरे असले तरी मानवी मनातील स्वत:पलिकडे बघण्याच्या भावनेला देखील ती जागृत करतात. सावित्रीबाई फुलेंना प्लेगच्या साथीमध्ये लोकांची सेवा करताना मृत्यू आला होता, ही फार जुनी गोष्ट नाही. आज देखील कोरोनाचा सामना करणार्या काही आरोग्य कर्म चार्यांचा मृत्यू झाल्याचे प्रसंग घडत आहेत.
मानसिक पातळीवर या साथीकडे संकट म्हणून बघायचे की धीराने आणि विचारपूर्वक सामोरे जायचे, हे प्रत्येकाने आपल्या स्वत:शी आणि समाज म्हणून आपण सर्वांनी ठरवण्याची ही वेळ आहे.