क्वांटम भुताची भेट

चेतन कोटबागे -

निकी आणि चिनचू ही दोघं भावंडं बेळगुंद नावाच्या छोट्याशा गावात रहायची. निकी नववीत शिकणारा तर चिनचू महाविद्यालयात शास्त्र शिकणारा होता.  निकीच्या शाळेत त्याला लहानपणापासून वाचनाची गोडी लावणारे शिक्षक लाभले आणि त्याची वाचण्याची गोडी वाढतच गेली. त्याचं केवळ वाचणं अफाट नव्हतं तर वाचलेल्याचं अचूक आकलनही. एवढ्या वाचनामुळे निकी कुठल्याही विषयावर अचूक बोलायचा आणि आपलं मत मांडायचा. पण त्यामुळे चिनचू बरोबर तिचे काही वेळा गमतीदार संवाद झाडायचे तर काही वेळा चक भांडण व्हायचं. खूपदा चिनचू निकीच्या ज्ञानामुळे चितपट व्हायचा. मग चिनचूचा पारा चढायचा. अशावेळी निकीला खोडी काढायची उबळ आली तर तो चिनचूला अजून चिडवायचा आणि मग काय, दे मार भांडण! दोघांची कुस्तीच जुंपायची.

पण मग तिथं गोदाका असली म्हणजे मग ती निकीची बाजू घेऊन भांडण सोडवायची. गोदाका निकीच्या जन्माच्या आधीपासून निकीच्या घरी काम करायची. निकी लहान असताना बरेचदा तिची आई तिला गोदाकाकडे सोडून काही कामानिमित्त बाहेर जाऊन यायची. त्यामुळे लहानपणापासून निकीचं आणि गोदाकाचं चांगलं गूळपीठ जमायचं. त्यांच्या मैत्रीला जागून गोदाका निकीची नेहमी भांडणातून सुटका करायची. पण याची परतफेड म्हणून की काय, पण निकी घरात कोणी गोदाक्काविरुद्ध काही बोललं तर लगेचच लढायला उठायचा.

एका शनिवारी संध्याकाळी निकी बाहेरच्या खोलीत चित्रं काढत बसला होता. दिवाळी जवळ आल्यामुळे वर्गात मास्तरांनी दिवाळीचं चित्र काढून आणायला सांगितलं होतं. दुपारपासून प्रयत्न करूनही ते चित्र अजून काही पूर्ण झालं नव्हतं. खोडून खोडून चित्राचा कागद आणि निकी दोघंही रडकुंडीला आले होते. चित्रातल्या आकाशकंदिलाची शेपटी नीट करावी म्हणून निकीने खोडरबर उचलायला गेला आणि तो गोंधळला. खोडरबर जागेवर नव्हते. निक्कीने मांड्या वर करून हात फिरवला, बाजूचे कागद उचलून पाहिले, मग शेवटी उठून पलंगाखाली शोधाशोध केली पण नाहीच; त्याला खोडरबर मिळालं नाही.

शेवटी तो दमून पलंगावर आडवा पडला आणि छतावर लोंबणार्‍या कोळ्याच्या जाळ्याचं निरीक्षण करू लागला. किटू मांजरीने जमिनीवरून निकीच्या छातीवर उडी मारली आणि त्याच्या छातीवर येऊन बसली. एवढ्यात बाहेर जावं म्हणून चिनचू आला. निकी त्याला म्हणाला  “अरे दादा, ही काल तिच्या बास्केटमधून बाहेर कशी पडली? त्याचं झाकण तर नीट लावलं होतं!” चिनचूने क्षणभर विचार केला आणि म्हणाला “अरे त्यात काय? ती वांटम टनेलिंगने बाहेर पडली.” “वांटम टनेलिंग?” निकीने विचारलं. “अरे म्हणजे समजा इलेक्ट्रॉनला एका भिंतीतून, अर्थात त्याच्या मापाच्या, जायचं आहे पण त्याच्याकडे तेवढी ऊर्जा नाही तर तो इलेक्ट्रॉन त्या भिंतीतून आरपार जाऊ शकतो, म्हणजे तो इलेक्ट्रॉन भिंतीकडे सापडण्याची शक्यता असते. आता किटूने पण तसंच केलेलं असणार. तिला त्या बास्केटमधून तर बाहेर पडत येत नाही. पण बाहेर तर पडायचं आहे. मग तिने क्वान्टम टनेलिंगचा मार्ग पत्करला, मग ती इलेक्ट्रॉनसारखी त्या बास्केटच्या भिंतीतून आरपार जाऊन बाहेर पडली.” निकी गादीवर पडल्या पडल्या अर्धवट वळून म्हणाला, “पण इलेक्ट्रॉन असं कसं करू शकतो?” “कारण इलेक्ट्रॉन हा कधी तरंग  असतो तर कधी कण! त्या तरंग स्वरूपामुळे तो असं करू शकतो. किंबहुना, निसर्ग अणूच्या पातळीवर असाच आहे.”

“म्हणजे आपली किटू पण तरंग झाली, बाहेर पडली असं म्हणायचं का तुला?”

“हो!” चिनचू हसत म्हणाला.

निकीनं पडल्यापडल्या त्याला विचारलं, “दादा, माझं छोटंसं काम करशील का?” चिनचूच्या कपाळावर आठ्या चढल्या. “फार मोठं काम नाहीये!” आठ्या बघून निकी म्हणाला, “माझं खोडरबर हरवलं आहे. नवीन घेऊन येशील का?”

“शोधलंस का सगळीकडे?” आठ्यांची घडी न विस्कटता चिनचू म्हणाला. “अर्थातच!” निकी म्हणाला, आणि तेवढ्यात त्याला मित्राची, हणम्याची हाक ऐकू आली. तो झटकन उठून बाहेर गेला.

चिनचू बुटाची लेस बांधावी म्हणून खाली वाकला आणि त्याला भिंतीजवळच्या कोपर्‍यात पलंगाखाली खोडरबर दिसलं. तो बूट घालून बाहेर आला. निक्की हणम्याबरोबर बोलत उभा होता. चिनचूने निकीकडे पाहिलं आणि काही न बोलता तो निघून गेला. त्यानंतर चिनचू रोज एकदातरी पलंगाखाली वाकून तिथे खोडरबर आहे ना याची खात्री करून बघायचा. त्याचा दुसरा अर्थ असाही होता की गोदाकाचा झाडू त्या खोडरबरापर्यंत जात नव्हता.

पुढच्या शनिवारी दुपारी निकी आणि चिनचू बाहेरच्या खोलीत पलंगावर बसून बुद्धिबळ खेळत होते. निकीला एकदम खोडरबरबद्दल आठवलं. तो चिनचूला म्हणाला “दादा, माझं खोडरबर आणलंस का रे?” चिनचू गालातल्या गालात हसत म्हणाला. “तुला न्यूटनचा गतीचा नियम माहीत आहे का?” “कुठला रे? तीन आहेत!” निक्की उत्तरला. “तोच रे जो सांगतो की जोपर्यंत तुम्ही कुठल्याही गोष्टीवर बल लावत नाही तोपर्यंत तिची गतीची अवस्था बदलत नाही.”

“पण त्याचा खोडरबराशी काय संबंध?” निकी म्हणाला. “आहे ना. चांगलाच आहे. जोपर्यंत तू किंवा गोदाकाचा झाडू पलंगाखालच्या खोडरबरावर बल लावणार नाही, तोपर्यंत तो तिथेच असेल! किंबहुना, विश्वाच्या अंतापर्यंत!” गोदाक्काचं नाव ऐकून निक्की खवळला. दोन मिनिटं शांत बसून त्याने विचार करून पुढची चाल रचली आणि घास खाकरला. “विश्वाचा अंत राहू दे बाजूला! गोदाकाला विचारलंस का की वांटम विश्वात राहणं किती कठीण आहे ते?

चिनचू फिसकन हसून म्हणाला, “गोदाका आणि वांटम विश्व?”

“तुला माहीत आहे ना की वांटम विश्वात जगणं किती कठीण आहे ते.”

निकी पुढे बोलत राहिला, “तू मागच्या टेबलावरचा टॉर्च घेऊन बघतोस का की ते रबर तिथे आहे की नाही!”

“बघायला कशाला पाहिजे? ते तिथेच आहे याची मला खात्री आहे!” चिनचू म्हणाला. “अरे वेड्या, तेच तर मी तुला सांगतोय. तू जर वांटम विश्वात असताना शंभरवेळा खोडरबराकडे पाहिलंस तर तुला ते तिथेच प्रत्येक वेळेला दिसेल असं नाही. किंबहुना, तुला ते प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी दिसेल किंवा कधी कधी ते दिसणार पण नाही. मी पाहिलं तेव्हा मी वांटम विश्वात होतो आणि मला ते खूप प्रयत्न करूनही दिसलं नाही. म्हणूनच मी तुला नवीन खोडरबर आणायला सांगितलं.”

चिनचूने हत्ती हलवण्यासाठी उचलला. पण त्याने तो पटावर न ठेवता निकीला फेकून मारला. त्याने झटकन बाजूला होत तो चुकवला.

“बाबा रे! डोळा गेला असता ना माझा!” असं म्हणत तो उठून गेला.

दिवाळीनंतर हळूहळू एप्रिल उजाडला. दहा दिवसांवर वार्षिक परीक्षा आली. हणम्याच्या निकीकडे चकरा वाढायला लागल्या होत्या. निकीकडे येता जाता रस्त्यावर एकाकी कौलारू बंगला होता. हणम्याच्या लहानपणापासून तो त्या बंगल्यात राहणार्‍या भुताच्या गोष्टी  ऐकत आला होता. हणम्या जसा मोठा होत गेला तशा त्या गोष्टी थोड्या मागे पडल्या. त्या बंगल्याच्या मागच्या आवारातल्या आमराईतल्या कैर्‍या दरवर्षी न चुकता खाणे हा मग त्याचा आवडता उद्योग बनला. अर्थात, यात निकीचा पण सहभाग होता.

पण गेली दोन वर्षं कैर्‍यांची चव कडवट झाली होती. दोन वर्षांपूर्वी एक कुजकट म्हातारा त्या बंगल्यात येऊन राहिला होता. तो आमराईजवळ कोणाला फिरकूच देत नसे. तिथे त्याने पहार्‍याला दोन गडी कायम ठेवले होते. आमराईत कोणी पोरगा सापडला की ते गडी पकडून म्हातार्‍याच्या हवाली करत. तो म्हातारा त्या पोराला एका खोलीत कोंडून ठेवत असे. नंतर ते गडी त्या पोराच्या आई-बापाला घेऊन हजर होत. मग तो म्हातारा आई, बाप आणि पोरगा या सगळ्यांची लाज काढून त्या पोराला सोडून देत असे.

हणम्या आणि निकीच्या वर्गातल्या काही मुलांची अशी लाज गेलेल्या गोष्टी ऐकून ते दोघं गप्प राहिले होते. पण या वर्षी आंब्याला कधी नव्हता एवढा मोहोर आला होता. हणम्याचं जाता-येता रोज टपोर्‍या कैर्‍यांकडे न चुकता लक्ष जायचं.     

एके दिवशी दुपारी हणम्याला राहवलं नाही. त्यानं निकीला गळ घेतली. निकीने सुरुवातीला नकार दिला. पण हणम्या पाठ सोडायला तयार नव्हता. त्याने कैर्‍यांची रसाळ वर्णने करून शेवटी निकीचा नकार मोडून काढला. ते दोघं सायकलवर डबलसीट बसून बंगल्याजवळ आले. बंगल्यापासून थोडी दूर सायकल लावून दोघं चालत चालत निघाले.

बंगल्याजवळ आल्यावर हणम्याने निकीला थांबण्याची खूण केली आणि तो कुंपणाच्या भिंतीवरून चढून हळूच आत उतरला. त्याने गड्यांचा कानोसा घेतला. ते दोघं बंगल्याचा दुसर्‍या टोकाला विहिरीजवळ तंबाखू चोळत गप्पा मारत बसले होते. हणम्या भिंतीजवळ परत आला आणि त्याने हळूच शीळ घातली. निकी भिंतीवरून चढून आत आला. ते मांजराच्या पावलांनी झपझप मागे आमराईत गेले.

हणम्या चपळाईने झाडावर चढला आणि हाताला येणार्‍या कैर्‍या त्याने तोडून खाली उभ्या असलेल्या निकीकडे टाकायला सुरुवात केली. हळूहळू अंधार पडायला लागला. एक झाड मग दुसरं असं करून दोन मोठ्या सॅक मध्ये मावतील इतक्या कैर्‍या हणम्याने तोडल्या. हणम्या झाडावरून उतरला. त्याला निकीने हातात सॅक दिली. आता जवळपास पूर्ण अंधार झाला होता. निकी हणम्याला हळू आवाजात म्हणाला, “ते गडी कुठं असतील रे?”

“कुठं काय हितंच हायेत की!” कुणीतरी अंधारात एकदम बोललं आणि निकीच्या डोळ्यांवर भपकन बॅटरीचा प्रकाशझोत टाकला. “हणम्या पळ!” असं ओरडून निकी पळाला आणि धाडकन कोणाला तरी धडकून जमिनीवर आडवा झाला.

निकीला कॉलरला पकडून  एका गड्याने उठवलं. त्याने समोर पाहिलं तर दुसरा गडी हणम्याची कॉलर धरून उभा. दोघांना त्यांनी जवळजवळ खेचतच बंगल्याच्या मागच्या दारात नेलं. “अण्णा!” म्हणून एकाने हाक मारली. दार उघडून म्हातारा बाहेर आला. “ही दोघं आमराईत सापडली!” म्हातार्‍याने दोघांकडे एकदा रोखून पाहिलं आणि तो आत वळला. निकी आणि हणम्याला गड्यांनी पकडून आत ढकललं. आत ढकलताच हणम्या आणि निकी जोरात ओरडायला लागले, “आम्हाला सोडा ना आता! आम्ही परत असं नाही करणार!” पण गड्यांनी त्याना एका लांबलचक पॅसेजच्या टोकाशी म्हातार्‍यामागे ओढत नेलं. म्हातार्‍याने खोलीचं दार उघडलं. गड्यांनी दोघांना आत ढकललं. “यांचे आई-बाप कुठं राहतात ते विचारून घ्या आणि बोलावून आणा त्यांना!” निकीने म्हातार्‍याचं बोलणं ऐकलं. आता आपण पुरते अडकलो याची जाणीव दोघांनाही झाली. त्यांनी मुकाट्याने स्वतःचा पत्ता सांगितला. खोलीचं दार ओढून बाहेरून कडी घालून ते गडी निघून गेले. आता आपली पण हजामत होणार या  विचाराने निकी हैराण झाला.

तासाभराने हणम्या आणि निकीच्या आयांना घेऊन ते गडी परतले. म्हातार्‍याने बंगल्याचे दार उघडताच त्यांच्यावर बरसायला सुरुवात केली. “तुमच्या पोरांना तुम्ही चोर्‍या करा हेच शिकवलं का?” त्या दोघी मुकाट्याने म्हातार्‍याचं चर्‍हाट ऐकत खोलीच्या दाराशी आल्या. म्हातार्‍याने दार उघडून दिवा लावला आणि पाहिलं तर खोलीत कोणीच नव्हतं. म्हातार्‍याने आ वासला. “कुठं गेली पोरं?” निकीच्या आईने विचारलं. यावर कुणी काहीच बोललं नाही.

दोघी आया गोंधळलेल्या अवस्थेत बंगल्याच्या दाराशी आल्या. तेवढ्यात चिनचू तिथून जात होता  आणि त्याचं आईकडे लक्ष गेलं. तो आईला म्हणाला “तू इथं काय करतेस?” आई म्हणाली, “अरे यांचं म्हणणं की, निकी आणि हणम्या आमराईत चोरी करत होते. त्यांनी दोघांना पकडून एका खोलीत डांबून ठेवलं होत. पण आता तिथे दोघंही नाहीत!” हे ऐकून चिनचू उडालाच आणि म्हणाला, “अगं, ते दोघं तर घरी अभ्यास करत आहेत. मी आताच त्यांना बघून बाहेर पडलो!”

दुसर्‍या दिवशी शाळेत निकी आणि हणम्याच्या गायब होण्याची गोष्ट वर्गात वार्‍यासारखी पसरली. सुट्टीत सगळ्यांनी त्यांना गाठून विचारलं की, नेमकं काय झालं? हणम्याने निकीकडे सूचक पाहिलं. घसा खाकरून निकी सांगू लागला.

आम्हाला अंधार्‍या खोलीत बंद करून म्हातारा आणि गडी निघून गेले. मी मान खाली घालून एका लाकडी पेटीवर बसलो आणि माझ्यासमोर हणम्या जमिनीवर बसला. दोन मिनिटं झाली ना झाली तोच मी बसलेल्या पेटीतून निळसर रंगाचा लांबलचक पट्टा बाहेर पडला. हळूहळू तो पट्टा माणसाच्या आकारात बदलत गेला. त्याच्या चेहर्‍यावर डोळ्यांच्या ठिकाणी दोन हिरवे दिवे पेटल्यासारखे दिसत होते. तो पट्टा आता भुतासारखा जमिनीवर तरंगत होता. तो पट्टा म्हणाला “नमस्कार मित्रांनो!” मी एकदम घाबरून उडी  मारली आणि हणम्याला चिकटलो. हणम्या चाचरत म्हणाला,

“तू कोण?”

“मी? मी वांटम भूत आहे.”

“वांटम भूत?” आम्ही दोघंही जोरात किंचाळलो.

“ओरडू नका. तो म्हातारा येईल परत. मी तुम्हाला मदत करायला आलो आहे.”

“मदत? आम्हाला? का?” मी चाचरत म्हणालो.

त्यावर ते भूत म्हणालं, “मला त्या म्हातार्‍याचा राग येतो. मला घाबरतच नाही. उलट मीच त्याला घाबरून लपून बसतो. म्हातारा येण्याआधी तुम्ही पोरं माझ्या गोष्टी ऐकून कसे थरथर कापायचा. आणि आता! माझ्या गोष्टी सुद्धा कोणी ऐकत नाही. म्हातार्‍याने माझी सगळी लाज घालवली.” असं म्हणून ते भूत उदास चेहरा करून पेटीवर बसलं.

“पण तुझं वांटम भूत हे नाव कसं पडलं?” हणम्यानं विचारलं.

“मी भिंतीतून आरपार जाऊ शकतो आणि तुम्हाला पण माझ्याबरोबर नऊ शकतो. ते वांटम मेकॅनिक्सनुसार इलेक्ट्रॉन असं करतो म्हणे. तो पण असाच भिंतीतून आरपार जातो. त्याला ‘टनेलिंग’ म्हणतात. म्हणून माझं भूत हे नाव बदलून मीच वांटम भूत नाव ठेवलं.” भूत जरा खुशीत येऊन म्हणालं.

“तर मुलांनो! चला उठा! माझे हात धरा. मी तुम्हाला बंगल्याच्या बाहेर पोहचवतो.” असं म्हणून ते भूत उठलं आणि त्याने त्याचे निळे हात पसरले. माझा माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता. मी हणम्याला ढोसलं. आम्ही दोघांनी हात लांब करून त्याच्या थंड निळ्या हातांना हातात धरलं. ते भूत म्हणालं, “आता तुम्ही डोळे बंद करा आणि मी जोपर्यंत सांगत नाही तो पर्यंत उघडू नका.” आम्ही डोळे बंद केले आणि ते भूत जस आम्हाला ओढत नेत होतं तसं गेलो. काही क्षणानंतर आम्ही एका कापडाच्या तागातून चालले आहोत असं वाटायला लागलं. पण नंतर गार हवेचा झोत जाणवला, पण आम्ही डोळे उघडले नाही. मग आम्ही पुन्हा एकदा कापडातून गेलो. त्यातून बाहेर पडल्यावर भूत म्हणालं,

“आता डोळे उघडा.” आम्ही पाहिलं तर आम्ही सायकलपाशी उभे होतो. “पुढच्या वेळी मी असेल याची खात्री नसेल. मी आता दुसर्‍या गावाला जातोय. तेव्हा परत कैर्‍या चोरल्या तर मी मदतीला नसेन.” असं सांगून ते भूत निघून गेलं. आम्ही सायकलीवरून घर गाठलं.

हळूहळू वांटम भुताची गोष्ट पसरत चिनचूच्या कानावर गेली. त्याने एकदा संध्याकाळी घरात कोणी नसताना निकीला गाठले आणि त्याचे कान धरले. “वांटम भुताच्या गोष्टी कधीपासून सांगायला लागलास? खरं काय झालं ते सांग!” निकी कळवळून म्हणाला, “सांगतो! पण कान सोड.” चिनचूने त्याला सोडलं. त्याचा लाल झालेला कान चोळत निकी बोलू लागला “आम्हाला म्हातार्‍याच्या माणसांनी कैर्‍या चोरताना पकडलं आणि नंतर त्या म्हातार्‍याने आम्हाला खोलीत डांबून ठेवलं. आम्ही खोलीतून पळून जाता येईल का म्हणून वाट शोधायला लागलो. खोलीच्या खिडक्यांना तर गज होते. वरती छपराकडे पाहिलं तर कौलं दिसली. मग मी आणि हणम्याने मिळून कोपर्‍यातल्या लाकडी पेटीवर चढून दोन-चार कौलं काढली. मी मग हणम्याच्या खांद्यावर बसून छपरावर चढलो. हात देऊन हणम्याला मग वरती खेचलं. कौलं परत जागेवर लावली आणि उड्या टाकून सरळ घरी आलो.”

चेतन कोटबागे, बेळगावी

मो. ९१७२३ ४३०७२


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]