भरत यादव - 9890140500

एक
स्त्री एक शेत आहे,
ज्यात पुरुष तणाप्रमाणे
उगवत असतो
काही स्त्रिया आपल्या शेतात
तण उगवू देत नाहीत
अशाप्रकारे त्या ओसाड होण्यापासून वाचतात.
दोन
एकटी स्त्री खोल अंधार्या विहिरीसारखी असते
प्रत्येकजण तिथून जाताना तीत डोकावत राहतात
तिच्या बांधणीत तिच्या इतिहासाचा
शीलालेख धुंडाळतात
खोलीची अथांगता शोधू पाहतात
एकट्या स्त्रीच्या अंतरातले स्रोत तेव्हाच फुटतात, जेव्हा तिची इच्छा असते.
तीन
स्त्रीच्या जुन्या जखमेवर
पुरुषाने नुसते बोटच ठेवले नाही
तर ओरखडले
स्त्रीच्या डोळ्यांच्या दोन्ही कडांवर
दोन थेंब मोत्यांप्रमाणे वर आले
एक गतकाळातले आणि दुसरे वर्तमानातले
पुरुषाने दोन्ही हातांमध्ये एक-एक
घेतले आणि विचार केला
स्त्रीत अद्यापही लवण शिल्लक आहे.
चार
एक पुरुष तिला उजाड जंगलात सोडून आला
तिथे भटकत असलेल्या स्त्रीला
दुसर्या पुरुषाने स्वप्न दाखविले
आता ती स्त्री स्वप्नात भटकत आहे.
पाच
स्त्री त्याला झोप यावी, यासाठी
अंगाईप्रमाणे
गाणं ऐकवत असते
तो शांत झोपी जातो
एक दिवस पुरुषानं तिला अंगाईप्रमाणं गाणं ऐकवलं
ती स्त्री तेव्हापासून आतापर्यंत
झोपू शकलेली नाहीये
पुरुष आता आणखी गाढ
निद्रा घेत आहे.
-मूळ हिंदी कविता : बहादूर पटेल
मराठी अनुवाद : भरत यादव
yadavbh515@gmail.com
संपर्क : 9890140500