राहुल थोरात -
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली ३५ वर्षे समाजातील विविध प्रकारच्या अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत आहे. त्याचसोबत समाजासाठी विविध विषयांवर समाज प्रबोधन करण्याचे कार्य सुद्धा सातत्याने करीत असते. नववर्षाच्या निमित्ताने समाजात अनेक ठिकाणी पार्ट्या आयोजित करण्याचे प्रस्थ गेले काही वर्षे वाढत चालले आहे. या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दारू पिण्याची चुकीची प्रथा पडत चालली आहे. सरकारही महसूल वाढीच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या दिवशी दारूविक्रेत्यांना अनेक सवलती देत या प्रथेला प्रोत्साहनच देत आहे. ज्यामुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी जात आहे. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नववर्षानिमित्त ‘द दुधाचा, नाही दारू’चा ही व्यसनविरोधी मोहीम दरवर्षी राबवते. सदर कार्यक्रमात कार्यकर्ते असंख्य नागरिकांना दूध वाटप करत नववर्षाची सुरवात दारू पिऊन न करता दूध पिऊन करा व व्यसनापासून दूर राहा असा संदेश देत व्यसनविरोधी प्रबोधन करत असतात. या वर्षीही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखांनी राज्यभर ही मोहीम राबविली. या मोहिमेचे विविध ठिकाणचे वार्तांकन….
कोल्हापूर : व्यसनविरोधी जागर
साने गुरुजी वसाहत
सरत्या वर्षाला निरोप देताना धाब्यांवर होणारी गर्दी, फार्म हाऊसवर होणार्या पार्ट्या व व्यसनी पदार्थांचा वारेमाप वापर व अश्लील नृत्य याचा होणारा वापर ही भारतीय संस्कृतीला काळिमा फासणारी गोष्ट आहे, याकडे तरुणांचा कल वाढतो आहे, हे अत्यंत चिंताजनक बाब आहे. यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूरच्या वतीने शाळा-शाळांमधून व्यसन विरोधी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरला निरोप देणे व नव्या वर्षाचे स्वागत करणे यासाठी विद्यार्थ्यांनी हा क्षण कुटुंबीयांसमवेत साजरा करावा व व्यसनापासून सदैव दूर राहावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूरचे सदस्य अनिल चव्हाण यांनी आज केले. आपटेनगर परिसरातील संकल्प माध्यमिक विद्यालयात व्यसनविरोधी ‘जागर करू या’ या उपक्रमांतर्गत ते बोलत होते. या वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांनी “आम्ही जातिभेद, धर्मभेद, वर्ग भेद, अंधश्रद्धा, तसेच व्यसने यापासून दूर राहू, नव्या वर्षाचे स्वागत आम्ही कुटुंबीयांसमवेत एकत्रित करू; नव्या वर्षात नवे संकल्प करू”, अशी प्रतिज्ञा घेतली. या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबासमवेत गायन, वादन, संगीत, विविध स्पर्धा आयोजित करावी तसेच सामाजिक उपक्रम राबवावेत, सार्वजनिक स्वच्छता मोहीम, आरोग्याविषयी जनजागृती, वृक्षारोपण यासारखे उपक्रम राबवावेत असे आवाहन त्यांनी केले. आर. डी. पाटील यांनी स्वागत केले. अवधूत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सुषमा सुतार यांनी आभार मानले. या वेळी संभाजी पाटील, यशवंत रानगे उपस्थित होते.
कपिलतीर्थ
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर तर्फे ३१ डिसेंबर हा दरवर्षीप्रमाणे ‘द दारूचा नव्हे, तर द दुधाचा’ हा उपक्रम विविध ठिकाणी राबवला गेला. याच्यामध्ये ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ म्हणत दुधाविषयीचे फायदे तसेच चांगल्या-वाईट सवयी यांच्यावरती इंदिरा गांधी विद्यानिकेतन, कपिलतीर्थ भाजी मार्केट समोर, कोल्हापूर येथील सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना किरण गवळी, खगोल अभ्यासक आणि गीता हसूरकर यांनी मुलांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रबोधन केले. प्रतीकात्मक दारूच्या बाटलीला चप्पलने मारून ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ हा उपक्रम राबवला. तसेच गोकुळ दूध संघ, कोल्हापूर यांचेकडून मिळालेले दूध वाटप केले.
हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी इंदिरा गांधी विद्यालय शाळेच्या मुख्याध्यापिका मोहिते मॅडम आणि शाळेच्या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रमेश वडणगेकर आणि अनिल चव्हाण सर यांचे विशेष सहकार्य लाभले.

नागपूर :
व्यसनाला स्पर्श न करता आनंदी व सुखी संसार व्यतीत करा…
“चला व्यसनाला बदनाम करू या,” हा अनोखा सामाजिक जागृतीचा उपक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे दरवर्षी थर्टी फर्स्ट म्हणजे दि. ३१ डिसेंबरला “द दारुचा नव्हे तर द दुधाचा,” “दारू पिऊ नका, दारूऐवजी दूध प्या,” “नो व्हिस्की नो बिअर हॅपी न्यू इअर” अशा घोषणा देत व दुधाचे वाटप करत हा कार्यक्रम संपन्न होत असतो. या वर्षी हा कार्यक्रम भीम चौक, नारा रोड, जरीपटका, नागपूर येथे सायंकाळी ६.३० वा. आयोजित केला होता. कार्यक्रमात दुधाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे. या प्रसंगी दारू व अन्य व्यसनांचे परिणाम या विषयावर बोलताना ते म्हणाले की, दारू व अन्य व्यसनाचे परिणाम इतके भयानक असतात की घरसंसारी दारूमुळे कलह, अशांती, पैशाची चणचण, कौटुंबिक हिंसा व परिणामी कुटुंबाच्या कुटुंबे बरबाद होतात. समाजातील दारुड्या व्यक्तीचा मानसन्मान व प्रतिष्ठा लयास जाते. दारू व व्यसनाचे परिणाम किती वाईट, शरीराला घातक व जीवघेणी असतात असे ते पोटतिडकीने समजावून सांगत होते. व्यसनाला स्पर्श न करता आनंदी व सुखी संसार व्यतीत करा असा सल्लाही त्यांनी दिला. अशाच आशयाचे संबोधन अतिथी मालाताई मंडपे, नरेश महाजन व देवानंद बडगे यांनीसुद्धा आपापल्या भाषणातून सांगितले. गायक अजय रहाटे, विवेक निमगडे व देवानंद बडगे यांनी गीते सादर करून वातावरण निर्मिती केली. कार्यक्रमाला व्यसनाच्या परिणामांना सामोरे गेलेल्या भुक्त-भोगी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रा. पुष्पा घोडके यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला अरविंद तायडे, माजी कामगार उपायुक्त विजयकांत पानबुडे, अल्का लाडे, रंजना ठवरे, रमेश ढवळे, चंदा मोटघरे, अॅड. विद्या खोब्रागडे, अशोक राऊत, प्रा. सखाराम मंडपे, चित्तरंजन चौरे हे कार्यकर्ते उपस्थित होते, तर तारा बनसोड, राजन टेंभूर्णे, मालन वालदे, लीलाबाई लोखंडे, शालिनी पानतावणे, प्रभाबाई बनसोड, ताराबाई वाकडे, सुनीता ढवळे, लकी बनसोड व राजेश सावदेकर, सर्व अंगुलिमाल विहार परिसरात राहणारे अनेक लोक उपस्थित होते.
पेण
रायगड जिल्ह्यात पेण आणि खारपाडा गावात “द, दुधाचा, द नाही दारूचा” उपक्रम संपन्न
३१ डिसेंबर रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पेण शाखेने दरवर्षीप्रमाणे, “द दुधाचा, द नाही दारूचा अर्थात चला व्यसनाला बदनाम करू या” या उपक्रमाचे आयोजन केले होते. ३१ डिसेंबरपासून नवतरुण व्यसन करायला सुरुवात करतो आणि मग पुढे व्यसनाधीन होतो, म्हणून पेण शाखा ३१ डिसेंबर हा दिवस व्यसनमुक्ती दिवस साजरा करते. त्या दिवशी नागरिकांना आवाहन केलं जात की, “आजपासून दारू नको, दूध प्या.”
पहिला कार्यक्रम पेण नगरपालिकेसमोर सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाच्या सक्रिय कार्यकर्त्या सावनी गोडबोले मॅडम यांच्या हस्ते नागरिकांना मसाले दूध वाटपाने सुरुवात केली. म.अंनिस रायगड जिल्हा कार्याध्यक्ष संदेश गायकवाड यांनी, “ज्यांना दारू सोडायची आहे, त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आणि व्यसनापासून दूर राहून कुटूंब सुखी करा”, असं आवाहन केलं. सदर कार्यक्रमात अरुण म्हात्रे यांनी स्वत: दारू पिणं कसं सोडले या बद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाला प्राचार्य सतीश पोरे सर, एन. जे. पाटील सर, पेण शाखेचे अध्यक्ष नितीन निकम सर, डॉ. प्राध्यापक शेख सर, सूर्यकांत पाटील, आदेश पाटील, अॅड. संकल्प गायकवाड, गीता भानुशाली, राजरत्न लोखंडे सर आणि रामकांत घरत उपस्थित होते.
खारपाडा
दुसरा कार्यक्रम संध्याकाळी ६ ते ९ खारपाडा गावात घेण्यात आला. सदर कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी पेण शाखेचे कार्यकर्ते रमाकांत घरत आणि खारपाडा टीमने पार पाडली. या कार्यक्रमात दूध वाटपाबरोबर प्रतिष्ठित नागरिकांचं सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलं, तसेच डॉ. अरिफ यांचं व्यसनमुक्तीवर व्याख्यान ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमात पेण शाखेचे अध्यक्ष नितीन निकम सर, प्राचार्य पोरे सर, जगदीश डंगर, एन. जे. पाटील सर, राजरत्न लोखंडे, आदेश पाटील उपस्थित होते. तसेच खारपाड्यातून या वेळी युवा कार्यकर्ते महेंद्रदादा घरत, संतोष ठाकूर, मालती संतोष ठाकूर, भरत घरत, रणजीत पाटील, चंद्रकांत घरत, मनोज पाटील, महेंद्र मोरे, अॅड. जयेश देसले, महादेव घरत, हिरामण घरत, दर्शन घरत, माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सदस्य अशोक पाटील, हितेश घरत, गौरव घरत, आदित्य घरत, कैलास रुठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

रोहा
मित्रांनो काहीही झालं तरी दारू पिऊ नका….
मित्र म्हणतील काही नाही रे….
काही नाही होत….. चल..
तुम्ही फक्त नाही म्हणजे नाही म्हणा…
कारण, हेच मित्र जेव्हा तुम्ही बेवडे होता, तुमचं घरदार उद्ध्वस्त होतं, तुम्ही रस्त्यात पडलेले असता तेव्हा तुमच्या जवळून जातील, पण तुम्हाला ओळख दाखवणार नाहीत. तुमचा तिरस्कार करतील…
तेव्हा आज ३१ डिसेंबर सावध रहा, दारू पासून लांब रहा… ३१ डिसेंबर आपल्या परिवारासोबत celebrate करा…
NO WHISKEY, NO BEER…
HAPPY NEW YEAR…
महा अंनिस शाखा रोहा आणि नागोठणे यांचे वतीने मसाला दुधाचे वाटप करून जनतेला आवाहन केले गेले की, आपल्या घरादाराचा विनाश करणार्या दारूपासून दूर रहा…
सोलापूर
‘द दुधाचा, नाही द दारूचा’ हा उपक्रम अत्यंत समाजोपयोगी आहे. सोलापुरात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शिवाजीराव देशमुख यांचे उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन.
दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. ते टाळण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने आयोजित केलेला ‘द दुधाचा नाही दारूचा’ हा उपक्रम अत्यंत समाजोपयोगी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शिवाजीराव देशमुख यांनी ‘द दुधाचा, नाही दारूचा’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले. सदर कार्यक्रमास प्रायोजक पार्क चौकातील मिष्टी मिठाईचे मालक श्री. हेमल शहा हे लाभले होते. या वेळी कार्याध्यक्ष डॉ. अस्मिता बालगावकर, सचिव लालनाथ चव्हाण, मधुरा सलवारू, निशा भोसले, उषा शहा, शकुंतला सूर्यवंशी, व्ही. डी. गायकवाड, प्रा. डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर, ब्रह्मानंद धडके, यशवंत फडतरे, गोरख गडसिंग, कुंडलिक मोरे, छाया मोरे, निनाद शहा, उषा धडके, सुजीत हवळे, शीला हवळे, मिलिंद गायकवाड, अरुण गायकवाड, शकुंतला सूर्यवंशी, गणेश पवार, आशा पवार, सुरेखा गडसिंग, निलेश गुरव, श्रीरंग बनसोडे, विजय जाधव, लता ढेरे, डी. वाय. पांडगळे इ. कार्यकर्ते उपस्थित होते. मिष्टी मिठाईचे छाया शहा, हेमल शहा, दर्पण शहा, खिल्ति शहा, आशी शहा हेही उपस्थित होते.
‘द दुधाचा, नाही दारूचा, चला व्यसनाला, बदनाम करू या,’ ‘नो वाईन नो बिअर, हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर,’ ‘व्यसनाला ठेवू दूर, निरोगी आयुष्य जगू भरपूर,’ ‘निर्धार करू या, व्यसनमुक्तीचा, निषेध करू या, व्यसनाच्या प्रतिष्ठेचा,’ ‘संकल्प करू या, व्यसनाला हद्दपार करू या,’ ‘हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर, नाही खाणार गुटखा, नाही पिणार बिअर’ इत्यादी घोषणा देत पार्क चौक परिसरात नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.
बार्शी
बार्शी शाखेतर्फे ३१ डिसेंबर रोजी ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ उपक्रमांतर्गत दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नेचर डिलाइट डेअरी, मु. पो. कळस, ता. इंदापूर, जि. पुणे यांच्या वतीने एकूण हजार सुगंधी दुधाचे पॅकेट्स वाटण्यात आले. सदर दूध वाटप कार्यक्रम श्री. शिवाजी महाविद्यालय बार्शी व अंनिस शाखा बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
सातारा
ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ‘एक दोन तीन चार, व्यसनाला करू हद्दपार’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांकडून दूध वाटप…
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि परिवर्तन संस्था, सातारा यांच्या वतीने ‘दारू नको दूध प्या’ हा उपक्रम ‘हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर, खाणार नाही गुटखा पिणार नाही बियर,’ ‘नो चीअर नो बियर, ओन्ली हॅपी न्यू इयर,’ ‘एक दोन तीन चार व्यसनाला करू हद्दपार’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी दूध वाटप करत राजवाडा गोलबाग येथे उपक्रम साजरा करण्यात आला. याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमामध्ये ज्येेष्ठ कार्यकर्ते कुमार मंडपे, प्रमोदिनी मंडपे, डॉ. हमीद दाभोलकर, उदय चव्हाण, डॉ. दीपक माने, प्रकाश खटावकर, संतोष भिलारकर, विष्णू भिसे, महेश कुराडे, ज्ञानेश्वर मोरे, गणेश साळुंखे, भगवान रणदिवे, सिद्धांत वरुटे इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फलटण
‘चला व्यसनाला बदनाम करू, दारू नको दूध प्या, आणि नवीन वर्षाचे स्वागत करू’ हा उपक्रम फलटण महा. अंनिस शाखेने ३१ डिसेंबर २०२५ रोजी महात्मा फुले चौक, फलटण येथे दूध वाटप करून राबविला. शाखेचे आरती कांबळे, सचिव मोहिनी भोंगळे, शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप शेंडे सर, आनंद देशमुख सर, देशमुख मॅडम, मंदाकिनी गायकवाड, प्रसाद शिंगाडे, काकडे सर, सचिन शिंदे, शाखेचे कार्याध्यक्ष अयाज अतार सर, भुजबळ सर, वसिम शेख सर, निवडून आलेले नगरसेवक आणि अंनिसचे विकास काकडे सर, मदने मॅडम, शाह मॅडम, पंकज पवार असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
रहिमतपूर
३१ डिसेंबर २०२५ ‘द दारूचा नाही दुधाचा’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा, रहिमतपूरतर्फे गांधी चौक येथे दूध वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन API सचिन कांडगे व डॉ. वसंत कणसे तसेच रहिमतपूर नगरीचे आदर्श पोलीस पाटील दीपक नाईक यांनी केले.
API सचिन कांडगे यांनी तरुण पिढीने व्यसनाधीनतेकडे न वळता चांगला प्रयत्न करून स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्यावे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही सर्व महाराष्ट्रात कार्यरत आहे, ही माणसे आपली आहेत आणि वेळोवेळी यांची मदत आपल्याला होत असते असे सांगितले. मी इथे तुमच्या नगरीत असेन किंवा नसेन, परंतु आपण हा उपक्रम अजून मोठ्या प्रमाणात करू असेही त्यांनी सांगितले. दारूमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम, मग तुम्ही ती कमी जास्त प्रमाणात घेतली तरी होतच असतात. त्यामुळे तरुण पिढी व सर्वच लोकांनी व्यसनाच्या नादी न लागता चांगल्या सवयी, चांगले विचार अंगीकारून देशाला, गावाला व परिवाराला हातभार लावावा, असे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय डॉ. वसंत कणसे हे होते. दरवर्षीप्रमाणे रहिमतपूरचे आदर्श पोलीस पाटील दीपक नाईक साहेब यांनी हा उपक्रम घडवून आणण्यासाठी खारीचा वाटा उचलत मोलाचे सहकार्य केले. प्राचार्य राजू सय्यद सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तसेच म. अंनिस हा उपक्रम घेण्यामागचा हेतू मोहसीन शेख यांनी स्पष्ट करत उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या वेळी मधुकर माने, सीताराम माने, शिवाजी शिंदे, प्रवीण माने, शंकर कणसे, विजय जाधव, विपुल साळुंखे, भगवान माने, अल्कोहोलिक अॅनॉनिम्स संघटनेचे विशाल गायकवाड व इतर पदाधिकारी तसेच रहिमतपूर नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक, नगरीतील व्यापारी वर्ग, मेडिकल विभाग, उद्योजक वर्ग, तरुण पिढी आणि रहिमतपूर पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी हजर होते.
कराड
३१ डिसेंबर म्हणजेच सरत्या वर्षाचा शेवट आणि नववर्षाची सुरुवात. यानिमित्ताने देशभरच नव्हे, तर जगभर आनंद आणि उत्साहाच्या निमित्ताने दारूचा महापूर फैलावतो. एक गोष्ट काढून घेतली, तर त्याला दुसरी गोष्ट द्यावी लागते हा निसर्गाचा नियम आहे आणि व्यतीच्या मानसिकतेची पण तीच गरज आहे, म्हणूनच अंनिस ही सातत्याने “दारू नको पण दूध प्या” हा कृतिशील संदेश गेली अनेक वर्षे देत आलेली आहे. या उपक्रमाचा भाग म्हणूनच अंनिसच्या कराड शाखेने या वर्षी हा एक चांगला उपक्रम राबवला. कराड शहरातील प्रतिष्ठित नागरिक श्री. निशांत ढेकळे आणि श्री. अजय किरकिरे यांचे हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कराड शहराचे वैभव असलेल्या आणि स्वच्छतेमध्ये पारितोषिक मिळालेल्या छत्रपती शिवाजी उद्यानाच्या जवळ अंनिसच्या वतीने मसाला दुधाचा स्टॉल लावण्यात आला आणि जवळपास ३०० हून अधिक सर्व लहान थोर मंडळींना मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. अंनिसने आपल्या सोबतच इतर समविचारी संघटनांना जोडून घेतले असल्यामुळे हा उपक्रम पूर्णपणे यशस्वी झाला.
माननीय अशोक दादा पाटील, बाळासाहेब दीक्षित, रावसाहेब मोहनराव डोळ, भानुदास वास्के तसेच विजय दिवस समारोहाचे सर्वस्वी संभाजीराव मोहिते सर, ‘एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब’चे वृक्षमित्र चंदूकाका जाधव, चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे सर्वस्वी अशोकराव पवार आणि अंनिसचे बाळ देवधर, सीताराम चाळके, चंद्रशेखर नकाते, मधुकर शिंदे, अर्जुगडे सर, प्रफुल्ल ठाकूर, सैफुल्ला मोमीन, जाधव सर, रमेश शहा, प्रताप चव्हाण, कुंभार सर, नाना जानुगडे इत्यादी कार्यकर्त्यांनी हा उपक्रम संपूर्णपणे यशस्वी केला.
गोंदिया
उपस्थितांनी घेतली व्यसनमुतीची शपथ
‘चला व्यसनाला बदनाम करू या’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम MG paramedical व अंनिसच्या माध्यमातून राबविण्यात आला. या प्रसंगी गोंदियाचे ठाणेदार श्री. किशोर पर्वते सर, प्रभाग ८ चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. सुनील भरणे, संविधान मैत्री संघाचे श्री. अतुल सातदेवे, श्री. चंद्रिकापुरे हे मंचावर उपस्थित होते. पोलीस निरीक्षकांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली व जागोजागी दुधाचे वाटप केले गेले, तसेच सुनील भरणे यांनी व्यसनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चप्पल मारून दहन करण्यात आले. सरते शेवटी सर्वांना व्यसनमुतीची शपथ देऊन कार्यक्रम संपन्न झाला.
पुणे
सरत्या वर्षाला निरोप द्यायचा म्हणून दारू प्यायची हे उचित नसून त्या ऐवजी गरम दूध प्या असे आवाहन करत ‘द दारूचा नाही तर द दुधाचा’ उपक्रम संपन्न!
अलीकडच्या काळात व्यसन हे प्रतिष्ठितपणाचे एक लक्षण मानले जाऊ लागले आहे. गरीब, श्रीमंत, शिक्षित, अशिक्षित, साधारण नोकरी – व्यवसाय करणारे ते उच्चपदस्थ तसेच सामाजिक कला, राजकीय इत्यादी सर्वच क्षेत्रातील व्यक्ती आणि अगदी विद्यार्थी वर्गही आता व्यसनाकडे वळू लागला आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. व्यसनग्रस्त व्यक्तीमुळे कुटुंबाची तर वाताहत होतेच; पण समाजालाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. सरत्या वर्षाला निरोप द्यायचा म्हणजे दारू पिण्याचा कार्यक्रम व्हायला पाहिजे, अशी मानसिकता अलीकडे वाढीस लागली असून या मनोधारणेतून दरवर्षी ३१ डिसेंबरला दारूच्या पार्ट्या होतात. सामाजिक हित लक्षात घेऊन व्यसनाधीनता कमी व्हावी, या हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून वर्षाखेरीस ३१ डिसेंबरला संध्याकाळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘द दारूचा नाही तर द दुधाचा’ हा उपक्रम राबवत असते. या वेळी रस्त्याने जाणार्या-येणार्या लोकांना सरत्या वर्षाला निरोप द्यायचा म्हणून दारू प्यायची हे उचित नसून त्याऐवजी गरम दूध प्या, असे आवाहन करून गरम दूध देण्यात येते.
पुणे शाखेकडून या वर्षी हा उपक्रम पुण्यात ताराचंद हॉस्पिटलजवळ रास्ता पेठ येथे आणि हडपसरला रामटेकडी येथील मिलिंद बुद्धविहार या दोन ठिकाणी राबविण्यात आला.
उपक्रमाच्या दोन्ही ठिकाणी बॅनरवर लिहिलेले ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ हे वाक्य रस्त्याने जाणार्या-येणार्या लोकांना आकर्षित करीत होते. ‘नो व्हिस्की नो बियर, हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर’ यांसारख्या घोषणांनी रस्त्याने जाणार्या-येणार्या लोकांचे लक्ष वेधले जात होते. रास्ता पेठ व हडपसर या दोन ठिकाणी झालेल्या उपक्रमात मिळून सुमारे ७० लिटर दुधाचे वाटप करण्यात आले.
रास्ता पेठ येथील उपक्रमासाठी वसंत कदम, अनुराधा काळे, आनंद कांबळे, बाळकृष्ण लोंढे, नागेश कवडे, शेख, सुरेश सपकाळ, प्रकाश सोनवणे आणि हेमा क्षीरसागर इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तर हडपसर येथील कार्यक्रमासाठी दत्तात्रय जाधव, इंद्रजीत देसाई, संजय मालती कमलाकर – (पती-पत्नी) डॉ. शहाणे, सत्यनारायण कांबळे, प्रकाश कदम, साधना शिंदे, भगवान वाघ इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या वेळी भगवान वाघ यांनी समितीला १०० रु. देणगी दिली.
पिंपरी चिंचवड
दारूच्या बाटलीला जोडे मारो आंदोलन
महाराष्ट्र अंनिसमार्फत ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या मोहिमेंतर्गत ‘दारू नको दूध प्या!’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये नागरिकांना दारूचे दुष्परिणाम सांगून, दारू पिऊ नका. त्याऐवजी शरीराला हितकारक दूध पिण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच उपस्थित नागरिकांना दुधाचे मोफत वाटप देखील करण्यात आले. अनेक नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन व्यसनविरोधी कार्यक्रमात पुढाकार घेतला. सोबत ‘चला व्यसनाला बदनाम करू’ या माहिमेंतर्गत दारूच्या प्रतीकात्मक बाटलीला ‘जोडे मारो’ असेही आंदोलन घेण्यात आले. सोबत ग्रंथदिंडीही लावण्यात आली होती व व्यसनाचे दुष्परिणाम दाखवणारे पोस्टर लावले होते. व्यसनविरोधी अनेक घोषणा देण्यात आल्या. अनेकांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. यामध्ये डॉ. राजेंद्र कांकरिया, कोठारी सर, सोळंकी सर, राजू पेठे, राजू जाधव, श्रीराम नलावडे, सुरेश बावणकर इ. सामील होते. या उपक्रमाचे नियोजन करण्यात प्रदीप तासगावकर, विजय सुर्वे, सीमा बावणकर, निर्मला सोळंकी, भारत विठ्ठलदास, प्रकाश सातव यांनी सहकार्य केले. या मोहिमेत अनेक कार्यकर्ते सामील झाले होते.
वर्धा
दारूच्या व्यसनामुळे गोरगरीब जनतेचे होणारे आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक नुकसान टाळण्याचे आवाहन
‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’तर्फे दरवर्षी ३१ डिसेंबर हा दिवस व्यसन मुक्तिदिन म्हणून साजरा केला जातो. ह्या वर्षी सुद्धा ‘चला व्यसनाला बदनाम करू या’, ‘द दारुचा नाही तर द दुधाचा’, या मोहिमेंतर्गत बुधवार दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता कामगार चौक, दयाल नगर, शादिजा हॉस्पिटलजवळ, देवळी रोड, वर्धा येथे संपन्न करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. विनय शादिजा तर प्रमुख अतिथी डॉ. प्रवीण धाकटे, डॉ. नरेंद्रकुमार कांबळे, प्रमुख पाहुणे महेश दुबे, राजू वाघमारे, प्रियदर्शना भेले, उषा कांबळे, ज्योत्स्ना वासनिक, सुरेश रंगारी, शीतल बनसोड, चंद्रप्रकाश बनसोड, विलास नागदेवते, हरिश्चंद्र भुरे, संदीप कांबळे इत्यादी प्रमुख अतिथी या प्रसंगी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. प्रवीण धाकटे, डॉ. विनय शादिजा, डॉ. नरेंद्रकुमार कांबळे, महेश दुबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दारूच्या व्यसनामुळे गोरगरीब जनतेचे आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक नुकसान कसे होते, कुटुंबावर होणारा दुष्परिणाम, दारूच्या व्यसनामुळे आरोग्य बिघडून वेळप्रसंगी कमी वयात होणारे मृत्यू अशा अनेक दुष्परिणामांची माहिती या प्रसंगी देण्यात आली व पत्रके देऊन प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित पाहुण्यांचे स्वागत महाराष्ट्र् अंनिसचा विशेषांक देऊन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात ‘चला व्यसनाला बदनाम करू’ या पोष्टरवर टाचणी टोचून व्यसनाचा निषेध करण्यात आला. ज्योत्स्ना वासनिक यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक केले. शीतल बनसोड यांनी कार्यक्रमाचे संचालन, सुरेश रंगारी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता दशरथ गवळी, सुधाकर दडमल, जानरावजी नागमोते, अनिल भोंगाडे यांनी सहकार्य केले.
जालना
दूध वाटपाबरोबर व्यसनविरोधी प्रबोधन
जालना शहर शाखेच्या वतीने थर्टी फर्स्टला अंबड चौफुली, जालना येथे ‘द दुधाचा द दारूचा नाही’ हा उपक्रम राबविण्यात आला. येथील बस स्टँड परिसरातील नागरिकांना दुधाचे वाटप करण्यात आले. व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन करण्यात आले. या उपक्रमासाठी जिल्हा प्रधान सचिव मधुकर गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, मनोहर सरोदे, संजय हेरकर, सुभाष पारे, बंडू ननवरे, प्रशांत वाघ, हरिश्चंद्र ढगे, अॅड. सुभाष कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

नांदेड
२०२६ या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने भावसार चौक, मालेगाव रोड, नांदेड येथे भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस. बी. तांबे यांच्या हस्ते दूध वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
दरवर्षीच्या अर्थसंकल्पात दारूसारख्या व्यसनी पदार्थाची भाववाढ असते. तरीही व्यसनी पदार्थाचे उत्पादन आणि व्यसनी लोकांची संख्या कमी होत नाही. उलट वाढतच असते. कारण एकदा लागलेले व्यसन सहजासहजी सुटत नाही. बहुतेक वेळा तरुण व्यसनाची सुरुवात ३१ डिसेंबरपासून म्हणजे नववर्षाच्या स्वागतापासून किंवा न्यू इयर सेलिब्रेशनच्या नावाखाली करतात.
दारूसारख्या व्यसनाचे दुष्परिणाम व्यसनी व्यतीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतातच. शिवाय, त्याचे आर्थिक नुकसान व सामाजिक पत कमी होते. व्यसनी व्यती त्याच्या कुटुंबाला, शेजार्याला, नातेवाइकांना तसेच अनोळखी लोकांना सुद्धा त्रासदायक ठरतो. पर्यायाने याचा परिणाम देशाच्या मानवी संसाधनांवर होतो. व्यसन हा मानसिक आजार असल्यामुळे व्यसनी व्यतीकडून कोणतीही चांगली गोष्ट घडत नाही. व्यसनापासून दूर राहावे यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने विविध उपक्रम राबवते. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी “द दारूचा नाही द दुधाचा”(दारू नको दूध प्या) या घोषवाक्य अंतर्गत दरवर्षी दुधाचे वाटप करते. त्याचप्रमाणे यावर्षीही दूध वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
सम्राट हटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंनिसचे प्रा. सुलोचना मुखेडकर, उषाताई गैनवाड, डॉ. सारिका शिंदे-जावळीकर, इंजि. आनंद बिरादार, प्रा. डॉ. शिवाजी कांबळे, नारायण गैनवाड, इंजि. नागराज, इंजि. कंधारे, रमेश हटकर आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी योगशिक्षक व योगसाधक उपस्थित होते.
बिलोली
दारूच्या बाटलीऐवजी हातात दूध देत अंनिसने तरुणांसमोर आरोग्य, विवेक आणि सामाजिक जबाबदारीचा आरसा उभा केला.
थर्टी फर्स्टच्या जल्लोषाच्या नावाखाली आजची तरुण पिढी कोणत्या मार्गाला चालली आहे, याचा गंभीर विचार करायला लावणारा आणि तरुणांच्या डोळ्यात अंजन घालणारा सामाजिक उपक्रम बिलोली येथे पार पडला. दारू, नशा आणि बेफिकिरी याला नकार देत ‘द दारूचा नव्हे, तर द दुधाचा’ सशक्त व सकारात्मक संदेश देणारा दूध वाटपाचा व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम तहसील कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात व शांततेत संपन्न झाला.
या वेळी उपस्थित मान्यवरांना, तरुणांना कमलाकर जमदाडे यांनी संबोधित करताना सांगितले की, क्षणिक मजेसाठी स्वतःचे आरोग्य, कुटुंबाचे स्वप्न आणि समाजाचे भविष्य धोक्यात घालणे ही प्रगती नाही. खरी आधुनिकता ही व्यसनात नसून विचारात, संयमात आणि सामाजिक जाणिवेत आहे, असे आवाहन करण्यात आले.
विशेष म्हणजे, मागील ११ वर्षांपासून बिलोली शहरात हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, दरवर्षी हा कार्यक्रम केवळ एक औपचारिकता न राहता तरुणाईला अंतर्मुख करणारी सामाजिक चळवळ ठरत आहे. या वेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव कमलाकर जमदाडे यांच्यासह अनेक तरुणांनी स्वतःहून दूध स्वीकारत दारूला नाही, असा मौन पण ठाम संदेश दिला. या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी, नायब तहसीलदार दीपक मरळे, व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनुदत्त रायकंठवाड यांची उपस्थिती लाभली.
संकलन : राहुल थोरात




